partner in Marathi Book Reviews by Ishwar Trimbak Agam books and stories PDF | पार्टनर - पुस्तकानुभव

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

पार्टनर - पुस्तकानुभव

पार्टनर - पुस्तकानुभव

व.पु.
फक्त दोन अक्षरंच खूप आहेत यांची ओळख सांगायला.

वसंत पुरुषोत्तम काळे.
अवघ्या मराठी वाचकांच्या मनावर दशकानु दशके अधिराज्य गाजवणारे लेखक, कादंबरीकार, कथाकार. वपूंचं कोणतही पुस्तक घ्या, कुठूनही वाचायला सुरूवात करा. अगदी कोणत्याही वयोगटातील माणसांनी देहभान विसरून वाचावं अशी त्यांची पुस्तकं. कॉलेज मध्ये असताना आणि नंतरही वपुंच्या पुस्तकांबद्दल खूप ऐकलं होतं. पण आम्हाला इतिहासाचा नाद, त्यामुळे त्यांचं एकही पुस्तक वाचायला योग आला नाही. सुरुवातीला ऑर्कुट, नंतर फेसबुक, आता व्हाट्सऍप, इंस्टाग्राम, ट्विटर अन इतर अनेक सोशियल मीडियावर वपुंचे विचार वाचनात येतात, अजूनही येत राहतील.

पुस्तक दिनाच्या निमित्ताने मेहता पब्लिकेशनच्या सेल मधून वपुंची वपुर्झा आणि पार्टनर हि दोन पुस्तके खरेदी केली होती. शिवाय, पुस्तक प्रेमी या फेसबुक पेज वर पार्टनर या पुस्तकाबद्दल खूप अनुभव, समीक्षा वाचण्यात आल्या होत्या. हातात घेतलेलं काका विधाते यांचं संताजी खाली ठेवलं अन कपाटातून पार्टनर बाहेर काढलं.
मेहता पब्लिकेशनचे जवळ जवळ दीडशे पानांच हे पुस्तक, किम्म्मतही तेवढीच. ऐतिहासिक पुस्तक पूर्ण न वाचतच दुसरे पुस्तक वाचायला घेणं हि कदाचित माझी पहिलीच वेळ. पुस्तक वाचता वाचता आपण कधी कथानकाशी एकरूप होऊन जातो कळतही नाही. कथेतला श्री कधी आपला वाटू लागतो तर कधी स्वतःला आपण श्री च्या जागी स्वतःलाच समजू लागतो.

पार्टनर फक्त पार्टनर, ना नाव, ना गाव. नेहमी पोरींना फिरवत, मजा करत, आपलं आयुष्य आपल्याच धुंदीत जगत असतो. मोठ्याभावाचे लग्न झाल्यावर अचानक श्रीच्या आयुष्यात येतो काय अन श्रीच आयुष्य बदलून जातो काय...!

पुस्तकाच्या पहिल्याच पानावर पार्टनरचं वाक्य आहे.

"पोरगी म्हणजे झुळूक.
अंगावरून जाते.
अमाप सुख देते.
पण धरून ठेवता येत नाही."

"कुणाचा मुलगा होणं टाळता येत नाही पण कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं."

पार्टनरचं एक वाक्य पुस्तकाच्या शेवटपर्यंत घुमत राहत.

"आपल्याला नको असलेली व्यक्ती हवी तेव्हा न जाणं, म्हणजे नरक."

"पण जेव्हा हवी ती व्यक्ती आयुष्यात येते, तेव्हा मात्र आयुष्य स्वर्गातून सुंदर वाटतं."

अशीच भावना श्रीच्या आयुष्यात जेव्हा किरण येते तेव्हा पाहायला मिळते. लहानपणापासून जे प्रेम, माया, आपलेपणा त्याला त्याच्या आई-बापापासून(मोठ्या भावामुळे) मिळालं नाही ते प्रेम त्याला किरण देते. तो आपलेपणा, मैत्री, साथ त्याला पार्टनर देतो.

पार्टनर म्हणतो,

"प्रेम वगैरे काही नसतं रे. शरीराची भूक भागवण्यासाठी एकत्र येणं बस्स."

"लग्न झालं की, स्त्री मधली प्रेयसी संपते आणि मूल झालं की तिच्यातली पत्नी संपते."

मोठ्याभावाचे लग्न झाल्यावर रात्री झोपण्यासाठी खोलीच्या गॅलरीत जागा देणारा पार्टनर कधी आपलासा होऊन जातो तर कधी कधी मोठ्या भावाचा वागण्याचा राग येऊ लागतो. श्रीची आई, भाऊ, वहिनी यांच्या वागण्यातील बारकावा वपुंनी आपल्या लेखनामध्ये एवढा बेमालूमपणे हाताळला आहे कि, आपल्याला आजूबाजुच्या माणसांमध्ये त्यांच्या वागण्याच्या तऱ्हा दिसायला लागतात. नकळत आपण त्यांची तुलनाच करायला लागतो. लग्नानंतर श्री आणि किरणची पहिल्या भेटीसाठी चाललेली धडपड, श्री च्या आईचं घरी येऊन वस्तूंच्या सतत किमती विचारणं, किरणचं सासुवर पाळत ठेवणं, यावरून श्री अन किरणची भांडणं, रुसवा-अबोला, हे सगळं श्री ने डायरीमधून लिहून ठेवणं, आपल्या पार्टनर ला या गोष्टीबद्दल पत्र लिहिणं, अन ते किरण ला सापडल्यावर तिचा होणारा राग, या अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनात घडतात त्या वपुंनी संवादामधून अक्षरशः जिवंत केल्या आहेत.

आपल्या मेडिकल मध्ये येणारे नेहमीचे कस्टमर यायचं बंद झाल्यावर, श्री त्यांची चौकशी करतो. त्यांची गोष्ट ऐकून तर अक्षरशः डोळ्यांत पाणी येत. वाटतं, खरंच किती प्रेम करतात हि लोक एकमेकांवर..!

संवादा मागून संवाद येत राहतात आणि कथा उलगडत जाते. सरळ साधी चाललेली कथा अचानक धक्का देऊन जाते. तेव्हा मात्र रडू आल्याशिवाय राहत नाही. स्वतः वाचल्याशिवाय तो प्रसंग कळणार नाही आणि ते दुःख जाणवणारही नाही.

पुस्तक वाचता वाचता आपण कधी श्री होऊन जातो कळतही नाही. पूर्ण पुस्तकभर पार्टनर आपली साथ सोडत नाही. प्रत्येक पानावरुन काहीना काही घेण्यासारखं आहे. जीवनात एक तरी असा निस्वार्थी पार्टनर असावा, असं नेहमी वाटतं राहतं. रक्ताच्या नात्यांपेक्षा असा एखादा पार्टनर सगळ्यांच्याच आयुष्यात असावा.

साधी सरळ असणारी हि कथा. आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी, कराव्या लागणाऱ्या तडजोडी, तर कधी मनाला चटका लावून जाणारे प्रसंग, एकदा तरी नक्की वाचावे अशीच आहे. आणि एकदा वाचायला घेतली तर संपवल्या शिवाय खाली ठेवणार नाही, हे हि नक्की.

- धन्यवाद
- ईश्वर त्रिंबकराव आगम
- वडगाव निंबाळकर, बारामती.
- ९७६६९६४३९८