अजिंक्य नुकताच जमीनदार झाला होता.जमीनदार म्हणजे त्याने कोकणात स्वतःच्या मेहनतीवर जमीन घेतली होती.आवड होतीच त्याला.पण आता तिथे काहीतरी करण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.एक वर्ष घरूनच प्रोजेक्टची कामं मिळवून त्याने कंपनीतून ठरवून ब्रेक घेतला होता.मनात आलं की उठला आणि निघाला.
जरा अनवट वाटेवरचं गाव त्याने निवडलं होतं त्यामुळे पूण्यातून गावाला जाणारा रस्ताही तुलनेने कमी वाहतुकीचा असायचा.
.अजिबात घाई न करता भल्या पहाटे उठून आवरून तो शांतपणे निघाला एकटाच.गाडी सुरु केल्यावर लक्षात आलं की एसी काम करत नाही आहे.फक्त फॅनच चालू आहे...
अरे देवा.. दहानंतर ऊन वाढणार आणि जीवाची काहिली होणार दुपारी पोचेपर्यंत... पण आज जायला तरं हवं होतं... जमिनीची मोजणी लागली होती उद्याला.
कराडला नाश्ता उरकून तो मलकापूरला फाट्यावर वळला.अवतीभवती पळस,पांगारा,काटेसावरी वेड लावत होते. अजिंक्यचे बाबा प्रसिद्ध वनस्पतीशास्रज्ञआणि आई मराठी साहित्यातलं नावाजलेलं नाव.दोन्हीकडून बाळकडू मिळाल्याने निसर्ग आणि पुस्तकं हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय.पण संगणकीय गमतीजमतीतही रस असल्याने तो साॅफ्टवेअर इंजिनीअर झाला.लग्न जरा सवडीनेच करीन असं आधीच जाहीर केलं होतं त्याने.ताईचं झालय नं वेळेवर मग माझ्या मागे लागू नका.जगू दे जरा मनासारखं काही वर्ष मला...
निसर्गाची बदलती रूपं झाडांचे खराटे पाहत उन्हाची वाढती काहिली झेलत तो अणुस्कुरा घाट चढला. मधे थांबून सगळं खोरं त्याने डोळ्यात सामावून घेतलं आणि पुढे गेला. बाटलीतलं पाणी कोमट आणि बेचव वाटू लागल्याने पाण्याची आस त्याला कासावीस करायला लागली.लहानपणी ऐकलेली कावळ्याची गोष्ट त्याला आठवली.
तोच त्याला रस्त्याच्या डावीकडेच डेरेदार आंब्याच्या खाली एक लाल फडकं बांधलेला डेरा आणि टेबल ग्लास असं दिसलं.लिंबू सरबत आहे तर... गाडी बाजूला लावून तहानलेला अजिंक्य उतरला.
पांढरा लेंगा,पांढरा मळकट सदरा,पांढरी टोपी,गालांवर वाढलेली पांढुरकी दाढी... या दादा... ताक आहे.....
व्वा ताक म्हणजे जीव की प्राण.आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन डोळे.... एक द्या काका.... काकांनी माठावरचं झाकण काढलं.ओघराळ्याने शुभ्र ताक काचेच्या ग्लासात ओतलं.त्या धारेमुळे वर ग्लासावर तयार झालेले बुडबुडेही मनाला थंडावा देऊन गेले. कोथिंबीर घालून आलं मीठ लेऊन सजलेलं मधुर ताक!!!
अजिंक्यने रस्त्सातच कडेला फतकल मारली. तहानलेल्या शरीराला ताकाचा दिलासा मिळाला.
अहो काका मागच्यावेळी बहुतेक मी तुम्हाला इथेच सोडलं होतं.दोन तीन मावश्याही होत्या,.
हं का? काकांनी दुसरा ताकाचा ग्लास अजिंक्यसाठी भरत म्हटलं... हां हां आठवलं.... मी धनगरवाड्याहून परतलो होतो सांजच्याला. तुमी सोडलं हुतं....
त्या बाया पण हुत्या मागच्या वाडीवरच्या....
तिसरा ग्लास भरला गेला...
किती मस्त वाटलं काका... त्या शीतपेयांना या ताकाची सर नाही बघा... इतका कासावीस झालो होतो उन्हाने आत्ताच.अख्खा उन्हाळा सरायचाय अजून...
हो नं.पण तुमी इथलं कुठलं??
अहो नाही.मी पुण्याचा,.. इथे जमीन घेतली आहे त्यामुळे येतो जातो.
छानच हाय की.. शरात लई गर्दी.माझा मुलगा शिकतोय पुन्यात.आमचं बरं हाये. मागेच गाव. दुभती जनावरं हायती.त्यांचंच दूध त्याचच ताक!
व्वा सुंदरच आहे काका ताक!
इथे धंदा होतो का पण तुमचा?
हो होतो.येणारे जाणारे हायेत रस्त्याला.सांजच्याला परततो. ह्यं काय समोर बाकीचं सामान ठिऊन जातो घरला.
पण ऊन लागत असेल.
न्हाई दादा..अणुस्कुर्यापासून इतपत्तुर अशीच हवा बरं वर्षभर. बदल नाही होत.आनि माझं म्हनाल तर या आंब्याखाली असं थंड वाटतय नं उन्हाळ्यात की काय इचारू नका... ईस्वास न्हाई बसनार पण खरं सांगतुय...
अजिंक्य ग्लासातलं संपलेलं ताक विसरून पुन्हा ग्लास तोंडाला लावताना भानावर आला.
किती धावत आहे नं माणसं सुखासाठी.उन्हाळ्यात एसी हवा,शीतपेय आईक्रीम हवीत,कूलर हवा सगळ्यांना.
पण हे काका या आंब्याच्या डेरेदार थंड सावलीखाली केवढे आनंदी आहेत मनापासून...
एव्हाना पैसे देऊन झाले होते.तरी काकांनी त्याचा ग्लास भरला... अहो नकोय काका.तृप्त झालो.
प्या हो पैसे काय जातात कुठं... याचे देऊ नका... हे माझ्याकडून...
आधीच ताकाने आणि काकांच्या थंडगार विचाराने शांतावलेला अजिंक्य या वाक्याने अधिकच शहारला... माणुसकी,आत्मीयता अनुभवून आणखीनच शांत झाला... अगदी आतून.....
शहरात कुणी कुणाला फुकट काही देत नाही,लहानांपासून मोठ्यापर्यत जो तो स्वतःला सांभाळण्यात मग्न आहे... आज एक गाडी,एक घर, पुढच्या वर्षी दुसरी मग तिसरी... अरे संपतच नाही आहे हे!!
पण सर्वात नशिबवान आहेत हे काका! आंब्याच्या डेरेदार छायेत ताक घेऊन बसलेला त्यांचा चेहरा अजिंक्यने डोळ्यांच्या कॅमेर्याने मनात चित्रित केला आणि भविष्याचे ,माणुसकीचे,निसर्ग सहवासाचे आडाखे बांधतच त्याने एसी बंद असलेली गाडी सुरु केली... आता त्याला ऊन जाणवत नव्हतं.. त्याच्या शरीरात, मनात ,हृदयात "ताक" वाल्या काकांचा माणुसकीचा थंडगार झरा वाहत होता आंब्याच्या थंडगार छायेखाली.