Paris - 6 in Marathi Travel stories by Aniket Samudra books and stories PDF | पॅरिस - ६

Featured Books
Categories
Share

पॅरिस - ६

०९ मे, २०१८

पॅरिसला आल्यावर सायकलिंग करायचेच हे आमच्या ‘टु-डु’ लिस्ट मध्ये होते. ‘बाईक अबाऊट टूर्स’ नावाच्या एका संस्थेशी ह्याबद्दल इथे येण्याआधीच बोलून ठेवले होते. ही लोक १५-२० लोकांचे छोटे ग्रुप्स बनवतात, त्यांना सायकली पुरवतात आणि पॅरिसचा काही भाग फिरवतात. साधारण ४-५ तासांची हि टूर असते.

एक तर आम्ही सगळे सायकल-वेडे, इकडे पुण्यात खूप सायकलिंग करतो. पॅरिसला तर सायकलिंग मोठ्या प्रमाणात होते, त्यासाठी ट्रॅक्स पण आहेत बरेच, विचार होता सायकलवर फिरायला तर मजा येईलच, शिवाय बऱ्याच गोष्टी शोधाशोध न करता बघताही येतील. स्वातीताईला बुधवारी युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर्स असतात त्यामुळे त्या दिवशी ती आमच्याबरोबर नसणार होती. सायकलिंग आणि फिरणे दोन्ही गोष्टी होऊन गेल्या असत्या ह्या विचाराने आमचा बुधवार त्यासाठी ठरला होता. पण काल झालेली पायपीट आणि झोपायला झालेला उशीर त्यामुळे एक तर उठलोच ८.३०ला आणि चालणं झालेलं असल्याने सायकलिंगसाठी म्हणावा तसा उत्साह येत नव्हता. शिवाय किमान आदल्या दिवशी नावनोंदणी आवश्यक असते तीही केलेली नव्हती. तरी पण एकदा फोन करून चौकशी केली.

ते म्हणाले टूर १०.३०ला सुरु होते, ९.४५ पर्यंत अमुक-अमुक ठिकाणी पोहोचलात आणि सायकल शिल्लक असेल तर काहीतरी करता येईल.

पुढच्या ४५ मिनिटांत आंघोळी उरकून मेट्रो पकडून तिथपर्यंत पोहोचणे अवघडच होते. स्वातीताईचा शुक्रवारही बिझी डे होता, तेंव्हा करु मग सायकलिंग असे ठरले. सकाळी फिरायला मग नोट्रे-डेम आणि परिसर बघायचे ठरले. स्वातीताई बरोबर नसल्याने आज आमचं आम्हीच जाणार होतो. स्वातीताईने मॅपवर सर्व ठिकाणं समजावली. कुठली मेट्रो कुठुन पकडायची तेही सांगितलं. मग सावकाशीत आंघोळी उरकल्या, टिपिकल फ्रेंच ब्रेकफास्ट घेतला ज्यामध्ये croissant नावाचा एक ब्रेड होता. साधा गोडसर आणि दुसरा चोक्लेट्सचं डिपींग असलेला. बरोबर विविध प्रकारचे जॅम आणि कॉफी. माझ्यासारख्या गोडखाऊ माणसाला ही पर्वणीच होती. वाटेत खायलाही सटरफटर घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या पहिल्या शोध मोहिमेला.

[Image source Internet]

पॅरिसला Saint Salazar नावाचं मुख्य स्टेशन आहे. कुठेही जायचं असेल तरी सर्वप्रथम इथे यायचे आणि इथून पुढे. अख्या पॅरिसला जाणाऱ्या मेट्रो इथूनच सुटतात. Saint Salazar अर्थात SaLazar ला जाणं अगदीच सोप्प, ढीगभर मेट्रो आहेत इथे जायला. पहिला टप्पा सहज पार पडला. आता दुसरा टप्पा म्हणजे SaLazar वरुन Notre Dame ला जाण्याचा.

घरातून निघताना स्वातीताईने दोन गोष्टी स्पष्ट सांगितल्या होत्या –

१. You just cannot get lost in Paris. Keep your eyes open and you will find the way
२. मेट्रो मधून बाहेर रस्त्यावर ज्या बाजूने / ज्या exit ने याला, परत येताना तिथुनच आत शिरा म्हणजे बरोब्बर त्याच प्लॅटफॉर्म वर जाल जेथून परतीची मेट्रो पकडायची आहे.

Notre Dameची मेट्रो अगदी लग्गेचच मिळाली आणि ४ स्टेशन्स नंतरच्या प्लॅटफॉर्म वर आम्ही उतरलो. हे जग सगळं आमच्यासाठी नवीनच होते. आधी म्हणालो होतो त्याप्रमाणे पॅरिसमध्ये मेट्रो जमिनीच्या एक दोन नाही तर चक्क ४-५ लेव्हल्स खालपर्यंत आहेत. प्लॅटफॉर्म वरून बाहेरच्या जगात यायला अनेक जिने / एस्कलेटर्स / डावीकडे उजवीकडे वळत वळत यावे लागते. प्रश्न होता फक्त भाषेचा कारण सगळ्या पाट्या फ्रेंचमधूनच लिहिलेल्या, इंग्लिशचा नामोनिशाण नाही. पण चित्रकृती संकेतचिन्ह मदतीला होती, त्यामुळे टप्प्या टप्प्याने बाहेर येत होतो.

स्टेशन्सला बऱ्यापैकी गर्दी होती, पण सर्वकाही शिस्तीत. कुणाला मेट्रोत शिरायची घाई नाही कि बाहेर पडायची. मेट्रो १५ सेकंदच थांबायची पण तरीही घाई-गडबड न करता सुद्धा सर्व सुरळीत चालू होते. पहिली आतली लोकं बाहेर येणार आणि मगच बाहेरची लोकं आत जाणार. एस्कलेटर्सच्या उजव्याबाजूला आपण उभं राहायचं. डावी बाजु पूर्णपणे मोकळी. ज्यांना घाई आहे ते ह्या बाजूने चढून जायचे. सर्व काही अलिखित, परंतु कटाक्षाने पाळले जाणारे.

जमिनीच्या इतक्या खाली इतकं विस्तीर्ण जग अचंबित करणारे होते. पॅरिस जितकं जमिनीवर आहे तितकंच जमिनीच्याखाली सुद्धा आहे ह्याची जाणीव झाली. अनेक ठिकाणी गुगल-मॅप्स वापरता यावे म्हणून मोठ्ठाले टचस्क्रीन मॉनिटर्स लावलेले होते, त्यामुळे बाहेर पडायच्या आधीच आपल्याला कुठे जायचे आहे आणि आजूबाजूला काय आहे ह्याची चाचपणी करता आली.
काही मिनिटांमध्येच बाहेर जायचा रस्ता सापडला, शेवटचा जिना चढून वर आलो आणि काही अंतरावर समोरच notre dame ची भव्य वास्तू उभी होती. आपलं आपण, न चुकता इथपर्यंत आलो ह्याचा आनंद इतका होता कि नक्की कुठल्या बाजूने रस्त्यावर आलो आहोत हेच पाहायचे विसरून गेलो.

हवा खूपच छान होती, ऊन असले तरी हवेत गारठा होता. क्षणाचाही वेळ न दवडता लगेचच कॅमेराचा क्लिकक्लिकाट सुरु केला. वाईड शॉट्स, क्लोज शॉट्स खूप मस्त मिळाले.

माझ्याकडचा DSLR बघुन एक बाई तिचा कॅमेरा घेऊन आली.
“Looking at your camera, looks like you are a professional photographer.. can you please click our family picture..?”

मला खरं तर त्यांचे फोटो काढण्यात काडीचाही उत्साह नव्हता, नावापुरते २-४ फोटो काढून तिला कॅमेरा देऊन टाकला. पण तिला काही बहुदा ते आवडले नसावेत, कुठल्या तरी वेगळ्याच भाषेतून तिने तिच्या नवऱ्याबरोबर काहीतरी बडबड केली. मग तिचा नवरा परत कॅमेरा घेऊन आला आणि त्याने कसा फोटो हवाय ते सांगितले. शेवटी हवा तसा फोटो त्यांना काढून दिला. त्यांनीही मग उपकाराची परतफेड म्हणून आमचाही एक फोटो काढून दिला.

मनसोक्त फोटो काढून झाल्यावर समोरच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी शिरलो. बरेचसे गिफ्ट-आयटम्स खरेदी केले आणि मग २-३ कि.मी. पायपीट करून लॅटिन-क्वार्टर्स च्या गल्लीमध्ये शिरलो. ते लॅटिन-क्वार्टर्स राहिले बाजूलाच, आमचे लक्ष वेधून घेतले ते त्या गल्लीनामध्ये असलेल्या अनेक-विविध खाण्याच्या दुकानांनी. ती एक प्रकारची खाऊ-गल्लीच होती. विविध प्रकारच्या बेकऱ्या, फ्राईड-चिप्सचे अनेक-विविध प्रकार, आइसक्रीम्स, चोक्लेट्सची दुकानं, फ्रेंच फुड्सचे रेस्टोरंटस ह्यांची रेलचेल होती. हे इतकं आजूबाजूला पाहिल्यावर नकळतच भुकेची जाणीव झाली. मग पेटपूजा केली आणि परत मुख्य रस्त्याला आलो.

ह्याबाजूलाही शॉपिंगसाठी बरीच व्हरायटी होती. एका हिंदी बोलणाऱ्या बांग्लादेशीच्या दुकानात घुसलो आणि अजून काही छान छान शॉपिंग करून बाहेर पडलो. एव्हाना तीन वाजून गेला होता आणि संध्याकाळी मला आणि बायकोला एका ‘शो’ ला जायचे होते त्यामुळे परतीचा मार्ग धरला आणि मग जाणीव झाली, मेट्रो स्टेशनच्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचे. कारण बाहेर येताना आपल्याच धुंदीत असल्याने तो मार्ग बघायचाच राहिला होता.

झालं.. सकाळचा तो न चुकण्याचा आनंद विरून गेला आणि शोधाशोध सुरु झाली. पाच-सहा ठिकाणांवरुन मेट्रो-स्टेशन्स गाठली, पण प्रत्येक वेळी वेगळाच प्लॅटफॉर्म. SaLazar ला जाणारी मेट्रो तेथून जातच नव्हती. पुन्हा तेव्हढे जिने चढून वर. काहीच समजायला मार्ग नव्हता. मध्येच कधीतरी वाटायचं, हं, इथूनच गेलो होतो आपण, हा रस्ता बरोबर आहे, पण प्लॅटफॉर्मला जाऊन तेथून जाणाऱ्या मेट्रो नंबर्सची लिस्ट बघितली कि निराशा पदरी पडायची.

चकवा म्हणतात तो काय असतो ह्याचा अनुभव आज प्रत्यक्षात, ते पण पॅरिसमध्ये मिळत होता.

आधीच वरती रस्त्यावर भरपूर चाललो होतो, त्यात हे इतक्या वेळा जिने चढ उतार .. ह्यामुळे आता पाय दुखायला लागले होते. अचानक छोटा मुलगा म्हणाला, आपण इकडूनच गेलो होतो नक्की.. आपण आलो तेथे स्पायडरमॅन चे चित्र होते नक्की. आम्हाला कुणालाच खात्री वाटत नव्हती, पण सगळं फिरुन, शोधून पण झालं होतं , म्हणून नाईलाजाने गेलो त्या रस्त्याने आणि खरोखरच बरोब्बर स्थानकावर पोहोचलो, मेट्रोही आलेलीच होती. धावत जाऊन एकदाच आत शिरलो तेंव्हा कुठे हुश्श झाले.

लवकरात लवकर घरी पोहोचून थोडी विश्रांती घेणं आवश्यक होते, कारण संध्याकाळी मला आणि बायकोला जायचे होते एका खास शो ला, 'लिडो दी कॅब्रे शो'

[क्रमशः]