Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 9 in Marathi Fiction Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ९

Featured Books
Categories
Share

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ९

कादंबरीने फक्त छान smile केले त्यावर. हसत बाहेर लक्ष टाकलं तिने. आभाळ गच्चं भरलेलं होते. तरी पाऊस सुरु झाला नव्हता. ती तंबूमधून बाहेर आली. " कुठे चालली... पाऊस येतो आहे.. " ," जास्त दूर जाणार नाही.. " म्हणत कादंबरी त्या ठिकाणापासून जरा दूर आली. एका झाडाखाली उभी राहिली. भरलेल्या पावसाकडे पाहत होती. तिचेही काही खास नातं होते पावसाशी. कारण अश्याच एका पावसात तिने घर सोडायचा निर्णय घेतला होता .


============================== ============================


" कुठे आहेस .... हॅलो .... आवाज येतो आहे का ... " सुप्रीने आकाशला कॉल लावला.
" हॅलो... हॅलो... सुप्री ... हॅलो... काहीच ऐकू येतं नाही.... " आकाशचे हेच उत्तर आणि कॉल कट्ट झाला. पुन्हा कॉल लावला तरी पुन्हा तेच, वैतागून तिने मोबाईल बाजूला ठेवला.
" काय करायचे या माणसाचे... " सुप्री वैतागत बोलली. संजना तिच्यासोबत स्टेशनवर होती. तिची नजर आभाळाकडे गेली. पाऊस जमावाजमव करत होता आभाळात. त्यात यांची ट्रेन उशिराने होती. पाऊस सुरु होण्याच्या आत ट्रेन आली पाहिजे असा विचार संजना करत होती. दुपारचे ४ वाजत होते. तेव्हाचीच ट्रेन होती. काही कारणाने उशीर झालेला. तेव्हा घोषणा झाली कि गाडी आणखी १५ ते ३० मिनिटे उशिरा आहे.


" याचा अर्थ ... आपल्याला पोहोचेपर्यंत रात्र होईल. " संजनाने अंदाज लावला.
" त्याचा फोनही लागत नाही बघ. कुठल्या डोंगरावर जाऊन बसला आहे कोण जाणे.... " सुप्री बोलली आणि स्वतःच हसली. संजनाही हसली. गाडी येईपर्यंत या दोघींच्या गप्पा गोष्टी पुन्हा सुरु झाल्या.


============================== ============================


" कादंबरी .... तुला कळते आहे का ... काय बोलते आहेस ते... ",
" हो काका ... पूर्ण शुद्दीत आहे मी .. तुम्हीच झोपेत असल्या सारखं बरळत आहात. " कादंबरीने उलट उत्तर दिलं.
" व्वा !! एवढी मोठी झालीस.... पाठी मागे तर बोलतेस, आता सरळ तोंडावर उलट बोलते आहेस.. " ,
" तुम्हीच शिकवलं हे ..... " ,
" कादंबरी !! " काकांचा पारा अधिक चढला. " तुला शिकवलं ना इतके ... हाच गुन्हा झाला आमचा... , म्हणून इतकी पोपटासारखी बोलते आहेस .. " काकांचे डायलॉग सुरु झाले.
" wow !! किती बर झालं असतं ना... पोपट असते तर... उडूनच गेली असती. " त्या उत्तरावर सारेच गप्प झाले.


" पण मी म्हणते.... काय कमी आहे त्या मुलात... चांगला जॉब आहे... घर सुद्धा आहे... " काकींनी सुरुवात केली. मधेच तिचे वाक्य कादंबरीने तोडलं.
" मी जवळपास तुम्हाला आता ५० वेळा सांगितलं आहे. नको आहे तो विषय. पुन्हा पुन्हा काय तेच.... वैताग आला मला. " ,
" म्हणजे लग्न करायचे आहे कि नाही... " कादंबरी शांत झाली.
" बोल ना ... काहीतरी... " काकांनी पुन्हा विचारलं. कादंबरीने एक कटाक्ष टाकला काकांवर आणि बाहेर निघून गेली.


गेल्या आठवडाभर हेच सुरु होते घरात. त्याचे tension, शिवाय ऑफिस मध्ये प्रचंड काम वाढले होते. बॉस सारखा मागे लागलेला असायचा. " जमत नसेल तर दुसरीकडे जॉब शोधा. " , हे वाक्य तर ठरलेलं. काम करून सुद्धा असं ऐकावं लागत असेल तर कसं मन रमणार तिथे, तरी दिवस ओढायचा म्हणून ओढत होती. त्यातून घरी आलं कि काका- काकींचे सुरु व्हायचे. लग्न कर .... लग्न कर .... त्रास नुसता. मानसिक त्रास... त्यातून एक विरंगुळा तो फोटोग्राफीचा. सुट्टी असली कि किंवा घरी पुन्हा मनस्ताप सुरु झाला कि कादंबरी निघायची फोटोग्राफी साठी. पाऊस इतका आवडायचा नाही तिला, तरी पावसात निसर्गात होणारी रंगाची उधळण तिला जास्त आवडायची... फोटोग्राफीसाठी.

" काय ठरवलं आहेस कादंबरी " आज पुन्हा काकींनी विषय काढला. कादंबरी ऑफिसमधून नुकतीच घरी आलेली. आल्या आल्याचं पहिला प्रश्न आला.
" काका - काकी .... शेवटचं सांगते .... मला नाही इतक्यात लग्न नाही करायचे.. " ,
" अगं पण का ... का नाकारत आहेस त्याला... " ,
" त्याच्यात काहीच कमी नाही , पण मला अजून खूप काही करायचे आहे Life मध्ये... या लग्नात वगैरे अडकली तर काहीच करता येणार नाही पुढे.... " ,
" म्हणजे अजून किती वर्ष तुला पोसावे लागेल ... ते तरी सांग ... " काका रागाच्या भरात जे बोलायला नको होते ते बोलून गेले. कादंबरीला वाईट वाटलं. सारखी हसत असणारी कादंबरी , त्यादिवशी मात्र एकटीच , शांत बाल्कनीत जाऊन बसली होती कधीची. पुढचे काही दिवस तसे शांतच गेले तिचे. ऑफिसमध्ये सुद्धा गप्प गप्प असायची.


अश्याच एका दुपारी, ऑफिसमध्ये चहाची वेळ झाली. कादंबरी तिच्याच विचारात. चहाचा कप घेऊन गच्चीवर आली. पावसाळा सुरू होणार होता. आज आभाळ आलेले भरून. खूप दिवस मनात काही धुसफुसत होते तिच्या. पावसाची चाहूल लागली तशी पुन्हा तिच्या ऑफिसमध्ये येऊन बसली. पुढच्या काही मिनिटात पावसाने सुरुवात केली. कादंबरी पुन्हा खिडकीपाशी आली. पाऊस रिमझिम पडत होता तरी थंडावा आला होता. कादंबरीचे डोळे भरून आलेले, कारण काही विचार केला होता तिने आणि पक्का विचार केला होता. पावसासोबत मनातल्या भावना डोळ्यावाटे वाहत होत्या. कितीवेळ ती पावसाला पाहत होती माहित नाही. ठरलं शेवटी. जागेवर येऊन बसली. पटापट resignation letter टाईप केलं. बॉसला मेल केला. बॉसच्या उत्तराची वाट बघत राहिली नाही. आपले सामान घेतले आणि बाहेर पडली ऑफिसच्या. कोणालाही न सांगता. बाहेर पाऊस सुरूच होता. तशीच भिजत भिजत ती घरी आली.


आज दुपारीच कशी आली हि, काकींच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह. काका त्याच्या कामाला गेले होते. कादंबरीने काकीकडे एकदाच पाहिलं. तिच्या खोलीत गेली. सर्व सामानाची बांधाबांध केली. संध्याकाळ झाली. काका आले घरी.
" काय सुरु आहे कादंबरी " ,
" सामान आवरते आहे " तिचे थंड उत्तर.
" का ? " ,
" निघते आहे मी .. " ,
" कुठे ? " काकीला तर धक्का बसला.
" माहित नाही पण इथे थांबणार नाही..... मला माहित नव्हतं कि मी कोणावर तर ओझं झाली आहे ते.. " यावर काका मान खाली घालून उभे राहिले. " पुन्हा मला कोणावर पोसायची वेळ येऊ नये म्हणून निघाली आहे, तुम्ही मला एव्हडी वर्ष सांभाळलंत त्यासाठी खूप आभारी आहे मी तुमची.. जन्मभर " ,
" पण अशी जाऊ नकोस... " काकी बोलत होत्या.
" नको .... आणि खरं सांगावे तर मला नाही जमत आता , इतकी tension घेयाला... माझे खांदे झुकत चालले आहेत... अपेक्षांच्या वजनाने... " ,
" पण जाणार कुठे ... " ,
" माहित नाही .... पाय दुखेपर्यंत आणि पाय नेतील तिथे जाणार ... कदाचित या शहरापासून दूर... जिथे माझ्याकडून कोणी आणि मी कोणापासून कोणतीच अपेक्षा ठेवणार नाही... अशी जागा शोधून काढीन आणि तिथे जाईन.... " एवढं बोलून कादंबरी घरच्या बाहेर पडली. कादंबरी बाहेर आली तेव्हा पाऊस थांबला होता तरी थंड हवा वाहत होती. तिने वर पाहिलं आभाळात, पाऊस भरत होता... नव्याने तयारी करत होता.


कादंबरीला अचानक आठवलं सगळं. एक तो दिवस आणि आजचा दिवस. आठवण होते त्यांची, तरी माघारी गेले नाही कधी. आई-वडील कुठे गेले , का गेले , माहित नाही... तेव्हा लहानपणापासून काका- काकींनी सांभाळलं. पण कधी तरी येणार होती हि वेळ. आलीच. कादंबरी समोरच पाहत होती. दुपारची वेळ तरी काळोखी दाटलेली. वर काळोख आणि खाली उजळ जमीन. जणू काही चित्रकाराने रंग उधळले असावेत या मोठ्या कॅनवास वर. समोर गावात झाडाच्या पानांची सळसळ सुरु होती. पक्षी घराकडे परतत होते. पावसाची चाहूल लागलेली ना . उन्हाळ्याचे बहावा - गुलमोहोर आता अंग झटकत होते. त्यामुळे पावसाच्या आधीच बहावा- गुलमोहोराचा लाल -पिवळा पाऊस पूर्ण गावभर उतू गेलेला दिसतं होता. गावातली लहान- सहान पोरं ... जमा होतं होती, पावसात चिंब भिजण्यासाठी. वाऱ्यासोबत सुकलेला पाला - पाचोळा , लहानश्या वावटळीत फेर धरत होता. एवढ्या दुरून सुद्धा कादंबरीला ते सर्व स्पष्ट दिसत होते. कादंबरी अजूनही तिथेच उभी होती. हसताना सर्वांसोबत आणि रडू आले तर अशी एकटीच राहायची ती. हसरे चेहरे , हसतानाच छान वाटतात. असे तिला वाटायचे. पावसाने सुरुवात करण्याआधी कादंबरी शांत येऊन बसली तिच्या तंबूत.



----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: