असे म्हणतात ‘सत्य’ जरी ‘गुणकारी’ असले तरी ते ‘कटू’ असते आणि ‘असत्य’ जरी ‘गोड’ असले तरी ‘विषारी’ असते. ‘अर्धसत्य’ मात्र आपल्याला हवे तसे मांडता येते, सत्याचा कडूपणा आणि असत्याचे विष आपल्याला हवे तसे कमी अधिक करता येत असते आणि त्यामुळे अर्धसत्य तुलनेने ‘गोड’ आणि ‘गुणकारी’ भासत असते.
पण जेव्हा त्या अर्धसत्याची दुसरी बाजू समोर येते तेव्हा मात्र ती निश्चितच कटूही असते आणि विषारीसुद्धा... अशाच आणखी एका अर्धसत्याची कहाणी “कोवळं प्रेम”
नेहा आज उशिराच घरी आली होती, घरातील परिस्थिती नेहमी प्रमाणेच होती. बाबा नेहमीप्रमाणे बातम्या बघत बसले होते. आल्यावर पाच-एक मिनिटे विश्रांती घेऊन लगेचच ती नेहमीप्रमाणे कामाला लागली. घरातील थोडका पसारा आवरायला घेतला. अजून रात्रीच्या जेवणाचे बघायचे होते. नेहा काम करताना नेहमीच तिची धुसफूस होत असे, त्यामुळं नकळतच भांड्याला भांडी लागून घरात ठणठणाट होत असे. बाबांनाही आता हे सगळे नित्याचे झाले होते. संध्याकाळचा हा अर्धा तास नेमीच त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत असे.
नेहाच्या आईच्या निधनानंतर घरी नेहा आणि बाबा असे दोघेच असत. बाबा आता त्यांच्या व्यावसायिक जबाबदारीतून निवृत्त असल्यामुळे घरीच असत. नेहा मात्र एका नामांकित शाळेत शिक्षिका होती, तसेच मानसशास्त्राची तिला आवड होती. म्हणूनच तिने त्या बाबतीत तज्ञांकडून प्रशिक्षण घेतले होते आणि संध्याकाळच्या वेळात गरजू लोकांसाठी ती समुपदेशनही करत असे. दररोजच्या घरकामा व्यतिरिक्त सकाळी शिकवण्या, मग दिवसभर शाळा, आणि संध्याकाळी रिकाम्या वेळात समुपदेशन असा तिचा दिवस व्यतीत होत असे. त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत तिचा दिनक्रम पूर्णपणे व्यस्त असे. संध्याकाळचा हा अर्धा तासच काय तो तिच्या आयुष्यातील रिकामा म्हणावा असा रकाना होता. मात्र इतर सामान्य माणसांप्रमाणे या वेळात स्वतःचे मनोरंजन करून घेण्याऐवजी नेहाचा हा अर्धातास सुद्धा ती अनावश्यक कामे उरकण्यात व्यतीत करत असे त्यामुळे नकळतच तिची धुसफूस होत असे. खरे तर या फावल्या वेळात तिने स्वतःची एखादी आवड जपावी असे बाबांनी तिला अनेकदा सुचवून पहिले होते पण तिने त्यांच्या या सूचनेला नेहमीच हसून नकार कळवला होता.
तसे पाहता, नेहा ही आईबाबांची एकुलती एक लेक होती. एकुलती एक असल्यामुळे मिळणारे सर्व फायदे तिला भरभरून मिळाले होते. तिचे बालपण अगदी लाडात गेले होते. आईबाबांनी तिचा एकही हट्ट अपुरा ठेवला नव्हता. त्यामुळे तिची आईवडीलांविषयी कधीच काही तक्रार नसे. आई-बाबा लाड करत असले तरीही नेहाने त्याचा गैरफायदा कधीच घेतला नव्हता. मुळातच तिचा स्वभाव पोक्त, समजूतदार आणि आज्ञाधारक होता. स्वतःचे नियम बनवून त्यांचे पालन करायची सवय तिला लहान वयातच लागली होती. त्यामुळे नेहावर हात उचलण्याची सोडा, साधे ओरडण्याची गरज सुद्धा आई-बाबांना कधी पडली नव्हती. एकूणच छोटीमोठी कारणे सोडली तर एकमेकांविषयी तक्रार करण्याची गरज त्यांच्या नात्यात कधीच भासली नाही. नेहाच्या लहानपणापासून आजपर्यंत सगळे तसेच चालू होते.
या नात्यातील गोडव्याला अपवाद होता फक्त नेहाच्या अविवाहित राहण्याच्या निर्णयाचा. नेहाची तीशी सुरु झाली असली तरीही ती अजून अविवाहित होती. तिचा हा निर्णय तिच्या आई-बाबांच्या कधीच पचनी पडला नव्हता. तसे त्यांनी वारंवार बोलूनही दाखवले होते. इतर मुलींप्रमाणे नेहचाही संसार फुलावा अशी तिच्या आईबाबांची प्रामाणिक इच्छा होती. नेहा जरी एक आज्ञाधारक मुलगी असली तरीही या बाबतीत ती आपल्या निर्णयावर ठाम होती. नेहाने लग्न करावे म्हणून आई बाबांनी मांडलेले सगळे तर्क तिने नेहमीच खोडून काढले होते.
त्यातूनही आई बाबांचा लग्नासाठीचा आग्रह जेव्हा शिगेला पोचला होता, तेव्हा तर तिने स्वत:ने एकटे वेगळे राहण्याचा प्रस्ताव समोर ठेवून दोघांचीही बोलती बंद केली होती.
नेहाच्या त्या प्रस्तावामुळे त्यांच्या आग्रहाला बसलेल्या मर्यादा त्यांनी भविष्यात कधीच ओलांडल्या नाहीत कारण आपली मुलगी या जगात आपल्यापासून वेगळी होऊन एकटी राहणार हे दु:ख त्यांना अधिक भयावह वाटत होते. म्हणूनच तेव्हापासून आई आणि बाबांनी तिच्यावर कधीच अधिक दबाव आणला नाही, मात्र तिने लग्न करावे असे सुचवायचे त्यांनी कधीच बंद केले नव्हते आणि नेहालाही त्याविषयी कसलीच तक्रार नव्हती. त्यांनी तसे सुचवल्यावर त्याला हसून नकार देणे तिलाही कालानुरूप सवयीचेच झाले होते.
नेहाने जेव्हा अविवाहित राहण्याचा निर्णय समजल्यापासून आई नेहमीच चिंतातुर दिसत असे, आईच्या अशा चेहऱ्याकडे बघून नेहाच्या मनाची घालमेल वाढत असे. आईच्या हट्टाला नकार देणे नेहमीच तिला अवघड वाटत असे, आता तर प्रश्न तिच्या आयुष्याविषयीच्या निर्णयाचा होता. या बाबतीत आई हट्ट लवकर सोडणार नाही हे नेहाला कळून चुकले होते. म्हणूनच तेव्हापासून तिने स्वतःला कामात व्यस्त करून घेतले, जेणेकरून घरी कमी वेळ व्यतीत करावा लागेल आणि आई-बाबांना उत्तरे देण्याची गरज तिला टाळता येईल.
मुळातच आपण अविवाहित असल्याने आईला होणारे दुख तिला निश्चितच अपरिचित नव्हते. म्हणूनच आपला नकार आईला कळवताना आपण तिला दुखवणार नाही याची काळजी ती नेहमीच घेत असे.
बाबांचे मात्र तसे नव्हते. सतत नोकरीमध्ये व्यस्त असल्या कारणाने ते केवळ संध्याकाळीच घरी भेटत असत, नेहाच्या गरजांकडे आणि वागण्याकडे लक्ष घालायला त्यांच्याकडे मुळातच वेळ कमी असे. तरीही तिच्या या निर्णयाचे दु:ख त्यांनाही निश्चितच झालेले होते, पण ते व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ मात्र नव्हता.
अशाच परिस्थितीत थोड्या चढउताराने तिघांची आयुष्य व्यतीत होत होती. पण त्या वर्षी अचानक उद्भवलेल्या आजाराने नेहाच्या आईचे निधन झाले आणि मग मात्र नेहा आणि बाबांच्या आयुष्याची समीकरणे पुरती बदलून गेली.
नेहाची आई वारल्यापासून नेहा आणि बाबा दोघे घरी एकटेच असत. या जगात एकमेकांची काळजी घेणारे ते दोघेच होते. नेहाने बाबांच्या सेवेमध्ये कुठेच कमी पडून दिले नव्हते. त्यांचे सर्व हट्ट ती आनंदाने पुरवत असे. त्यांची औषधे, त्यांच्या जेवणाच्या सवयी या मध्ये आईच्या निधनानंतर सुद्धा तिने अजिबात फरक पडू दिला नव्हता. बाहेरच्या लोकांसाठी त्या बाप-लेकीचे हे नाते अगदी दृष्ट लागण्यासारखे होते, पण अजूनही या गोड नात्यात नेहाचा अविवाहित राहण्याच्या निर्णयाचा विषय अधून मधून कडूपणा आणत असे. कारण अजूनही तिच्या विवाहाचा विषय सुद्धा काढलेला तिला रुचत नसे. तसेही तिच्या या निर्णयाला आपल्या वागण्याचाही थोडा फार हातभार लागला आहे याची पुरे पूर जाणीव बाबांना होती. त्यामुळे तिच्यावर दबाव टाकताना बाबांना नेहमीच मर्यादा येत असत.
आईशी या विषयावर बोलताना नेहा नेहमीच समजूतदारपणाची भूमिका घेत असे. पण बाबांना मात्र ती अधिक आक्रमकपणे उत्तर देत असे. सुरुवातीला तर बाबांनी प्रयत्न केले तेव्हा दोघांच्या आक्रमक स्वभावामुळे दोघांमध्ये या विषयावरून वारंवार खटके उडाले होते. पण कालांतराने बाबांनीच माघार घेतली आणि ते आता वादाचा विषय नेहासमोर काढणे त्यांनी बंद केले होते.
एकंदरीत नेहाची होणारी धुसफूस शांतपणे बघण्या व्यतिरिक्त त्यांच्या कडे कसलाच पर्याय शिल्लक नव्हता. रोज संध्याकाळचा तो अर्धा तास त्यांना नेहमीच त्रासदायक वाटत असे आणि येणारा प्रत्येक दिवसागणिक त्या त्रासाची दाहकता वाढतच चालली होती. त्या पेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आपल्या नंतर नेहाची काळजी कोण घेणार हा प्रश्न अलीकडे त्यांना अधिक अस्वस्थ करत असे. म्हणूनच लवकरच या परिस्थितीवर तोडगा काढायला हवा या निर्णयाप्रत ते पोचले होते.
या विषयावर नेहा आपल्याशी स्पष्ट बोलणार नाही हे त्यांना आता कळून चुकले होते, म्हणूनच त्यांनी त्रयस्थ व्यक्तीची मदत घ्यायचे ठरवले होते. याच विचारात असताना त्या दिवशी एक आयती संधी त्यांच्या दारी चालून आली होती. नेहा आज समुपदेशन करण्यात जरा जास्तच व्यस्त होती, तिची घरी येण्याची वेळ उलटून गेली तरीही ती घरी आली नव्हती. बाबा तिचीच वाट बघण्यात मग्न होते आणि तेव्हाच अचानक दारावरची बेल वाजली. बाबांनी घाईघाईने आणि मोठ्या आशेने दार उघडले होते पण त्यांची साफ निराशा झाली होती.
“नमस्कार सर, मी मिसेस पारखी. नेहाला मी मानसशास्त्राचे धडे देत असे. त्याच संदर्भात मला तिच्याशी काही बोलायचे आहे.” – दारात उभ्या असलेल्या बाईने आपली ओळख करून दिली.
बाबांनी हातानेच तिला आत येण्याचे निमंत्रण दिले.
“नेहा, अजून घरी आलेली नाही. संध्याकाळी ती इथेच जवळच्या सेंटर वर समुपदेशन करण्यासाठी जात असते.” – बाबा
“मला माहिती आहे, पण तिच्याशी मला थोडे खासगी बोलायचे होते म्हणून तिने मला घरी भेटण्यासाठी बोलावले होते.” – मि. पारखी
बाबांनी त्यांना बसण्याची खूण केली आणि पाणी आणण्यासाठी आत गेले. प्राथमिक पाहूणचार झाल्यावर त्या खोलीत आता बाबा आणि मि. पारखी दोघेच होते. पारखी बाई नेहाला सिनियर होत्या, त्यांनीच नेहाला मानस शास्त्राचे धडे दिले होते तसेच त्या नेहाच्या हितचिंतकांपैकी एक होत्या. नेहाचा स्वभाव जरी लाघवी असला, वरून जरी ती आनंदाने वावरत असली, तरीही तिचे मन कुठेतरी खोलवर दुखावलेले आहे हे त्यांना नेहमीच जाणवत असे. तिचा अविवाहित राहण्याचा निर्णयही त्यांना फारसा पटलेला नव्हता, किंबहुना तिच्या दुखावलेल्या मनामुळेच तिने असा जगावेगळा निर्णय घेतला असावा असे त्यांना नेहमीच वाटत होते.
पण तिच्या मनाच्या दुखण्या मागचे कारण मात्र त्यांना अजून समजले नव्हते. नेहाने तसेही ते सगळ्यांपासून अतिशय खुबीने लपवून ठेवले होते. नेहाच्या स्वातंत्र्याचा पारखी बाईंनी नेहमीच सन्मान केला होता आणि या विषयावर तिने ठरवून दिलेल्या सीमेपालिकडे जाऊन चर्चा केली नव्हती.
पण आता मात्र त्यांचीही मनस्थिती बाबांप्रमाणेच होत चालली होती, नेहाची अस्पष्ट चिडचिड त्यांना अलीकडे अधिक सातत्याने जाणवू लागली होती.
आणि म्हणूनच तिच्या दुखावलेल्या मनाचे रहस्य उलगडण्यात त्यांना आता रस वाटू लागला होता, किंबहुना हे रहस्य उलगडण्यासाठी अधिक विलंब करणे चुकीचे असेल असे त्यांचे मन त्यांना समजावत होते. म्हणूनच नेहाच्या वाडीलांशी बोलून या विषयावर अधिक माहिती घ्यावी असे त्यांचे मत झाले होते. त्यामुळेच त्यांनी आज नेहाला क्लिनिक मध्ये गुंतवून ठेवले होते आणि तिच्या अपरोक्ष बाबांना भेटायला त्या आल्या होत्या.
मि. पारखी त्यांच्या स्वभावाने आणि त्यांच्या व्यवसायामुळे बोलक्या होत्या. थोडी औपचारिक बोलणी झाल्यावर दोघेही निवांतपणे नेहाची वाट बघू लागले होते. थोड्याच वेळात पारखी बाईंनी बाबांशी संवाद साधण्यास सुरुवात केली.
"मी मगाशी तुमच्याशी खोटे बोलले." - पारखी
"म्हणजे?"
"म्हणजे मी इथे नेहाला भेटायला आलेले नाही, तिला मी इथे आले आहे याची कल्पनासुद्धा नाही आहे. आणि हो ती अजून तासभर तरी इथे येणार नाही. मी तशी व्यवस्थाच करून आलेली आहे."
"मी समजलो नाही, मग इतका वेळ आपण बोलत होतो ते...."
"ते संभाषण निरर्थक होते. खरे तर मला तुमच्याशीच बोलायचे होते. मला तुमच्याशी ज्या विषयावर बोलायचे आहे तो विषय थोडा नाजूक आहे. कदाचित मी त्या विषयावर बोललेले तुम्हाला आवडणार नाही, म्हणूनच मी विषयाला थेट हात घालायचे टाळत होते.”
पारखी बाई अंदाज घेत बोलत होत्या. पारखी बाईंच्या त्या वाक्यामुळे बाबा चांगलेच सावध झाले आणि व्यावसायिक अनुभवामुळे पारखी बाईंनी ते लगेच ओळखले. बहुतेक वेळेला आपले खासगी विषय तिऱ्हाईत माणसाशी बोलताना नेहमीच त्या माणसाला मोकळे करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात हा त्यांचा अनुभव होता. प्रत्येकाच्या मनाचा गुंता अत्यंत नाजूकपणे सोडवण्याची कला त्यांना मात्र आता चांगलीच अवगत झाली होती. पुढील थोडा वेळ त्यांनी आपल्या कलेचे असेच काही आविष्कार दाखवले.
बाबांना आधी त्या भूत काळात घेऊन गेल्या, थोडे आपले अनुभव सांगितले थोडे त्यांचे अनुभव ऐकले. गप्पा अगदी रंगात आल्यावर मात्र त्यांनी हळुवार पणे विषयाला हात घातला.
“नेहाचा अविवाहित राहण्याचा निर्णय.....”
पारखी बाईंचे वाक्य पूर्ण होण्या आधीच बाबा खुर्चीतून उठले. काही वेळ मग ते खिडकीतून बाहेर बघत उभे होते. त्यांना लागणारा वेळ दिला पाहिजे हे पारखी बाईंना चांगलेच ठाऊक होते, म्हणूनच त्या शांत पणे आपल्या खुर्चीवर बसून होत्या. थोडा वेळ विचार करून बाबा परत पारखी बाईंकडे वळले, नकळत त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या हे पारखी बाईंना पुरते समजले होते.
“मी या विषयावर सर्वच गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही... “ – बाबा
“आपले संभाषण पूर्णपणे गुप्त राहील याची तुम्ही खात्री बाळगा. माझ्या व्यवसायाचा नियमच आहे तसा, आणि आता पर्यंत मी त्याचे कधीच उल्लंघन केले नाही.” – पारखी
पारखी बाईंच्या या वाक्यावर मात्र बाबा कुत्सितपणे हसले.
“मला तुमच्या क्षमतेवर अविश्वास दाखवायचा नव्हता... तुम्ही तुमचे काम निश्चितच चांगले जाणत असणार यात मला मुळीच शंका वाट नाही. तसेही तुमच्या क्षमतेचा अंदाज तुमच्या शिष्येकडे बघून म्हणजेच नेहाकडे बघून मिळून जातो. पण तुमच्या व्यवसायाच्या जशा काही गरजा आहेत तशाच माझ्याही व्यवसायाच्या काही गरजा आहेत.” – बाबा
“म्हणजे?”
“म्हणजे, आम्हालाही आमच्या कामात गुप्तता बाळगावी लागते.. इतकेच मी तुम्हाला सांगू शकेल. पूर्णपणे तपशीलवार माहिती देणे मला जमणार नाही.
तरीही हा प्रश्न सोडवण्यासाठी तुमची मदत झाली तर मला ते निश्चितच आवडेल. कारण माझ्या व्यावसायिक जबाबदारी बरोबरच नेहाचे वडील म्हणूनही माझी काही जबाबदारी आहे हे सत्य मला या वयात नाकारणे शक्य होत नाही. व्यावसायिक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळताना, नेहाचे वडील म्हणून मी किती अपयशी ठरलो आहे याची जाणीव मला दररोज संध्याकाळचा तो अर्धा तास करून देत असतो. आता मला हे सहन होत नाही.
तुम्ही माझी मदत कराल ना?” – बाबा
“तसे नसते तर मी इथे आलेच नसते, तुम्ही तुम्हाला शक्य तितकी माहिती मला द्या.
मग मात्र आपण एकत्र मिळून या प्रश्नावर काही तोडगा काढता येईल का ते बघू...” – पारखी बाई.
पारखी बाईंच्या या वाक्यानंतर बाबांना थोडे हायसे वाटू लागले होते. त्यांना पारखी बाईंविषयी अधिक विश्वास वाटू लागला होता. विषय गहन होता, नेहालाही यायला अजून वेळ होता, थंड डोक्याने विचार करायचा म्हणून बाबांनी दोघांसाठी कॉफी करून आणली होती. आता खोलीतील वातावरण आणि बाबांचे मनही आता थोडे शांत झाले होते. बाबा आता निवांत पणे बोलू लागले.
“नेहा तशी लहानपणापासूनच समजूतदार होती. तक्रारीला तिने विशेष वाव दिला नाही. तिला न एकदा सांगितले की पुरे असायचे. एखादी गोष्ट तिला परत परत सांगायची वेळ अपवादानेच आली.
कदाचित त्यामुळेच मी तिला गृहीत धरू लागलो असेल. माझ्या कामाच्या स्वरुपाने तिच्यावर होणार्या अन्यायात भरच घातली असे म्हणावे लागेल. अगदी साधे उदाहरण द्यायचे तर तिचा वाढ-दिवसच घ्या, तिला माझ्या कडून कोणतेच गिफ्ट नको असायचे पण एकच हट्ट असायचा की ‘मी’ सकाळपासून तिच्या सोबत असावे. पण तिची ही साधी मागणी सुद्धा मी क्वचितच पुरती करू शकलो कारण बहुतेक वेळेला ऐन वेळी मला कामा निमित्त बाहेरच पडावे लागत असे. खरे तर तिने या बाबत सुद्धा कधीच तक्रार केली नाही. हे सगळे मला कळतच नव्हते असे म्हणता येणार नाही. पण नेहमीच घरच्या जबाबदार्यांपेक्षा मला कामालाच प्राधान्य देणे भाग होते. ‘ही’ ने सुद्धा नेहमीच माझी बाजू सावरून घेतली, कदाचित त्यामुळेच नेहाची कुठलीच तक्रार माझ्यापर्यंत पोचलीच नाही.
माझ्या कामाविषयी मी कुणालाच सविस्तर पणे सांगू शकलो नाही, किंबहुना अजूनही सांगू शकत नाही. सरकारी गुप्त हेर खात्यात काम करण्याचे काही व्यावसायिक दुष्परिणाम असतात, नात्यांची आबाळ होणे हा ही त्यातलाच एक भाग म्हणता येईल. पण देश हितासाठी काही जणांना असा त्याग करणे भाग असते. त्यामुळेच मी ही जबाबदारी कर्मनिष्ठ भावनेने सांभाळत होतो. माझ्या पारिवारिक चुकांची किंमत माझ्या परीने चुकवत होतो, त्याबद्दल माझी कसलीच तक्रारही नव्हती. पण ते वर्ष आमच्या आयुष्यात वेगळेच वादळ घेऊन आले होते.
त्या वेळी कामामध्ये माझ्यावर नवीन जबाबदारी देण्यात आली होती. आपल्या देशातील वातावरण गढूळ करण्याचा कट काही समूह करत होते, मला गुप्तपणे त्यांची पाळे-मुळे शोधून असे समूह नष्ट करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अर्थात माझ्या कामात गुप्तता ही नेहमीच महत्त्वाची होती आणि अजूनही ती सांभाळणे महत्त्वाचे आहे.
एकूणच मी धडाडीने कामाला लागलो होतो. काहीच दिवसात मी काही नावे शोधून काढली होती, त्यांच्या भोवती फास आवळण्याचे काम आता करायला घेणार होतो तेवढ्यात मला काही अनोळखी फोन येऊ लागले. अर्थात माझ्या कामात ते मला काही नवे नाही, पण यावेळी हे प्रकरण माझ्या घरापर्यंत पोचले होते. त्यांची माणसे माझ्या घरावर पळत ठेवू लागली होती, मला हे समजताच मी पावले उचलली आणि वरिष्ठांशी बोलून घराची सुरक्षा वाढवून घेतली. एकूणच जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आमच्यातील संघर्ष वाढतच चालला होता. माझ्यावर दबाव टाकण्याचा त्यांनी हर तर्हेने प्रयत्न केला होता.
आम्हीही आमच्या निश्चयावर ठाम होतो आणि त्यांच्या सर्व दबावाला झुगारून आम्ही काम करत होतो, दिवसागणिक नवीन नावे मिळत होती आणि त्यांच्या भोवतीचा फास आवळत चालला होता.
इकडे मात्र नेहा नुकतीच कॉलेजात दाखल झाली होती. तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस सुरू झाले होते. नवीन मित्र, मैत्रिणी आणि नव्या जगाची चाहुल तिला खुणावू लागली होती. तिच्या वागण्यातील बदल आम्हाला जाणवत होते. आमच्या संस्कारांवर विश्वास ठेवून तिला पूर्ण पणे मोकळीक देण्याचे आम्ही ठरवले होते. ती आता नेहमीपेक्षा अधिक खुष दिसू लागली होती. तिच्या मनात नवीन प्रेमाची पालवी फुटली असावी असा संशय मला येत होता. म्हणूनच मी माझ्या काही साथीदारांना त्या बाबतीत तपास करण्यास सांगितले.
माझा अंदाज बरोबर ठरला होता. नेहा एका मुलाच्या प्रेमात अडकत चालली होती. अर्थात या वयात असे होणे साहजिकच होते. पण त्या मुलाची ओळख माझ्यासाठी अधिक भयावह होती. कारण त्याचा फोटो बघताच मी त्याला ओळखले होते.
नेहाच्या तथाकथित प्रियकराचे नाव आमच्या यादीत समाविष्ट होते. आदल्या दिवशी मी त्या समूहाचे जे काही फोटो नजरे खालून घातले होते त्यात त्याचाही फोटो होता आणि आज हे नेहा सोबतचे नवीन फोटो समोर येत होते.
मी त्यांच्या दबावाला बधत नाही हे बघून त्यांनी माझा कच्चा दुवा शोधला होता. त्यांनी नेहाभोवती जाळे पसरवायला सुरुवात केली होती. नेहाला प्रेमपाशात अडकवून तिच्या मार्फत माझ्यावर दबाव टाकता येईल असा त्यांचा अंदाज असावा.
काही क्षणासाठी मी बिथरलो होतो, माझ्यातील बाप माझ्यातील ऑफिसरवर विजय मिळवू लागला होता. मी लगेचच माझे पिस्तुल घेऊन त्याला भेटायला निघालो होतो कारण मला माझ्या मुलीच्या भवितव्याशिवाय आणखी काहीच महत्त्वाचे नव्हते. आमच्या या बुद्धिबळाच्या खेळात तिचा प्याद्याप्रमाणे वापर व्हावा हे मला बिलकुल मान्य नव्हते पण त्याच वेळी माझ्या सहकर्म्यांनी माझी समजूत घातली आणि मला शांत केले.
त्या दिवशी दुपारी आम्ही त्याला एकटे गाठले. नेहाचे फोटो समोर टाकले. त्याचे कारस्थान फसल्याचे त्याला समजावले. त्याच्या समोर आम्ही दोन पर्याय ठेवले होते – चोवीस तासाच्या आत शहर सोडून कायमचे निघून जायचे किंवा आम्ही मुक्त हस्ताने आमची कारवाई सुरू करणार होतो. त्याचे आयुष्य उध्वस्त करायला आम्हाला फार वेळ लागणार नव्हता.
आमच्या धमकावण्या नंतरही तो कमालीचा शांत होता. मला त्याचे डोळे अजूनही आठवतात, त्यात एक वेगळीच मग्रुरी होती. त्याच वेळी आमच्यासमोर काही चालणार नाही म्हणून मनातील हतबलता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तो काहीच न बोलता विक्षिप्त हसला आणि तेथून उठून चालू लागला. आम्ही त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत असतानाच मला साहेबांचा फोन आला आणि मला त्यांना भेटायला जावे लागले.
साहेबांबरोबरची मिटिंग साधारण तासभर चालली. मिटिंग संपताच मी लगेच नेहाला भेटायला म्हणून तिच्या कॉलेजात गेलो, पण तिथे पोचल्यावर समजले की ती आज लवकर घरी निघून गेली आहे.
मी घरी पोचलो तेव्हा या दोघी रडत बसल्या होत्या. तसे मला ते अपेक्षितच होते. आपली प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर जाणार, आणि ते सुद्धा कायमची, हा धक्का पचवायला नक्कीच सोपा नसणार होता. म्हणूनच मी नेहाची शक्य तेव्हढी समजूत काढायचा प्रयत्न केला. पण त्या दिवशी ती काहीच ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हती आणि म्हणूनच मी तिला अधिक वेळ देण्याचे ठरवले होते.
दुसऱ्याच दिवशी माझ्या सहकाऱ्यांनी मला एक रेकॉर्डींग ऐकवली, नेहाच्या आणि तिच्या प्रियकराची शेवटची भेट त्यांनी रेकॉर्ड केली होती.
त्याने स्वतःची बाजू अत्यन्त कुशलपणे मांडली होती, आपल्या व्यवस्थेमुळे त्याच्यावर झालेला अन्याय, त्याविरुद्ध त्याने केलेले बंड, आणि या परिस्थितीत त्याच्या आयुष्यातील नेहाचा उदय आणि या निष्ठुर जगात जगण्याची प्रेरणा देणारे तसेच मनात एक नविन आशा जागवणारे त्यांचे कोवळे प्रेम... अशी एक करूण कहाणी त्याने नेहाला ऐकवली होती, पण तो इतक्यावरच थांबला नाही.
पुढे जाऊन त्याने माझ्या कामगिरीच्या वेळेचे काही फोटो सुद्धा तिला दाखवले होते, त्याच्या मते मी या भ्रष्ट व्यवस्थेमधील एक कळसूत्री बाहुले झालो होतो आणि व्यवस्था टिकवण्यासाठी अनेक अनैतिक कामे पूर्ण केली होती, खरे तर त्यात चूक असे काहीच नव्हते. माझ्या व्यवसायामध्ये मी केलेली सगळी कमी गरजेची असली तरी ती नैतिक होती असे म्हणता येणार नाही.
मला वाटते त्याच्या त्या भेटीमुळे नेहाच्या मनावर काही ओरखडे कायमचे कोरले गेले असावेत. मुळातच जे होउ नये म्हणून मी प्रयत्न करत होतो अगदी तसेच झाले होते, आमच्या दोघांच्या संघर्षात नकळतच नेहा होरपळत होती."
"दुर्दैव, केवळ दुर्दैव.... नेहा तर पार कोलमडून पडली असेल या आघातामुळे. ज्या दोन व्यक्ती तिला आदर्श वाटत होत्या त्या दोघी तिच्या समोर केवळ आदर्शवादाचे मुखवटे घालून वावरत असल्यासारखे तिला वाटत असेल. ती भयंकर चिडली असणार तुम्हा दोघांवर-" - मी. पारखी
इतक्यात दारावरची बेल वाजली आणि पारखी बाईंचे ते वाक्य अर्धवटच राहिले. बाबा आणि पारखी बाईंची नजर एकाचवेळी घड्याळाकडे गेली, ते भेटल्यापासून अर्धाच तास झाला होता, अपेक्षेप्रमाणे नेहा अजून अर्धा तास तरी येणार नव्हती.
बाबांनी लगबगीने दार उघडले, दारामध्ये नेहाला बघून दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला, नेहा मात्र कमालीची शांत होती. नक्की काय घडले असणार याची तिला पूर्ण कल्पना येत होती. तिने काहीच घडले नाही अशा आवेशात नेहमीची कामे करायला घेतली.
"मला वाटते आता मी निघायला हवे, परत भेटुयात, निवांत बोलूयात ....." - पारखी बाई.
"मला वाटते हा विषय तुम्ही इथेच थांबवावात, तसेही माझा निर्णय मी बदलणार नाही आहे.
बाकी कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी तुम्ही वाटेल तेव्हा भेटा, माझी कसलीच हरकत नाही." - नेहा शांतपणे म्हणाली आणि हातातील कामे उरकू लागली.
बाबांनी नजरेनेच पारखी बाईंना थांबण्याची खूण केली, तसेही आज विषय निघालाच होता, तर आता या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावून टाकावा असे बाबांना वाटत होते.
"कसला विषय? तुला काय वाटते? आम्ही कोणत्या विषयावर बोलत होतो?" - बाबा.
बाबांच्या या प्रश्नावर मात्र नेहा कुत्सित हसली.
"बाबा, मी तुमचीच मुलगी आहे. तुम्हाला काय वाटते? मी आज अर्धा तास लवकर का आले असेल?
मला वाटते आपल्या तिघांनाही माहिती आहे की तुम्ही कोणत्या विषयावर बोलत होतात." - नेहा
"तसे असेल तर चांगलेच आहे, मला वाटते मग आपण थेट मुद्द्याला हात घालूयात." - पारखी बाई
"बरोबर आहे, आज काय तो सोक्ष मोक्ष लागून जाऊदे." - बाबा.
यावर नेहा हलकेच हसली आणि शांतपणे त्या दोघांच्या पुढ्यात येऊन बसली.
"ठीक आहे, तुम्ही म्हणता तसा सोक्ष-मोक्ष लावून टाकू, पण मग मला एक वचन द्या की ही या विषयावरची शेवटची चर्चा असेल. या नंतर हा विषय परत काढायचा नाही." - नेहा शांतपणे म्हणाली.
नेहाच्या या अटीवर बाबा आणि पारखी बाईंची हलकेच नजरा नजर झाली आणि दोघांनीही आपला होकार कळवला.
सुरवात पारखी बाईंनी केली, त्यांनी नेहाला तिच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम समजावून सांगितले, त्यांच्या हाताखालून गेलेल्या केसची उदाहरणेसुद्धा दिली.
नेहाने सगळे शांतपणे ऐकून घेतले.
"माझा निर्णय घेताना तुम्ही सांगता त्या सर्व गोष्टींचा मी विचार केला आहे मॅडम."
"आणि तरीही तू हा निर्णय घेतलास? का? कशासाठी?" – पारखी बाई.
"मला वाटते मूळ कारण बाबांना ठाऊक आहे..." - नेहा शांतपणे म्हणाली.
आता मात्र बाबांचा संयम सुटला होता... तरीही स्वतःला शांत ठेवत बाबा बोलू लागले. आपल्या रागामुळे ही बैठक विफल होऊ नये या साठी ते विशेष प्रयत्न करत होते.
“प्रामाणिकपणे सांगतो, मला अजूनही तुझ्या निर्णयामागचे मूळ कारण समजले नाही आहे. होय पण तुझ्या वागण्या बोलण्यावरून तू अशी का वागली असावीस याचा मी केवळ अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला.”
“बर, तसे म्हणूयात हवे तर.
आता आम्हाला सांगा नक्की तुम्ही काय अंदाज बांधलेत? मी हा निर्णय का घेतला असावा?” – नेहा शांतपणे म्हणाली.
“हे सगळा तुझ्या त्या कोवळ्या वयातल्या प्रेमामुळे झाले आहे.” – बाबा
“कदाचित मी त्युझ्या प्रियकराला धमकावून दूर जाण्यास सांगितले हे तुला पटले नसावे.. आणि त्यामुळेच कदाचित मला धडा शिकवण्यासाठी असे वागत असशील.” – बाबा
यावर नेहा कुत्सितपणे हसली.
“तुम्ही त्याला धमकावणार हे तर आम्हाला अपेक्षितच होते, असे होणार हे आम्हाला दोघांना माहित होते. आणि आम्ही तशी मानसिक तयारीही ठेवली होती.
आणि तुम्हाला धडा शिकवायचे माझ्याकडे खूप मार्ग होते बाबा. त्या साठी मी असा टोकाचा निर्णय घेणार नाही हे तुमच्या सारख्या अधिकार्याला समजायला हवे...”
हा मात्र बाबांसाठी धक्का होता. तो पचवायला त्यांना थोडे जडच गेले, आणि ते जागेवरून उठून खिडकीत उभे राहिले.
“असे असूनही मग टोकाचा निर्णय का?” – पारखी बाई
यावर मात्र नेहाने परत एकदा मौन धरण केले.
“चल मान्य करूयात, तू म्हणतेस तसा तुला मला धडा शिकवायचा नसेल, पण मग मला खरेच समजत नाही. त्या कोवळ्या प्रेमामुळे तू आपल्या आयुष्यात एवढे वादळ का निर्माण करावे?”
"कोवळं प्रेम....." - नेहा कुत्सित पणे हसली आणि पुढे बोलू लागली.
"तुमच्या दोघांच्या ध्येया पुढे त्याची किंमत नगण्यच असेल नाही..." - नेहा शांतपणे बोलत असली तरी तिच्या नजरेतून तिचा राग आणि जरब स्पष्ट जाणवत होती.
"माझ्यासाठी तरी देशाच्या सुरक्षेपुढं बाकी गोष्टी नगण्यच आहेत." - बाबा शांतपणे म्हणाले.
"असेच काहीतरी बोलला होता तो... जेव्हा सुरुवातीला भेटला होता.
त्यालाही तुमच्या प्रमाणेच देशाची सुरक्षाच महत्वाची वाटत होती. त्याच्या दृष्टीने सध्याची व्यवस्थाच देशाला नष्ट करू पाहत होती. आशा व्यवस्थे विरुद्ध बंड करणे किती साहजिक आहे हे तो हसत हसत सांगायचा...
त्या वेळी तुम्ही दोघे समोरासमोर उभे राहाल असे कधीच वाटले नव्हते. तुमचे सगळे आदर्श गुण, मला त्याच्यामध्ये दिसू लागले होते आणि नकळतच मी त्याच्या प्रेमात अडकले.
खूप सुंदर दिवस होते ते, कदाचित माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वात सुंदर. पण त्याचे परिणाम इतके भयावह असतील असे मला कधीच वाटले नव्हते.
जेव्हा तुम्ही त्याला शहर सोडून जण्यास संगीतले तेव्हा तो मला भेटला होता-" - नेहा
"होय, माहिती आहे. इतकेच नाही तर त्याने तुला काय सांगितले हे सुद्धा माहिती आहे.
माझ्याविषयी आणि देशाविषयी कायमचे विष पेरून गेला तो तुझ्या मनात....
बरोबर संधी साधली त्या नीच माणसाने...." - बाबा रागाने म्हणाले. नेहा परत एकदा कुत्सितपणे हसली.
"तुम्हाला काय वाटते? माझा निर्णय मी केवळ तो जे काही बोलला त्या मुळे घेतला आहे काय?
तुम्हाला जर तसे असेल तर ते पूर्ण चुकीचे आहे.
खरे तर, तो काय म्हणाला हे माझ्या साठी फार महत्वाचे नाही. कारण त्या वेळेपुरते तरी मी सत्य स्वीकारले होते. आज्ञाधारक मुलगी होते ना मी....
तसेही तुम्ही देश सेवेसाठीच सगळे करत होतात हे मला मान्य होते. कदाचित त्यामुळेच मला आमचा विरह सहन करण्याची बळ मिळाले होते.
आमच्या दूर राहण्याने तुमच्यातील संघर्ष विरुन जाईल आणि जरी तो चालू राहिला तरी तो तात्विक असेल, त्यात वैयक्तिक हेवे-दावे नसतील अशी भाबडी समजूत झाली होती माझी.
पण तुम्ही दोघांनी मला चुकीचे ठरवले. माघार घेणे तुमच्या दोघांनाही कदाचित अपमानास्पद वाटू लागले असावे.
त्याला माझे प्रेम आणि त्याची तत्वे सोडवली नाहीत आणि तुम्हाला तुमचे कर्तव्य चुकले नाही. परिणामस्वरूप दिवसेंदिवस तुमचा संघर्ष वाढतच गेला. घाव प्रतिघांव होऊ लागले, नैतिक-अनैतिक सीमारेषा धूसर होऊ लागल्या. तुम्ही दोघे त्वेषाने लढत होतात, एकमेकांवर कुरघोडी करत होतात.
एक मेकांना मात देण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जायला तयार होतात. तुमच्या दोघांसाठी आता एकमेकांना नेस्तनाबूत करणे अधिक महत्त्वाचे झाले होते.
पण त्याचवेळी तुम्ही एकमेकांवर केलेल्या घावामुळे जखमा मात्र मला होत होत्या. अशा जखमा ज्या कदाचित कधीच भरून येणार नव्हत्या."
"काय बोलते आहेस तू?" - बाबा
"काहीच माहिती नाही असा आव आणू नका..." - नेहा रागाने म्हणाली
"हे बघ नेहा, त्याच्या देश-विरोधी कारवाया जो पर्यंत चालू होत्या तो पर्यंत केस माझ्या साठी संपणार नव्हती. हे तुला चांगले ठाऊक असायला हवे होते." - बाबा खंबीरपणे म्हणाले.
"बरोबर... अगदी बरोबर.
तुम्ही बरोबरच वागलात आणि तो ही त्याच्या जगी बरोबरच वागला.
माझेच चुकले. कारण मीच मुर्खासारखी स्वप्नांच्या दुनियेत जगत होते.
पण एक गोष्ट मात्र खरी की त्याच वेळी तुमचा हा खेळ कसा संपणार या प्रश्नाची धास्ती मला जाणवू लागली होती, कारण तुमच्या दोघांपैकी एकाचा विजय म्हणजे दुसरऱ्याचा सर्वनाश असणार याची मला पुरती कल्पना येऊ लागली होती.
......आणि म्हणूनच मीच हा खेळ संपवायचे ठरवले.
मी त्याला जाऊन भेटायचे ठरवले, 'माझे प्रेम, हा केवळ दिखावा आहे.' असे मी त्याला सांगणार होते. त्याचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसावा म्हणून मी केवळ तुमच्या वागण्यावरून असे वागले अशी पुस्तीही जोडणार होते.
माझ्या या वाक्याचे काय परिणाम होतील याचा अंदाज मला होता.
खरे तर माझ्या या शब्दांमुळे तो कोलमडून पडेल याची पूर्ण कल्पना मला होती, पण त्यांनतर तो या सगळ्यांपासून दूर कुठे तरी निघून जाईल आणि नवीन डाव मांडेल असा माझा अंदाज होता.
अगदी लगेचच नाही पण काही दिवसांनी तरी या धक्क्यातून सावरून तो परत उभा राहू शकेल, तसेच त्या वेळी सगळे शांत झाले असेल, आपल्या सगळ्यांच्याच जखमा भरल्या असतील आणि आपण तिघेही आपल्या आयुष्यात आल्या जागी समाधानी असू असे स्वप्न मी पुन्हा एकदा बघू लागले होते.
पण हे काम तितके सोपे नव्हते, आधी मला माझेच मन घट्ट करावे लागणार होते. खूप विचार केला आणि सर्व धीर एकवरून मी त्याला भेटायला गेले.
सुरुवातीला त्याला वाटले मी मस्करीच करते आहे, त्याचे मन माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. आपले प्रेम खरे असल्याची साक्ष ते वारंवार त्याला देत होते. एकूणच तो ऐकणार नाही हे मला समजले, म्हणून मी त्याला दिवसभर जुळवलेली कहाणी ऐकवली, आमच्या कॉलेजातील एका अनोळखी मुलाचा फोटो माझा प्रियकर म्हणून सादर केला. आणि तेव्हाच माझ्या शब्दांनी त्याच्या मनावर विजय मिळवला.
पण त्या वेळेची त्याची नजर आठवली की अजूनही मला घाबरायला होते.
'मी हरलो, मी हरलो' असे अस्पष्ट पणे पुटपुटला होता तो... त्याच्या मनात निर्माण झालेला भावनांचा कल्लोळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागला होता. मनातील वादळामुळे जरी घशातून शब्द फुटत नसले तरीही त्याची नजर तिचे काम बिनचूक करत होती.
का?
असे का?
माझ्या बरोबरच का?
सगळेच खोटे आहे का?
या जगात सच्चेपणाला जागाच नाही का? ....
असे असंख्य प्रश्न ती माझ्यावर उधळत होती, त्या पैकी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याची मी तयारीच केली नव्हती..
मला त्याच्या नजरेचा दाह फार वेळ सहन झाला नाही आणि मी सरळ त्याच्याकडे पाठ फिरवून निघून आले, पाठ फिरताच, खूप प्रयत्नांनी अडवून ठेवलेल्या अश्रूंना मोकळी वाट मिळाली होती.
घरी आले तेव्हा आई झोपून गेली होती आणि तुम्ही ड्युटीवरून यायचे होतात. त्यामुळे माझे दुःख आवरायला मला रात्रीची साथ आपसूकच मिळाली.
हा धक्का पचवायला जड असला तरीही दुसऱ्या दिवसापासून नव्याने सुरुवात करायची असे मी ठरवले होते.
त्या रात्री मी अश्रूंना अडवले नाही, मला माझे मन रिकामे करायचे होते. मनातील भावना मी अश्रूंच्या वाटेने विसर्जित करत होते. पहाटे पहाटे नुकताच डोळा लागला होता आणि तेव्हाच रक्ताने माखलेले कपडे घेऊन तुम्ही घरी परत आलात.
मी घाबरले, तुम्हाला येऊन बिलगले.
तेव्हा तुम्ही म्हणाला होतात,
'घाबरू नकोस.. मला काहीही झालेले नाही. हे रक्त माझे नाही. एका बदमाशाचे आहे...'
तुमचे ते शब्द मला केवढे सुखावून गेले होते तेव्हा....
पण संध्याकाळी आमच्या दोघांच्या मित्राने मला गाठले, मी तेथून निघून गेल्यावरची हकीकत त्याने मला ऐकवली आणि तेव्हाच मला समजले की सकाळी तुमच्या अंगावर चिकटलेले रक्त त्याचेच होते म्हणून.
जगविरुद्ध बंड करणारा तो, प्रेमातील पराभवाने पुरता खचून गेला होता.
....आणि त्याच नैराश्यात किंवा रागात त्याने नको ते पाऊल उचलले. मित्रांची नजर चुकवून अगदी एकट्यानेच तो सरकारी यंत्रणेवर हल्ला करण्यासाठी चालून गेला ...
तुमच्या सारख्या कुशल आणि प्रशिक्षित अधिकाऱ्यांसमोर आपला निभाव लागणार नाही हे त्याला ठाऊक होते तरीही....
आणि काळाने त्याचा डाव साधला, तुमच्या पैकी एक कुशाग्र ऑफिसरची गोळी त्याचे बंड कायमचे शांत करून गेली होती....."
आता मात्र नेहा मुक्त पणे रडत होती, बाबांचे डोळेही पाणावले होते.
"बाबा, तुमचा संघर्ष जर वगळला असता तर आमचे प्रेम कोवळं असले तरीही निश्चितच खरे होते, गहिरेही होते...
अन्यायाविरुद्ध बंड करायची प्रवृत्ती सोडली तर त्याचात एकही अवगुण नव्हता.....
केवळ परिस्थितीमुळे आणि काहीशा दुर्दैवाने तुम्ही दोघे एक मेकांपुढे उभे ठाकला होतात.....
माझ्या पहिल्या प्रेमाची झालेली ही अवस्था पाहून परत प्रेम करायची माझी हिंमतच कधी झाली नाही....आणि हो म्हणूनच हा कठोर निर्णय मला घ्यावा लागला. कदाचित माझ्या या निर्णयामुळे आमच्या प्रेमाच्या वाट्याला थोडा तरी न्याय मिळेल असे मला मनापासून वाटते.
त्याच्या समोर मी ऐकवलेल्या कथेमुळे त्याची झालेली अवस्था पाहून मला तुम्हाला हे सत्य कधीच समजू नये असेच वाटत होते...
या संघर्षात मी माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका व्यक्तीला गमावून बसले होते पण त्याच बरोबर एक गोष्ट मात्र मी हट्टाने खरी केली होती.
ती म्हणजे त्या दिवसापासून तुमचा संघर्ष तरी पूर्णपणे संपला होता.
आता त्याचा विषय सोडला तर बाकी सगळे पूर्ववत आले होते, आणि ते तसेच पूर्ववत ठेवण्याच प्रयत्न मी त्या दिवसापासून आज पर्यंत करते आहे.
तुम्हाला माझा निर्णय आवडलेला नाही... मान्य आहे.
पण मलाही खूप गोष्टी मान्य नव्हत्या बाबा....पण मला त्या स्वीकाराव्या लागल्या.. माझ्याप्रमाणे तुम्हीही माझा हा निर्णय स्वीकारावा अशी माझी माफक अपेक्षा आहे.
खरे तर मला या विषयावर बोलायची कधीच इच्छा नव्हती, पण तुम्ही हार मानणार नाहीत म्हणून आज एकदाच आणि शेवटचे आपण या विषयावर बोललो आहोत.
आता उद्याची सकाळ होईल तेव्हा सगळे काही पूर्ववत झाले असेल अशी मी अपेक्षा करते..." – नेहा
इतके बोलून नेहा त्या खोलीतून निघून गेली. तिच्या साठी हा विषय आता कायमचा संपला होता.
आता इथे थांबून अधिक काही साध्य होणार नाही हे समजून पारखी बाई बाहेर पडल्या होत्या... नेहाच्या मनातील दु:खाची माहिती झाल्यामुळे आता त्या आपला पुढचा मार्ग अधिक पद्धतशीरपणे निवडू शकणार होत्या.
बाबा मात्र त्या खोलीत एकटेच बसून होते. नेहाच्या अविवाहित राहण्याच्या निर्णयामागचे कारण समजल्यावर आता त्या अर्ध्या तासाचे चटके त्यांना रोज अधिकच जाणवणार होते.... आपल्या एकुलत्या एक मुलीच्या कोवळ्या पण गहिर्या प्रेमाचा असा करूण अंत त्यांनाही आता कायमचा बोचणार होता.