आली दिवाळी भाग ६
दिवाळीचा शेवटचा दिवस असतो भाऊबीज .
दिवाळीच्या सर्व दिवसात स्त्री शक्तीला मान दिलेला आपण पाहतो .
वसुबारस ला गोमाता , नरकचतुर्दशीला आई ,लक्ष्मीपुजनला देवी लक्ष्मी ,पाडव्याला पत्नी आणि भाऊबीजेला बहिण
भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.
ब्रह्मदेवाने पृथ्वी निर्माण केली. या सर्व गोष्टींची परतफेड म्हणून सर्व ऋषी मुनींनी मोठा यज्ञ केला. मग या यज्ञात बळी काय द्यायचे हा प्रश्न पडला. यमराज तयार झाला आणि यज्ञात उडी घेतली. यमाने यज्ञात उडी घेतली, असे कळताच बंधू प्रेमामुळे यमाची बहीण यमी हिने देखील यज्ञात उडी घेतली. या आहुतीने यज्ञ समाप्ती झाली. देवही संतुष्ट झाले त्यांनी यमाला वर दिला सर्व लोक हा दिवस नक्कीच लक्षात ठेवतील.
तुझे आत्मदहन वाया जाणार नाही. त्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा करतील.
यम दिसायला सुंदर होता. मृत्यू हा मुख्यत: शुभ आणि पवित्र आहे. तो जर नसेल तर जग किती भयंकर होईल.
यम हा कार्तिक शुद्ध द्वितीयेला बहीण यमीच्या घरी जातो. यमी स्वागत करते, ओवाळते. यम तिला भेट देतो.
याच दिवशी नरकात पडलेल्यांना एक दिवसापुरते मुक्त करतो. म्हणून
या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात.
या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे.
यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की तिचे रडणे तिच्या डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना.
तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दल चे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली.
आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करायची .
कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात.
या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो.
भाऊ यथाशक्ती पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो.
असे म्हणतात की या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्त्व जागृत होतं. अशा परिस्थितीत बहिणीच्या सानिध्यात राहण्याने तिच्या हाताने बनलेले पदार्थ खाल्ल्याने आणि तिच्याकडून ओवाळून घेतल्याने भावाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतो.
नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले होते . अपमृत्यू निवारणार्थ या दिवशी यमाला दीप दान करतात .
या दिवशी बहीण भावाला औक्षण करते. भाऊ नसेल तर बहीण चंद्राला ओवाळते.
दिवाळीतील हा सर्वोत्तम सण होय.
बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा इतका मंगल आणि उत्कृष्ट सण नाही.
हिंदी आणि मराठी अनेक चित्रपटातून भाऊबिजेचा प्रसंग चित्रित केला आहे .
यासंबंधी ची गाणी सुद्धा लोकप्रिय आहेत जसे ..
सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योति
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया…
“जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे !
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहो दे !”
असा हा दिवाळी सण, कुटुंबाला एकत्र आणणारा
नातेवाईकातील स्नेहाचे धागे जोडलेले ठेवणारा ..
दिवाळी हा सणांचा राजा मानला जातो .
हिंदु माणुस जगात कुठेही असु दे दिवाळीच्या दिवशी तो आपल्या घरी जातो व घरच्या सोबत हा सण साजरा करतो .
पाच सहा दिवसाच्या या सणात भारतात मुलांच्या शाळांना पण सुट्ट्या दिल्या जातात .
या काळात बाजारपेठेत करोडो रुपयांची उलाढाल होते .
कपडे ,दागिने ,फटाके, फराळाचे पदार्थ ,मिठाया ,वेगवेगळ्या वस्तू यांची देवाण घेवाण याच सणात होते .
कारण या सणात प्रत्येक दिवशी नात्यातील वेगवेगळ्या लोकांना भेटी दिल्या व घेतल्या जातात .
या दिवसात घर दुकाने खरेदी करणे शुभ असल्याने अनेक प्रकारची प्रलोभने यावेळी दाखवली जातात .
एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडल्या तर त्याची “दिवाळी “झाली असे म्हणले जाते .
असा हा मांगल्य पावित्र्य आणि नातेसंबंधातील प्रेमाचा सण..
समाप्त