27. Maharashtratil kille - 2 in Marathi Travel stories by Anuja Kulkarni books and stories PDF | २७. महाराष्ट्रातील किल्ले - भाग २

Featured Books
Categories
Share

२७. महाराष्ट्रातील किल्ले - भाग २

२७. महाराष्ट्रातील किल्ले- भाग २

* महाराष्ट्रात बरेच किल्ले आहेत. त्यातल्या प्रसिद्ध किल्ल्यांची माहिती-

१. रायगड -
‘रायगड’ हा शिवकाळातील महत्त्वपूर्ण किल्ला आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६४ मध्ये हा गड बांधून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड! छत्रपती शिवाजी महाराज यांचा शके १५९७, आनंदनाम संवत्सर, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, शनिवार ६ जून, १६७४ रोजी जो राज्याभिषेक झाला आणि तो या रायगडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसन रायगडावरच झाले. म्हणून या गडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड (कुलाबा) जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणार्‍या या गडाच्या सभोवताली दाट जंगले आहेत. त्यामुळे लांबून गडाचे दर्शन अतिशय विलोभनीय दिसते. रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते. रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात रायगडला विशेष महत्व आहे. हा किल्ला अतिशय प्रेक्षणीय आहे. याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. १. रायगड, २. रायरी, ३. इस्लामगड, ४. नंदादीप, ५. जंबुद्विप, ६. तणस, ७. राशिवटा, ८. बदेनूर, ९. रायगिरी, ११. भिवगड, १२. रेड्डी, १३. शिवलंका, १४. राहीर, १५. पूर्वेकडील जिब्राल्टर. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग मानला जातो. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना होती.

छत्रपती शिवाजी राजांची समाधी रायगडावर असून गडावर अनेक इतर ऐतिहासिक वास्तू आहेत. ज्या अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यात विशेष करून महाराजांची सदर, दरबाराची जागा, हिरकणी बुरूज, भवानी टोक, छत्रपतींच्या वाड्याचा चौथरा, बाजारपेठेचे अवशेष इत्यादि महत्त्वाच्या वास्तू आहेत. रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे असून त्याचे नाव “गंगासागर तलाव” असे आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग “महा-दरवाजा” मधून जातो. रायगड किल्ल्यामध्ये असलेल्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाजवळील भाग ध्वनीलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे कि दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला “हिरकणी बुरूज” असे म्हणतात. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज, उत्तरेकडच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा, वाघ्या कुत्राची समाधी, नाना दरवाजा, हत्ती तलाव, महाराजांची समाधी, मेणा दरवाजा इत्यादी मुख्य आकर्षण आहे. गडाला सुमारे १४०० पायर्‍या आहेत. ज्या शिवभक्तांना गडावर चालत जाणे शक्य नाही, अशांसाठी आता ‘रायगडावर’ रोपवेची सोय करण्यात आली आहे. जे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण बनले आहे. गडावर राहण्याची व भोजनाची उत्तम प्रकारे सोय आहे. गडाच्या पायथ्याशी पाचडला मातोश्री जिजाबाईंची समाधी आहे. महाडपासून २७ कि. मी. अंतरावर असणार्‍या रायगडावर जाण्यासाठी महाडपासून गाड्यांची सोय आहे. श्रेष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला, तसेच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची येथूनच सुरुवात केली. थोडक्यात म्हणजे, इथे बऱ्याच गोष्टी पाहून इतिहास अनुभवता येतो. इथे चढून जाण्याचा सुद्धा अनुभव घेता येतो.. हा किल्ला ट्रेकिंग साठी सोपा किल्ला समजला जातो. रायगड ला काय पाहता येईल-

१. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा - उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नव्हता त्यामुळे महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा जिजाबाईचा राहता वाडा. येथे पायऱ्यांची एक विहीर आहे. ह्या विहिरीला ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात. त्याचबरोबर, जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन सुद्धा आहे जे अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे आहे.

२. खुबलढा बुरूज - गड चढतांना एक बुरुजाचे ठिकाण दिसते. आणि हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज आहे. ह्या बुरुजा शेजारी ‘चित्‌ दरवाजा’ होता पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झ़ाला आहे.

३. नाना दरवाजा - नाना दरवाजाला ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणले जात. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या बांधलेल्या आहेत. ह्या खोल्यांना ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी सुद्धा इथे पाहायला मिळतात.

४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा - चित्‌ दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाट प्रदेश लागतो. या मोकळ्या जागेच्या टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा आहे आणि दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे सुद्धा आहे. त्याचबरोबर, इथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा पाहायला मिळतात.

५. महादरवाजा - महादरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूस वरच्या बाजूला दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थं म्हणजे किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’. महादरवाजाला दोन भव्य बुरूज आहेत. त्यातला एक बुरुज ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंचं आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्याला ‘जंग्या’ म्हणले जाते. शत्रूवर हल्ला करण्यासाठी ह्याचा वापर व्हायचा. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेला तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचा खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत आणि डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.

६. चोरदिंडी - महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत जाते येते. जिथे ही तटबंदी संपते त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात चोरदिंडी पाहायला मिळते. ही चोरदिंडी म्हणजे लहान आकाराचा दरवाजा. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.

७. हत्ती तलाव - महादरवाजातून थोडे पुढे गेले की एक तलाव दिसतो. तो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

८. गंगासागर तलाव - हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेचा इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांचा राज्याभिषेकानंतर सप्तसागर आणि महा नद्यांमधून आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांचा काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.

९. स्तंभ - गंगासागराच्या दक्षिण दिशेला दोन उंच मनोरे दिसतात. त्यालाच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराचा शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून ह्या स्तंभांवर नक्षीकाम आढळते.

१०. पालखी दरवाजा - स्तंभांचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.

११. मेणा दरवाजा - पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की, चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाज्या पर्यंत घेऊन जातो. तिथे उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते राण्यांचे महाल आहेत. मेणा दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.

१२. राजभवन - राणीवसाच्या समोर डाव्या हातास दासदासींचा मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांचा मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याचा अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन आहे. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.

१३. रत्‍नशाळा - राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे. हे तळघर म्हणजे रत्‍नशाळा. हा खलबतखाना होता आणि ही गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

१४. राजसभा - महाराजांचा राज्याभिषेक जेथे झ़ाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते.

१५. नगारखाना - सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.

१६. बाजारपेठ - नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांचा काळातील बाजारपेठ. पेठेचा दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे.

१७. शिरकाई देऊळ - महाराजांचा पुतळ्याचा डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांचा काळात मावळकर नावाचा इंजिनिअरने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.

१८. जगदीश्वर मंदिर - बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याचा भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराचा पायऱ्यांचा खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाचा उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे - श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांचा आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’

१९. महाराजांची समाधी - मंदिराचा पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर अष्टकोनी चौथरा दिसतो. हा चौथरा म्हणजेच महाराजांची समाधी. तेथे काळ्या दगडाचा चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधलेले आहे आणि वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खाली पोकळी आहे. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे दिसतात.

२०. कुशावर्त तलाव- कुशावर्त तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर भग्नावस्थेतला नंदी दिसतो.

२१. वाघदरवाजा - कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरले की वाघ दरवाजाकडे जाता येते. दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरता येऊ शकते. पुढे राजाराम महाराज आणि त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाजाने बाहेर निसटली होती.

२२. टकमक टोक - बाजारपेठेच्या समोर खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जाऊ तसतसा रस्ता निमुळता होतांना दिसतो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. या टोकावर वारा प्रचंड असतो आणि जागाही कमी असल्यामुळे सावधानता बाळगावी लागते. शिवराज्यकाळात या ठिकाणावरून कडेलोट केला जात असे.

२३. हिरकणी टोक - गंगासागराचा उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती वाट हिरकणी टोकाकडे जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले की डाव्या बाजूला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेचा माऱ्यात असायची. त्यामुळे युद्धाच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा होती.

२४. वाघ्या कुत्र्याची समाधी - असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांचा अत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्र्याने त्या चितेत उडी घेतली होती. ही जागा विशेष प्रसिद्ध आहे.