कृषि-पराशर ग्रंथातील उत्सव आणि पूजनविधी
कृषि-पराशर हा पराशरांनी लिहिलेला शेतीविषयक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्राचा तो एक महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाच्या शैलीवरून ते ८ व्या शतकातील असावा असे मानले जाते. * (डॉ. वर्णेकर श्रीधर भास्कर, १९८८, संस्कृत वाङ्ग्मय कोश (द्वितीय खंड), प्रकाशक- भारतीय भाषा परिषद, कलकत्ता. पृ. ८०)
कृषि-पराशर या ग्रंथाचा लेखक पराशर कोण असावा याविषयीही मतभिन्नता आहे, तथापि वैदिक काळातील सूक्तद्रष्टा पराशर हा या ग्रंथाचा कर्ता नाही असेही अभ्यासक मानतात.
भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.
सदर ग्रंथात सामान्यत: पावसाचे – वादळवार-याचे अंदाज, पशुधनाचे व्यवस्थापन, बीजाची निवड वा जोपासना, जलाचे व्यवस्थापन, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलेले आहे. मानवी जीवनात दैनंदिन व्यवहारातही परमेश्वराचे आशीर्वाद घेउनच एखाद्या कार्याचा आरंभ करण्याची परंपरा आहे. सदर ग्रंथातही शेतीविषयक कामांची सुरुवात करताना पूजनाचे काही विधी सांगितले आहेत. तसेच भक्तीखेरीज मानवी समूह हा उत्सवप्रिय असतो. समूहाने एकत्रितपणे साजरे करण्याचे शेतीसंदर्भातील काही उत्सवही या ग्रंथात सांगितले आहेत.
सदर निबंधात कृषि-पराशर या ग्रंथात दिलेल्या शेतीशी संबंधित काही पूजाविधी आणि उत्सव यांच्याविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे.
पूजनविधी- धान्याची समृद्धी मिळण्यासाठी वेताच्या वृक्षाचे रोपण करण्याचा विधी सांगितला आहे- कार्तिक महिन्यातील संक्रांतीच्या काळात अतिशय पवित्र भावनेने
शेतक-याने, स्नान करून शेताच्या ईशान्येकडील कोप-यात पाने असलेल्या वेताच्या रोपाचे काळजीपूर्वक रोपण करावे. त्यानंतर धूप, गंध आणि सुगंधी फुले यांनी वेताच्या रोपाचे आणि धान्याच्या छोट्या रोपांचे पूजन करावे. तालवृक्षाच्या फळांचा गर, दहीभात आणि मिठाई व खीर यांचा नैवेद्य दाखवावा. ’धान्याची लहान, मोठी, वृद्ध, रोग झालेली तसेच निरोगी अशी जी झाडे असतील ती सर्वच सुषेण, राघव आणि पृथु यांच्या आज्ञेने समानप्रकारे नलदंडाच्या योगाने फुलांनी आणि फलांनी लगडलेली होवोत. लवकरच त्यांची वाढ पूर्ण होवे आणि त्यायोगे धन आणि धान्याने शेतक-याला स्वस्थता मिळो. ’ वेताच्या रोपाचे रोपण करून अशी प्रार्थना केल्याने शेतक-यांना धान्याची समृद्धी मिळते. तूळ राशीतील घटसंक्रांतीच्या काळात जे शेतकरी अशाप्रकारे वेतवृक्षाचे रोपण करीत नाहीत त्यांच्याकडे धान्याची निर्मिती चांगल्याप्रकारे होत नाही ( असे सांगितले आहे. )१
मार्गशीर्ष महिन्यात शुभदिवशी स्नान करून त्यानंतर शेतक-याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे. शेताच्या ईशान्य कोप-यात गंध, फुले, धूप, नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे. २
तयार झालेल्या पिकांची झोडपणी करून त्यातून धान्य वेगळे काढण्यासाठी मेढी तयार करावी लागते. त्यासाठी जमिनीवर एक समतल खड्डा करावा आणि ते शेणाने सारवावा आणि त्यामध्ये मेढी रोवावी. मेढी चांगली असेल तर त्यामुळे धान्यची समृद्धीही वाढते. न्यग्रोध (वड), सप्तपर्ण(सातवीण), गंभारी(), शाल्मली (सावरी)तसेच औदुंबरच्या तसेच कोणत्याही चिकाच्या झाडाच्या खोडापासून मेढी तयार करावी. यांच्या अभावी एखाद्या स्त्रीवाचक नावाच्या वृक्षाच्या झाडाच्या खोडापासून मेढी तयार करावी. त्यावर कडुनिंबाची पाने व मोहरी यांचे आच्छादन करावे आणि त्यावर पताका लावावी. धान्याचे केशरासारखे गवत आणि तांबडा ऊस यांनी सुशोभित मेढीचे गंध आणि फुलांनी पूजन केल्यास ती विपुल धान्य देणारी होते.
शेतामध्ये नांगर चालविण्यापूर्वी करण्याचे पूजनही पराशराने सांगितले आहे. इंद्र, शुक्र, पृथुराम तसेच पराशर यांचे स्मरण करून अग्नी, द्विज आणि देवतांचे पूजन करून नांगरणीला सुरुवात करावी. काळ्या अथवा लाल (तपकिरी) असे बैल नांगरणीसाठी योग्य असतात. अशा बैलांच्या मुखाला आणि पार्श्वभागाला लोणी किंवा तूपाचे लेपन करावे. उत्तर दिशेला तोंड करून दही, दूध आणि पांढरी फुले यांचे अर्घ्य द्यावे आणि प्रार्थना करावी-शचीपती इंद्र या अर्घ्याने संतुष्ट होवो आणि सुंदर वृष्टी करू. जी व्यक्ति नांगरणी करणार आहे तिने भक्तीपूर्वक जमिनीवर बसून गुडघे टेकून इंद्राला प्रार्थना करावी की “हे देवा, धान्यसंपत्तीला समृद्ध कर. ”त्यानंतर आकाशस्थ मेघांसहित मरुतदेवांना तुपाचा दिवा आणि नैवेद्य अर्पण करावा.
धान्य हातात आल्यावर त्याची साठवणूक करताना काय करावे याविषयी पराशर म्हणतात की- “ हे देवी कामरूपिणी, सर्व इच्छा पूर्ण करणारी, सर्वांचे हित करणारी अशी तू मला धन प्रदान कर. ” अशा आशयाचा मंत्र शेतक-याने स्वत: कागदावर लिहून तो धान्यागारात ठेवावा. व त्यानंतर लक्ष्मीची पूजा करावी.
धान्याची पेरणी करण्यापूर्वी पवित्र मनाने व्यक्तीने तन्मयतेने मनात इंद्राचे ध्यान करावे. गार पाण्यात भिजविलेल्या धान्याच्या तीन मुठी पेराव्यात. त्यानंतर पूर्वेकडे तोंड करून कलश घेऊन पुढील मंत्र म्हणावा-“ भरपूर अन्न देणा-या, धान्य उत्पन्न करणा-या हे वसुंधरे, तुला नमस्कार असो. सर्व प्रकारचे विपुल धान्य उगवावे, मेघांनी योग्य वेळी पाउस पाडावा आणि धन आणि धान्याने शेतकरी समृद्ध व्हावा. ”शेतात प्रारंभिक पेरणी झाल्यानंतर
शेतक-यांनी तूप आणि दूध यांच्या मिश्रणाने तयार केलेल्या खिरीचे भोजन करावे. असे केल्यामुळे शेती निर्विघ्नपणे सुफलित होते असे पराशराने सांगितले आहे.
धान्य कापणीला आल्यावर त्यापूर्वी शेताच्या ईशान्य कोप-यात गंध, फुले, धूप आणि नैवेद्याने धान्याची पूजा करावी व मगच धान्याची कापणी करावी.
या विधिविधानांची माहिती दिल्यानंतर पराशराने काही सामूहिक उत्सवांची माहिती दिली आहे. शेतीच्या संदर्भात शेतक-याच्या व्यक्तिगत व कौटुंबिक जीवनात पशुधनाचे महत्व अविवाद्य आहे. त्यामुळे गाय, बैल यांच्या पूजनाचा उत्सव साजरा करण्यास सांगितले आहे. कार्तिक महिन्यातील लगुड प्रतिपदेला हा उत्सव करावा. गायीच्या अंगाला तेल वा हळद लावून चोळावे. त्यांच्या शिंगाना श्यामलता नावाची वनस्पती बांधावी. पशुपालकांनी आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी हा उत्सव करणे उपयुक्त आहे. त्यासाठी पशुपाल्काने स्नान करून, स्वत:च्या अंगाला कुंकू व चंदन यांचा लेप लावावा व आभूषणे परिधान करावी. वस्त्र, दागिने यांनी आपल्या मुख्य बैलाला सुशोभित करावे. स्वत: हातात लगुड म्हणजे काठी घेऊन बैलाची गावामध्ये वाजत-गाजत मिरवणूक काढावी. त्याच दिवशी गाई व बैलांच्या अंगावर तापलेल्या लोखंडाचे डाग द्यावेत आणि कान व शेपटी येथे छेदन करावे. या नियमांचे पालन जो करील त्याचे पशुधन पुढील वर्षभर निरोगी व स्वास्थ्यपूर्ण राहील.
पौष महिन्यात करण्याच्या पुष्ययात्रा उत्सवासंबंधी पराशर सांगतो- धान्याची कापणी करण्यापूर्वी शेतात धान्य उभे असताना पौष महिन्यात शेताच्या परिसरात पुष्ययात्रा उत्सव करावा. केळीच्या पानावर मांस, मासे, आदि सामिष आहार तसेच मिरची, हिंग इ. चा वापर करून केलेले शाकाहारी पदार्थ, दही, दूध, तूप, खीर, पेय विविध फळे, कंदमुळे, खीर, पुरी तसेच मिठाई इ. पदार्थ वाढावेत. सर्वात आधी वयस्कर व्यक्तींना जेवायला वाढावे. जेवणानंतर आचमन करून चंदन, केशर, कस्तुरी आणि अन्य सुगंधानी युक्त तेल एकमेकांच्या अंगाला लावावे. नवी वस्त्रे परिधान करून, कापूर इ. नी सुगंधित विडे एकमेकांना द्यावेत. फुलांचे अलंकार घालून इंद्राला नमस्कार करून गीत, वाद्य आणि नृत्याचा आनंद घेत उत्सव साजरा करावा. त्यानंतर आनंदाने सर्वांनी नमस्कार करून सूर्याकडे तोंड करून पुढील चार श्लोक म्हणावेत. त्यांचा आशय – “शेतातील पीक अद्याप काढलेले नसताना पुष्ययात्रेच्या प्रसंगी आम्ही जिचे पूजन केले आहे ती देवी लक्ष्मी आमच्यावर कृपा करो. कर्म, मन, आणि वाणीने जे आमचा विरोष करतील त्यांचा विरोध पुष्ययात्रेच्या प्रभावाने मावळून जावो. पुढील एक वर्षापर्यंत रात्रंदिवस आमचे धान्य, यश, स्त्री, पुत्र, राजसन्मान, पशुधन, आणि मंत्रशासन व धनाची वृद्धी होत राहो. यानंतर आनंदाने सर्वांनी घरी परतावे तथापि त्या दिवशी रात्री भोजन करू नये. पराशराने प्राचीन काळी सर्वांच्या कल्याणासाठी हा उत्सव सांगितला आहे. त्यामुळे सर्व विघ्नांच्या शांतीसाठी आणि धान्याच्या वाढीसाठी सांगितलेले नियम पाळून प्रयत्नपूर्वक पुष्ययात्रा उत्सव करावा.
***