nirnay - 2 in Marathi Fiction Stories by Vrushali books and stories PDF | निर्णय - भाग २

Featured Books
Categories
Share

निर्णय - भाग २

निर्णय - भाग २

दोन वर्षांपूर्वी कुठल्याश्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये त्यांची ओळख झाली. तिची नुसती बडबड चालू असल्याने सगळेच लगेच तिचे फ्रेंड्स बनले. परंतु कोणाशी न जमणाऱ्या त्याच्याशी मात्र तिची अशी गट्टी जमली की सोबत्यांनाही विश्वास बसेना की ते कालच भेटलेत. दोन दिवस दोघांचीही अखंड बडबड चालू होती की सोबत्यानीही त्यांना एकटच सोडणं पसंत केलं होत. निघायच्या आदल्या रात्री कॅम्प फायर संपवून सगळा ग्रुप आपापल्या तंबूत झोपी गेला होता. हे दोघे मात्र पुन्हा शेकोटी पेटवून तिथेच बस्तान मांडून तारे बघत पडले होते. रात्र जशी चढत होती तसे तारे अजूनच चमकत होते. घराच्या बाल्कनीतुन कधीच नजरेस न पडलेले दृश्य पाहताना ती हरवून गेली होती. सहजच तिने त्याच्या दिशेने पाहिलं तर तो शेकोटीच्या राखेत कसल्याशा रेघोट्या ओढत बसला होता. समोर अर्धवट धुगधुगती आग, त्यातून स्पष्ट दिसणारे लालभडक निखारे, त्या लालसर पिवळ्या प्रकाशात चमकणारी त्याची विचारमग्न चर्या..... न राहवून तिने त्याचा एक फोटो काढलाच. त्या क्लीक च्या आवाजानेही त्याची समाधी हलली नव्हती. म्हणून त्याला डिस्टर्ब करण्यासाठी तिने टोकल.

" चला, उद्या पहाटे निघायचंय.... नाही..." ती.

" हं..... " तो नुसताच हुंकारला. अजूनही तो त्याच्याच तंद्रीत होता कदाचित. समोर अर्धवट जळत्या निखाऱ्यांवरून त्याची नजर काही ढळत नव्हती.

" काय झालंय.....? " त्याचा चेहरा न्याहाळत तिने विचारलं.

तो गप्पच.... उत्तरादाखल केवळ ' च्चक ' केलं. मागच्या दोन दिवसात त्याला एखाद्या खळखळणाऱ्या झऱ्यासारखं पाहिलेलं तिने परंतू आता मात्र त्याला धीरगंभीर बघून उगाचच तिच्या मनात भीती दाटली. कदाचित त्याला आता एकट सोडायची गरज होती म्हणूनच त्याला बाय करत ती आपल्या तंबूच्या दिशेने वळली.

" थँक्स.." त्याच्या आवाजसरशी ती झटकन मागे वळली. त्याचे डोळे का कोण जाणे काठोकाठ भरून आल्यासारखे जाणवले. तिने वळून त्याला एक मस्त स्माईल दिली.

" का..?" आपले डोळे मोठाले करत तिने प्रश्न टाकला.

" तुझ्यासोबत पुन्हा हसायला शिकलो मी...." अजूनही त्याची नजर निखाऱ्यांवरच होती.

" मी आहेच स्मार्ट...." आपले मोकळे केस उडवत ती उगाचच खिदळली. तो ही किंचितस हसला.

" उम्म..... बर एक सांगशील का....?" तिने त्याच्या जवळ बसत पुन्हा प्रश्न केला.

" काय?" यावेळी त्यांने मात्र तिच्याकडे बघितलं. इतक्या जवळून तिच्या डोळ्यात बघताच तो स्वतःलाच हरवत होता.

" कोण होती ती??" तिच्या थेट प्रश्नाने तो बावचळला. नकळत त्याच्या कपाळावरच्या शिरा ताणल्या गेल्या. हृदयाची धडधड तीव्र झाली.

" बोल नं...." तिने आपला हात त्याच्या हातावर ठेवला.

" जाऊदे ना..." हलकेच हसत त्याने मान हलवली. आणि एक उडी मारून तिच्या समोर बसला. "कॅन वी बी फ्रेंड्स?"

" ऑ...." ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत बसली.

" ओय्ये... मी प्रपोज नाही करत आहे. फ्रेंडशिपबद्दल विचारतोय." त्याच्या ह्या निरागस वाक्यावर ती मात्र खळखळून हसत सुटली. तो मात्र कन्फ्युज होऊन तिच्याकडे बघतच राहिला..... आणि बघतच राहिला.... वाऱ्याच्या झुळकीने तिच्या चेहऱ्यावर उडणारे तिचे ते निळसर केस.... खळाळून हसल्याने चेहऱ्यावर पसरलेली आणि त्या अंधुक प्रकाशात किंचित उठून दिसणारी तिच्या गालावरची लाली.... हसल्याने पाणी भरलेले तिचे मासोळी डोळे..... आह्ह !!!

जुन्या आठवणीने आताही तिचे गाल लाल झाले होते. नकळत पुन्हा त्याचाच नंबर डायल झाला. तिच्या छातीत धडधड सुरू झाली. डोळे गच्च मिटत तिने फोन कानाला लावला. परंतु आताही पलीकडून फोन बंद असल्याचीच सूचना मिळाली. ती तशीच खाली बसली. त्याचा फोन बंद असल्याने नक्की काय झालंय हे ही कळायला काही मार्ग नव्हता. निघाल्यावर रस्त्यात कुठेतरी जोरदार एक्सिडेंट झालेला. मग त्याच कनवाळू मन आपली एंगेजमेंट विसरलं आणि आई बाबांना पुढे व्हायला सांगून तो मदत करायला अपघातस्थळी धावला. खरंतर त्याच्या अशा मदतीला धावण्याच्या सवयीचं सगळ्यांना कौतूक होत. परंतु आज त्याचीच सवय सर्वांच्या उपहासाच कारण बनली होती. भर साखरपुड्याच्या समारंभात सगळे पै पाहुणे गोळा झालेले असताना मुहूर्त टळून गेलातरी मुलाचा पत्ता नव्हता. भरीस भर म्हणून मागच्या दोन तासापासून त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. नातेवाइकांना टोमणे मारायला आणि चघळायला ही एक मोठी गोष्ट मिळाली. नेहमीच सगळ्या बाबतीत पर्टीक्युलर असलेला तो आज मात्र कर्तव्य निभावताना आपल्याच परिवारासाठी बेजबाबदार ठरला होता.

" खूप वाट बघितली... निघुया आता " तिने आईकडे पाहिलं. तिचेही डोळे लालसर झाले होते. तिच्या चेहऱ्यावरचं सार तेज मावळून गेलं होतं. पडलेल्या खांद्यानी आणि थरथरत्या हातानी आईने तिला पकडलं. ह्या क्षणी तिला खुप अपराधी वाटत होतं. आपल्या आईला तिने इतक्या वर्षांत कधीच अस हतबल पाहिलं नव्हतं. ती दाखवत नसली तरीही कोपऱ्यात सर्वांपासून लपून आपले डोळे पुसुन आली होती. प्रेमाची बाजू सावरण्यात कुठेतरी आई वडील देखील दुखावले गेले होते.

" पण... आई.." तिने आईला थांबवायचा प्रयत्न केला.

" हॉलवाला मगाशीच येऊन हॉल खाली करायला सांगून गेलाय..."

"आई.. अग...."

" shhhh.... घरी जाऊन बोलूया... आता चल " आईने जवळजवळ खेचलच तिला. सकाळपर्यंत सोनेरी स्वप्न बघणारे तिचे डोळे आता आसवांनी भरले होते. चेहऱ्यावरची रया तर केव्हाचीच उतरली होती. तिच्या चमचमणाऱ्या लेहेंग्याची चमक फिकी पडली होती. हॉलभर पसरलेल्या रिकाम्या खुर्च्या बघून तिला गलबलून आलं. नक्की कोणाचं काय चुकलंय हेच कळत नव्हतं. पण एक मात्र नक्की होत की काहीतरी चुकलंय.