Savitribai in Marathi Magazine by Nagesh S Shewalkar books and stories PDF | फुल्यांची सावित्रीबाई

Featured Books
  • فطرت

    خزاں   خزاں میں مرجھائے ہوئے پھولوں کے کھلنے کی توقع نہ...

  • زندگی ایک کھلونا ہے

    زندگی ایک کھلونا ہے ایک لمحے میں ہنس کر روؤں گا نیکی کی راہ...

  • سدا بہار جشن

    میرے اپنے لوگ میرے وجود کی نشانی مانگتے ہیں۔ مجھ سے میری پرا...

  • دکھوں کی سرگوشیاں

        دکھوں کی سرگوشیاںتحریر  شے امین فون کے الارم کی کرخت اور...

  • نیا راگ

    والدین کا سایہ ہمیشہ بچوں کے ساتھ رہتا ہے۔ اس کی برکت سے زند...

Categories
Share

फुल्यांची सावित्रीबाई

फुल्यांची सावित्रीबाई

'सर्व मानव ही एका ईश्वराची लेकरे आहेत हे जोपर्यंत आपणास कळत नाही तोपर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप आपणास कळणार नाही. आपण सारे मानव भाऊ भाऊ आहोत असे वाटणे हे ईश्वर ओळखण्याच्या मार्गातील महत्त्वाचे चिन्ह आहे आणि ते सत्य आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही श्रेष्ठ व महार-मांग नीच म्हणून स्पृश्य-अस्पृश्यता मानणे मूर्खपणाचे आहे. जे लोक असे मानतात व तिचे देव्हारे माजवितात. त्यांना ईश्वराचे सत्यस्वरुप कधीच ओळखता येणार नाही. उच्च जाती, नीच जाती ही ईश्वरकृत नाहीत. स्वार्थी मानवाने स्वतःचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी आणि त्यायोगे आपले व आपल्या वंशजांचे हित व्हावे म्हणून निर्माण केलेले हे पाखंडी तत्त्वज्ञान आहे. दुसऱ्या मानवास अस्पृश्य मानणे हे मनुष्यात्वाचे लक्षण नाही. म्हणून अस्पृश्यतेचा धिक्कार करणे यातच प्रत्येक व्यक्तीचे, समाजाचे किंवा कोणत्याही मानवी संस्कृतीचे परम कल्याण आहे....'

- सावित्रीबाई फुले.

सातारा जिल्ह्यातील शिरवळ या गावापासून जवळ असलेल्या नायगाव ता. खंडाळा येथे खंडोजी नेवसे पाटील यांचे वास्तव्य होते. नेवसे पाटील हे घराणे म्हणजे पेशव्यांच्या काळातील एक इनामदार घराणे. लक्ष्मीबाई ह्या त्यांच्या पत्नी. या दांपत्याच्या जीवनात परमोच्च आनंदाची एक सर आली. ३ जानेवारी १८३१ यादिवशी त्यांच्या घरात एका कन्यारत्नाचा जन्म झाला. मोठ्या उत्साहात या मुलीचे नाव सावित्री असे ठेवण्यात आले. सावित्री ही खंडोजी आणि लक्ष्मीबाई यांची एकुलती एक कन्या होती. त्यामुळे सावित्री आईवडिलांची लाडकी होती. तो काळ स्त्री शिक्षणाच्या बाजूचा नव्हता मात्र बालविवाहाची कास धरलेला होता. सावित्री सात वर्षांची झाली आणि खंडोजी पाटलांनी तिच्यासाठी वर शोधायला सुरुवात केली. सात वर्षे वय म्हणजे अगदीच लहान पण सावित्रीची शरीरयष्टी तशी मजबूत असल्यामुळे तिचे वय त्यामानाने थोडे जास्तच वाटत होते. त्यामुळे सावित्रीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.

सुयोग्य मुलाचा शोध घेता-घेता दोन वर्षे उलटली. १८४० यावर्षी पुणे येथील गोविंदराव फुले यांचे चिरंजीव ज्योतिबा यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. त्यावेळी फुले कुटुंबीय पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या खानवडी या गावात राहात असले तरीही ते मूळचे सातारा जिल्ह्यातील कटगूण येथील रहिवासी होते. गोविंदराव यांचा परंपरागत फुले विकण्याचा व्यवसाय होता. लग्नसमयी ज्योतिबा तेरा वर्षांचे तर सावित्रीबाई यांचे वय नऊ वर्षांचे होते. सावित्रीबाई सासरी आल्या. त्यावेळी त्यांच्याजवळ एका ख्रिश्चन मिशनर्यांनी भेट दिलेले एक पुस्तक होते. सावित्रीबाईंना शिकण्याची खूप आवड होती परंतु समाज स्त्री शिक्षणाच्या विरोधात होता. सावित्रीबाई सासरी आल्या तेव्हा तिथे ज्योतिबांची सगुणाऊ नावाची मावसबहीण राहात होती. तिलाही शिकण्याची ओढ होती. स्वतः ज्योतिबा यांची विचारसरणी स्त्री शिक्षणाचा कैवार घेणारी होती. पत्नीची शिकण्याची इच्छा पाहून ज्योतिबांनी पत्नीला शिकवण्याचा निर्णय घेतला. गोविंदराव फुले यांना आपल्या सूनेने सामाजिक प्रवाहाच्या विचारधारेच्या विरुद्ध जाऊन शिकावे हे मान्य नव्हते. मुळात त्यांचा स्वतःचा मुलींच्या शिक्षणाला विरोध होता. परंतु ज्योतिबा स्वतःच्या मतावर ठाम होते. समाजाच्या आणि मुख्य म्हणजे वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांनी सावित्रीबाईंना शिकवायला सुरुवात केली. घर आणि शेत या दोन शाळांमध्ये सावित्रीबाई शिक्षणाची बाराखडी गिरवू लागल्या. शेतात काम करत असताना झाडाखाली बसून काळ्या काळ्या मातीमध्ये अक्षरे गिरवण्याचा सराव करु लागल्या.

ज्योतिबा फुले यांनी १८४८ यावर्षी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा काढली. इंग्रज शासन काळात कुण्या भारतीय व्यक्तीने सुरु केलेली ती पहिली शाळा होती. त्यांच्या या शाळेत मुलींच्या जाती-धर्माला थारा नव्हता. सर्वांसाठी खुली अशी ती शाळा होती. स्त्रिया आणि त्यातही अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा एक प्रकारचा गुन्हा होता. सर्वत्र ज्योतिबांवर टीका सुरु झाली परंतु ज्योतिबा डगमगले नाहीत. स्वतः काढलेल्या शाळेत ज्योतिबा शिक्षक म्हणून काम सुरू केले. या शाळेत अजून एक शिक्षक असावा या हेतूने ज्योतिबांनी दुसरा शिक्षक नेमण्याचा विचार आणि प्रयत्न सुरु केले. परंतु त्या शाळेवर अस्पृश्यांची शाळा असा शिक्का बसलेला असल्यामुळे कुणीही शिक्षक म्हणून यायला तयार होत नव्हता. फार मोठा प्रसंग उभा राहिला. हातात घेतलेले कार्य तर सोडायचे नव्हते आणि आलेल्या संकटावर मात करून पुढे जायचे होते. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या जोडीने एक महत्त्वाकांक्षी असा निर्णय घेतला. फार मोठे धाडस केले. स्वतः सावित्रीबाई यांनी शाळेतील मुलींना शिकविण्याचा विडा उचलला. सावित्रीबाई तशा अक्षर ओळख असलेल्या. अशा परिस्थितीत इतरांना शिक्षण द्यायचे म्हणजे? परंतु जे कार्यसिद्धीसाठी पेटून उठलेले असतात, स्वतःचे सर्वस्व अर्पण करायला सिद्ध झालेले असतात त्यांना येणारी संकटे, अडचणी यांचे काही वाटत नाही. सावित्रीबाई यांनी शिक्षिका हे पद स्वीकारले. त्या अगोदर पती ज्योतिबा यांच्याकडून स्वतः शिक्षण घ्यायच्या आणि मग शिकलेले शाळेत जाऊन शिकवायच्या. किती अवघड काम होते हे. पण सावित्रीबाईंना ते लीलया पेलले. परंतु संकटाची मालिका का संपत होती? संकटे हात धुवून मागे लागली होती. फुले दांपत्याचा निर्णय न आवडलेल्या अनेकांनी त्यांच्या मार्गावर काटे पसरविण्याचे काम सुरू केले. ज्यावेळी सावित्रीबाई शाळेत जाण्यासाठी निघायच्या त्यावेळी असंतुष्ट लोक त्यांच्यासाठी अभद्र, निंदायुक्त अशी भाषा वापरत असत. परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाहीत, खचल्या नाहीत. कुणालाही शब्दाने न बोलता, खाली बघत त्या इच्छित स्थळी पोहोचत असत. सावित्रीबाईंच्या या मौन हालचालींमुळे त्रास देणारे अजून संतापायचे. रागाने लालेलाल होऊन कुणी त्यांच्यावर खडे-दगडे फेकत असत. तरीही सावित्रीबाई निश्चलपणे मार्गक्रमण करीत असत. पुढे जाऊन काही लोकांनी त्यांच्या दिशेने शेण आणि चिखल फेकायला सुरुवात केली. सावित्रीबाईंचे सारे शरीर चिखल-शेणाने भरून जात असे. यावरही त्यांनी एक तोडगा काढला. शाळेत जाताना सोबत असलेल्या एका पिशवीत त्या एक साडी घेऊन जायच्या. शाळेत पोहोचले की, शेण-चिखलाने भरलेली साडी बदलून पिशवीतली साडी नेसून अध्यापनाचे काम करायच्या.

आपल्या कोणत्याही त्रासाला सावित्रीबाई दाद देत नाहीत हे पाहून लोकांनी एक चाल खेळली. काही लोकांनी सरळ गोविंदराव यांची भेट घेतली. गोविंदराव हे जुन्या चालीरीती मानणारे गृहस्थ आहेत हे जाणून त्यांनी गोविंदरावांचे कान भरले. त्यांना सांगितले की, 'तुमचा मुलगा आणि सून धर्म विरोधी काम करीत आहे. तुमची सून स्वतः तर शिकतेच आहे परंतु इतर बायकांनाही शिकवते आहे. हे तुम्ही कसे काय सहन करता?' या गोष्टीचा जो अपेक्षित परिणाम व्हायला हवा होता तो झाला. गोविंदरावांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाई या दोघांनाही ते करीत असलेले काम समाज मान्य नाही. अनेक लोकांना ते पटलेले नाही. तेव्हा हातात वेळ आहे तोवर आवरते घ्या. शाळा आणि शिक्षण बंद करा. असे ऐकवले. परंतु ज्योतिबांनी अतिशय नम्रतेने वडिलांना नकार दिला. शेवटी गोविंदराव यांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाई या दोघांनाही घर सोडायला सांगितले. त्यामुळे पती-पत्नीवर एक अनपेक्षित असे वेगळेच संकट कोसळले. उभयतांना वाईट जरूर वाटले परंतु ते हातपाय गाळून बसले नाहीत. वडिलांना आपले समाजोपयोगी कार्य आवडत नाही, त्यांनी आपणास वेगळे व्हायला सांगितले आहे. हरकत नाही. नियतीची इच्छा असे मानून त्यांनी घर सोडले. सावित्रीबाई या प्रकरणाने खचल्या नाहीत कारण त्यांचा पतीवर आणि ते करीत असलेल्या कामावर पूर्ण विश्वास होता. पुढेही पतीला संपूर्ण साथ द्यायची असा निश्चय करून त्या जोमाने कामाला लागल्या. अस्पृश्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे हे सांगून त्या म्हणाल्या, "अज्ञान, गतानुगतिकता, भ्रामक समजुती यांच्या विळख्यात गुरफटलेल्या शूद्रातिशूद्रास शिक्षणाची जाणीव होईल. म्हणून शिक्षण घेण्यास टाळाटाळी आपल्या हातून झाल्यास आपण भोगीत असलेली दुर्दशा पुढील पिढीस भोगणे क्रमप्राप्त ठरेल."

केवळ विचार मांडून मोकळे होणारांपैकी फुले दांपत्य नव्हते. तर विचाराला साजेशी कृती आणि अंमलबजावणी करण्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी १८४८ ते १८५८ या दशकात पंधरापेक्षा जास्त शाळा सुरु केल्या. त्यांच्या या शाळांना सरकारने मान्यता देऊन अनुदानही मंजूर केले. १८५२ यावर्षी मेजर कँडी यांच्या हस्ते फुले पती-पत्नीचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे बालविवाहानंतर ज्या मुली गरोदर असताना विधवा झाल्या अशा बायकांसाठी सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी एक माहितीपत्रक प्रसारित केले. त्यात असे आवाहन केले होते की, 'विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपले मूल न्यावे किंवा इथे ठेवावे हे तुमच्या खुषीवर अवलंबून राहील. तुमच्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल.' पाठोपाठ एक प्रसुतीगृहही सुरू केले. केशवपन हा विधवा स्त्रियांना सामोरे जावा लागणारा एक भयंकर प्रकार! सावित्रीबाईंनी या अनिष्ट प्रथेविरुद्ध जोरदार मोहीम उघडली. या प्रथेविरुद्ध नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली नाभिकांचा एक संप घडवून आणला. इतकेच नव्हे तर ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांना अपत्य नव्हते. त्यांनी काशीबाई नावाच्या एका विधवा महिलेचा यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला आणि काशीबाईसह यशवंतचाही सांभाळ केला.

ही सारी जनहितार्थ, समाजसेवेची कामे करत असताना सावित्रीबाईंनी एक छंद जोपासला. तो म्हणजे लेखनाचा! सामाजिक स्थिती, महिलांवर असलेले बंधन पाहून त्यांचे मन अस्वस्थ होत असे. या अस्वस्थ मनात विचारांचे काहूर माजले की, मग त्यांचे हात आपोआप लेखणी आणि कागद यांचा आधार घेत असे. आणि मग अस्वस्थ मनातील हुंकार कधी लेखाच्या माध्यमातून तर कधी कवितेच्या माध्यमातून कागदावर उमटत असत. या सर्व कवितांचा 'काव्यफुले' या नावाचा एक काव्यसंग्रह १८५४ यावर्षी प्रकाशित झाला. शीर्षकातही त्यांनी एक काव्यात्मकता साधली. एक तर घराण्याचे आडनाव फुले म्हणून आणि दुसरे म्हणजे संग्रहातील अनेक कविता ह्या फुलांना साद घालणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ एक-दोन कडवे घेऊया.....

फूल जाईचे

पहात असता

तो मज पाही

मुरका घेऊन ॥१॥

रीत जगाची

कार्य झाल्यावर

फेकून देई

मजला हुंगून ॥२॥

कवितेचे दोनच कडवे आहेत पण फार मोठे तत्त्वज्ञान सांगून जाते. निसर्गातील असो किंवा या संसारातील असो अनेक गोष्टींचा मानव उपयोग करून घेतो, उपभोग घेतो आणि स्वतःचे समाधान होताक्षणी फेकून देतो. मानवी स्वभावाचे खरेखुरे वर्णन सावित्रीबाई करतात.

मानवी स्वभावाच्या उत्शृंखलपणावर नेमके बोट ठेवून कवयित्री म्हणतात,

'जावयास त्या लाजही नाही

कोण कुठली कळी फुलांची

जुनी विसर नवीन पाही

रीत जगाची उत्शृंखलही

पाहुनिया मी स्तिमित होई ॥' पुरुषांच्या एकूण शृंगारिक वर्तनाचा भेद सोप्या शब्दात केलेला आपल्या लक्षात येतो. नेमका वर्मस्थानी घाव घालावा तो असा.....

लोकोपयोगी कार्य करीत असताना १८९० हे वर्ष उजाडले. २८ नोव्हेंबर १८९० हा दिवस सावित्रीबाईंच्या जीवनातील अत्यंत दु:खाचा, त्यांचे सर्वस्व हरण करणारा ठरला. याच दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांचे एका आजाराने निधन झाले. सावित्रीबाई अतिशय दुःखी झाल्या. त्याहीपेक्षा क्लेशदायक घटना म्हणजे ज्यावेळी ज्योतिबांची अंत्ययात्रा निघणार होती त्यावेळेस त्यांचा दत्तकपुत्र यशवंत ह्याला टिटवे धरण्यासाठी ज्योतिबांच्या पुतण्यांनी विरोध केला कारण जो टिटवे धरतो त्यास वारसा हक्क मिळत असे. भांडण वाढत असताना स्वतः सावित्रीबाई पुढे आल्या. त्यांनी टिटवे हातात घेतले आणि स्वतः पतीच्या चितेला अग्नी दिला.

पतीच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी त्यांचे कार्य नेटाने आणि धैर्याने पुढे चालवले. दुसराही असाच एक प्रसंग यशवंताच्या बाबतीत पुढे आला. यशवंत विधवेचा मुलगा असल्यामुळे त्याला कुणी मुलगी द्यायला तयार होत नव्हते. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला आणि ज्ञानोबा ससाणे यांच्या राधा नामक मुलीशी विवाह लावून दिला.

१८९७ ह्या वर्षात पुण्यात प्लेगची फार मोठी साथ आली. सावित्रीबाईंनी प्लेगग्रस्तांची सेवा करताना स्वतःला झोकून दिले. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. सावित्रीबाईंनाही प्लेगच्या आजाराने गाठले. दुर्दैवाने सावित्रीबाईंना १० मार्च १८९७ या दिवशी मृत्यू आला. सावित्रीबाई फुले यांच्या एकूण सामाजिक कार्याची नोंद घेऊन सरकारने त्यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस १९५५ या वर्षापासून 'बालिका दिन' म्हणून साजरा करायला सुरुवात केली....

नागेश सू. शेवाळकर.