Hasyeshwaraas patra in Marathi Letter by Nagesh S Shewalkar books and stories PDF | हास्येश्वरास पत्र

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

हास्येश्वरास पत्र





**************** हास्येश्वरास पत्र ! ************
प्रति,
हास्येश्वरा,
तुला मनापासून हसऱ्या चेहऱ्याने स.न. वि. वि.
आम्हा मानवाच्या जीवनात तुझे स्थान जणू आत्म्यासारखे! नव्हे तू आमचा आत्माच आहेस. जिथे तू नाहीस तिथे राम नाही, त्या वातावरणात जिवंतपणा नाही. अगदी आमचा जन्म झाल्यापासून ते थेट आम्ही चितेवर जाईपर्यंत तू आमची साथ करतोस.... इमानदारीने... प्रामाणिकपणे! अगदी बाळ जन्माला आले की, पहावयास येणारे बाळाला पाहताच म्हणतात, 'व्वा! हसरा चेहरा आहे. जीवनात आनंदी असेल हो.'
त्याचप्रमाणे मृत्यूनंतर अंत्यदर्शनासाठी येणारे कुणीतरी म्हणते, 'आनंदी जीवन जगले हो. आताही चेहऱ्यावर समाधान, हसरी छटा आहे.'
असा आहे हास्यसम्राटा तुझा महिमा. आमच्या शरीराच्या प्रत्येक अणूमध्ये तुझे वास्तव्य आहे. डोळे असोत, ओठ असोत, चेहरा असो वा शरीराचा कोणताही अवयव असो, तुझ्या उपस्थितीत सारी काया प्रफुल्लित होते, ताजीतवानी होते. काही क्षणासाठी आम्ही आमचे दुःख विसरून जातो. तुझे वास्तव्य म्हणजे धम्माल असते. तुझ्या आगमनाला स्थळ, काळ, वेळ, नाते कशा-कशाचेही बंधन नसते. तुझे रूप तरी एक आहे का? जसे ईश्वराला कोणतेही रूप नाही, आकार नाही तसेच तुझे आहे. तू दिसत नसलास तरी तुझी उपस्थिती हमखास जाणवते. तुझे जवळ असणे किती आल्हाददायक असते हे मी नाही सांगू शकत. परंतु साक्षात परमेश्वराला मानवाने अनेक रूपे दिली आहेत त्याचप्रमाणे हे हास्या, तुलाही आम्ही अनेक शाब्दिक रूपे, नानाविध नावे दिली आहेत. ...
'हास्याचा धबधबा, हास्याचा कडकडाट, हास्य कारंजी, हास्याचा गडगडाट, गगनभेदी हास्य, सातमजली आणि बत्तीस मजली हास्य,हसण्याची धमाल, हास्योत्सव, हास्ययोग, हसून हसून पोटदुखी, मुरकुंडी वळली, हसण्यासाठी जन्म आपुला, स्मितहास्य, हसता हुआ नुरानी चेहरा, हसून हसून गोरामोरा,हास्यकल्लोळ, हास्यक्लब, मादक-मधाळ हसणे, जीव घेणारे, दिलखेच हास्य अशा विविध प्रकारानुरूप, प्रसंगारूप, व्यक्तीनुरूप तू आमचे जीवन व्यापून टाकताना जगणे सुसह्य केले आहे. तुझ्यामुळे होय, हास्यनंदा, तुझ्यामुळे ठिकठिकाणी, क्षणोक्षणी गमतीदार घटना घडतात. अशा साऱ्या गमतीदार, मजेशीर गोष्टी कथा, कादंबरी, सिनेमा, नाटक यामधून लिहिणारी, व्यक्त करणारी लेखक, नायक मंडळी आहे. वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिके, त्रैमासिके, दिवाळी अंक, ई मासिके आणि अनेक विशेषांकाच्या माध्यमातून तुझी असणारी उपस्थिती वाचकांना आवडते, भावते.
तुला एक घटना सांगतो, एकदा एका पहिलवानाने एका विनोदी लेखकाला विचारले, 'का हो, लेखकराव, तुम्ही एक सारखे विनोदी लेखन करता, वाचकांना खळखळून हसवता, तुमचे घर कायमच खिदळत असणार. वहिनींना हसण्याशिवाय दुसरे कामच नसणार.' हे हास्यरंगा, त्या लेखकाने काय उत्तर द्यावे? तो तर पडला विनोदी लेखक! तो म्हणाला,
'बरोबर आहे, पहिलवान! आम्ही खातो-पितो-तोंडी लावतो ते हसणे. हास्य आमचा श्वास आहे, ध्यास आहे, प्राण आहे. पण तुमचे काय, तुम्ही तर पडला पहिलवान...कुस्त्यांचे फड गाजवणारे! तुमच्या घरीही कुस्तीची तालिम नेहमीच होत असणार. बिचाऱ्या वहिनी! त्यांना तर कुस्त्यांमधून क्षणाची ही उसंत मिळत नसणार.सारखं कुस्ती एके कुस्ती...' ते लेखक बोलत असताना बिचाऱ्या पहिलवानाने तिथून काढता पाय घेतला.
कुणीतरी म्हटलय, हसणे पेरणारा, हास्य फुलवणारा विनोद नागडा असला तरी चालेल परंतु तो दारासिंगप्रमाणे सशक्त आणि फड गाजवणारा असला पाहिजे. यासोबतच हे हसण्या, तुझी बाष्कळ विनोद, कमरेखालचा विनोद, किळसवाणा विनोद आणि फालतू विनोद अशीही रुपे आहेतच म्हणून खुद्द संत रामदास यांनी तुझी नोंद घेताना म्हटलय की, 'टवाळा आवडे विनोद!' एकदा महाराष्ट्राला खळाळून हसवणारा एक विनोदी नट आजारी पडला. त्याला दवाखान्यात घेऊन गेले. तिथे त्याला स्ट्रेचरवर नेत असताना आजूबाजूचे लोक खदखदून हसत होते, त्यांच्या लेखी तो आजार म्हणजे एखाद्या सिनेमातील किंवा मालिकेतील विनोदी प्रसंग आहे . हे सम्राटा, चराचरात तू केवळ मानव प्राण्यालाच प्रसन्न आहेस. तुझे वरदान केवळ आम्हालाच लाभले आहे. आम्ही मानव तुला प्राप्त करून घेण्यासाठी, जीवनात प्रफुल्लता आणि टवटवीतपणा आणण्यासाठी कारण शोधत असतो. हे हास्यदेवता, या सृष्टीमध्ये अवतार घेण्यासाठी कारणांची मुळीच कमी नाही. आबालवृद्धांसाठी हसणे ही एक उर्जा आहे. स्फूर्ती, चैतन्य, प्रेरणा ही आहे. असे असले तरी काही मानव प्राणी अपवादही आहेत बरे! स्मित हास्य, मंद हास्य, माफक हास्य आणि अनेकदा शेजारची माणसे सात मजली हास्य करीत असतानाही एखादा माणूस निर्विकार, स्थितप्रज्ञ अवस्थेत बसून राहतो. चेहऱ्यावर हास्याची साधी लकेरही तो येऊ देत नाही. असा अपवाद वगळता तुझा वावर तसा संसर्गजन्य रोगाप्रमाणे असतो. शेजारची, समोरची व्यक्ती हसत असताना माणूस कितीही गंभीर प्रवृत्तीचा असला तरीही त्याच्या चेहऱ्यावर तू अवतरल्याशिवाय राहातच नाही.
माणूस सकारात्मक आणि खिलाडूवृत्तीचा असला की, तिथे तुझी हमखास उपस्थिती असते. रस्त्यावर चालताना छोट्याशा चुकीमुळे कुणी घसरून पडले की, आजूबाजूचे लोक हसतात. हे हसणे उचित की अनुचित हा भाग निराळा. पडणारी व्यक्ती सकारात्मक विचाराची असेल तर ते हसणे मनावर न घेता एक तर त्यांच्या हसण्यामध्ये सहभागी होते किंवा खजिल होत तिथून निघून जाते. दुसरीकडे स्वतःच्या अपमानावर कुणी हसत असेल तर तो आपला अपमान समजून हमरीतुमरीवर येणारी माणसंही आहेत. स्वतः दुसऱ्याला हसायचे, त्याची चेष्टा करायची परंतु कुणी आपल्या कृतीवर हसत असेल तर तेही पचवता आले पाहिजे. परंतु असे अनेक ठिकाणी होत नाही. हे हास्या, संत कबीर त्यांच्या एका रचनेत म्हणतात की, बालक रडत रडत जन्माला येत असले तरीही त्याच्या आगमनाने घर हसते, जग हसते. मात्र त्या बालकाने मोठे होत असताना जीवन असे जगले पाहिजे की, त्याने हसत हसत हे जग सोडताना जगाने रडले पाहिजे. अर्थात जगाचे हे रडणे अंतःकरणापासून आलेले असावे.
दुसरीकडे एखाद्या सौंदर्यवतीच्या चेहऱ्यावर तुझे फुललेले रूप जीव ओवाळून टाकावेसे वाटणारे असे असते. एखाद्या तरुणीच्या मधाळ हसण्याला एखादा तरुण फसतो आणि मग त्यांच्या जीवनात तू बहरून येतोस आणि मग ते दोघे एकमेकांचे जीवनसाथी बनतात. तुझी निर्मिती करणारे, तुला आवाहन करून जनसामान्यांच्या चेहऱ्यावर तुला प्रस्थापित करणारे अनेक लेखक आहेत. काही लेखकांवर तू प्रचंड माया केलीस, त्यांना भरभरून बरेच काही दिले. त्यांच्या माध्यमातून तू महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात स्वतःचे खास अस्तित्व निर्माण केले. त्यामुळे माणूस स्वतःचे दुःख, जखमा, रडणे, आजार, भांडणे, द्वेष, क्रोध, राग, संताप, चिडचिड अशा अनेक त्रासदायक गोष्टी विसरतो. हसणाऱ्या, हसवणाऱ्या माणसांचा एक खास वर्ग असतो. ते स्वतःसोबत इतरांना ही भरभरून देतात. तुझ्यामुळे जीवनाकडे पाहण्याची मानवाची दृष्टी खेळकर, आनंदी बनते. म्हणून तू सर्वत्र अति प्रिय आहेस. जीवनातून तुला वर्ज्य केले तर जीवन कसे वाळवंटासारखे रखरखीत होईल. विनोद आणि हसणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू! 'जिथे विनोदाची वस्ती, तिथे हमखास हसण्याची मस्ती!' असे तुम्हा दोघांचे नाते आहे. विनोदातून हसणे फुलते तर हसण्याच्या शिडकाव्यामुळे विनोद फुलतो, बहरतो.
हे हसणेश्वरा, आज स्पर्धेच्या युगात, तंत्रज्ञानाच्या जगात, स्मार्ट फोनच्या जमान्यात त्या मानाने तुझा वावर खूपच कमी झाल्याचे जाणवते आहे. आधीची एकत्रित कुटुंब पद्धती आता 'हम दो हमारे दो किंवा हमारा एक' इथपर्यंत आली असून पतीपत्नी बारा-बारा, चौदा-चौदा तास घराबाहेर असल्यामुळे तुझे अस्तित्व दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. जिथे कुठे तू प्रकट होतोस तिथे बऱ्याच वेळा केवळ औपचारिकता असते. 'हसायचे म्हणून हसायचे' अशीही परिस्थिती निर्माण होते आहे. त्यामुळेच कदाचित 'हास्यक्लब' निर्माण होत असावेत. परंतु तिथले कृत्रिम हास्य तो आनंद, तो खळखळाट देऊ शकत नाहीत जे तुझ्या नैसर्गिक रूपातून मिळतो. कारण तुझा नैसर्गिक अवतार हा ह्रदयापासून प्रकट झालेला असतो. हास्यक्लबांमध्ये पैसे देऊन तुला प्रसन्न करून घेण्यापेक्षा चॉकलेट देऊन एखाद्या बालकाचे निरागस, निस्वार्थी हसणे पाहताना त्यात सामील होणे किंवा एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला मदत केली तर त्याच्या चेहऱ्यावर फुललेले हसू एक वेगळेच समाधान, आनंद देऊन जाते. खरे सांगू का, तुझी उपस्थिती म्हणजेच एकमेकांजवळ जाणारी, अगदी अनोळखी माणसाला आपलेसे करणारी असते.
असेही पाहण्यात येते की, नेहमी खळाळून हसणाऱ्या, इतरांना हसवणाऱ्या माणसाच्या अंगावर संसाराची जबाबदारी पडली की, त्याच्या चेहऱ्यावरील हसू लुप्त पावते. अधूनमधून त्याच्या चेहऱ्यावर फुललेली हास्यरेषा त्याच्याबद्दल किव वाटावी अशीच भासते .
मित्रा, हास्या, एकदा प्रख्यात विनोदी लेखक पु. ल.देश असे म्हणाले की, 'जन्म आणि मृत्यू या टोकात पकडून नियतीने माणसाची सतत चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की, आसपासच्या मंडळीची जमेल तेवढी हसवणूक करण्या पलीकडे कुणाच्याच हातात हाती फारसे काही उरत नाही.' या सुंदर वाक्याचा थोडक्यात अर्थ असा की, मानवाने जमेल तेवढे, जमेल तेव्हा हसले पाहिजे, हसवले पाहिजे. स्वतः पु. ल. यांच्या जीवनाचा हा मुलमंत्र होता. तो हा मंत्र मुक्त हस्ते उधळत होते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवत होते. निर्माण झालेल्या दुःखाला बाजूला सारून जो पुढे जातो त्यालाच जीवन जगण्याचे औषध गवसलेले असते आणि ते गुणकारी औषध तू आहेस, हसण्या केवळ तू आहेस.
हे सारे खरे असले, तुझे प्रत्येक रूप भावणारे, आवडणारे, हसवणारे असले तरीही दोस्ता, तुझं विकृत रूप आहेच की. अनंत कालापासून अगदी पुराणात, सत्ययुगातही खलनायकी, दुष्ट स्वभावाची माणसे होती आणि आजही आहेत. विकृत, छद्मी, निर्लज्ज, भीतीदायक अशी तुझी रूपे कुणालाच आवडत नाहीत. शरीराचा थरकाप उडवणाऱ्या तुझ्या रुपापासून कधी एकदा दूर जावे असे होऊन जाते. म्हणून हे हसण्या, तुला एक विनंती की, कायम आमच्यासोबत रहा. तुझ्या आगमनाने अनेकांची दुःख सुसह्य कर. आनंदाचे झाड प्रत्येकाच्या दारी लाव. तू स्वतः बहरून ये. प्रत्येकाला भरभरून दे.... बस्स! यापेक्षा जास्त काय लिहू?
तुझाच,
एक भक्त.... हसरा....
(नागेश सू. शेवाळकर)
थेरगाव, पुणे
संपर्क ९४२३१३९०७१
-------------------------------------------------------------------------------------------------------- - --------