१३
तिचे वर संशोधन?
कालच्या दिवसाने माझ्या अपेक्षा वाढवल्या होत्या. काही नाही तर 'मोडक मोडक' म्हणत ती येईल.. मग गप्पा मारीत बसू. उगाच घाई नको म्हणून लवकर उठून तयार होऊन बसलेलो. सकाळी उठून मी गप्पांसाठी विषयही निवडून ठेवलेले! आयत्या वेळी काही सुचण्या न सुचण्याची चिंता नको. नको तेव्हा तोंडी परीक्षेत ब्लँक व्हायची सवय माझी मोडायलाच हवी. पण तोपर्यंत परीक्षेत काॅपी करावी तसे रेडिमेड गप्पांचे विषय शोधून ठेवावेत. आणि मग जमेल तसे बोलत सुटावे. म्हणजे उगाच ती नको म्हणायला, व्हाय आर यू अव्हाॅयडिंग वगैरे.
तयार होऊन मी खाली आलो. आता मी कात टाकून अगदी टीपटाॅप झालेलो. लुंगीबिंगी कायमची बाद. स्मार्ट टी शर्ट नि जीन्स.. माझ्या मते मी ही त्यात स्मार्ट दिसत असावा. वेळ कशी सांगून येत नाही, तशी ती ही काय कधीही भेटू शकते. रामदास स्वामी सांगून गेलेत तसे सदा सावधान राहणे गरजेचे!
थोड्या वेळात काकू आली. आईदेखील उठलेली. बरीच मंडळी बाजूच्या घरात झोपली होती. आठ वाजेतोवर उठली नव्हती. येता येता बुरकुल्यांच्या खोलीवर नजर टाकलेली मी. तिकडे सामसूम होती. अगदीच काही आवाज नाही. आई आणि रमाकाकू आजच्या जेवणाच्या बेताबद्दल बोलत होत्या. त्यांच्या गप्पांत कळले.. सकाळीच ही बुरकुले फॅमिली कुठेतरी निघून गेली. कुठे गेली असावी? मी न विचारता गप्प राहिलो आणि कुठे गेली यापेक्षा परत कधी येतील यातच मला जास्त इंटरेस्ट होता. तरीपण आपसूक काही माहितीचे तुकडे.. (म्हणजे पीसेस ऑफ इन्फर्मेशन.. आता वै शी बोलायचे तर अशा भाषांतराची सवय हवी!) कानी पडतात का याची वाट पाहात बसलो. इतक्यात रमाकाकू म्हणाली, “काय मोदका.. लवकर उठलास?"
"अगं, झोप झाली असेल त्याची. काल रात्री लगेच झोपून गेला तो."
"आणि असा तयार होऊन कुठे निघालास सकाळ सकाळीस?"
"मी? कुठे नाही."
"मग असा झकपक.. स्मार्ट दिसतोयस हां आजकाल.. कुणाला भेटायला जायचंय?"
"काय तरीच काकू. इकडे कोण असणार माझ्या ओळखीचे."
"ते ही खरेच. पण ओळखी काय केल्या की होतात. हो की नाही? आणि लग्नघर म्हणजे लोक भेटतातच, दूरदूरचे."
काकू नक्कीच माझी चेष्टा करतेय.. तिला किंवा आईला माझ्या वै बद्दलच्या भावना कळल्या की काय? की माझी देहबोलीच काही बदललीय?
"मोदका, तुला बोअर तर नाही ना होत इकडे?”
“अगं तो कसला बोअर होतोय.. मस्त बाग आहे. पाणी घालायला हो की नाही?”
अशा वेळी निर्विकार चेहरा कसा ठेवावा? तरी जमेल तितके मी दुर्लक्ष केले. पण काकू मुद्दा सोडायला तयार नव्हती.
"हो ना. मी तर म्हणते हा मोदक आहे तोवर माळ्याला सुट्टीच देऊन टाकते.. काय मोदक? "चालेल, घालेल ना हा रोज पाणी झाडांना!"
दोघांनी मला असे अडचणीत आणायचे ठरवूनच टाकलेय की काय? नशिबाने काकू स्वतःच ट्रॅक बदलत म्हणाली,
“काय मोदका.. कशी आहे कृत्तिका?”
हा हिचा गुगली की काय?
मी गडबडत म्हटले, “मला काय माहित.. आज सकाळपासून कोणी नाही आहेत ते म्हणालीस ना तू..”
“ओ हो! म्हणजे लक्ष सगळे आपल्या बोलण्याकडे होते प्रमिला..”
“तू काही लक्ष देऊ नकोस रमे.. न बोलून शहाणा. वडलांच्या वळणावर गेलाय.”
कारण नसताना आईने येथे बाबांचा उद्धार केला.
मी इंग्रजीत स्ट्रेट फेस म्हणतात तसा बसायचा आटोकाट प्रयत्न करत बसलो.
इथून जावे का.. नाहीतर ही रमाकाकू वकिली बाण्याने नामोहरम करायची.. पण अजून वै परत कधी यायची याची माहिती मिळायची बाकी होती.
"हां. गेलेत बाहेर सगळे खरे. इतक्या लांबून आलेत, इकडची कामे करून टाकतील. नंतर वेळ मिळायचा नाही ना. तरी मी म्हणाले मिसेस बुरकुल्यांना, लवकर निघा म्हणजे सगळे संपवून येता येईल. हो की नाही रमे?"
"हो ना. गेलेत सकाळी, थोडा उशीर झाला. आता तयारी म्हटले की थोडा उशीर तर होणारच की नाही. त्यात वैदेहीची तयारी. थोडा वेळ लागणारच.."
मी कान टवकारून ऐकू लागलो. रमाकाकूने धागा सोडला नाही.. पुढे म्हणाली, “काही नाही रे आलेच आहेत तर एक दोन मुलगे बघून घ्यावेत वैदेहीसाठी म्हणून गेलेत.. परत परत कसे येतील? त्यांना इकडचेच स्थळ हवेय. प्रमिले, वैदेही तशी चांगली मुलगी आहे नाही? कुणीही हसत हसत पसंत करेल.”
"रमे, मी तर म्हणाले त्यांना, आलाच आहात तर नक्की करूनच जा. खरं की नाही मोदक?"
यावर मी काय म्हणावे अशी अपेक्षा असावी त्यांची? बोलता बोलता काकू आणि आई माझ्या चेहऱ्यावरच्या उडणाऱ्या रंगाकडे पाहात होते.. की तो माझा निव्वळ भास होता?
एकाएकी माझ्या हातापायातले त्राण गेल्यासारखे झाले. बुरकुले मंडळी खरेच वर संशोधनास लागलीत की काय? कालपर्यंत फक्त चार दिवसात खूप सारा पोर्शन पुरा करायचे टेन्शन.. ते नुसते पासिंग मार्कांचे होते, आज.. आता अभ्यास असा करा की नंबरही पहिलाच आला पाहिजे! इथेही काँपिटिशन?
रात्रीचे ते स्वप्न आठवून मी परत अजून काळजीत पडलो. पहाटेचे नसेल ही ते स्वप्न पण वै काय विचार करत असेल माझ्याबद्दल? ती मला खरंच हसत असेल की काय? आता काय करावे? आज दोन मुले पाहणार आहे ती. तिला काय कोणीही करेल पसंत. पण तिला मी पसंत पडेन ना? कठीण आहे. वै बद्दलचे हे माझे एकतर्फी खयाली पुलावाचे घाणे घालणे बंद करू की अजून अथक प्रयत्न करू? आणि अजून प्रयत्न म्हणजे मी काय करणार होतो? आज संध्याकाळपर्यंत आवडला असेल वै.. नाही, वैदेहीला कोणी तर? पत्ता डायरेक्ट कट माझा? द एंड आॅफ द शाॅर्टेस्ट लव्ह स्टोरी?