Panchnama manuskicha in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | पंचनामा माणुसकीचा

Featured Books
Categories
Share

पंचनामा माणुसकीचा


* पंचनामा माणुसकीचा! *
दत्तोपंत दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत होते. त्यांची एक नजर वर्तमानपत्रावर तर दुसरी नजर समोर वाहिन्यांवर चालू असलेल्या बातम्यांवर होती. राजकारणविषयक दिवसभर चालत असलेल्या बातम्या, चर्चा ते न कंटाळता बघत असत. त्यादिवशीही ते बातम्यांचा मनसोक्त आनंद घेत असताना त्यांचा भ्रमणध्वनी खणखणला. त्यावर घर खरेदीविक्री करण्यासाठी, भाडेकरू देण्यासाठी काम करणाऱ्या मध्यस्थाचे नाव पाहून दत्तोपंतांनी भ्रमणध्वनी उचलला.
"हल्लो, साहेब, बोला. काय म्हणता, मिळाला कुणी किरायेदार?" दत्तोपंतांनी विचारले.
"तर मग. पंत, आपण एकदा काम हातात घेतले की, होणार म्हणजे होणार. अहो, माझा व्यवसायच आहे तो. पण यावेळी जरा आपले कमिशन वाढून पाहिजे हं."
"ठरु तर द्या. कोण आहे? शक्यतो सरकारी नोकर असावा."
"तसेच आहे. अगदी तुमच्या बिरादरीतला आहे. म्हणजे शिक्षिका आहे हो. तेही सरकारी शाळेत."
"शिक्षिका? बर पण मग तिचा नवरा काय करतो? कसे आहे साहेब,आजकाल अनेक कुटुंबात बायका नोकरीला आणि नवरा घरकामाला म्हणजे बेकार! ही अशीच उद्योग नसलेली माणसेच मग त्रास देतात हो..."
"दत्तोपंत, सारे फोनवरच का? दहा मिनिटात तिला घेऊन घरी येतोय. हा सूर्य हा जयद्रथ! बरोबर ना? हात कंगण को आयना किसलिए? आलोच हं." म्हणत मध्यस्थाने फोन ठेवला. तसे दत्तोपंत स्वयंपाकघराकडे बघत म्हणाले,
"अहो, ऐकता काय? घरासाठी गिऱ्हाईक येत आहे म्हटलं?"
"काय? गिऱ्हाईक? घरासाठी? हे घर विकायच का? कधी ठरवले? मला साधं सांगितलेही नाही. एवढा मोठा निर्णय परस्पर घेतलात? समजली बरे, माझी तुमच्याजवळ काय आणि किती किंमत आहे ती." स्वयंपाक घरातून बाहेर येत अन्नपूर्णाबाई म्हणाल्या.
"झाले तुझे कीर्तन सुरू? तुला कीर्तनसाठी विषयाचीही गरज नाही. काही समजून न घेता, समजले नाही तर पुन्हा कोणतीही चर्चा न करता नॉनस्टॉप सुरु होतेस?"
"वर पुन्हा मलाच दोष? मी कीर्तन करते ते दिसते पण तुमचा हा असा आगाऊपणा नाही दिसत. आयुष्य गेले पण कधी काही स्पष्टपणे सांगितले असेल, चर्चा करुन कोणती गोष्ट ठरवली असेल तर शपथ! शाळेत हेडमास्तर होता पण खरी हेडमास्तरकी गाजवली ती घरी आणि त्यातही माझ्यावर."
"झाले का पुराण सुरू? आपल्या त्या रिकाम्या पडलेल्या घरासाठी किरायेदार घेऊन मध्यस्थी येत आहे... थोड्याच वेळात. समजले?"
"समजले. आधी किरायेदार म्हणायचे ना? गिऱ्हाईक कशाला म्हणायचे? कोण आहे?"
" आहे म्हणे एक शिक्षिका."
"शिक्षिका? म्हणजे पुन्हा बाईच. का हो, त्या मध्यस्थाला बाईच कशी हाती लागते हो? म्हणजे बाईच कशी मिळते हो? पुरुष किरायेदार मिळतच नाही का? आपल्या त्या फ्लॅटला का पुरुष किरायेदाराची ऍलर्जी आहे का? आत्तापर्यंत याच मध्यस्थाने आणलेले पाचही किरायेदार बायकाच होत्या म्हणून मला वाटले की..." अन्नपूर्णाबाई बोलत असताना घरापुढे गाडी थांबल्याचा आवाज येताच पंत गडबडीने बाहेर जात असल्याचे पाहून अन्नपूर्णाबाई मनाशीच म्हणाल्या,
'ही बघा तुमची घाई. यांचा असा हा उतावळेपणा. खरेतर तुम्ही मध्यस्थाला सांगून ठेवायला हवे होते, निक्षून सांगायला हवे होते की, आम्हाला एकटी राहणारी बाई किरायेदार नको म्हणून...' अन्नपूर्णाबाईंचे स्वगत सुरू असताना दत्तोपंत त्या दोघांना आत्यंतिक आदराने आत घेऊन येत तितक्याच विनयाने म्हणाले,
"या. या. साहेब, या. या मॅडम, या. बसा. बसा. अग, पाणी आणतेस का?" अन्नपूर्णाबाईंकडे बघत पंत म्हणाले. तसे आतल्या आत दात खात आत जात अन्नपूर्णाबाई मनाशीच पुटपुटल्या,
'काय पण लगबग एका माणसाची. धड बुड टेकवू दिले नाही तर झाले आदरातिथ्य सुरू! जसे काय किरायेदार नाही तर यांच्या मुलीला बघायला पाहुणे आले आहेत. आता बाईने म्हणायला अवकाश हे नक्कीच पाचशे सोडा हजार रुपये किराया कमी करतील आणि अनामत रक्कमही मागणार नाहीत'
"पंत, या आपला फ्लॅट घेऊ इच्छित आहेत. शिक्षिका आहेत. तुम्हीपण शिक्षक होता म्हणून म्हटलं चांगला जोडा जमेल तुमचा. म्हणजे किरायेदार आपल्या खात्यात नोकरीला असला की..." मध्यस्थ बोलत असताना पाण्याचे प्याले घेऊन आलेल्या अन्नपूर्णाबाई मध्येच म्हणाल्या,
"घरमालकाशी चांगले संबंध जुळायला वेळ लागत नाही..."
"काकू, मलाही हेच म्हणायचे होते. बरे, पंत, ते तुमचे किरायाचे काय ते सांगा." मध्यस्थी म्हणाले.
"मी काय सांगणार? तुम्हाला माहिती आहे की..." पंतांना पूर्ण बोलू न देता अन्नपूर्णाबाई मध्येच म्हणाल्या,
"त्यांना काय माहिती? वास्तू आपली आहे ना? रोखठोक बोललेले बरे. हे बघा बाई, महिना सहा हजार, लाइट बील, तिथले मेंटेनन्स वेगळे पडेल. दोन महिन्याचा किराया बयाना म्हणून द्यावा लागेल. हे आहेत भिडस्त. माणुसकीचा पुतळा! कुणाला रोखठोक बोलून दुखवायचा यांचा स्वभाव नाही. स्वतःच्या खिशाला चाट लावून घेतील पण स्पष्टपणे सांगणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे किराया ऑनलाइन भरावा लागेल..."
"अग,कशाला? त्यांना कशाला त्रास? मी जात जाईन ना. तेवढीच चौकशीही करता येईल म्हणजे ह्यांना काही त्रास आहे का नाही तेही समजेल..."
"बरोबर आहे तुमचे. पण कसे आहे, आपण असतो दोन-दोन महिने नागपूरला. बाई, आमची मुलगी आणि जावई राहतात ना तिथे. आम्हाला अधूनमधून जावे लागते. उगीच दोन दोन महिन्याचे भाडे कशाला अडकून ठेवायचे. नंतर एकदम द्यायला तुम्हालाही बोजा नको."
"ठिक आहे. मी ऑनलाइन ट्रान्सफर करत जाईन. पण किराया जरा जास्त वाटतो हो..." असे म्हणत मध्यस्थाकडे बघत पुढे म्हणाली, "का हो साहेब ? जास्त वाटतात ना?"
"मी काय बोलणार ना? मी पडलो मध्यस्थी? मला कुणाचीच बाजू नाही ना घेता येणार? काकूंनी सहा सांगितले तर तुम्हाला किती परवडतात ते सांगा ना."
"मला वाटते पाच हजार रुपये महिना, लाइट बील, मेंटेनन्स ठिक राहील आणि हो बयानाची रक्कम एक महिन्याचा किराया म्हणजे पाच हजार रुपये देईन. यापेक्षा जास्त मला परवडणार नाही." त्यावर पंत काही बोलणार होते तितक्यात सौ. पंत पटकन म्हणाल्या,
"मी एकदम बरोबर सांगितले आहे. जाऊ देत साडेपाच हजार रुपये महिना द्या. बयाना रक्कम मात्र दहा हजार द्यावी लागेल. कसे आहे, ती तुमचीच रक्कम आहे. तुम्ही घर सोडताक्षणी तुम्हाला परत करावीच लागेल ना?"
"मॅडम, हो म्हणा..." मध्यस्थी म्हणाले
"तुम्ही कधी राहायला येणार?" पंतबाईंनी विचारले
"आम्ही एक तारखेला राहायला येऊ. मी आणि माझी आई दोघी जणी आहोत."
"काही हरकत नाही. किल्ली तुम्ही आताही नेऊ शकता. किराया एक तारखेपासून सुरू होईल. तुमचा फोन नंबर तेवढा द्या." दत्तोपंत म्हणाले.
"ठिक आहे. मी लगेच मिसकॉल देते. म्हणजे माझा नंबर तुम्हाला मिळेल..." म्हणत बाईंनी फोन लावला. पंतांच्या फोनची घंटी वाजताच त्यांनी पुन्हा बंद केला.
"वाजली का तुमची घंटी? आता सेव्ह करा. नाही तर विसरून जाल. दहा मिनिटांनी कुणाचा तरी दुसऱ्याच क्रमांकावरून फोन येईल आणि तुम्ही तोच नंबर बाईंच्या नावे सेव्ह कराल. मग होईल पंचाईत."
म्हणत सौ. पंत स्वतःच हसू लागल्या. पंतांनी फ्लॅटची चाबी मध्यस्थाकडे दिली आणि दोघे निघाले तसे पंत त्यांना दारापर्यंत सोडून आले. आल्या आल्या ते बायकोला म्हणाले,
"अशी ग कशी तू? वास्तविक तिथे चार हजारच भाडे चालू आहे. तीन-साडेतीन हजार रुपये खूप झाले असते. दहा हजार आगाऊ घ्यायला ती असे कोणते तुझे घर खराब करणार होती की नासधूस करणार होती? बयाना रक्कम घ्यायची काही गरजच नव्हती."
"असे का? तुमची माणुसकी आणि स्त्री दाक्षिणात्य ठेवा गुंडाळून. अशा वागण्यामुळे चार किरायेदार बायकांनी तुम्हाला गंडवलेय. ती पहिली काय नाव त्या बाईचं.. देताना उपकार केल्यासारखे दोन हजार बयानाचे दिले आणि दोन दिवसातच फोन करून घरी बोलावले. तुम्हाला पोहे खाऊ घालून तुमच्या खिशातून काढून घेतले दोन हजार. महिनाभर राहिली आणि भाडे न देता, काहीही न सांगता गेली पळून. त्याच्यानंतर आलेली ती महामाया चांगली दोन महिने राहिली पण बयाना भाडे तर सोडा किराया म्हणून एक रुपयाही न देता, लाइटबील, मेंटेनन्स माथी मारुन रफुचक्कर झाली.तुमच्या लाघवी, भिडस्त स्वभावाचा अनेकांनी फायदा घेतलाय."
"अग, असतील काही अडचणी. प्रत्येकालाच असतात..."
"आपण राहत नव्हतो किरायाने? त्यावेळी तुटपुंज्या पगारात भागवताना नाकीनऊ यायचे पण आपण कधी बुडवला कुणाचा रुपया? प्रसंगी एक वेळ उपाशी राहिलो असू पण कुणाची फसवणूक नाही केली."
"खरे आहे तुझे. आपली म्हणजे तुझी बरोबरी नाही येणार कुणाला? पगारच किती होता आपले लग्न झाले तेव्हा मला पण तू होतीस म्हणून आपला संसाररथ इथपर्यंत आला..."
"आणि आजही तुमच्या माणुसकीखातर तुम्ही तीन हजार किराया मान्य केला असता पण मी पाच हजारावर पटवले तिला..."
"काय हे पंतीनबाई, पटवले काय? शोभते का तुम्हाला हे? इस बात पर..."
"आणते चाय करुन. का हो, आज तुम्ही तुमच्या माणुसकीला जागला नाहीत. आज त्या दोघांना चहा नाही करायला सांगितलात?"
"अरे, खरेच की! थांब आत्ता बोलावतो..."हसत दत्तोपंत म्हणाले. तशा सौ. पंत हसत म्हणाल्या,
"धन्य आहे हो बाप्पा तुमची. आलेच चहा घेऊन..."
अन्नपूर्णाबाई आत गेल्या आणि पंत पुन्हा दूरदर्शनवर नजर लावून बसले...
महिना संपत आला. तशी दत्तोपंतांना अचानक आठवण झाली. ते मनाशीच म्हणाले,
'आँ! उद्या एक तारीख. मास्तरीनबाई राहायला येतील. अजून आगाऊचा किरायाही दिला नाही. कधी येणार राहायला तेही कळवलं नाही. चला. आपणच खबर घेऊया..'
पंतांनी ताबडतोब बाईंचा क्रमांक जुळवला. पण बाई 'आऊट ऑफ कवरेज' होत्या म्हणजे त्यांचा फोन लागत नव्हता. चहाचा कप घेऊन आलेल्या अन्नपूर्णाबाईंनी पंतांची तगमग मनोमन जाणली आणि त्यांनी विचारले,
"काय झाले हो?"
"काय होणार? बाई रेंजमध्ये नाहीत ग..."
"पंत, या वयात का बायका तुमच्या रेंजमध्ये येणार आहेत?"
"अग, उद्या एक तारीख आहे. ती बाई उद्या राहायला येणार म्हणाली होती..."
"येईल हो. तिचा पसारा असणारच केवढा असा? एकटा जीव सदाशिव! हं... हं... आली. तुमची तळमळ लक्षात आली म्हटलं. अजून तिने रक्कम दिली नाही वाटते. देईन की हो. कुठे जाईल? शेवटी आपल्याच घरात किरायाने राहायला येणार आहे ना..."
"किरायाचे काही नाही ग. आपले कुठे काय त्या किरायावरून अडलेय. देईल आज नाही तर महिन्याने पण राहायला यायला हवी..."
"एक काम करा ना, तिचा फोन लागत नाही न मग त्या मध्यस्थाला विचारा की. त्याला माहित असेलच की."
"अरे, खरेच की. माझ्या लक्षातच आले नाही..." असे म्हणत पंतांनी लगेचच फोन लावला.
"बोला. पंत काय म्हणता? अजून आमचे काम नाही केले. अहो, तुम्हाला एवढा चांगला किरायेदार मिळवून दिला... पण तुम्ही अजून माझे कमिशन नाही पाठवले. यावेळी किराया दाबून मिळालाय तसेच कमिशनही भरपूर हवे हो."
"साहेब, कमिशनचे होईल हो. पण अजून बाईंचा राहायला यायचा पत्ता नाही. बयाना रक्कमही दिली नाही. तर तुम्हाला कमिशन कसे देणार?"
"काय सांगता मॅडमने, अजून बयाना दिला नाही? मी परवाच्या दिवशी फोन केला तर म्हणाल्या की, काकांकडेच निघाले आहे. देते आज त्यांना किराया. त्यामुळे मला वाटले, दिला असेल. मी आपला तुमचीच वाट बघत बसलो. बरे, मी आलोय मुंबईत. दोन दिवसात परत आलो की, करुया काही तरी." असे म्हणत मध्यस्थाने फोन बंद केला. दत्तोपंत बायकोने आणलेला चहा घेत असताना त्यांचा फोन वाजला. त्यावर बाईंचे नाव पाहून पंतांनी लगबगीने चहाचा कप बाजूला ठेवून फोन उचलत असताना त्यांना अचानक ठसका लागला. अन्नपूर्णाबाईंनी हसत विचारले,
"बाईंचाच फोन आहे वाटते?"
"तुला काय माहिती?" हाताच्या इशाऱ्याने पंतांनी विचारले.
"तुमची लगबग, गडबड, चेहऱ्यावरील भाव का मला ओळखता येत नाहीत?" ते ऐकून पंतांनी हसतहसत फोन उचलला.
"बोला. काय म्हणता?"
"आम्ही पंधरा दिवसांनी राहायला येत आहोत. आज बयाना द्यावा म्हणते. काका, तुम्हीपण शिक्षक होता. मी तर शिक्षणसेवक आहे. तुम्हाला पगार तर माहिती आहेच. जरा बयानाची रक्कम दोन महिन्यांऐवजी एक महिन्याची दिली तर चालणार नाही का? प्लीज!"
"ठिक आहे. एक महिन्याचा बयाना द्या."
"थँक्स काका! तुम्ही पंधरा मिनिटात नेहरु नगरजवळ असलेल्या महाराष्ट्र बँकेत येऊ शकाल का? मी पोहोचतेय तिथे. काय झाले माझ्या मोबाईलला रेंजच नाही हो त्यामुळे ट्रान्सफर नाही करू शकत. याल ना?"
"येईल की. न यायला काय झाले? लगेच पोहोचतो. निघालोच..." असे म्हणत पंत ताडकन उठले.
"गुडघेदुखी कमी झाली का हो. ..."
"तसे काही नाही. त्यांच्या मोबाईलला रेंज नाही. ह्या महिन्याचा प्रत्यक्षात घेऊन जा..."
"अहो, मग एवढी काय घाई आहे? देईल की पुढील महिन्यात दोन्ही महिन्यांचे एकदम..."
"असे कसे? व्यवहार म्हणजे व्यवहार!"
"खरेच की. मग दोन महिन्याचा ऍडव्हान्स ठरलेला असताना एक महिन्याचा बयाना रक्कम देणे या व्यवहाराचे काय?"
"अग, तिची परिस्थिती नाही तशी. थांब. आलोच. ती वाट पाहात असेल..." असे म्हणत पंत घाईघाईने निघाले असताना सौ पंत म्हणाल्या,
"घरी मी पण जेवणासाठी वाट पाहतेय हे विसरु नका..." ते बोल ऐकून पंत हसत हसत निघाले...
काही क्षणातच पंत इच्छित स्थळी पोहोचले. बँक नुकतीच सुरू झाली होती. विशेष गर्दी नव्हती. दत्तोपंतांनी इकडेतिकडे पाहिले पण त्यांना हवी असलेली व्यक्ती कुठे दिसत नव्हती. पुन्हा पुन्हा सर्वत्र नजर टाकून पंत बँकेतल्या खुर्चीत बसले. 'रिकामटेकड्यांना मोबाईलचा आधार' याप्रमाणे पंत भ्रमणध्वनीवर बोटे चालवत फेसबुक, व्हाट्सएप, मेसेंजर, ट्विटर अशा साधनांमध्ये मुक्त विहार करत बसले. या चक्रव्यूहात अडकलेल्या इसमास स्थळ, काळ, वेळ, तहानभूक कशाचीही इतकेच काय पण कुटुंबाचीही आठवण राहात नाही. आबालवृद्ध सारेच भ्रमणध्वनीच्या चक्रात गरगरत असतात. पंताचेही तसेच झाले. तेही भान विसरून आलेल्या पोस्ट, संदेश याचे वाचन करताना, काही ठिकाणी उत्तर देताना किती वेळ गेला ते त्यांना समजले नाही. अचानक त्यांच्या कानावर आवाज आला,
"काका, काका..." पंतांनी दचकून वर बघितले तर त्यांची किरायेदार समोर उभी होती. परंतु चेहरा घाबरलेला दिसत होता.
"काका, सॉरी! तुम्हाला खूप वेळ वाट बघावी लागली पण वेळच तशी आली होती हो. म.. म.. माझी पर्स कुणीतरी हिसकावून नेली हो..." डोळ्यात पाणी आणून ती शिक्षिका सांगत होती.
"म्हणजे? झाले काय? पर्समध्ये जास्त पैसे होते काय?" पंतांनी आस्थेने विचारले.
"हो ना. तुम्हाला द्यायचे पाच हजार रुपये होते. झाले काय मी ती पर्स अशी गळ्यात अडकवून इकडे यायला निघाले. गांधी पुतळ्याजवळच्या सिग्नलवर थांबले. सिग्नल सुरू होण्यासाठी काही सेकंद बाकी असताना माझ्या शेजारी थांबलेल्या मोटारसायकलवरील एका युवकाने माझ्या पर्सला हिसका मारला आणि मला काही समजण्यापूर्वी निघूनही गेला. त्याचा झटका एवढा जोरात होता की, मी खालीच पडले. हे बघा. खरचटले मला..." स्वतःच्या हाताचे दोन्ही कोपर दाखवत ती म्हणाली. ते पाहून पंतांनी काळजीने विचारले,
"जास्त लागले नाही ना..."
"लागण्याचे सोडा पण तुम्हाला द्यायची आणि माझी महिनाभराची खर्चाची रक्कम पळवून नेली हो. आता महिनाभर ..."
"काळजी करु नका..." असे म्हणत पंतांनी स्वतःच्या खिशातील पाच हजार रुपये काढून तिच्या हातात ठेवले आणि म्हणाले,
"हे असू देत. हळूहळू परत करा. किरायाची बयाना रक्कम देऊही नका."
"थँक्स काका. खूप खूप आभारी आहे. मी उद्या राहायला येते."
"या. काही हरकत नाही. फ्लॅटची किल्ली आहे ना?"
"हो. आहे. येते मी." असे म्हणत ती पंतांचा निरोप घेऊन तिथून निघाली...
काही क्षणातच पंत घरी पोहोचले. त्यांना पाहताच सौ. पंत म्हणाल्या,
"मी म्हणाले होते ना, जेवण करूनच याल तुम्ही..." त्यांना मध्येच थांबवत पंत म्हणाले,
"कशाचे जेवण आणि कशाचा पाहुणचार? पाच हजाराला चाट बसली..." असे सांगून पंतांनी सारी हकीकत बायकोला सांगितली. ती ऐकून अन्नपूर्णाबाई म्हणाल्या,
"का हो, माणुसकीखातर केलेल्या कामाच्या प्रित्यर्थ सरकार पद्म पुरस्कार देते का हो? तुमची शिफारस केली असती. मला एक कळत नाही, तुम्हाला तिला पाच हजार रुपये द्यायची काय गरज होती? कोण लागून गेली होती ती? पुरती ओळख नसताना तिला शे-पाचशे सोडा चक्क पाच हजार रुपये देऊन मोकळे झालात? कशावरून ती खरे बोलत होती?"
"अग, तिची दशा, तिचा चेहरा, घाबरलेला चेहरा आणि मुख्य म्हणजे गाडीवरून पडल्यामुळे फुटलेले कोपरे..."
"पंत, जागे व्हा. पाच हजार रुपये मिळविण्यासाठी असले तमाशे सातत्याने होत असतात. कोपर फोडून घ्यायला असे किती कष्ट पडणार आणि असे किती रक्त वाहणार?"
"जाऊ देत. तिचा प्रामाणिकपणा तिच्यापाशी. चला. जेवूया..." असे म्हणत पंत हातपाय धुवायला गेले आणि पंतीनबाई स्वयंपाक घरात...
चार पाच दिवस असेच गेले. पंत शांत होते. किरायेदार बाईचा फोन येईल याची वाट पाहात होते. पण ना बाईंचा फोन आला ना मध्यस्थाचा. पंतांनी अनेक वेळा विचार केला की, फोन करून बाई राहायला आल्या का अशी चौकशी करावी किमान मध्यस्थाला तरी विचारावे पण का कोण जाणे त्यांनी तो विचार टाळला. पंतांना आलेली अस्वस्थता अन्नपूर्णाबाईंच्या लक्षात आली. त्यांचा स्वभावही त्या ओळखून होत्या. हाती घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय, ते मार्गी लावल्याशिवाय पंतांना चैन पडत नसे. ते काम अपेक्षेप्रमाणे पुढे सरकावे यासाठी पंत प्रामाणिकपणे, चिवटपणे, आस्थेने सर्व मार्गांचा अवलंब करत असत. ते म्हणतात ना, 'शिजेपर्यंत माणूस दम धरतो, पण थंड होईपर्यंत तो थांबत नाही.' अशी काहीशी अवस्था पंतांची होती. त्यांची ती घालमेल जाणून घेऊन अन्नपूर्णाबाई म्हणाल्या,
"अहो, एवढे अस्वस्थ होणे बरे नाही. एक काम करा, चार वाजता चहा झाला की, जाऊन प्रत्यक्ष पाहून या."
"अग, पण असे जाणे बरे दिसेल का? काय वाटेल त्यांना की, मी त्यांची नड भागवली, किरायाची आगाऊ रक्कम दिली नाही म्हणूनच हा माणूस चकरा मारतोय..."
"बरे दिसण्याचे काय? फ्लॅट आपला आहे. आपण जाऊन पाहू शकतो. वाटल्यास आपण दोघे जाऊया. मग तर झाले."
"ठिक आहे. आज नको. उद्या सकाळी जाऊया." असे म्हणत पंतांनी टिव्ही सुरू केला आणि सौ. पंत चहा ठेवायला आत गेल्या. वाहिन्यांवर एका खमंग राजकीय विषयावर जोरदार चर्चा चालू होती. विषय आवडता होता, चर्चाही रंगतदार अवस्थेत होती पण पंतांचे मन काही लागत नव्हते. त्याच अवस्थेत मुकपणे चहा घेऊन पंत नेहमीप्रमाणे इव्हीनिंग वॉकला बाहेर पडले. वातावरण रोजचे होते. नेहमीप्रमाणे पंतांना आवडणारे, उल्हासित करणारे होते पण पंतांची मनाची अवस्था बरोबर नव्हती त्यामुळे ते त्या वातावरणाचा आनंद, आस्वाद घेऊ शकले नाहीत आणि ते घरी परतले. पंतांना दररोजपेक्षा लवकर घरी परतलेले पाहून अन्नपूर्णाबाईंनी ओळखले की, स्वारीचा मुड अजूनही ठिकाणावर आलेला नाही. जोवर त्या बाईची भेट होणार नाही तोवर पंत असेच अशांत राहणार. त्यांना वर्षानुवर्षाच्या सहवासाने हे चांगले माहिती झाले होते की, आपला नवरा म्हणजे माणुसकीचा खळखळता झरा आहे. कुणाच्याही अगदी अनोळखी माणसाच्या, परिवाराच्या अडचणीत जमेल तशी मदत करणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हे तर रक्तातच होते. त्यांच्या अशा स्वभावाने त्यांनी असंख्य मित्र जोडले होते. जवळ येईल त्यास मार्गदर्शन करणे हे पंतांना फार आवडत असे. शिक्षक म्हणून काम करताना खेड्यातील अनेकांना त्यांनी सर्व प्रकारची मदत केली होती. प्रसंगी खिशाला झळ पोहोचली तरीही त्यांनी कधी त्याची पर्वा केली नाही. पंतांना निवृत्त होऊन अनेक वर्ष होत होती परंतु त्यांनी जमवलेली माणसे आजही त्यांच्या संपर्कात होती. अडचण आली की, फोनवर, प्रत्यक्ष भेटून पंताचे मार्गदर्शन घेत असत. अन्नपूर्णाबाईंना पतीचा हा स्वभाव खूप आवडत होता. लग्न झाल्यावर त्यांना पतीचा हा स्वभाव थोडा खटकत होता परंतु पंतांनी जोडलेली माणसे, त्या व्यक्तींजवळ पंतांबाबत असलेला आदर पाहून अन्नपूर्णाबाईंनीही पतीच्या 'हा' मध्ये 'हा' मिसळायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना स्वतःलाही खूप आनंद मिळत होता. पंतांचा स्वभाव उधळ्या किंवा वारेमाप खर्च करण्याचा नाही. हेही पंतीनबाईंनी ओळखले. 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा...' या ओवीशी साधर्म्य असणारा आपला पती आहे याचा अन्नपूर्णाबाईंना अभिमान होता, खूप कौतुक होते. दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळणारा असा आपला नवरा हे त्या सर्वांना अत्यंत अभिमानाने सांगत असत.
त्याच रात्री जेवणानंतर माध्यमावरील नेहमीच्या मालिका पाहून दोघेही झोपायला गेले. अन्नपूर्णाबाईंना पडल्या पडल्या झोप लागली पण पंतांना झोप लागत नव्हती. ते सारखी कुस बदलत होते. समोरच्या घड्याळात रात्रीचे अकरा वाजल्याचे पाहून पंतांनी पुन्हा डोळे लावले. झोपेची वाट पाहणे हे काम ते इमानेइतबारे पार पाडत असताना त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. 'आत्ता यावेळी कोण असेल बाबा?' असे पुटपुटत त्यांनी भ्रमणध्वनी उचलला. चष्मा काढून ठेवलेला असल्यामुळे त्यांनी डोळे किलकिले करून नाव वाचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या 'त्या' फ्लॅटच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचाफोन होता. पंतांनी फोन उचलताच तिकडून आवाज आला,
"पंत, झोपलात काय?"
"तीच तयारी करत होतो. बोला. काय म्हणता?"
"तुम्ही तुमचा फ्लॅट किरायाने दिलाय का?"
"हो. दिलाय. पण ते राहायला आले का नाही ते माहिती नाही. का हो काय झाले?"
"काही नाही. पण आत्ता तुमचा फ्लॅट सताड उघडा आहे. कुलूप लावलेले नाही. दिवसभर बहुतेक कुणी होते. मी दहा वाजता बाहेरून आलो तर फ्लॅटमधून बोलण्याचा आवाज येत होता. काही क्षणापूर्वी मी सहज डोकावले तर फ्लॅटचे प्रवेश दार चक्क उघडे दिसते आहे. आत कुणी आहे असे जाणवत नाही म्हणून मला तुम्हाला कळवणे गरजेचे वाटले. तुम्ही येऊ शकता का आता?"
"आत्ता? सकाळी आले तर नाही का चालणार? खूप उशीर झालाय म्हणून विचारतोय..."
"पंत, समजून घ्या. अजून जास्त उशीर होऊ नये म्हणून म्हणतोय."
"बरे. बरे. पोहोचतो दहा-पंधरा मिनिटात." असे म्हणत पंतांनी फोन केला तसे सौ. पंतांनी काळजीने विचारले,
"काय झाले? कुणाचा फोन होता? कुठे जायचे आहे?" बाहेर जायचे कपडे घालता घालता पंतांनी थोडक्यात सारे त्यांना सांगितले आणि घरातील एक कुलूप घेऊन गडबडीने बाहेर पडले. दहा-बारा मिनिटात ते फ्लॅटवर पोहोचले. तिथे चार-पाच लोक जमा झाले होते. पंत पोहोचताच कुणी काही न बोलता पंतांच्या मागोमाग सारे फ्लॅटमध्ये शिरले. पाहतात तर बराच पसारा इतस्ततः पसरला होता. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची थोटके, स्त्री-पुरुषांची अंतर्वस्त्रे, फरशीवर अर्धवट गुंडाळलेली गादी,विस्कटलेली चादर, गरगर फिरणारा छताचा पंखा ते पाहून पंतांसह सारे आश्चर्यात पडले. पंत थोडेसे घाबरले.
"काका, कुणाला किल्ली दिली होती का?" एका शेजाऱ्याने विचारले.
"होय. एक किरायेदार ठेवला होता... म्हणजे एक शिक्षिका आहे. एक तारखेला सामान घेऊन येणार होती. मी तिच्याकडेच किल्ली दिली होती."
"त्यांचा काही संपर्क क्रमांक वगैरे?" कुणीतरी विचारले.
"आहे. पण दुपारपासून बंद येतोय..." पंत म्हणाले.
"आता लावून पहा..." एकाने सुचवले. त्यावर दत्तोपंत काही बोलण्यापूर्वीच दुसरा इसम म्हणाला,
"नको. आता नको. बाईमाणूस आहे. उगीच घेण्याचे देणे पडायचे. सकाळी बोलवा. त्या बाईला आणि त्या मध्यस्थाला. कुलूप कुठे दिसत नाही."
"मी आणले आहे." पंत म्हणाले. तसे एकामागोमाग एक सारे बाहेर पडले. पंतांनी कुलूप लावले आणि स्कुटी सुरू करून घराच्या दिशेने निघाले. काही वेळातच ते घरी पोहोचले. सौ. पंत दारातच उभ्या होत्या. त्यांना पाहताच पंत म्हणाले,
"अग, इतक्या रात्री एकटी दारात कशाला उभी आहेस?"
"त्याला काय होतेय? ते जाऊ देत. काय झाले ते सांगा?" अन्नपूर्णाबाईंनी घरात येत विचारले. सोफ्यावर बसून पंतांनी त्यांना सर्व हकिकत सांगितली. तसे त्यांनी विचारले,
"काय असेल हो? आपण तर पंधरा दिवसांपूर्वीच दोनशे रुपये देऊन फ्लॅट स्वच्छ झाडून पुसून घेतला होता."
"हो ना. काय झाले ते एक तर त्या मास्तरीनबाईला किंवा मध्यस्थाला माहिती... "
"किल्ली तर बाईंजवळ दिली होती ना?"
"नाही. मी मध्यस्थाकडे दिली होती. पण पुन्हा घेतली असेल तिने तर काय माहिती? जाऊ देत. झोप आता." म्हणत पंत झोपायच्या खोलीकडे निघाले असताना सौ. पंत पुटपुटल्या,
"ईश्वरा, सारे व्यवस्थित होऊ दे रे बाबा."
दोघांनाही बराच उशिरा झोप लागल्यामुळे सकाळी उशिराच जाग आली. पंत वर्तमानपत्राचे निरिक्षण करत असताना सौ. पंतांनी विचारले,
"काही आला का हो कुणाचा फोन, मेसेज काही?"
"नाही ना. फोनच करावा म्हणतो थोड्यावेळाने." पंत म्हणाले.
"ते तर करा पण आता त्या मध्यस्थाच्या नावाने कानाला खडा लावा. त्याच्या ओळखीने यापुढे कुणालाही ठेवायचे नाही. दोन-चार महिने राहिला तर राहिला रिकामा. आपली काही चूल बंद राहणार नाही. मला काय वाटते, एकदा जावाईबापूंना फोन करून विचारा. ते न्यायालयात अधिक्षक आहेत. काही तरी मार्ग सांगतील."
"नको. सध्या नको. साऱ्या गोष्टी आपल्याला तर आधी पूर्णपणे समजू दे. उगाच त्यांना कशाला काळजी. आपली लेक तर काळजी करण्यात तुझ्याही पुढे आहे. बसायची न जेवता दिवसभर रडत. पाहू काय काय होते ते..." पंत समजावून सांगत असताना त्यांच्या भ्रमणध्वनीवर अनोळखी क्रमांकाचा फोन लावला. साशंकपणे त्या क्रमांकाकडे पाहत पंतांनी फोन उचलताच आवाज आला,
"दत्तोपंत बोलता काय?"
"होय. मीच बोलतोय. आपण कोण बोलताय?"
"मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून बोलतोय. तुम्हाला आत्ता पोलीस स्टेशनमध्ये यावे लागेल?"
"पोलीस स्टेशनमध्ये? कशाला? म्हणजे काय झाले ते कळेल का?"
"ते फोनवर नाही सांगता येत. काळजी करु नका. तुम्हाला लगेच घरी जाता येईल. एक मामुली चौकशी करायची आहे. या. लवकर या." असे सांगून तिकडून फोन बंदही झाला. पंत फोन बंद करून बाजूला ठेवत असताना सौ. पंतांनी रडवेले होत विचारले,
"अहो, हे काय नवीनच त्रांगड म्हणायचं? मी पण येते तुमच्याबरोबर..."
"काही नको. काही तरी छोटे काम असणार म्हणून बोलावले आहे..."
"अहो, तुम्हाला जिल्हा परिषदेच्या कार्यालयात नव्हे तर पोलीस ठाण्यात बोलावले आहे. तिथे कुणाला बोलावतात माहिती आहे ना?"
"माहिती आहे आणि मला हेही माहिती आहे की, मी तसे कोणतेही नियमबाह्य काम केलेले नाही. गेले वर्षी गणेशोत्सवाच्या काळात आपल्या गल्लीतल्या दोन पोरांना पोलीस स्टेशनमधून सोडवून आणले होते त्या संदर्भात काही काम असेल. येतो मी आत्ता..." असे म्हणून पंतांनी पत्नीचा निरोप घेतला. त्यांची स्कुटी दिसेनाशी होईपर्यंत अन्नपूर्णाबाई दारात उभ्या होत्या. दुसऱ्याच क्षणी त्यांनी देवघराकडे धाव घेतली. देवासमोर बसून हात जोडून आधी प्रार्थना केली आणि मग शेजारचे ताम्हण घेऊन एक-एक करत सारे देव ताम्हनात घेऊन ताम्हण पूर्ण भरेपर्यंत त्यांनी त्यात पाणी ओतले. आणि पुन्हा हात जोडून म्हणाल्या,
"हे प्रभो, पंत लवकरात लवकर घरी परत यावेत. अशा थंडीच्या वातावरणात तुम्हाला जास्त वेळ थंडगार पाण्यात बसायचे नसेल तर पंतांना लवकर घरी आणा मगच तुम्हाला बाहेर काढते..."
तिकडे दत्तोपंत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांना बसायला सांगून फौजदार म्हणाले,
"टेंशन घेऊ नका. वयस्कर माणसांना त्रास देणे आम्हाला आवडत नाही."
"साहेब, काय झाले?"
"काही विशेष नाही. तुमचे या शहरात स्वतःचे घर आहे का?"
"होय. आम्ही राहतो ते घर आणि एक फ्लॅट आहे."
"फ्लॅटवर कोण राहते?"
"कुणीच नाही. रिकामाच असतो. अधूनमधून किरायेदार राहतात..."
"किरायेदार तुमच्या ओळखीचे असतात की कुणाच्या ओळखीने ठेवता?"
"आमचे एक मध्यस्थ आहेत. त्यांचा हाच व्यवसाय आहे. "
"अच्छा! त्या मध्यस्थाचे नाव, फोन नंबर आहे का?"
"आहे..." असे म्हणत दत्तोपंतांनी समोर सरकावलेल्या कागदावर मध्यस्थाचे नाव आणि भ्रमणध्वनीवर शोधून त्याचा क्रमांक लिहिला. फौजदाराने विचारले,
"ह्या गृहस्थाच्या मध्यस्थीने किती किरायेदार ठेवले? सारे किरायेदार कौटुंबिक होते ना?"
"नाही, साहेब. सर्व म्हणजे चार पाच बायकाच ठेवल्या होत्या."
"अच्छा!..." असे म्हणत फौजदारांनी पुन्हा दहा बारा फोटो चिकटवलेला एक कागद पंतांसमोर ठेवला. सर्व फोटो बायकांचे होते. फौजदार म्हणाले,
"दत्तोपंत, यापैकी कुणी तुमच्याकडे किरायेदार म्हणून राहिली होती का?"
सारे फोटो बारकाईने एकदा-दोनदा पाहिल्यानंतर एका फोटोवर बोट ठेवून पंत म्हणाले,
"एक वर्षांपूर्वी ह्या बाई किरायेदार म्हणून आल्या होत्या. आगाऊ रक्कम द्यायचे तर सोडा पण दोन महिन्याचा किराया, सोसायटीचे मेंटेनन्सही न देता निघून गेल्या शेवटी ते मेंटेनन्स मलाच भरावे लागले. साहेब, अजूनही मला काही समजले नाही..."
"सांगतो. सारे सांगतो. अजून कोण कोण बायका त्याने ठेवल्या होत्या... किरायेदार म्हणून?"
"एक मिनिट हं..." असे म्हणत पंतांनी भ्रमणध्वनीवर असलेल्या इतर किरायेदार महिलांची नावे आणि संपर्क क्रमांक कागदावर लिहून दिले. त्यानंतर फौजदार म्हणाले,
"खरे तर मी आता जे काही सांगतोय ते सांगायला मी बाध्य नाही पण तुम्ही एक जुनेजाणते शिक्षक आणि एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून तुम्हाला सांगतो. पण ही माहिती तुम्ही कुणालाही सांगू नये. अगदी तुमच्या पत्नीलाही..." असे म्हणत फौजदारांनी सारी माहिती हळू आवाजात सांगितली. आणि शेवटी म्हणाले, "यापैकी कुणाचाही फोन आला तर उचलू नका. कुठे भेटायला बोलावले तर जाऊ नका आणि आम्हाला ती माहिती कळवा. या आता. आणखी एक करा..." असे म्हणत फौजदारांनी काही सूचना केल्या. फौजदारांचा निरोप घेऊन दत्तोपंत घरी परतले. अन्नपूर्णाबाई घरातून दारात, दारातून घरात बेचैन अवस्थेत चकरा मारत होत्या. पंत दुरून येताना दिसताच त्या दारात थांबल्या. पंत स्कुटी उभी करून आत येताच त्यांनी विचारले,
"काय झाले? काय म्हणाले? काही त्रांगड तर नाही ना?"
"काही नाही. मी म्हणालो तेच गेले वर्षीच्या पोरांबाबत माहिती हवी होती..."
"नक्की ना? मग काढू ना देव पाण्याच्या बाहेर?" अन्नपूर्णाबाईंनी विचारले.
"काय? म्हणजे तू देव पाण्यात ठेवले होतेस? काय हे अन्ने?"
"काहीही असू दे. माझी भक्ती आहे, श्रद्धा आहे म्हणूनच तुम्ही पोलीस स्टेशनमधून सहीसलामत बाहेर आलात..." असे म्हणत अन्नपूर्णाबाई देवघरात गेल्या...
दुसऱ्या दिवशीची सकाळ! पंत नेहमीप्रमाणे लवकर उठले. दात घासून स्वतःचा चहा करून घेतला. बायकोचा चहा झाकून ठेवला. तोपर्यंत अंगणात वर्तमानपत्र येऊन पडल्याचा आवाज ऐकताच कप टीव्हीच्या समोर ठेवून पंतांनी दार उघडले. वर्तमानपत्र उचलले. दार लावत असतानाच सवयीप्रमाणे पहिल्या पानावरील ठळक बातम्यांवर नजर टाकत चहाचा कप हातात घेत सोफ्यावर टेकत असताना त्यांचे लक्ष एका बातमीने आणि प्रकाशित झालेल्या छायाचित्राने वेधले. ते पाहताच त्यांना चक्कर आल्यागत झाले. हातातला कप निसटून फरशीवर आदळला. चहा आणि कपाचे तुकडे सर्वत्र पसरले. बातमीचे शीर्षक होते, 'शहरात सुरू असलेले सेक्स स्कँडल उघडकीस!' छापलेले छायाचित्र त्या मध्यस्थाचे होते. पंतांनी ती बातमी अधाशासारखी पण भीत भीत वाचून काढली. संपूर्ण बातमी वाचताच त्यांना एका गोष्टीचे समाधान होते की, संपूर्ण बातमीमध्ये त्यांच्या नावाचा किंवा त्यांच्या फ्लॅटचे नाव किंवा माहिती छापली नव्हती. पकडण्यात आलेल्या महिलांची नावे किंवा छायाचित्र छापले नव्हते. कप खाली पडल्याचा आवाज ऐकून अन्नपूर्णाबाईंनी लगबगीने बाहेर येऊन विचारले,
"काय झाले हो?..." पंतांनी त्यांना इशाऱ्याने जवळ बसवले आणि म्हणाले,
"अग, आपण फार मोठ्या प्रकरणातून वाचलो ग. हा मध्यस्थ चक्क बायकांचा दलाल निघाला ग. शहरात केवळ आपल्याच फ्लॅटमध्ये नाही तर अजून अकरा-बारा फ्लॅटमध्ये तो बायका किरायाने आणून ठेवायचा. नंतर त्यांना जाळ्यात ओढून, कधी बळजबरी करून वाममार्गाला लावायचा आणि मग धंदा करवून घ्यायचा. बाप रे! काय माणसे असतात ना एक एक..."
"मला एक सांगा, काल तुम्हाला याच प्रकरणात पोलिसांनी बोलावले होते ना? काही भानगड तर नाही ना?"
"अग, खरेच काही नाही. पोलिसांनी साधी चौकशी केली. काही गोष्टींची त्यांना खातरजमा करायची होती. त्यांनी त्याचवेळी मला आश्वासन दिले होते की, तुम्हाला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये किंवा न्यायालयात यायची गरज नाही. आम्ही आमच्या पद्धतीने केस हँडल करतो. तुम्ही आत्ता घरी न जाता त्या फ्लॅटवर जा पूर्ण स्वच्छता करुन दोन कुलूप लावून मगच घरी जा. तुमचे किंवा ज्यांचा या प्रकरणाशी केवळ घरमालक-किरायेदार-मध्यस्थ एवढाच संबंध आहे त्या कुणाचेही नाव आम्ही समोर येऊ देणार नाही आणि पोलिसांनी शब्द पाळला..."
"धन्य रे देवा, तुझी लीला न्यारी!" असे म्हणत अन्नपूर्णाबाईंनी दिवाणखान्यात लावलेल्या गणपतीबाप्पाच्या फोटोकडे पाहत हात जोडले पाठोपाठ पंताचेही हात नकळत जोडल्या गेले. दोघांच्याही डोळ्यात अश्रू दाटले होते...


नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर, लेन०२,
हॉटेल जय मल्हारच्या जवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१