कृष्ण कन्हैय्या
कृष्णाचे त्यांच्या जवळील प्रत्येकासोबत एक विलक्षण नातं होतं.
तो कुणाचा पुत्र, कुणाचा मित्र, कुणाचा सखा, कुणाचा गुरू तर कुणाचा भाऊ होता.
मात्र या प्रत्येक नात्यात अद्भूत रहस्य दडलं होतं.
महाभारतात कृष्णावर प्रेम करणारी अशी अनेक होती नाती आजही अजरामर आहे.
कृष्णभक्तीच्या महान नात्याचे पदर असे आहेत .
कृष्ण आणि देवकी
कृष्ण हा देवकी आणि वसुदेवाचा मुलगा होता. मात्र कंसांच्या भीतीने देवकी आणि वसुदेवाने कृष्ण जन्मानंतर लगेचच त्याला गोकुळात यशोदा आणि नंदाकडे सुपूर्त केलं होतं.
त्यामुळे देवकीला तिच्या बाळाला त्याच्या जन्मापासूनच स्वतःपासून वेगळं ठेवावं लागलं.
एखाद्या मातेसाठी तिचं बाळ हे सर्वात महत्त्वाचं असतं. बाळाला जन्मापासून स्वतःपासून वेगळं करणं हे नक्कीच देवकीसाठी त्रासदायक ठरलं असणार.
मात्र देवकीने कृष्णाच्या प्रेमापोटी हा त्याग सहन केला होता.
कृष्ण आणि यशोदा
कंसाच्या भितीपोटी वसूदेवाने कृष्णाला यशोदा आणि वसुदेवाकडे सुपूर्त केलं होतं.
यशोदेने कृष्णाला गोकुळमध्ये लहानाचं मोठं केलं होतं.
यशोदाला कृष्ण तिचे अपत्य नाही हे माहीत असूनही तीने त्याच्या वर स्वतःच्या मुलाप्रमाणेच प्रेम केलं आणि त्याला चांगले संस्कार दिले.
महाभारतातमध्ये कृष्ण आणि यशोदेच्या अनेक कथा आहेत.
ज्यामधून तिच्या वात्सल्याचे दाखले मिळतात.
या उदाहरणामुळे जन्मदात्या मातेप्रमाणेच संगोपन करणारी मातादेखील मुलांसाठी तितकीच महत्त्वाची आहे हे दिसून येतं. ज्यांना स्वतःची मुलं नाहीत त्या महिला इतरांच्या मुलांवर तितकंच प्रेम करू शकतात याचा हा एक उत्तम दाखला आहे.
कृष्ण आणि राधा
भगवान कृष्णाचे नाव घेतलं की राधेचा उल्लेख हा आपोआपच होतोच.
इतकं राधाकृष्णाचं नातं एकरूप झालेलं होतं. राधा ही कृष्णाची निस्सीम भक्त होती.
कृष्ण राधेच्या प्रेमाच्या कथा आजही मोठ्या भक्तीपूर्वक सांगितल्या जातात कारण त्यांचे प्रेम निस्वार्थी होतं. राधा ही कृष्णापेक्षा मोठी होती.
तिचे आधीच लग्न झालेले होते. म्हणूनच राधेचे कृष्णावरील प्रेम हे भौतिक नसून ते भक्तिपूर्ण होते .
आजही राधाभक्ती अथवा मधुराभक्तीला अध्यात्मामध्ये एक विशेष स्थान आहे.
मथुरेत कृष्णाच्या नावाऐवजी राधेचे नाव प्रथम घेतले जाते जसे की राधे राधे आणि मग राधा कृष्ण असा जप असतो.
कृष्ण आणि गोपी
गोपी या कृष्णाच्या सवंगडी होत्या .
कृष्ण हा भगवंत असूनही तो गोकुळातील एका सर्वसामान्य गवळ्याच्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला होता.
मात्र तो भगवंताचा अवतार असल्याने त्याच्यातील अद्भूत चैतन्य सर्वसामान्यांना भूरळ घालत असे.
लहानग्या कृष्णाच्या सहवासात आल्यावर गोकुळातील गोपिका आणि त्यांच्या गायी तहान भुक विसरून जात असत.
कृष्णाने त्याची बासरी वाजवण्यास सुरूवात केली की सर्वांचं भान हरपत असे.
कृष्णाच्या सहवासात आल्यामुळे त्यांच्यातील विकार दूर होऊन त्यांच्यामध्ये अद्वैत भावना जागृत होत असे. कृष्ण आणि गोपिकांच्या या नात्यावर अनेक गवळणी रचलेल्या आहेत. ज्यामधून त्यांच्या भक्तीची उदाहरणे समजू शकतात.
कृष्ण आणि मीरा
मीरा ही एक खूप मोठी कृष्णभक्त होती.
मीरेची अनेक भजने आजही लोकप्रिय आहेत.
मीरेचा जन्म राजपूत कुटुंबात झाला होता.
एका दंतकथेनुसार मीराने लहानपणी आईला माझा पती कोण असे विचारले होते. त्यावळी तिला तिच्या आईने कृष्णाच्या मुर्तीकडे बोट दाखवून तिला सांगितले होते की, “कृष्ण तुझा पती आहे.”
यामुळे लहानपणापासून मीरेने कृष्णाला आपले पती मानले होते.
पुढे लग्नानंतरही ती कृष्णभक्तीत लीन राहत असल्यामुळे तिला समाजाच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.
मात्र यामुळे मीरेच्या कृष्णभक्ती कोणताच फरक पडला नाही.
एका वेळेस तिला विषाचा प्याला पण प्यावा लागला .
पण कृष्ण कृपेमुळे तीला अपाय झाला नाही .
अनेक संता सोबत कृष्णाच्या भजन कीर्तनात मीरा रमून जात असे .
राधा कृष्ण राधा मीरा या विषयावर अनेक चित्रपट झाले आहेत .
अनेक हिंदी व मराठी गाणी यासंबंधात सर्वश्रुत आहेत .
कृष्ण आणि रुक्मिणी, सत्यभामा
कृष्णाला आठ पत्नी होत्या.
शिवाय एका राक्षसाने कोंडून ठेवलेल्या एकशे आठ राजकन्यांना त्यांची बदनामी होऊ नये म्हणून लग्न करून कृष्णाने आपले नाव त्यांना दिले होते .
रुक्मिणी आणि सत्यभामा या त्याच्या दोन पत्नीचं नातं कृष्णासोबत विलक्षण होतं.
पुराण कथेत या दोघींच्या अनेक कथा आहेत.
ज्यावरून कृष्णाचे त्यांच्यावर असलेले प्रेम दिसून येते.
कृष्ण आणि सुदामा
हे मैत्रीचे एक सुंदर उदाहरण होते आणि आजही आहे .
सुदामा हा कृष्णाचा लहानपणीचा मित्र होता.
गुरू सांदिपनी यांच्या आश्रमात या दोघांनी एकत्र शिक्षण घेतले होते.
सुदामा हा गरिब कुटुंबातील होता.
मोठे झाल्यावर सुदामा कृष्णाला भेटण्यासाठी पोहे घेऊन गेला होता.
मात्र कृष्णाने सुदामाने दिलेले पोहेदेखील एखाद्या पक्वान्ना प्रमाणे खाल्ले होते.
शिवाय सुदामा दुखावला जाणार नाही याची काळजी घेत कृष्णाने त्याची मदत केली होती.
कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचे दाखले आजही दिले जातात.
कृष्ण आणि अर्जुन
कृष्ण हा अर्जुनाचा गुरू होता.
असं म्हणतात की, अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्णाचे नामस्मरण ऐकू येत असे.
महाभारतात कृष्णाला अर्जुनाने केलेल्या उपदेशामुळे पांडव कौरवांसोबतचे युद्ध जिंकू शकले.
आपली भावंडे समोर युद्ध करायला उभी आहेत हे पाहिल्यावर अर्जुनाचे मनोधैर्य खचले होते .
तेव्हा कृष्णाने मामनुस्मर युद्धम च ..म्हणजे माझे ऐक आणि मनातले सर्व प्रश्न बाजूला ठेऊन युद्धाला सुरवात कर असा उपदेश केला होता .
जीवन हे एक युद्ध असून दररोज तुम्हाला जीवनात याला सामोरे जावे लागते. म्हणूनच कृष्णाने चाणाक्ष बुद्धीमत्तेने महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी अर्जुनाला केलेले मार्गदर्शन सर्वसामान्यांना जीवनात तारक ठरू शकते.
कृष्ण आणि द्रौपदी
द्रौपदी ही कृष्णाची मानलेली बहीण होती.
द्रौपदी ही द्रुपद राजाची मुलगी आणि पांडवांची पत्नी होती.
द्रौपदी एक महान कृष्णभक्त होती.
महाभारतात प्रत्येक कठीण प्रसंगी कृष्णाने द्रोपदीचे रक्षण केल्याच्या कथा आहेत.
कौरवांनी द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा घाट घातला होता तेव्हा कृष्णाने तिला वस्त्रे पुरवली होती .
तसेच एकदा कृष्णाच्या बोटाला जखम झाल्यावर तत्काळ द्रौपदीने आपला शालू फाडून ती जखम बांधली होती .
भावा बहिणीचे प्रेम यांच्याप्रमाणे असावे असे पूर्वापार म्हणतात .
भगवान कृष्ण आणि त्यांनी जीवनात वापरलेली कृष्णनीती सर्वांच्या जीवनासाठी अमुल्य आहे. कारण त्यामुळे तुम्हाला तुमचे आणि इतरांचे जीवन सुखी करता येऊ शकते.
अहंकाराचा सर्वात मोठा शत्रू आनंद आहे. आनंद आणि प्रेम असेल तेथे अहंकार टिकू शकत नाही. प्रेम, साधेपणा आणि अनंदापुढे अहंकार विरघळून जातो. कृष्ण म्हणजे आनंदाचे, साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण, प्रेमाचे उगमस्थान होय.
माखनचोर
कृष्णाचे एक रूप ‘ माखनचोर ‘ आहे.
पण तो एक लाडका चोर आहे .
दूध पौष्टिकतेचे, परिपक्वतेचे प्रतीक आहे.
ताक दुधाचे पक्व रूप आहे जे घुसळल्यावर लोणी वर तरंगते जे आणखी पौष्टिक, परिपक्व असते.
तसेच आपल्या विद्ववत्तेच्या परिपाकातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानप्राप्तीमूळेआपण शांत, स्थिर बनतो, विरक्त बनतो, कुशल बनतो.
माखनचोर रूप हे प्रेमाची प्रतिष्ठा वाढवणारे, विरक्ती मुळे प्राप्त होणारी मोहिनी आणि कौशल्य दर्शवणारे आहे.
मोरमुकुटधारी
कृष्णाच्या डोक्यावर कायम मोरपिसाचा मुकुट असतो .
राजावर संपूर्ण राज्याची जबाबदारी असते, जी मुकुटासारखी त्याच्या डोक्यावर असते, जी डोईजड वाटू शकते.
परंतू आईला आपल्या बाळाची जबाबदारी ‘ जड ‘ वाटते कां ?
तसे कृष्णाने त्याच्या सर्व जबाबदाऱ्या मोरपिसासारख्या लीलया आणि सहजतेने पार पाडल्या.
आपल्या प्रत्येकामध्ये असणारी सहजता, आकर्षकपणा आणि आनंद म्हणजेच कृष्ण होय.
जय श्री कृष्ण