maat - 3 in Marathi Moral Stories by Ketakee books and stories PDF | मात भाग ३

The Author
Featured Books
Categories
Share

मात भाग ३

रेवतीला सुहासच्या वागण्यातील बदल जाणवू लागले होते पण कारण तिच्या लक्षात येत नव्हते.. 

आपले काही चुकले का? आपण अनावधानाने सुहासला कधी दुखावले का? काही काही कळण्यास मार्ग नव्हता.. या घडीला तरी तिला हे सगळेच तिच्या आकलना पलिकडचे वाटत होते.. 

पण हे मुरणारे पाणी कोणत्या प्रवाहाला जाऊन मिळत आहे.. प्रवाहाचा वेग मंदावला आहे की प्रवाहाने त्याची दिशाच बदलली आहे याचा छडा लावायचा चंगच रेवतीने बांधला होता..

ती फार अस्वस्थ झाली होती की काहीतरी असे आहे जे सुहास आपल्या पासून लपवत आहे आणि ज्यामुळे तो आपल्याला टाळत आहे..

एवढ्या सुंदर कणाकणाने बहरलेल्या नात्याची रेशमी वीण एवढ्यात उसवायला सुरुवात तर झाली नसेल ना! अचानक रेवतीच्या मनात विचार चमकून गेला.. 

ती बेडवर उशीला टेकून बसली होती.. तिला आणखी अस्वस्थ वाटू लागले..

तिने एक उसासा टाकत डोळ्यांच्या पापण्या अलगद मिटल्या.. डोळ्यांत अलगद जमा झालेल्या पाण्यासोबत भूतकाळ बंद पापण्यांआडून डोकावू लागला..

रेवती आणि तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी शॉपिंग करून दंगा मस्ती करत मॉल मधून बाहेर पडत असताना मॉलमधील एका वळणावर जोरात एका मुलाला धडकल्या..

ती आणि तिच्या मैत्रिणी त्याच्या जोरदार धक्क्याने जमिनीवर फेकल्या गेल्या.. आणि एकावर एक पाठीवर पडल्या.. रेवती त्यांच्यात सर्वात मागे असल्याने तिच्या दोघी मैत्रिणी तिच्या अंगावर पडल्या होत्या.. हातातील शॉपिंग बॅग्स जमिनीवर इतस्ततः पसरल्या गेल्या..

हे सगळे अगदी काही क्षणांतच घडले असल्या कारणाने काय घडले हे सर्वांच्याच लक्षात यायला वेळ लागला..

त्या मुलाने, सुहासने पटकन हात देत आधी वरील दोघींना उठवले.. अचानक भार अंगावर आल्याने रेवतीची हालत खराब झाली होती.. तिला धड उठताही येत नव्हते.. पायाला मुंग्या आल्या होत्या.. 

सुहासने तिला हात देऊन उभे केले..  खरे पाहायला गेले तर त्याची काही चूक नव्हती.. रेवती आणि तिच्या मैत्रिणीच मस्ती करत चालल्या होत्या.. समोर पाहण्याचे भानही त्यांना उरले नव्हते..

पण तरीही सौजन्यापोटी सुहासने त्यांची माफी मागितली..

रेवती आणि तिच्या मैत्रिणींच्या आपली चूक.. उशीराने का होईना ध्यानात आली.. त्यांनी सुहासचे आभार मानले..

त्यानंतर विचित्र योगायोगांची एक शृंखला सुरू झाली.. वारंवार त्यांच्या बऱ्याच भेटी झाल्या.. कधी सीसीडी.. कधी हॉटेल.. कधी पेड पार्किंग..

आणि त्यादिवशी तर सारसबागेच्या गणपतीच्या दरबारी..

हा काही दैवी संकेत आहे का असा मनोमन विचार करत असतानाच सुहास तिच्या जवळ आला..

मंदिरातच सुहासने प्रसन्न चेहऱ्याने स्वतःची ओळख करून दिली.. या आधीच्या प्रत्येक भेटीत एकमेकांकडे फक्त कटाक्ष आणि एक ऑकवर्ड असे हसू होते..

रेवतीने ही आपली ओळख करून दिली..

रेवतीच्या मनात संकेत ठळक बसला..  सुहासला इतक्या वेळेस आपल्यासमोर आणण्यामागे गणपती बाप्पाचे काय प्रयोजन असावे.. रेवातीचे मन सुहासचा पाठपुरावा करत होते..

त्यानंतर हळूहळू झालेली मैत्री.. फोन नंबरची देवाणघेवाण.. फोनवर बोलणे..

एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचे न उलगडलेले पैलू अलवार उलगडले जात होते..

मनात प्रेमांकुर फुटू लागला होता.. पण पुढाकार कोणीच घेत नव्हते..

रेवती आजच्या काळातील मुलगी होती.. मग सुहासानेच प्रपोज करावे या विचारांची ती नव्हती.. त्यामुळे ज्या वेळेस तिला योग्य वाटेल तेव्हा तिनेच प्रपोज करायचे ठरवले होते..

त्यानंतर सुहासच्या वाढदिवशी रेवतीने त्याला केलेले प्रपोज.. भारावलेला सुहास.. त्याच्या होकारानंतरचे सुरुवातीचे अलवार दिवस.. हळूहळू फुलत चाललेले नाते.. कालांतराने आणि सहवासाने घट्ट झालेली या रेशमी नात्याची वीण..

सगळे रेवतीच्या बंद पापण्यां आड जसेच्या तसे.. आणि अगदी आज घडल्याप्रमाणे तरळत होते..

अचानक फोनच्या आवाजाने रेवतीची विचारशृंखला खंडित केली.. आणि पापण्यांना आपण वर्तमानकाळात परतल्याची जाणीव झाली.. 

रेवतीच्या आईचा फोन होता.. आईशी बोलून तिने फोन ठेवला..

परत तिची विचारशृंखला पूर्ववत झाली.. काय झाले असावे सुहासला..  की आपणच जरुरीपेक्षा जास्त विचार करत आहोत.. विचार करून करून रेवातीचे डोके जड झाले होते..

त्या अवस्थेतच ती बेडवर पडल्या पडल्या झोपेच्या स्वाधीन झाली..