Jay Malhar - 3 in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | जय मल्हार - भाग ३

Featured Books
  • Wisps of Smoke - 38

    Wisps of Smoke (A love, romantic, psychological and paranorm...

  • NAVORA

    NAVORAPrologue — A Flower That Became a DreamSometimes, a bu...

  • The Story of Navaratri

    Navaratri is a nine-day Hindi festival celebrated throughout...

  • Specialz

    "Here you go- master" Yomi sets the cup of tea on the paper...

  • Price Tag on Passion

    The rain lashed against the French windows of Mayur’s pentho...

Categories
Share

जय मल्हार - भाग ३

जय मल्हार भाग ३

॥ चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥

॥ चंपाषष्ठी चा करिती जे करिती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥

चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव.
श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस .
या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले.
विजायोत्सवामध्ये देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले.

आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत.
मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये.
घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा ,आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत.
प्रतिपदेला प्रात:काली उठुन स्नानादि आटोपुन सर्व देव टाक पंचामृताने प्रक्षालित करुन देवघर स्वछ करुन घ्यावे. चंदन पाट किंवा चौरंगावर नवीन वस्त्र टाकुन कुळाचाराप्रमाने माती अथवा भंडारा पात्रामधे पाण्याचा कलश ठेऊन त्यावर नागवेलीची पाने नारळ ठेवुन विधीवत् घटस्थापना करावी.
घटाच्या डाव्या बाजुस जोड पानावर म्हाळसा देवीच्या प्रित्यर्थ सुपारी ठेवावी. व उजव्या बाजुस जोडपानावर बानु देवीच्या प्रित्यर्थ सुपारी पुजन करावे.

नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावतो तशीच षड्रात्र उत्सवातही देवासमोर अखंड ज्योती प्रज्वलीत करावी परंतु तत्पूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...
या सहा रात्रीच्या (षड्रात्र )उत्सवात शुद्ध तुपाची ज्योत लावावी.

मंत्र महोदधि (मंत्राच्या शास्त्र पुस्तका) नुसार अग्नीसमोर करण्यात आलेल्या जपाचा साधकाला हजारपट जास्त फळ प्राप्त होते.

तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा.

अखंड ज्योत संपूर्ण सहा दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे. यासाठी एका छोट्या दिव्याचा उपयोग करावा. अखंड दिव्यामध्ये तेल, तूप टाकायचे असल्यास किंवा वात ठीक करायची असल्यास छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून बाजूला ठेवावा.

अखंड दिवा ज्योत ठीक करताना विझला तर छोट्या दिव्याने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा.

सहा दिवस घटावरती वेगवेगळ्या फुलांच्या माळा टांगाव्यात.
मंत्र जप जागरण , भजन , गायन करावे.चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला पुरणावरणाचा नैवेद्य तसेच वांग्याचे भरीत भाकरीचे रोडगे असा नैवेद्य दाखवावा.
तळीभंडार करुन घटोत्थापन करावे.

चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस भोजन, वाघ्या-मुरळींस भोजन घालावे.
भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा.
तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे.
सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात.
तळी भरणे-उचळणे हाही नवस प्रकार करतात. नंतर नवरात्र उठवतात.
याचे पूजेचे साहित्य:

कुंभ कलश, विड्याची पाने, सुपारी, छोटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप-दीप, गुगुळ, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल, पंचामृत इत्यादी

कापूर-चंदनमिश्रीत पाणी एका भाड्यांत घेऊन ते पूजेसाठी वापरावे.
पूजा करतांना सुगंधी फुले, गुलाल, व भंडार वहावा.
भंडारा लावलेले तांदूळाचे दाणे वहावेत.
पूजा करतांना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत.

पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळसीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री-पाने देवास वहावी.

देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावेत.
देवासमोर वाटींत दूध ठेवावे. त्रयोदशगुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा.

देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात.

देवाजवळ अखंड तेला-तूपाचा नंदादीप सहाही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात, देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात.
आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात.

सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य , वांग्याचे भरीत-बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात.

खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात. महाराष्ट्रांत चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात.

कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो.

वारी मागणे.

काही घरांतून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे.
या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळी करतात. जेवावयास ब्राह्मण, वाघ्या-मुरळीस बोलावतात. जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या-मुरळीकडून ' वारी खंडोबाची ' म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात.
वारीचा अजुनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यांत वारी मागतात. ताम्हण घेऊन पाच घरी ' वारी खंडोबाची ' म्हणून ओरडतात.
साधारणपणे कोरडे पीठ वारींत दिले जाते. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरांतील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे अशा घरास खंडोबा अन्न-धान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे.
नवरात्रातील सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते.

दान-धर्म: या नवरात्रांत आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दान-धर्म करावा. अन्नदानास फार महत्व आहे. कुंकू-अक्षतांसह पान-विडा द्यावा.

दिवटी-बुधले: दिवटी- बुधले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधांत शांत (विझवावी.) करावी.

व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे.

लग्नकार्यांत अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे. याही प्रचलीत प्रथा आहेत.

या सहा दिवसात मार्तंड भैरव स्तोत्राचे , मल्हारी विजय ग्रंथांचे वाचन करावे.