SAAPALA in Marathi Adventure Stories by Vinayak Potdar books and stories PDF | SAAPALA

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

SAAPALA

​​​​​​​कथेविषयी थोडंसं -


सर्वप्रथम मी माझ्या असंख्य प्रिय वाचकांचे कोटी कोटी आभार मानतो ज्यांनी माझ्या यापूर्वी प्रकाशित झालेल्या दोन्ही कथा “ सिक्सथ सेन्स “ आणि “ एक परी कथा “ या दोन्ही कथांना अक्षरशः डोक्यावर घेतलं, भरभरून कौतुक केलं. मी तुमचे आभार शब्दांत कसे मानू ? इतकंच म्हणतो की यासाठी आयुष्यभरासाठी मी तुमचा ऋणी आहे आणि याच वाढलेल्या अपेक्षांमुळं माझ्या मनावर खूप दडपण आलं होतं की पुढील कथा तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारी ठरायला हवी… अशीच लिहायला हवी. यासाठी मी खूप वेगवेगळ्या विषयांवर विचार केला. मधला काही काळ मी तुमच्यासमोर आलो नाही याचं कारण पण हेच होतं. मी जास्त पाल्हाळ लावत बसत नाही सरळ मुद्द्यावर येतो. तुमच्यासमोर जी कथा मी घेऊन आलोय ती मी बऱ्याच वर्षांपूर्वी लिहून ठेवली होती. आणि त्याकडे माझं लक्षच गेलं नव्हतं. पण आता बराच काळ उलटून गेल्यानं त्यावेळचे आणि आत्ताचे संदर्भ यामध्ये खूप फरक आहे. पण या काळाप्रमाणे कथेत बदल करायला गेलो असतो तर संपूर्ण कथेचा ढाचाच कोसळला असता. त्यामुळं मूळ कथा जशी आहे तशीच तुमच्यासमोर मी सादर करत आहे. कथेचं यश अपयश सर्वस्वी मी तुमच्यावर सोपवतो. नेहमीप्रमाणेच ही कथा देखील माझ्या बाकी कथांप्रमाणेच मला प्रिय आहे आणि आशा करतो तुम्ही आजच्या काळाशी कोणतीही तुलना न करता या कथेचा आनंद लुटाल. बाकी काय लिहू ? तुमच्या प्रतिक्रियांच्या … अमूल्य प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत


केवळ तुमचाच

विनायक नारायण पोतदार.

संपर्क : 9076640007 (व्हाट्सअप )


​​

सापळा (the trap) कादंबरी -


​​


प्रकरण १


" मोकळ्या हवेत श्वास घेणं किती आनंददायक असू शकतं, याची कल्पना तुम्हांला येणार नाही. साडेतीन वर्षांपूर्वी मलाही नव्हती. पण आज तुरुंगातून बाहेर पडल्यावर जो पहिला श्वास मी घेतला त्याचा आनंद काही औरच होता. तुरुंगातल्या अंधार कोठडीत खितपत पडलेलो असतानाच कोंदट हवेतला, उबग आणणारा श्वास आणि आज ... आज बाहेर पडल्यावर स्वतंत्र, मोकळा झाल्यावर, कैद्याचा शिक्का पुसला गेल्यावर घेतलेला श्वास याची किंमत काही औरच ! आता तुम्हांला लक्षात आलं असेल की मी मोकळ्या हवेत श्वास घेणं किती आनंददायक असतं असं जे मी म्हणालो त्या मागचं कारण. माझ्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नका हं. मी मूळचा अपराधी पिंडाचा माणूस नाही. तुमच्यासारखाच मी देखील एक सामान्य, सचोटीनं वागणारा, तत्वनिष्ठ माणूस होतो. तत्वनिष्ठ! या एका शब्दानं माझं संपूर्ण आयुष्य वेगळ्या वळणावर नेलं.

" हरीश ... ए हरीश . तुला पुन्हा बघून किती आनंद झालाय यार. बाहेरच्या, आपल्या दुनियेत तुझं हार्दिक स्वागत असो . " राहूल मला बघून धावतच माझ्याकडं आला. तो मला न्यायला आला होता. राहूल माझ्या जिवलग मित्रांपैकी एक होता. पणजी शहरातल्या जबाबदार, कर्तव्यदक्ष पोलिसांपैकी तो एक होता. खूप वर्षांपासून आमची अगदी जिवलग मैत्री होती. त्यामुळं मला पाहून त्याला झालेला आनंद हा नक्कीच खोटा नव्हता.

" चल तुझ्या घरी सोडतो मी तुला. वीणा तुला पाहून खूप खुश होईल बघ. "

वीणा माझी पत्नी. मी तुरुंगात गेल्यापासून गेली साडे तीन वर्ष बाहेरच्या जगात ती एकटी वावरत होती. कशी जगली असेल ती ?

" तू तुरुंगात गेल्यानंतर इथं बराच बदल झालाय हरीश. जुनी गॅंग निघून गेलीय. जुना कमिशनर देखील बदलून गेलाय. त्याच्या जागी नवीन कमिशनर आलाय. खूप चांगला माणूस आहे. "

मी काहीच बोललो नाही.

" आता काय करायचं ठरवलं आहेस तू ?" राहूल नं उतावीळपणे विचारलं.

" सध्या तरी काहीच नाही. केवळ परिस्थितीचा अंदाज घायचं ठरवलंय. मग पुढं बघू. दैनिक प्रभातनं ( ज्या वृत्तपत्रासाठी मी पत्रकार म्हणून काम करायचो ते वृत्तपत्र ) मला काढून टाकल्याचं तुला माहित असेलच." मी म्हणालो. " होय असं ऐकलय खरं. " राहूल म्हणाला, " तुला हे पचवणं सुरुवातीला थोडं जड जाणार असं दिसतंय. "

" नक्कीच. जेव्हा एक व्यक्ती एका पोलिसाला ठार करते भले अपघाती का असेना, तेव्हा ते विसरता येणं सोपं नसतं. मला चांगलंच माहिताय मला हे किती जड जाणाराय ते. "

" तुला पोलिसांकडून तरी काहीच त्रास होणार नाही. पण तुला आता वेगळं क्षेत्र निवडावं लागेल. डिसोझाचं इथं खूप वजन आहे. तो तुला नडला, तर कोणतंही वर्तमानपत्र तुला नोकरी देणार नाही. " राहूल म्हणाला.

" त्याची काळजी तू नको करू. " मी त्याला उत्तर दिलं.

" कदाचित मी तुझी मदत करू शकेन. "

" मला कुणाचीही मदत नकोय."

" पण वीणा ... ? "

" मी तिची काळजी घेईन. "

त्यानंतर बराच काळ आमच्यात काही बोलणं झालं नाही. त्याच्या गाडीच्या खिडकीच्या काचेतून तो बराच वेळ बाहेर पाहत राहिला. मग पुन्हा त्यानं सुरुवात केली. " हे बघ आपली मैत्री काही काल परवाची नाही. आपण कित्येक वर्षांपासूनचे मित्र आहोत. तू ज्या स्थितीतून जातोयेस त्याची कल्पना आहे मला. तेव्हा असं तुटकपणे बोलू नकोस. आपल्या नवीन कमिशनर- देशमुखशी मी तुझ्याबाबत बोललोय. अजून काही नक्की झालं नसलं तरी आमच्या ऑफिसमध्ये तुला नोकरीची संधी आहे. "

मी त्याच्याकडं पाहिलं, " तुझ्या ऑफिसमध्ये ? पोलिसांची नोकरी ? जगातील शेवटची नोकरी असली तरी नकोय मला.

" पण वीणानं खूप हालाखीत दिवस काढलेत. " मला समजवायच्या सुरात तो म्हणाला. " मी पण खूप हालाखीत दिवस काढलेत. " त्याचं बोलणं मध्येच तोडत मी म्हणालो, " त्यामुळं हिशोब बरोबर झाला. "

राहूल हताशपणे म्हणाला," ठीकय. जशी तुझी मर्जी. पण जे झालं ते झालं. आता इथून पुढचा विचार कर. तुझा, वीणा चा भविष्यकाळ- त्याचा विचार कर. "

" मग तुला काय वाटलं ? इतकी वर्ष तुरुंगात बसून मी कसला विचार करत होतो ? " समुद्रावर पडणाऱ्या पावसाकडं मी गाडीच्या खिडकीतून पाहत राहिलो. " मी बदललोय आता. पण मी काय काय चुका केल्या यावर विचार करायला आता माझ्याकडं पुष्कळ वेळ आहे. माझं तोंड बंद ठेवण्यासाठी कमिशनरने देऊ केलेले दहा लाख मी घ्यायला हवे होते. आता अशी चूक मी पुन्हा करणार नाही."

" तू उगाच निराश होतोयेस. तुला माहितेय तू जे केलंस ते योग्यच केलं होतंस. " राहूल पटकन म्हणाला, " ते पैसे म्हणजे तुझ्या स्वाभिमानावर,तत्वांवर घातलेला घाला होता. ते पैसे घेऊन तू कधीच ताठ मानेनं जगू शकला नसतास आणि हे तुला चांगलंच माहित आहे."

" खरंच ? पण आता इथून पुढचं माझं जगणं खूप आनंदी होणारेय असं समजू नकोस. साड़ेतीन वर्ष तुरुंगात अट्टल गुन्हेगारांसोबत काढणं किती कष्टदायक असतं, याची तुला कल्पना नाही येणार. ती लाच घेतली असती तर तुरुंगात जावं लागलं नसतं, तुझ्यासारखी एखादी कार पण असती माझ्याजवळ आज. "

राहूल माझं तुसडेपणाचं बोलणं ऐकून अस्वस्थ झाला. " मला तुझी काळजी वाटायला लागलीय यार. स्वतःला सावर. "

" माझी काळजी तू नको करुस. आणि वीणा नं मी जसा आहे, तसं मला स्वीकारलंय. "

" हरीश या साडेतीन वर्षांत तू वीणाशी खूप वाईट वागला आहेस. तुझ्यावरच्या खटल्याला तू तिला हजर राहू दिलं नाहीस, तुरुंगात भेटायला दिलं नाहीस. साधं पत्रदेखील तू तिला लिहू दिलं नाहीस, खरं तर तुझं दुःख तिला वाटून घ्यायचं होतं. पण तू तिला एखाद्या तिऱ्हाईतासारखं बाहेर ठेवलंस.

" मला माहित होतं मी काय करत होतो ते. मी जे केलं ते योग्यच केलं. तुला काय वाटतं कोर्टात यायची परवानगी देऊन फोटोसाठी टपलेल्या गिधाडांनी तिचे फोटो काढायला हवे होते? तुरुंगातल्या कोंदट, गुदमरणाऱ्या वातावरणात तिचा कोंडमारा करायला हवा होता ? तिला पत्र लिहायची परवानगी देऊन ती पत्रं मला मिळण्यापूर्वी त्या हरामखोर जेलरने वाचलेली तुला आवडली असती ? मी जे केलं ते योग्यच केलं, कारण मला तिला या सगळ्यापासून दूर ठेवायचं होतं. "

" तू चुकतोयेस हरीश. तिला तुझ्या सोबत राहायचं होतं. " राहूल माझं बोलणं तोडत म्हणाला. " आज देखील मोठ्या मुश्किलीने मी तिला माझ्याबरोबर येण्यापासून रोखलंय. "

आम्ही पणजी कॉलनीकडे निघालो होतो. पणजी शहरातील ती एक आलिशान वस्ती होती. एक काळ होता जेव्हा पणजी माझं आवडतं कार्यक्षेत्र होतं. एक काळ होता जेव्हा याच शहरातील सर्वात प्रसिद्ध दैनिक वर्तमानपत्र -’प्रभात’ चा, शहरातील घडामोडी, भानगडी लिहिणारा पत्रकार होतो. त्यानंतर माझे लेख जवळ-जवळ शंभर लहान दैनिकांना पुरवले जायचे. त्यावेळी मी चांगले पैसे कमवत होतो. आणि माझं कामदेखील मी आवडीनं करत होतो. माझं राहणीमान खूप चांगल होतं. याच काळात मी वीणाशी लग्न केलं. पणजी शहराच्या बाहेरील भागात आम्ही एक बंगला विकत घेतला, घर सजवलं, सगळं कसं सुरळीत सुरु होतं,आयुष्य स्थिर झालंय असं वाटत होतं आणि मग एका रात्री...

तेव्हा मी किनाऱ्यावरच्या हॉटेलमधील एका बारमध्ये बसलो होतो. तेव्हा योगायोगानं माझ्या कानावर दोन अनोळखी व्यक्तींच्या संभाषणाचा काही भाग कानावर पडला. दोघेपण दारू वर दारूचे पेग रिचवत होते आणि त्या नशेत त्यांचा आवाज खूप वाढला होता. त्यांचं बोलणं ऐकून माझ्यातला पत्रकार खडबडून जागा झाला. मला जाणवलं की ती एक विस्फोटक आणि गरमागरम खबर ठरणार होती. त्या बातमीमुळं माझं वृत्तपत्र दै. प्रभात कित्येक आठवड्यांसाठी विक्रमी खपणार होतं. मी पक्कं ठरवलं याचा मागोवा घ्यायचाच. त्यानंतर पुढचे दोन महिने मी या बातमीचा कुणाच्याही नकळत सखोल चौकशी करून माग काढण्यात घालवले. मुंबईच्या एका टोळीनं संपूर्ण पणजी शहराचा ताबा घ्यायची योजना आखली होती. ठिकठिकाणी ते बेकायदेशीर धंदे सुरु करणार होते.

जेव्हा या सगळ्या गोष्टीबाबत माझी खात्री पटली, तेव्हा असं वाटलं की या टोळीतले लोक वेडे असले पाहिजेत. कुणी असं कसं या शहराचा हवं तेव्हा कब्जा घेऊ शकेल ? पण नंतर मला अशी सणसणीत टीप मिळाली की या शहराचा पोलीस प्रमुख आणि इतर महत्वाच्या व्यक्तींना भरपूर लाच देऊन विकत घेतलं होतं आणि ते या टोळीला हवं त्या प्रकारचं संपूर्ण संरक्षण द्यायला तयार होते.

त्यावेळी मी एक मोठी चूक केली. मी स्वतःच याबाबत पुढं चौकशी करायचं ठरवलं. इतरांच्या आधी मला ही बातमी मिळवायची होती. जोवर आवश्यक पुरावे मला मिळत नाहीत तोवर हे शक्य नव्हतं. हे कट कारस्थान मलाच उघडकीस आणायचं होतं. म्हणून मी माझा बॉस दै. प्रभातचा मालक जॉन डिसोझाकडे गेलो आणि मला माहित असलेलं सर्व त्याच्या कानावर घातलं. त्यानं शांतपणे ते ऐकून घेतलं.

जेव्हा त्याला मी हे सांगितलं, तेव्हा त्याने याबाबतचे पुरावे माझ्याकडं मागितले. त्याला याबद्दल खात्री करून घ्यायची होती. आणि हे सर्व तो सांगत असताना एक विचित्र प्रकारचा थंडपणा त्याच्यातून डोकावत होता. मला अपेक्षित असलेला जोश, उत्साह त्याच्यात कुठं दिसत नव्हता. खरं तर याचवेळी मी सावध व्हायला हवं होतं. जरी मी पुष्कळ पुरावे मिळवले होते, तरी अजूनही बरीचशी माहिती मला मिळाली नव्हती. या टोळीनं माझ्या वृत्तपत्रालादेखील विकत घेतलं होतं. आणि असं काही घडू शकतं यावर स्वप्नात देखील विचार केला नव्हता. नंतर समजलं की त्यांनी डिसोझाला निवडणुकीत एका मोठ्या पदावर निवडून आणायचं आश्वासन दिलं होतं. एका लालची, महत्वाकांक्षी माणसासाठी ही मोठीच लाच होती.

मी मिळवलेली माहिती चेक करण्यासाठी त्याने माझ्याकडे मागितली. माहिती त्याच्या हवाली करण्यासाठी मी घरी परतत असताना मला वाटेत एका पोलीस गाडीनं अडवलं. पोलीस कमिशनर मला भेटायला उत्सुक असल्याचं त्यांनी मला सांगितलं. ते मला पोलीस हेडक्वार्टरला घेऊन गेले, जिथं माझी पोलीस कमिशनरशी भेट होणार होती.

हा पोलीस कमिशनर एकदम मुद्दयांवर येणारा माणूस होता. कोणताही फाफट पसारा न लावता त्यानं सरळ माझ्यासमोर दहा लाख रुपये ठेवले. बदल्यात मी मिळवलेली सर्व माहिती, पुरावे सगळं विसरायचं.

एक तर आयुष्यात मी कधीच यापूर्वी लाच घेतली नव्हती. दुसरं म्हणजे मी मिळवलेली स्टोरी मला कित्येक दिवस फ्रंट पेजवर ठेवणार होती. इतकी प्रसिद्धी मला इतर कशानेही मिळाली नसती. मी " हिरो " ठरणार होतो. वृत्तपत्र क्षेत्रात माझा दबदबा निर्माण होणार होता. मी तिथून सरळ उठलो आणि बाहेर पडलो. .... आणि संकटांना सुरुवात झाली.

मी मिळवलेली माहिती माझ्या वृत्तपत्राचा मालक डिसोझाकडं सोपवली आणि पोलीस कमिशनरने देऊ केलेल्या लाचेबद्दल देखील त्याला सांगितलं. त्यानं माझ्याकडे बारीक डोळे करून पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. त्यानं त्याच्या घरी मला रात्री साडेदहाला भेटायला बोलवलं. तोपर्यंत माझ्याजवळ मी केलेल्या कामावर विचार करण्याचा आणि पुढील योजना आखण्यासाठी वेळ होता. मी दिलेली माहिती आणि पुरावे डिसोझाने नक्की जाळले असणार असं आता मला वाटतं. कारण नंतर मी ते कधीच पहिले नाहीत.

वीणा माझ्यासोबत या कामात सुरुवातीपासून होती. यातल्या एकेक समोर येणाऱ्या गोष्टी पाहून ती खूप घाबरली होती. तिच्या मते मी एक जिवंत डायनामाईट जवळ घेऊन फिरत होतो. पण तिला हे ही माहित होतं की माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी संधी होती. त्यामुळेच ती सतत माझ्यासोबत राहिली.

डिसोझाला भेटायला मी बरोबर दहा वाजता बाहेर पडलो. मला अजूनही आठवतं वीणा मला कारपर्यंत सोडायला आली तेव्हा किती घाबरली होती. माझी ही मनस्थिती अस्वस्थ होती. पण तेव्हा डिसोझावर माझा विश्वास होता. त्याच घर पणजी मध्ये होतं. तिथं पोहोचण्यासाठी मला सुनसान रस्त्यावरून ड्राईव्ह करत जायचं होतं. याच रोड वर मी सापळ्यात अडकलो.

मी नेहमीच्याच सरासरी वेगाने चाललेलो असताना अचानक माझ्या मागून एक पोलीस गाडी वेगानं आली आणि मला ओव्हरटेक करून मला रस्त्याच्या कडेला ढकललं. त्यांचा हेतू मला जोराचा धक्का देऊन रस्त्याच्या बाजूला समुद्रात फेकायचा असावा. पण त्यांची योजना असफल ठरली. जोरात धक्का मारायच्या नादात गाडी चालवणाऱ्या पोलिसाच्या बरगड्या स्टीयरिंग व्हीलमध्ये अडकल्या. त्याच्या शेजारी असलेल्या पोलिसाला मात्र काही इजा झाली नाही. जोरात गाडी चालवण्याच्या अपराधाखाली त्याने मला अटक केली. हा सगळा सुनियोजित प्लॅन आहे हे समजून देखील मी काहीच करू शकत नव्हतो.

साधारणपणे दोन -तीन मिनिटात एक होमिसाईड स्क्वाडचं फिरतं पथक तिथं आलं. त्यांच्यातील मुख्य पोलिसानं चार्ज आपल्या ताब्यात घेतला. जखमी पोलिसाला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आणि मला हेडक्वार्टरला नेण्यासाठी गाडीत बसवलं.

रस्त्यात अचानक गाडी थांबवण्यात आली. तिथं मला बाहेर पडण्यास सांगितलं आणि बाहेर पडल्यावर माझे हात पाठीमागे बांधण्यात आले. नंतर स्क्वाड प्रमुखानं व्हिस्कीची बाटली काढली आणि त्याची चूळ माझ्या तोंडावर आणि कपड्यांवर फेकली. नंतर त्याने कुठूनतरी एक लोखंडी रॉड आणला आणि माझ्या डोक्यावर त्याचा प्रहार केला.

----------------------------

मी तुरुंगात आलो आणि त्या क्षणापासून पार खचलो. अपघात झालेला पोलीस हॉस्पिटलमध्येच संपला. त्यांनी माझ्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवला आणि चार वर्षांची शिक्षा सुनावली. माझ्या वकिलानं खूप प्रयत्न करून मला वाचवायचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. जेव्हा त्यानं गुप्त कट उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो लगेच झिडकारून टाकण्यात आला. डिसोझानं तर शपथेवर सांगितलं की त्याच्याजवळ माझी कोणतीही कागदपत्रे नव्हती आणि अशा अविश्वासू पत्रकार आणि दारुड्याला तो लगेच कामावरून काढणार होता.

नंतर मला कळलं की दबाव आल्यामुळे पोलीस कमिशनरने राजीनामा दिला. संपूर्ण पोलीस खातं ढवळून निघालं होतं. माझ्या वकिलाने खटला चालवताना काही मुद्दे, गोष्टी (कटकारस्थानाबद्दलच्या ) मांडल्यामुळे त्याबद्दल चौकशी सुरु झाली होती. मुंबईच्या टोळीनं आपलं बस्तान दुसऱ्या शहरात हलवायचं ठरवलं होतं. पण या सगळ्याचा मला काहीही फायदा झाला नाही. दारू पिऊन गाडी चालवून एका पोलिसाला मारल्याच्या आरोपाखाली मी चार वर्षांसाठी तुरुंगात गेलो होतो आणि कुणीही यात काहीही करू शकत नव्हतं.

आता साडेतीन वर्ष तुरुंगात काढल्यावर मी पुन्हा मोकळा झालॊ होतो. मी असा एक पत्रकार होतो ज्याला पत्रकारितेव्यतिरिक्त काहीही येत नव्हतं. माझ्या जुन्या नोकरीतील बॉस डिसोझाने माझं नाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्यानं इतर कोणत्याही वृत्तपत्रासाठी मला काम मिळण्याची शक्यता नव्हती. आता मला नवीन काहीतरी करावं लागणार होतं आणि हे नवीन नेमकं काय याच्याबद्दल माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. जरी पूर्वी मी चांगला पैसा कमावला असला तरी, मी उधळ्या पण तेवढाच होतो. जेव्हा मी तुरुंगात गेलो, तेव्हा वीणासाठी फारसा पैसा ठेवून गेलो नव्हतो. त्यामुळे आता फारशी शिल्लक असण्याची काही शक्यता नव्हती. आता मला तीच आश्चर्य वाटत होतं की इतके दिवस तिने कसं घर चालवलं असेल ? मी इतका हट्टी होतो की तिला पत्र पाठवायलासुद्धा मी मनाई केली होती.

मी राहूल ला विचारलं " वीणा कशी आहे? "

"ठीक आहे. तिनं वेवेगळ्या भांड्यांवर डिझाईन करून ती विकायचा आणि पैसे कमावण्याचा मार्ग शोधलाय."

त्यानं माझ्या घराकडं गाडी वळवली. घर नजरेला पडता क्षणी मला भरून आलं. घरचा रस्ता अगदी ओसाड पडला होता. सगळीकडं पाऊस कोसळत होता. राहूल नं बाहेर पडून बंगल्याचं बाहेरचं गेट उघडलं. " पुन्हा भेटूया." त्यानं माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, " हरीश, तू खूप नशीबवान आहेस. वीणासारखं माझी वाट पाहणारं देखील कुणी असतं तर मला खूप आवडलं असतं. "

त्याच्याकडं न पाहता मी घराच्या दिशेने चालू लागलो. घराचा समोरचा दरवाजा उघडला. समोर वीणा उभी होती.

---------------------३ ----------------------------------


साधारणपणे एक आठवड्यानंतर एके दिवशी सकाळी साडेसहा वाजता मी झोपेतून जागा झालो. मी परत तुरुंगात आहे असं विचित्र स्वप्न मला पडलं होतं आणि त्यामुळेच मी दचकून जागा झालो होतो. मी माझ्या बिछान्यात होतो आणि वीणा माझ्या शेजारीच झोपली होती.

जाग आल्यावर मी तसाच पडून छताकडं पाहत विचार करायला लागलो. गेल्या आठवडाभरात कमावण्याच्या दृष्टीनं मी काहीच केलं नव्हतं. पत्रकारिता मी आधीच सोडली होती. माझ्यासाठी तो मार्ग आता बंद झाला होता. डिसोझाचा प्रभाव इतका जास्त होता, की लहानात लहान पेपरसुद्धा मला ठेवून घ्यायला घाबरत होता.

लिहिणं हा जरी माझा व्यवसाय असला, तरी मी काही क्रिएटिव्ह रायटर नव्हतो. मी एक पत्रकार होतो आणि काहीही लिहिण्यापूर्वी त्याचं प्रूफ माझ्याजवळ असणं माझ्यासाठी गरजेचं होतं.

मी शेजारी झोपलेल्या वीणाकडं पाहिलं. तुरुंगात जाण्यापूर्वी २ वर्ष ३ महिने आधी मी तिच्याशी लग्न केलं होतं. तेव्हा मी २७ वर्षांचा होतो.

तिचे केस काळेभोर होते आणि तिचा रंग गहूवर्णीय होता. जगाच्या दृष्टीने ती काही फार सुंदर नव्हती. पण तरीदेखील माझ्यासाठी ती सर्वात आकर्षक स्त्री होती, मी आजवर पाहिलेल्या सर्व स्त्रियांपेक्षा ! ती शांतपणे झोपली होती. तिचं निरीक्षण करताना गेल्या साडेतीन वर्षांत तिने किती सोसलंय याची जाणीव होत होती. तिचे डोळे खोल गेले होते, निस्तेज वाटत होते. तिच्या ओठांमध्ये एक प्रकारचा सैलपणा आला होता. मी तिला सोडून तुरुंगात गेलो तेव्हा ती अशी नव्हती.

तिच्यासाठी हा खडतर काळ होता यात काहीच संशय नव्हता. तिच्यासाठी मी आमच्या संयुक्त खात्यावर काही रक्कम ठेवली होती. पण वकिलाची फी आणि घराचा शेवटचा हफ्ता भागवण्यातच त्यातील बरीचशी खर्च झाली होती. आणि आता तिला पैशांसाठी काम करायची वेळ आली होती.

तिच्याकडं बरेचसे पर्याय होते. पण तिनं आपल्यातील कलेला वाव द्यायचं ठरवलं आणि टुरिस्टना भांडी विकणाऱ्या माणसाकडे तिनं काम मिळवलं. तो माणूस भांडी तयार करायचा आणि वीणा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सुशोभित करून प्रवाशांना ती भांडी विकायची. यातून तिला घर चालवण्यासाठी पुरेसे पैसे मिळायचे. आणि दुसरं काम मिळेपर्यंत हे काम ठीक होतं.

सध्या माझ्या खात्यावर वीस हजार शिल्लक होते आणि दुसरं काम मिळेपर्यंत मला तेवढ्यावर भागवावं लागणार होतं. ते संपल्यावर मला माझ्या छोट्या मोठ्या गरजांसाठी वीणाकडं हात पसरावा लागणार होता. हे सगळं डोळ्यासमोर आल्यावर मी सुन्न झालो.

माझ्यातील निराशा वाढू लागल्यावर काल मी एक जॉब शोधण्याचा प्रयत्न केला. पण दिवसभर वणवण फिरल्यावर सुद्धा मला रिकाम्या हाताने परत यावं लागलं. सगळं पणजी शहर जणू मला ओळखत होतं आणि काम मागायला गेल्यावर त्यांचा उडालेला गोंधळ मला स्पष्ट दिसत होता.

" मि. हरीश ? तुम्हांला काम हवंय? काय चेष्टा करताय का आमची? आमच्याकड तुमच्या लायक काम नाही. " मी काम शोधतोय किंवा मला जॉबची गरज आहे यावरच कुणाचा विश्वास बसत नव्हता. मी पण मग चेष्टा केली असं म्हटल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडायचा आणि मी तिथून बाहेर पडायचो.

" कसला विचार करतोयस हरीश ? " वीणा कुशीवर वळत मला म्हणाली. " काही नाही ... " मी थोडा पेंगत होतो.

" नाही हरीश, तू काळजी करतोयस पुढं कसं होणार म्हणून ? पण डोन्ट वरी. सर्व काही ठीक होईल. आपल्याला सध्या महिंन्याला १५ हजार पर्यंत मिळतायेत ना. तुला एक ना एक दिवस काम मिळेलच. थोडा धीर धर. आपण अगदीच उपाशी मरत नाही आहोत. " वीणा मला समजावत म्हणाली.

" आणि तोवर मला तुझ्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. व्वा ! काय छान कल्पना आहे ना ? मज्जाच आहे माझी. "मी उपहासानं म्हणालो. तिनं माझ्याकडं पाहिलं. तिचे डोळे चिंतातुर वाटत होते.

" हरीश, आपण एकमेकांचे जोडीदार आहोत. जेव्हा तुला योग्य काम मिळेल, तेव्हा मी काम करणं सोडून देईन. हेच आपलं एकमेकांबद्दलचं कर्तव्य नाही का ?"

" धन्यवाद. हे सर्व सांगितल्याबद्दल." मी उपरोधाने म्हणालो. " हरीश .... मला खरंच आता तुझी काळजी वाटायला लागलीय. तुला कळत नसेल. पण तू खूप कठोर आणि रागीट झालायेस. तू मागचं सर्व विसरायचा प्रयत्न केला पाहिजेस. आपल्या समोर उभं आयुष्य पडलंय. आणि तू असं वागतोयेस ... "

" मला माहिताय" मी बिछान्यातून बाहेर पडत बोललो. " माझ्या जागी तू तुरुंगात साडेतीन वर्ष काढली असतीस तर तुला माझी मनःस्थिती कळली असती. असो. मी आपल्यासाठी कॉफी बनवतो. किमान इतकं तरी मी करू शकतो. "

हे सगळं मी तुम्हांला सांगतोय ते दोन वर्षांपूर्वी घडलेलं. आता मागे वळून पाहताना असं वाटतं, की मी तेव्हा खूप दुबळा बनलो होतो. माझ्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आणि तुरुंगातले दिवस यांनी मला तसं बनवलं होतं. मी नशिबाचा दुर्दैवी बळी ठरलो होतो.

माझ्या जवळ असलेलं सारी काही सोडून, वीणाला घेऊन मला दूर कुठंतरी जाऊन नवीन सुरुवात करावी लागणार होती. कारण या शहरात आता काम मिळणं शक्य नव्हतं.

पुढच्या दहा दिवसांत मी अस्तित्वात नसलेला जॉब शोधत होतो. मी वीणाला सांगायचो की मी जॉब शोधतोय, पण ते खोटं होतं. एक-दोन ठिकाणी अपयश आल्यावर मी जवळच्याच एका बारचा आधार घेतला.

जेव्हा मी रिपोर्टर होतो, तेव्हा फारसं ड्रिंक करत नव्हतो. पण आता मात्र मी पेगवर पेग रिचवायला सुरु केलं होतं. पाच सहा व्हिस्कीचे पेग रिचवल्यावर मला कशाचाच फरक पडेनासा झाला. जणू व्हिस्की माझ्यासाठी मॅजिक बॉटल ठरली होती. मी घरी परतायचो आणि वीणाने केलेल्या कामाकडे मी भावनाशून्य नजरेने पाहत बसायचो. नशेत असताना तिच्याशी खोटं बोलणं देखील सोपं वाटायला लागलं होतं.

" मी एका माणसाशी बोललोय. त्याला त्याच्या हॉटेलविषयी मी लिहावं असं वाटतं. पण आपल्या पार्टनरशी याविषयी बोलतो असं तो म्हणाला. तो तयार झाला तर महिन्याला दहा हजार मला मिळतील. "

खरं तर अशी कुणीही व्यक्ती नव्हती, ना भागीदार होता, ना कुठलं हॉटेल होतं. पण खोटं बोलणं गरजेचं होतं आणि महत्वाचं देखील. कारण त्यामुळे नीनाच्या मनातलं माझं अस्तित्व अढळ राहणार होतं. आजकाल तिच्याकडून पन्नास-शंभर रुपये मागताना पण मी चेहरा लपवत होतो. पण जेव्हा तुम्ही समोरच्याशी सारखं सारखं खोटं बोलायला लागता, तेव्हा कधी ना कधी त्याला ते कळतंच. माझंही तसंच झालं. मी जेव्हा जेव्हा खोटं बोलायचो, तेव्हा तेव्हा तिला ते कळायचं... पण तरी ती माझ्यावर विश्वास ठेवायची आणि इथंच ती चुकली. वास्तविक तिनं माझं खोटं उघडकीस आणायला हवं होतं. त्यामुळे मी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडलो असतो. पण तिनं तसं केलं नाही आणि मी पित राहिलो, खोटं बोलत राहिलो आणि काहीही न करता भटकत राहिलो.

आणि मग एके दिवशी, समुद्रकिनाऱ्यावरच्या एका बारमध्ये मी पित बसलो होतो, तेव्हा या सगळ्याची सुरुवात झाली. त्यावेळी साधारणपणे संध्याकाळचा सहा वाजण्याचा सुमार होता. मला चांगलीच चढली होती. मी व्हिस्कीचे आठ पेग रिचवले होते आणि नववा संपवण्याच्या बेतात होतो.

तो बार खूप छोटा आणि शांत होता. शिवाय तिथं फार वर्दळ पण नव्हती, जे माझ्यासाठी चांगलंच होतं. कोणताही व्यत्यय न येता एका कोपऱ्यात बसून मी खिडकीतून किनाऱ्यावर मौजमजा करणाऱ्या लोकांना पाहू शकत होतो. गेल्या पाच दिवसांपासून मी तिथला रेग्युलर कस्टमर झालो होतो. तिथला जाडा, टकल्या बारमन मला चांगलाच ओळखत होता. माझी व्हिस्कीची गरज पण त्याच्या चांगलीच परिचयाची झाली होती. माझं एक ड्रिंक संपायच्या आत दुसरं ड्रिंक माझ्या टेबलवर तो हजर करायचा.

तिथं फारसे पिणारे कुणी नव्हते. एखादा पुरुष किंवा स्त्री तिथं यायची, एखादं ड्रिंक घशाखाली ओतायची, थोडा वेळ टाईमपास करायची आणि निघून जायची. ते सर्व माझ्यासारखेच होते. काही काम नाही, धंदा नाही, डोळ्यासमोर कसलं ध्येय नाही ; फक्त टाईमपास करायला सगळे यायचे.

माझ्या टेबलाजवळ बारपासून दूर एका कोपऱ्यात एक टेलिफोन बूथ होता. तिथं सारखी वर्दळ सुरु असायची. लोक आत घुसायचे, फोन करायचे आणि निघून जायचे. सगळ्या वयातील स्त्रिया, पुरुष, मुलं, मुली तिथं यायचे.

जेव्हा मी तिथं बसून प्यायचो, तेव्हा त्या बूथचं निरीक्षण करायचो. माझ्यासाठी तो एक चांगला टाईमपास झाला होता. मी कुतूहलानं आतल्या माणसांचं निरीक्षण करायचो. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तींचे मी हावभाव न्याहाळायचो. त्यांच्यातले काहीजण हसायचे, काही गंभीर व्हायचे हे सगळं एखादं नाटक बघण्यासारखं होतं.

बारमनने माझ्यासमोर नववा पेग आणला. यावेळी तो निघून न जाता माझ्या शेजारीच थांबला. याचा अर्थ बिल द्यायची वेळ आली होती. मी त्याला माझ्याजवळ असलेली पाचशेची नोट दिली. त्याने उरलेले पैसे मला परत दिले आणि माझ्याकडं पाहून हसला. मी त्याला टीप देण्यासाठी नाणं शोधू लागलो तसा तो आणखी कुत्सितपणे हसून बारकडे परत गेला. त्याक्षणी मला त्याच्या कानाखाली जोरात हाणावं असं वाटलं. पण तसं करण्यासाठी अंगात धाडस असावं लागतं, ते मी तुरुंगात गेल्यापासून गमावून बसलो होतो.

त्याच दरम्यान तिथं एक स्री आली आणि बूथकडे गेली. तिनं स्वतःला आतमध्ये बंद करून घेतलं. तिने फिक्कट पिवळ्या रंगाचं टाईट स्वेटर आणि पांढऱ्या रंगाची सलवार घातली होती. डोळ्यांवर हिरव्या रंगाचा गॉगल आणि हातात पांढऱ्या पिवळ्या रंगाची हॅन्डबॅग होती.

तिनं पटकन माझं लक्ष वेधून घेण्याचं कारण होतं तिची परफेक्ट फिगर. सगळं कसं जिथल्या तिथं हवं तसं आणि तेवढं.. प्रमाणबद्ध ! ती जेव्हा चालत टेलिफोन बूथकडे गेली तेव्हा तिच्या चालण्यात अशी काही मादकता होती, न पिणारा सभ्य माणूससुद्धा टक लावून पाहत बसला असता.

मी एक पिणारा अट्टल दारुड्या झालो होतो. त्यामुळं लाज लज्जा न बाळगता तिच्याकडं सरळ पाहत बसलो. जेव्हा तिनं बूथमध्ये जाऊन स्वतःला आत बंद करून घेतलं, तेव्हा तिच्या चेहऱ्याकडे माझी नजर गेली. ती साधारण पस्तिशीतली स्त्री असावी. सुंदर, रेखीव अवयव असलेली काहीशी थंड पण कोणत्याही पुरुषाचं लक्ष वेधून घेणारी ती एक मादक स्त्री होती.

मी माझा नववा पेग रिचवत तिला पाहायला सुरुवात केली. तिचं संभाषण आनंदी होतं की नाही याबाबत मी काही सांगू शकत नाही. तिनं डोळ्यावर गॉगल घातल्यामुळे अंदाज बांधणं कठीण होतं. तरी पण ती फास्ट आणि मुद्देसूद बोलणारी होती. ती बूथमध्ये एक मिनिटापेक्षा कमी वेळ राहिली. आणि माझ्याजवळून माझ्याकडं न पाहता निघून गेली. मी परत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो. जोवर ती बारच्या बाहेर पडली नाही, तोवर मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो.

मी भरपूर प्यालो होतो त्यामुळं तिचा विचार करताना सारासार बुद्धीचा प्रश्नच नव्हता. मी जर तिथं एकटाच असतो, तर नक्कीच तिच्या मागे गेलो असतो. तिची फिगर पाहून मी या निष्कर्षाप्रत आलो की तिच्यासोबत एखादी रात्र खूप धमाकेदार ठरली असती.

ती कोण असावी यावर मी विचार करायला लागलो. तिचे कपडे महागडे होते. तिची पांढरी पिवळी हॅन्डबॅग कोणत्याही सामान्य दुकानात मिळणारी नव्हती.

ती पांढरी पिवळी बॅग!

बूथमध्ये जाताना ती आत घेऊन गेल्याचं मला आठवतं. पण बाहेर पडताना ती बॅग घेऊन बाहेर पडल्याचं काही नाही आठवत. माझ्या मनात आता हाच विचार पक्का व्हायला लागला की बाहेर पडताना ती बॅग घेऊन बाहेर पडली नाही. मी माझा पेग संपवला आणि धडपडत स्वतःला सावरत उभा राहिलो आणि बूथकडे गेलो. बूथचं दार उघडलं आणि .... तिथल्या शेल्फवर ती होती. गुड ! म्हणजे मी इतकं पिऊन पण शुद्धीवर होतो तर !

माझ्या डोक्यात आता विचार यायला लागला की बॅग उचलायची आणि तिच्या मालकिणीचा शोध लावायचा. नंतर बारमनला सांगायचं की ती तिची बॅग बूथमध्येच विसरून गेलीय. बारमनला सांगावंच लागेल नाहीतर त्याला न सांगता मी बॅग घेऊन रोडवर गेलो आणि एखाद्या पोलिसानं पकडलं तर ? आणि बारमनला सांगितलं तर ती बॅग द्यायला तिच्या घरी जाता येईल आणि मग तिच्याकडून चांगली बक्षिसी पण मिळू शकेल. कदाचित एक किस किंवा आणखीही काही. कोण जाणे ?

मी आत शिरलो आणि बूथचं दार लावून घेतलं. हॅन्डबॅग उचलली आणि उघडली. हे करताना खांद्यावरून मान उंच करून सगळीकडे पाहून घेतलं की कुणी मला बघत तर नव्हतं ? शेवटी मी तुरुंगात जाऊन आलेला कैदी होतो. त्यामुळे मला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्याचबरोबर मी रिसिव्हर उचलून कानाला लावला. आता बाहेरून कुणीही पाहिलं असतं तर त्याला असंच वाटलं असत की मी फोनवर बोलतोय. मी बॅग तपासायला सुरुवात केली.

बॅगमध्ये मला जे काही दिसलं त्यात- एक सोन्याची सिगारेट केस, सोन्याचा लायटर, एक हिऱ्याची क्लिप-जी साधारणपणे एक-ते दीड लाखाची असावी- या गोष्टी दिसल्या. शिवाय एक मोठी नोटांची गड्डी ज्यातील वरची नोट पाचशेची होती म्हणजे किमान लाखभर रुपये तरी असले पाहिजेत.

नोटांची गड्डी पाहून मला घाम फुटायला लागला. सिगारेट केस, लायटर, हिऱ्याची क्लिप या ओळखता येणाऱ्या गोष्टी होत्या. पण नोटा ... ? माझा नोटांमधला इंटरेस्ट वाढायला लागला.

हे जर मला मिळाले, तर मला उद्या वीणा समोर पैशांसाठी हात पसरावा लागला नसता. हे जवळ असतील तर मी माझ्या लायकीच काम आरामशीर शोधू शकलो असतो, ते पण पिण्याची मजा घेत !

जर ही बाई इतके पैसे विसरून जाण्याइतकी निष्काळजी असेल तर हे पैसे हरवल्यामुळे तिला फारसा फरक सुद्धा नाही पडणार. नंतर खूप दुरून आल्यासारखा माझ्या आतून आवाज आला," तुझं डोकं बिक फिरलंय की काय ? की तुला वेड लागलंय ? ही चक्क चोरी आहे. जर पकडला गेलास तर पुन्हा तू खडी फोडायला जाशील. आधी ती बॅग खाली ठेव आणि इथून बाहेर पड. तुला पुन्हा तुरुंगात जायचंय काय ?"

पण त्या आवाजाचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही. मला ते पैसे हवे होते. आणि ते मिळवणं खूप सोपं होतं. मला फक्त इतकंच करायचं होतं की बॅग मधून पैसे काढून माझ्या खिशात ठेवायचे, बॅग बंद करायची आणि ती तिथंच ठेवून बाहेर पडायचं. बस्स !

बारमनने मला पाहिलं असण्याची शक्यता नव्हतीच. बूथमध्ये सातत्याने लोकांचं येणं -जाणं सुरु होतं. पैसे कुणीही घेऊ शकत होतं. कुणीही!

मला त्यांची गरज होती. मी ते घेतले. नोटांची गड्डी खिशात कोंबली. बॅग बंद केली. माझं हृदय धडधड वाजत होतं. बूथमध्ये टेलिफोनच्यावर एक छोटासा आरसा होता. अचानक मी त्यात हालचाल पाहिली. बॅग अजूनही माझ्या हातात होती. मी आरशात पाहिलं.

ती बरोबर माझ्या मागे उभी होती, माझं निरीक्षण करत. तिच्या गॉगलवरून किरणं परावर्तित होत होती. त्यामुळे आरशात फक्त दोन हिरवे स्पॉटच दिसले. पण ती तिथं होती. केव्हापासून ती तिथं होती माहित नाही. पण ती तिथं होती.


-----------------------------------------------------------


प्रकरण २ रे


भिंतीवरच्या आरशात मी खिळल्यासारखा पाहत राहिलो, माझ्या हातून बॅग गळून पडली. जणू मी गोठून गेलो होतो.

मी पटकन भानावर आलो. व्हिस्कीच्या लाटा,ज्यांनी मला घेरलं होतं; आता त्या दूर निघून गेल्या होत्या. ती बारमनला बोलावू शकत होती आणि त्यानं माझ्याकडची नोटांची गड्डी सहज शोधली असती. नंतर त्यानं पोलिसाला बोलावलं असतं आणि त्यानंतर माझी रवानगी नक्कीच तुरुंगात झाली असती.

मी खाली पडलेली बॅग उचलली आणि दार उघडलं. मला बाहेर पडता यावं म्हणून ती थोडीशी बाजूला झाली.

" मला वाटतं मी माझी बॅग आत विसरलेय." ती म्हणाली.

" तुमचं म्हणणं बरोबर आहे. " मी म्हणालो, " मी बारमनकडे देणारच होतो. " मला त्याक्षणी असं वाटलं की धावत धावत रस्त्यावर जावं आणि नोटांची गड्डी कुठेही फेकून द्यावी. मग ती माझ्यावर कोणताही आरोप करू शकली नसती.

मी बाहेरील दरवाजाकडे जाण्यास वळलो आणि अचानक थांबलो. काउंटरच्या मागून बारमन बाहेर आला होता आणि माझ्या वाटेत उभा राहिला होता. तो थोडासा गोंधळल्यासारखा वाटत होता. नंतर तो त्याच वाटेवर चालत पुढे माझ्याजवळ आला.

" हा माणूस तुम्हांला त्रास देतोय का मॅडम ?" तो त्या स्त्रीला म्हणाला. मला असं वाटलं की कोणत्याही परिस्थितीत शांत राहायची दिव्य शक्ती तिच्याजवळ असावी.

" नाही. नाही. मी माझी बॅग इथं विसरून गेले होते. हे तर माझी मला द्यायला निघाले होते. "

" हे खरंय ?" त्यानं मला विचारलं.

मी एका पुतळ्यासारखा निश्चल झालो होतो. माझ्या तोंडाला कोरड पडली होती. मला काय उत्तर द्यायचंय हे माहित असूनदेखील मी काहीच न बोलता उभा राहिलो.

" बॅगमध्ये काही पैसे वैगेरे होते का ?" बारमननं तिला विचारलं.

" होय. मीच मूर्ख होते, जे बॅग इथं विसरून गेले. " ती म्हणाली.

तिचा आवाज स्पष्ट आणि धारदार होता. तिच्या डोळ्यांकडे जर मला पाहता आलं असतं -जे तिने गॉगल घटल्यामुळं शक्य नव्हतं -तर नक्कीच तिचे डोळे पण धारदार असल्याचं मला दिसलं असतं.

" तुम्ही तुमची बॅग तपासून का पाहत नाही ? काही हरवलंय की नाही वैगेरे ?"

अं ? मी ...आत्ताच करते "

त्याक्षणी मला वाटलं एक सणसणीत ठोसा त्या बारमनच्या नाकावर ठेवून तिथून सटकावं. पण मी असं काही केलं नाही कारण त्या बारमनला काही फरक पडला नसता.

ती माझ्या मागून बूथमध्ये शिरली आणि तिने बॅग उचलली. मी तिचं निरीक्षण करत होतो. त्याचवेळी माझं हृदय जोरात धडधडत होतं. तिनं बाहेर पाऊल टाकलं, बॅग उघडली आणि तिच्या पातळ बोटांनी बॅग हलवून आत पाहिलं. तिचा चेहरा संपूर्ण कोरा होता.

बारमन एकदा माझ्याकडं तर एकदा तिच्याकडं आळीपाळीनं पाहत होता. आता संपलं. वेळ भरली आता. येत्या अर्ध्या तासात मी पुन्हा तुरुंगात असेन.

" नाही. काहीही हरवलेलं नाही. " ती म्हणाली. तिनं माझ्याकडं पाहण्यासाठी हळूच मान वळवली. " माझी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. मला वाटतं अलीकडं मी फारच निष्काळजी झालेय. "

मी काहीच बोललो नाही.

" मला वाटतं हा क्षण आपण साजरा केला पाहिजे. " ती माझ्याकडे पाहत म्हणाली, " मी तुमच्यासाठी एखादं ड्रिंक मागवू का मि. हरीश ?"

अच्छा ! म्हणजे मी कोण हे तिला माहित होतं तर ! जेव्हा मी तुरुंगातून बाहेर आलो होतो, तेव्हा दैनिक प्रभातने (माझा जुना जॉब ) माझा फोटो पहिल्या पानावर छापला होता. आणि माझा गुन्हा, मला झालेली शिक्षा याबद्दल अगदी साग्रसंगीत वर्णन छापलं होतं. आणि दैनिक प्रभात वाचणाऱ्या माणसाने ही बातमी वाचली नसेल अशी काहीही शक्यता नव्हती.

तिच्या आवाजात असा काही सूर होता की मला तिचं आमंत्रण स्वीकारणंच हिताचं ठरेल असं वाटलं.

" दोन रॉयल स्टॅग लार्ज विथ आईस. " तिनं ऑर्डर दिली. नंतर ती मागे वळली. आणि जिथं मी नेहमी बसायचो त्या टेबलसमोर ती बसली. मी तिच्यासमोर बसलो. तिनं हॅन्डबॅग उघडली, त्यातून सोन्याची सिगारेट केस काढली आणि त्यातून एक सिगारेट काढून मला ऑफर केली. मी ती घेतली.

तिनदेखील एक सिगारेट काढून पेटवली. तितक्यात बारमन आमच्यासमोर तिनं ऑर्डर केलेले पेग ठेवून निघून गेला.

" तुरुंगातून बाहेर पडल्यावर आता कसं वाटतंय मि. हरीश ?" नाकपुड्यांतून सिगारेटचा धूर सोडत तिनं विचारलं.

" बरं वाटतंय " मी म्हणालो.

" मला वाटतं आता तुम्ही पत्रकार राहिला नाहीत. "

" बरोबर आहे तुम्ही म्हणता ते ."

तिनं आपल्या समोरील ड्रिंकचा ग्लास हलवला. त्यामुळे त्यातील आईस क्यूब एकमेकांवर किणकिणत आदळले. ती ग्लासाकडेच पाहत होती. जणू माझ्यापेक्षा तोच जास्त आकर्षक होता.

" मी बऱ्याच वेळेला तुम्हांला इथं येताना पाहिलंय." तिने खिडकीकडे बोट दाखवत म्हटलं. " या रस्त्याच्या पलीकडे माझी एक बीच केबिन आहे."

" वा. खूपच छान." मी म्हणालो.

तिनं तिचा ग्लास उचलून एक छोटा घोट घेतला.

" तुम्ही इथं बऱ्याचवेळा येता याचा अर्थ अजून तुम्हांला काम मिळालेलं नाही, बरोबर ?"

"बरोबर."

"तुम्हांला वाटतं की तुम्हांला लवकर काम मिळेल म्हणून ?"

"होय."

" पण ते इतकं सोपं नाहीय. "

हे ही बरोबर आहे. "

"मग जर तुम्हांला एखाद्या कामाची ऑफर आली तर स्वीकाराल ?"

मी तिच्याकडं पाहिलं.

" मी समजलो नाही. तुम्ही एखादी ऑफर देताय का ?"

हं ! शक्य आहे. जर तुम्हांला इंटरेस्ट असेल तर. "

मी पेग घेण्यासाठी हात पुढे केला. पण लगेच हात मागे घेतला कारण मी आधीच खूप प्यायलो होतो.

" काय काम आहे ?"

तुम्हांला भरपूर मोबदला मिळेल. बदल्यात एक छोटासा धोका पत्करून गुपचूप करायचं एक काम "

" म्हणजे हे बेकायदेशीर आहे तर. "

" नाही ... नाही. यात बेकायदेशीर असं काहीच नाहीय.. "

" पण यातून काहीच अर्थबोध होत नाहीय. यात धोका कुठं येतो ? मी कोणतंही काम करू शकतो. पण मला कळालं तरी पाहिजे की काम काय आहे ? "

" ठीकाय. मी समजू शकते तुम्हांला काय म्हणायचं आहे ते. " तिनं ड्रिंकचा आणखी एक घोट घेत म्हटलं.

" तुम्ही तुमचं ड्रिंक घेतलं नाही मि. हरीश ? मला माहित आहे मी तुमच्यासाठी काय करायला हवंय. आता मी जरा घाईत आहे. शिवाय आपल्या बोलण्यासाठी ही जागा योग्य नाही. मी तुम्हांला फोन करू शकते का ? आपण कुठंतरी दुसऱ्या जागी भेटू, जिथं आपल्याला निवांत बोलता येईल. "

" माझा नम्बर डिरेक्ट्रीत आहे. " मी म्हणालो.

" ठीकंय. मग मी फोन करते. कदाचित उद्याच. चालेल ना ?"

" चालेल. " मी म्हणालो.

" मी बिल देते." असं म्हणत तिने आपली बॅग उघडली. नंतर ती थांबली. आणि गोंधळून म्हणाली," मी बहुतेक कॅश घरी विसरले. "

" पण मी नाही. "

मी माझ्या खिशातून नोटांची गड्डी काढून तिच्यासमोर टाकली.

" ओह. धन्यवाद मि. हरीश. " तिनं त्यातून पाचशेची नोट काढली आणि टेबलवर ठेवली. नंतर उरलेली नोटांची गड्डी हॅन्डबॅगमध्ये टाकली व खुर्चीतून उठली.

मी पण उभा राहिलो.

" ठीकंय हरीश. उद्या बोलू. "

ती वळली आणि बारच्या बाहेर पडली. ती रस्ता क्रॉस करत असताना मी तिच्या मादक हालचालींचं निरीक्षण करत राहिलो. नंतर दाराजवळ गेलो आणि तिला कार पार्किंगमध्ये जाताना पाहिलं. ती सिल्व्हर कलरच्या रोल्स रॉईसमध्ये बसून निघून गेली. तिच्याकडं पाहण्यात जरी मी गुंग झालो होतो, तरी तिच्या गाडीचा नंबर पाहायचं मात्र मी विसरलो नाही.

मी पुन्हा टेबलकडे गेलो आणि खाली बसलो. माझा दारूने भरलेला ग्लास अजूनही टेबलवर होता. मी तो उचलून एक छोटासा घोट घेतला. तितक्यात बारमन तिथं आला आणि टेबलवर तिने ठेवलेली पाचशे रुपयांची नोट त्याने उचलली. " काय फटाका होती नाय ? आणि पैशानं तुडुंब भरलेली. " तो दात विचकत म्हणाला, " तू कसं काय तिला पटवलंस ? काही बक्षिसी वैगेरे दिली की नाही तिनं तुला ?"

मी बराच वेळ त्याला डोळे रोखून पाहिलं आणि तडक बारच्या बाहेर निघून आलो. तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या बारमध्ये बसण्याची ती माझी शेवटची वेळ होती. त्यानंतर मी पुन्हा कधीच त्या बारमध्ये पाऊल टाकलं नाही. आज ही समोरून गेलो तरी अंगावर काटा येतो.

रस्त्याच्या पलीकडे एक फोर व्हीलरचं शोरूम होतं. तिथं काम करणारा मार्शल माझ्या ओळखीचा होता. जेव्हा मी दैनिक प्रभातसाठी काम करायचो, तेव्हा पासूनची आमची ओळख होती. मी रस्ता क्रॉस केला आणि शोरूममध्ये गेलो. मार्शल टेबलमागे बसून कुठलं तरी मासिक चाळत होता.मला पाहून त्याला खूप आनंद झाला.

" हरीश ?? तू ? अरे कम कम. हाऊ आर यू मॅन ? " बसल्या जागेवरून उठून तो बाहेर आला. मी त्याच्याशी शेकहॅण्ड केलं. मला या मनःपूर्वक स्वागताने खूप बरं वाटलं. तुरुंगातून बाहेर पडल्यावर बऱ्याच मित्रांनी मला टाळण्याचा प्रयत्न केला होता. पण मार्शल खूप चांगला माणूस होता. आम्ही नेहमीच एकत्र असायचो.

मी टेबलच्या एका कोपऱ्यावर टेकलो आणि त्याला सिगारेट ऑफर केली. " मी सिगारेट सोडलीय. तुला बाहेर पडल्यावर कसं वाटतंय आता ?"

" ठीक." मी म्हणालो, " तुरुंगातून बाहेर पडल्यावरसुद्धा आपण नॉर्मल लाईफ जगू शकतो." नंतर आम्ही जवळपास दहा मिनिटे इकडंतिकडच्या गप्पा मारत राहिलो. मग मी माझ्या मूळ मुद्द्याकडं वळलो ज्यासाठी मी त्याच्याकडं आलो होतो.

" मार्शल, मघाशी जी रोल्स रॉईस गाडी गेली ती कुणाची आहे काही माहिती आहे तुला ?"

" म्हणजे तुला मि. फर्नांडिसच्या गाडीबद्दल विचारायचं आहे काय ?"

" ती मि. फर्नांडिसची गाडी होती ?"

" येस मॅन. ब्युटीफुल गाडी. "

" यू मिन मि. ऍंथोनी फर्नाडिसची गाडी ?" मी पुन्हा खात्री करून घेण्यासाठी विचारलं.

" यू सेड इट मॅन ... त्याचीच आहे. "

" तो पणजीमध्ये राहतोय ? तो तर दिल्लीला राहत होता ना ? "

" दोन वर्षांपूर्वी त्याने इथं जागा खरेदी केली. हवापालटासाठी तो इकडं शिफ्ट झालाय. "

माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. पण वरकरणी मी शांत असल्याचं भासवलं.

" आपण त्याच ऍंथोनी फर्नाडिस बद्दल चर्चा करतोय ना जो कोट्याधीश आहे, जगातल्या अफाट श्रीमंतांपैकी एक ?" मी पुन्हा त्याला विचारलं.

"तोच. मी असं ऐकलय की तो भयंकर आजारी आहे. त्यानं सगळा पैसा दिला तरी त्याचं आजारपण मी घेणार नाही. " मार्शल म्हणाला.

"काय झालंय त्याला ?" मी विचारलं.

"कॅन्सर. कुणीही त्याच्यासाठी काही करू शकत नाही. "

मी माझ्या हातातल्या सिगारेटकडं पाहिलं आणि शेवटचं थोटूक फेकून दिलं.

" म्हणून तो इथं राहायला आलाय ?"

" होय. त्यानं पणजी शहरात किनाऱ्याजवळचा डॉन बास्कोचा बंगला विकत घेतलाय. त्याला मस्त डेव्हलप केलंय. काय सुंदर जागा आहे ! स्वतःचा बंगला, स्वतःचा किनारा, स्वतःचा स्विमिंग पूल, प्रत्येक गोष्ट स्वतःची. "

डॉन बास्कोचा बंगला माझ्या चांगलाच लक्षात होता. पणजी शहरातला खूप मोठा व्यापारी होता तो. नंतर एका मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आणि त्याला स्वतःचा बंगला विकावा लागला. मी ऐकलं तेव्हा त्याचा घर विकण्याबाबतचा व्यवहार सुरु होता. पण कुणी घेतल्याचं ऐकलं नव्हतं.

माझ्या डोक्यात विचारांची घोडदौड सुरु होती. " म्हणजे ती रोल्स त्याची आहे तर !"

" त्याच्याजवळ असणाऱ्या दहा गाड्यांपैकी एक. " मार्शल म्हणाला.

" खरंच मस्त गाडी आहे. अशी एखादी गाडी माझी असलेली मला आवडेल. " मी म्हणालो.

" मला पण ." मार्शल म्हणाला.

" ती गाडी चालवणारी बाई कोण होती ? मी काही तिला निरखून पाहिलं नाही. पण ती सुंदर होती, तिनं डोळ्यांवर गॉगल चढवला होता. "

" त्याची बायको असेल. " मार्शल म्हणाला.

" त्याची बायको ! पण ती तर वयानं जास्त वाटत नव्हती. ती जास्तीत जास्त ३२-३३ वयाची असेल आणि ऍंथोनी फर्नाडिस माझ्या माहितीनुसार सत्तरीतला होता."

" जवळपास तेवढाच असेल. पॅरिसमध्ये असताना त्याने पुन्हा लग्न केलं. ती कोण होती आठवत नाही. कदाचित अभिनेत्री असेल किंवा मॉडेल." मार्शल म्हणाला, " दैनिक प्रभातमध्ये तिच्याबद्दल छापून आलं होतं.

" त्याच्या पहिल्या बायकोचं काय झालं ?" मी विचारलं.

"तीन वर्षांपूर्वी तिच्या कारला अपघात झाला.

" त्याची बायको आणि मुलगी आधी दिल्लीला राहायचे. तिथलं वातावरण त्याच्या तब्येतीला मानवल नाही. म्हणून तो इकडं शिफ्ट झाला. "

" त्याला एक मुलगी पण आहे ?"

" पहिल्या बायकोची. ती फक्त १८ वर्षांची आहे. पण काय फटाका पोरगी आहे! " माझ्याकडं पाहून डोळा मारत त्यानं म्हटलं. " त्याच्या महागड्या गाड्यांपेक्षा ती पोरगी मला जास्त आवडेल. "

" मार्शल साल्या तोंड आवर. लग्न झालंय तुझं. " मी म्हणालो.

" अरे तू अजून त्या पोरगीला पाहिलं नाहीस म्हणून असं बोलतोयस. भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तिला बघून. "

" मग करत बस तिचा विचार. मी निघतो आता. " मी म्हणालो.

" अरे पण अचानक फर्नांडिस बद्दल का विचारलंस ?" मार्शल म्हणाला.

" अरे काही नाही असंच विचारलं. ती गाडी आणि बाई बघितली म्हणून वाटलं विचारावं." मी त्याला उत्तर दिलं खरं, पण त्यानं त्याचं समाधान झालेलं दिसत नव्हतं. पण त्यानं पुढं विषय वाढवला नाही.

" जर तुला तात्पुरतं काम हवं असेल तर माझ्याकडे आहे हरीश." तो थोडासा बिचकत म्हणाला, " आपल्या शहरातली लोकगणना करण्यासाठी काही माणसं नेमायची आहेत. दहा -बारा दिवसांचं काम आहे. पैसे पण चांगले मिळतील. तुला चालेल का ?"

" थँक्स माझ्याबद्दल तू विचार केलास. पण मला काम मिळालंय. " मी क्षणभराचा देखील विचार न करता म्हणालो.

घरी परतताना मी मार्शलकडून मिळालेल्या माहितीवर विचार केला. त्यामुळं माझा उत्साह वाढला. जगातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या माणसाच्या बायकोकडं माझ्यासाठी काही काम होतं. आणि आता यात शंकाच नव्हती की ती मला उद्या फोन करेल. छोटासा धोका असं ती म्हणाली. पण ठीकाय ना. जर मोबदला तगडा मिळणार असेल, तर मी धोका पत्करायला तयार होतो. समुद्र किनाऱ्याजवळून जाताना मी मनातल्या मनात शीळ घातली. आयुष्य पुन्हा बहरत होतं.

दुसऱ्या दिवशी मी माझ्या जुन्या ऑफिसच्या - दैनिक प्रभातच्या -ऑफिसमध्ये गेलो. सकाळीच नीनानं मला सांगितलं होतं, की ती दुपारपर्यंत घरी येणार नव्हती. हे माझ्यासाठी चांगलंच होतं. जर फर्नांडिसच्या बायकोचा फोन आला तर मला निवांतपणे तिच्याशी बोलता येणार होतं. जोवर काम काय आहे ते कळत नाही, तोवर मी वीणाला यातलं काही सांगणार नव्हतो.

मी दै. प्रभातच्या रेकॉर्डरूममध्ये(मोर्ग) गेलो, जिथं पूर्वीच्या पेपरच्या प्रती ठेवलेल्या असतात. तिथं दोन मुली होत्या, ज्यांना मी पूर्वी कधी पाहिलं नव्हतं. मी त्यांच्याकडं दोन वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड असलेल्या फाईल्स मागितल्या.

मला जी माहिती हवी होती, ती मिळवायला मला फारसे कष्ट पडले नाहीत. त्यातून मला जी माहिती मिळाली ती अशी : ऍंथोनी फर्नांडिसनं त्याच्या पहिल्या बायकोच्या निधनानंतर पाच महिन्यांनी रिया वर्माशी लग्न केलं. रिया दिल्लीमधली ओपन शो गर्ल होती. एक आठवडाभर धुवांधार रोमान्स केल्यावर ऍंथोनीनं तिला लग्नासाठी विचारलं आणि तिनं लगेच होकार दिला. हे तर सरळ होतं की तिनं त्याच्या पैशांशी लग्न केलं होतं.

मी घरी परतलो आणि फोनची वाट पाहायला लागलो. बरोबर अकरा वाजता फोनची रिंग वाजली. फोन उचलण्या आधीच मला माहित होतं हा तिचा फोन असणार. माझं हृदय जोरात धडधडत होतं आणि हात पण थरथरत होता.

" मि. हरीश ?" तिचाच स्पष्ट, धारदार आवाज.

" बोलतोय" मी म्हणालो.

" आपण काल भेटलो होतो. "

तिला थोडासा झटका द्यायचं ठरवून मी म्हणालो, " होय मिसेस फर्नांडिस , बारमध्ये भेटलो होतो आपण. "

झटका बरोबर वर्मी लागला. काही वेळ पलीकडं शांतता पसरली. तिचा वाढलेला शासोच्छवास मात्र ऐकू येत होता.

" तुम्हांला कळींगुड बीच माहितीय ना ? तिथं समुद्रावर नहायला येणाऱ्यांसाठी केबिन्स आहेत. " तिनं विचारलं.

" हो." मी उत्तर दिलं.

" तुम्ही तिथं एक केबिन भाड्यानं घ्या. डावीकडील सगळ्यात शेवटची. तिथं मी तुम्हांला आज रात्री नऊ वाजता भेटेन. "

" चालेल. " मी म्हणालो.

परत थोडा वेळ शांतता पसरली. नंतर ती म्हणाली ," आज रात्री नऊ वाजता. " आणि तिने फोन ठेवून दिला.

मी रिसिव्हर ठेवला आणि सिगारेट पेटवली. मी खूप उत्तेजित झालो होतो. आताच्या प्रसंगामुळं माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. " एक छोटयाश्या धोक्याची शक्यता. " आता मी हे जाणून घेण्यासाठी उतावीळ झालो होतो की तिला माझ्याकडून नेमकं काय करून घ्यायचं होतं. कदाचित ती कुठ्ल्यातरी जाळ्यात अडकली असेल. ब्लॅकमेलिंग ? किंवा नको असलेल्या बॉयफ्रेंडपासून सुटका करून घ्यायची असेल. मी शहारलो. कल्पना करून काही उपयोग नव्हता.

मी माझ्या हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. अकरा वाजून चाळीस मिनिटे झाली होती. वीणा परतण्यापूर्वी मला कळींगुड बीच वर जाऊन तिथली केबिन बुक करून परतण्याइतका वेळ नक्कीच होता.

मी तिथं गेलो. तिथला माणूस -केबिनचा इन्चार्ज जयराम उसगावकर - बुडणाऱ्यांना वाचवणारा जीवनरक्षक पण होता.

तिथल्या केबिन्स ऐष आरामी होत्या. तिथं समुद्र स्नान केल्यावर विश्रांती घेता यावी यासाठीच त्या ओळीने उभ्या केल्या गेल्या होत्या. मी तिथं गेलो तेव्हा त्यातील जवळपास सर्व भाड्याने दिल्या होत्या.

जयराम मला आधीपासून ओळखत होता. जेव्हा त्यानं मला पाहिलं, तेव्हा त्यानं स्मित हास्य केलं.

" हॅलो मि. हरीश, बऱ्याच दिवसांनी आलात. पुन्हा भेटून आनंद झाला. "

मी त्याच्याशी शेकहॅण्ड केलं. " मला एक केबिन हवीय, भाड्याने. डावीकडील सर्वात शेवटची. रात्री नऊ वाजता. मिळेल का ?"

" आम्ही आठ वाजताच केबिन बंद करतो मि. हरीश" तो म्हणाला, " इथं त्यावेळी कुणीही असणार नाही. पण तुम्हांला केबिन मिळेल. या आठवड्यात २४ तासासाठी केबिन भाड्याने घेणारे कुणीही ग्राहक मला मिळाले नाहीत. त्यामुळं मी रात्री इथं थांबत नाही. चालेल ?"

" ठीकाय. चालेल.फक्त किल्ल्या मॅटच्या खाली ठेवून जा. बाकी भाड्याचं आपण उद्या बघू. "

" चालेल मि. हरीश. "

मी किनाऱ्याकडे पाहिलं. संपूर्ण किनारा समुद्रात अंघोळ करून आलेल्या उघड्या शरीरांनी झाकून गेला होता." जयराम आजकाल चांगली कमाई चाललेली दिसतेय तुमची. " मी म्हणालो.

" ठीकय. होतेय पोटापुरती. पण म्हणावा तसा धंदा नाहीय. रात्री तर सर्व केबिन्स मोकळ्याच असतात. हे असंच चालत राहिलं, तर लवकरच नवीन धंदा शोधावा लागेल. बाकी तुमचं कसं काय चाललंय?" जयरामनं मला विचारलं.

" ठीक चाललंय. आज रात्री नऊ वाजता मी इथं येईन. आपण सकाळी भेटूच."

घरी परतत असताना माझ्या डोक्यात एकच विचार चालला होता - वीणाला काय सांगायचं ? शेवटी मी शहर जनगणनेचं काम घेतलंय असं सांगायचं ठरवलं.

जेव्हा मी तिला सांगितलं तेव्हा तिला खूप आनंद झाला.

" आठवड्याला तीन हजार मिळतील," मी म्हणालो, " इथं बसून माशा मारण्यापेक्षा बरं. बरोबर ना ?" त्या दिवशी रात्री साडे आठ वाजता मी घरातून बाहेर पडलो. गॅरेजमध्ये जाऊन माझी जुनी मारुती ८०० सुरु केली. इंजिनचा आवाज ऐकल्यावर ठरवलं की हे काम फत्ते झालं की आधी गाडी बदलून टाकायची.

नऊला तीन मिनिटे असताना मी किनाऱ्यावर पोहोचलो. संपूर्ण किनारा ओसाड पडला होता. मॅटच्या खाली मला केबिनची किल्ली मिळाली. मी केबीनचं दार उघडलं.

आतमध्ये एक मोठी खोली, एक बेडरूम आणि किचन होतं. केबिन एसी (वातानुकूलित) होती. एक टीव्ही, रेडिओ आणि लँडलाईन होता. शिवाय आनंदाची गोष्ट म्हणजे छोटासा बार देखील होता तिथं. बारमागे असलेल्या शेल्फवर एक व्हिस्कीची बाटली देखील होती. सगळं कसं मस्त आणि जबरदस्त होतं.

मी एसी बंद केला आणि दारं, खिडक्या उघडल्या आणि बाहेरील व्हरांड्यात येऊन एका खुर्चीत बसलो. वातावरण एकदम शांत आणि एकाकी होतं. या बाईला नेमकं माझ्याकडून काय हवं होतं आणि ते काम झाल्यावर मला ती किती मोबदला देणार होती देव जाणे!

मी तिची जवळ जवळ पंचवीस मिनिटे वाट पाहिली. शेवटी ती येणार नाही असं वाटायला लागलं तेव्हा अचानक ती माझ्यासमोर प्रकट झाली. मला तिच्या येण्याची चाहूल पण लागली नाही. बसून बसून तिची वाट बघत जेव्हा मी तिसरी सिगारेट पेटवण्यासाठी झुकलो तेवढ्यात मला हालचाल जाणवली. मान वर करून पाहिलं तर ती माझ्यासमोर उभी होती... अगदी माझ्याजवळ. (एखाद्या भुतासारखीच जणू ती प्रकटली होती जणू. )

" गुड इव्हिनिंग मि.हरीश," ती म्हणाली आणि मी उठून उभं राहण्यापूर्वीच ती माझ्या शेजारील खुर्चीत बसली.

मी तिचं निरीक्षण केलं. तिनं एक सिल्कचा स्कार्फ डोक्यावरून घेतला होता, ज्यामुळं तिचा चेहरा अर्धवट झाकला गेला होता. तिनं डार्क कलरचा लाल ड्रेस घातला होता. तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर एक सोन्याचं महागडं ब्रेसलेट दिसत होतं.

" मी तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलंय," ती म्हणाली, " जो माणूस दहा लाख रुपयांची लाच नाकारतो आणि वाईट लोकांसोबत काम करायला नकार देतो, त्याची हिम्मत मानलीच पाहिजे. मी अशाच व्यक्तीच्या शोधात होते. "

मी काहीच बोललो नाही. तिनं एक सिगारेट पेटवली. मला ती माझ्याकडे बघतेय हे माहित होतं. ती अंधारात बसली होती नाहीतर तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव निहाळायला मला आवडलं असतं.

" तुम्ही धोका पत्करता आहात, असं नाही वाटलं तुम्हांला मि. हरीश ?" तिनं विचारलं.

" मी ?"

" जेव्हा तुम्ही माझे पैसे घेतलेत ; तेव्हा तुम्ही तुरुंगात जायचा धोका पत्करलात. बरोबर ?"

" तेव्हा मी खूप प्यायलो होतो. "

" आता तुमची धोका पत्करायची तयारी आहे ?"

" ते मला मिळणाऱ्या मोबदल्यावर अवलंबून आहे. " मी म्हणालो," आणि या घडीला मला पैसा हवाय, मला त्याची गरज आहे आणि तो कमवायची इच्छा देखील. पण पैसा पाहिजे. फुकटची हमाली करणार नाही. "

" जर तुम्ही माझं काम केलंत, तर मी तुम्हांला पंचवीस लाख देईन. "

कुणीतरी माझया छातीवर जोराचा ठोसा मारल्यासारखं वाटलं.

" २५ लाख ! तुम्ही नक्की २५ लाख म्हणालात ना ?"

" होय. हा मोबदला पुरेसा नाही ? तुम्ही माझं काम केलंत तर तुम्हांला ते मिळतील. "

मी एक दीर्घ श्वास घेतला. इतक्या पैशाच्या विचारानं माझी छाती धडधडायला लागली होती.

" काम काय आहे ?"

" मला वाटतं तुमचा इंटरेस्ट वाढलाय, मि. हरीश. मग तुम्ही धोका पत्करायला तयार आहात का ?"

" माझी तयारी आहे. " मी म्हणालो.

माझं विचारचक्र जोरात फिरू लागलं. इतक्या पैशांत मी खूप काही करू शकत होतो. वीणा आणि मी दुसऱ्या शहरात जाऊन नवीन आयुष्य सुरु करू शकत होतो.

" आपण चर्चा पुढं वाढवण्यापूर्वी मला तुम्हांला एक गोष्ट सांगायची आहे मि. हरीश. ती म्हणजे जोवर माझा नवरा मला पैसे देत नाही, तोवर माझ्याकडं पैसा नसतो. एका अर्थी मी त्याच्यावर अवलंबून आहे. तसं पाहिलं तर तो रोज जे पैसे देतो, तेवढे रुटीन लाईफ जगायला पुरेसे असतात. पण मी आणि माझी सावत्र मुलगी रुटीन लाईफ जगत नाही. "

" जर तुमच्याकडे पैसे नाहीत, तर तुम्ही २५ लाखांची ऑफर मला कशी दिली? " मी पटकन म्हणालो.

" ते पैसे तुम्हांला कसे मिळतील, हे मी तुम्हांला सांगू शकते"

मी तिच्याकडं रोखून पाहिलं आणि तिनं माझ्याकडं.

" ठीकय. बोला. "

" मला व माझ्या मुलीला सध्या २ कोटींची गरज आहे. आणि हा पैसा आम्हांला दोन आठवड्यांच्या आत हवाय. तुम्ही हा पैसा मिळवायला आम्हांला मदत करायची. जर तुम्ही केलंत, तर तुम्हांला पंचवीस लाख मिळतील.

मी तिचं सखोल निरीक्षण केलं. ती वेडी नक्कीच वाटत नव्हती. उलट जास्त समंजस वाटत होती.

" पण मी कशी मदत करणार ?" मी विचारलं.

तिनं उत्तर द्यायची घाई केली नाही.

" माझ्या नवऱ्याकडं जर मी हे पैसे मागितले तर तो नक्कीच देईल. पण इतके पैसे कशासाठी हे देखील तो विचारेल आणि याचं उत्तर आम्ही देऊ शकत नाही. पण तुम्ही मदत केलीत तर कोणत्याही प्रश्नांची उत्तरं न देता आम्ही हा पैसा मिळवू शकतो. "

माझ्यातला उत्साह आता ओसरायला लागला होता. हे सगळं एखाद्या सापळ्यासारखं वाटायला लागलं होतं. मी सावध झालो.

" इतके पैसे तुम्हांला कशासाठी हवेत ?" मी विचारलं.

" तुम्ही मी कोण हे शोधून काढण्याइतके हुशार आहात मग ... " ती म्हणाली.

" ते तर एखाद्या मूर्ख माणसानं पण शोधून काढलं असतं. तुम्हांला जर प्रसिद्धीपासून दूर राहायचं असेल तर ती रोल्स चालवायचं सोडून द्या." मी तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणालो, " तुम्हांला कुणी ब्लॅकमेल करतंय का ?"

" त्याच्याशी तुमचा संबंध नाही. हे पैसे मिळवण्यासाठी माझ्याकडं एक आयडिया आहे. पण तुमची मदत लागेल. त्यासाठीच मी तुम्हांला पंचवीस लाख देतेय. "

" जे आता तुमच्याकडे नाहीत " मी म्हणालो.

" पण तुमच्या मदतीने ते असतील. "

माझी आशा आता मावळत चालली होती.

" ठीकाय. आपण सरळ मुद्द्यावर येऊया. काय आहे तुमची आयडिया ?"

" माझ्या मुलीचं अपहरण केलं जाईल. " ती थंड आवाजात म्हणाली. " तिच्या परताव्याची किंमत असेल तीन कोटी रुपये यातले पंचवीस लाख तुम्हांला मिळतील. उरलेले मी आणि माझी सावत्र मुलगी वाटून घेऊ. "

" आणि हे अपहरण कोण करणारेय ?"

" कुणीच नाही. प्रिया-माझी सावत्र मुलगी -स्वतःच कुठंतरी निघून जाईल.तुम्ही या रकमेची मागणी माझ्या नवऱ्याकडे करायची. हीच तुमची मदत. तुम्ही घाबरवणाऱ्या आवाजात फोनवर बोलायचं. हे खूप सोपं आहे. पण ते व्यवस्थित केलं पाहिजे. फोन करणं पैसे मागणं आणि ते ताब्यात घेणं. यासाठीच तुम्हांला पंचवीस लाख देतेय मी. "

शेवटी रहस्य उलगडलं तर ! माझ्या तोंडाला कोरड पडली होती हे सगळं ऐकून.

अपहरण हा एक गंभीर गुन्हा होता. जर मी हे करायचं ठरवलं तर मला खूप सावधगिरी बाळगावी लागणार होती. जर पकडला गेलो तर सरळ खडी फोडायला जावं लागणार हे नक्की.

--------------------------------------------


प्रकरण ३ रे


एक छोटासा ढग चंद्राच्या समोर आला आणि समोरचा समुद्र अचानक शांत, थंड वाटायला लागला, किनारा देखील भकास वाटायला लागला. बस तेवढाच वेळ. मग ढग दूर झाला आणि किनारा,समुद्र पुन्हा पूर्वीसारखे चमकायला लागले.

रिया फर्नांडिस माझ्याकडे पाहत होती.

" इतकी मोठी रक्कम उभी करण्याचा दुसरा कुठला मार्ग नाहीय. " ती म्हणाली. " अपहरणच करावं लागेल. माझा नवरा केवळ यासाठीच पैसे देईल. आणि हे फारसं अवघड पण नाहीय. फक्त ठरवलेल्या योजनेनुसार काम केलं की झालं. "

" अपहरण हा एक गंभीर गुन्हा आहे," मी म्हणालो, " याचा विचार केलाय तुम्ही ?"

" पण कुणाचं ही अपहरण होणार नाहीय. " तिनं उत्तर दिलं. त्यावेळी तिनं आपले लांब सुंदर पाय माझ्यासमोर पसरले. " जर योजना बिघडतेय असं वाटलं तर मी माझ्या नवऱ्याला खरं काय ते सांगेन. बस्स ?"

एखादा सेल्समन जसं बनावट वस्तू विकताना बढाया मारत त्याचं वर्णन करतो, तसं ती मला पटवण्याचा प्रयत्न करत होती.

पण माझ्या मनात पंचवीस लाख रुपये घोळायला लागले होते. असेल थोडासा धोका. पण हे प्रकरण माझ्या पद्धतीनं हॅन्डल केलं तर मी पंचवीस लाखांचा धनी होणार होतो.

तुमचं म्हणणं असं आहे की हे सगळं प्रकरण तुमचा नवरा हसण्यावारी नेईल आणि मी फोन करणं, तुमच्या मुलीचं अपहरण झालंय असं सांगून ३ कोटी उकळणे हे सगळं तो लाइटली घेईल? पोलिसांना पण हेच सांगेल की तीन कोटी रुपये माझ्याकडून उकळण्यासाठी माझ्या बायको आणि मुलीने रचलेलं हे निव्वळ नाटक होतं ? "

थोडा वेळ ती गप्प बसली. नंतर ती म्हणाली," मि. हरीश, मला तुमच्या बोलण्याचा सूर खटकतोय. "

" माफ करा. पण मी एक पत्रकार होतो. त्यामुळं तुमच्यापेक्षा मला याबाबत जास्त माहिती आहे. ऍंथोनी फर्नांडिसच्या मुलीचं -एका अब्जाधीशाच्या मुलीचं जर अपहरण झालं, तर सर्व जगासाठी ती खळबळजनक बातमी ठरेल. "

" तुम्ही अतिशयोक्ती करताय मि. हरीश. मी माझ्या नवऱ्याला पोलिसांपर्यंत जाऊच देणार नाही. " तिचा आवाज धारदार आणि उतावीळ होता. " घडेल ते असं की - प्रिया नाहीशी होईल. तुम्ही माझ्या नवऱ्याला फोन करून तिचं अपहरण केल्याचं सांगाल आणि तिच्या बदल्यात दोन कोटी रुपये मागाल. माझा नवरा ते पैसे देईल आणि प्रिया घरी येईल. दॅट्स इट."

" म्हणजे तुमच्या मते हे इतकं सरळ साधं आहे " मी म्हणालो.

" हो हे इतकं सरळ आणि साधं आहे. आता तुम्ही सांगा तयार आहात की नाही ? नाहीतर मला दुसऱ्या कुणाला तरी विचारावं लागेल. "

" खरंच ?" मी म्हणालो. " स्वतःची उगाच फसवणूक करू नका. तुम्हांला चांगलंच ठाऊक आहे की दुसरं कुणी या कामासाठी शोधण्याइतका वेळ नाहीय तुमच्या जवळ. आणि मी म्हणजे कुणी सोम्यागोम्या नाहीय. यात भरपूर अडचणी आहेत. समजा तुमच्या नवऱ्याने पोलिसांना बोलावलंच तर तुम्ही काय करणार आहात ? एकदा का तुमच्या घरात पोलिसांनी पाऊल ठेवलं तर कुणालातरी पकडेपर्यंत ते तिथून हलणार नाहीत. आणि तो कुणीतरी म्हणजे मी असेन."

" पोलीस यात येणार नाहीत हे मी तुम्हांला आधीच सांगितलंय. मी माझ्या नवऱ्याला हॅन्डल करू शकते."

मी तिच्या वयस्कर अब्जाधीश आजारी नवऱ्याचा विचार करायला लागलो. त्याची आयुष्यावरची पकड कादाचित ढिली झाली असेल.कदाचित ती त्याला पैसे देण्यासाठी तयार करेल. कदाचित .....

या 'कदाचित' वाल्या कल्पनेने मी पुन्हा उत्साहित झालो. असं घडलं तर मी पंचवीस लाखांचा मालक होणार होतो.

" तुमच्या सावत्र मुलीला याची कल्पना आहे ?"

" अर्थातच. माझ्याइतकीच तिला देखील पैशांची गरज आहे."

मी अंधारातच सिगारेट पेटवली. " मी तुम्हांला आधीच सावध करतोय. पोलीस जर यात शिरले तर आपण सगळेच अडकणार आहोत. "

" मला वाटतं ज्या व्यक्तीच्या मी शोधात आहे, ती व्यक्ती तुम्ही नाही," ती म्हणाली, " आपण उगाच एकमेकांचा वेळ वाया घालवतोय. "

मी तिच्याशी सहमत होऊन ती जशी आली, तसेच तिला जाऊ द्यायला हवं होतं. पण तिनं ऑफर केलेले पंचवीस लाख डोक्यातून जात नव्हते. आता वाटायला लागलं की पोलीस कमिशनरने दिलेली लाच मी नाकारायला नको होती. तिथं माझा प्रामाणिकपणा आड आला होता. पण इथं मात्र हे पैसे घेताना ,मात्र मला असं काही फील होत नव्हतं याचंच आश्चर्य वाटायला लागलं.

" मी तुम्हांला सावध केलं," मी म्हणालो, " तुम्ही, तुमची सावत्र मुलगी आणि मी आपण तिघेही अडकून पडू."

" किती वेळा तुम्हांला सांगू की यात पोलीस येणार नाहीत म्हणून ?" आता तिचा पारा चढला होता. " मी तुमच्यावर अवलंबून राहू की नको ?"

" तुम्ही ढोबळमानाने मला कल्पना दिलीय. मला विस्ताराने सांगा सगळं काय ते. तरच मी याबाबत निर्णय घेऊ शकेन. "

" प्रिया नाहीशी होईल. तुम्ही माझ्या नवऱ्याला फोन कराल. " ती संतापाने बोलत होती. " तुम्ही त्याला सांगाल की तिचं अपहरण झालंय. ती सुखरूप परत येण्यासाठी तुम्हांला दोन कोटी द्यावे लागतील. जर रक्कम नाही दिली तर प्रिया त्याला परत कधीच दिसणार नाही. याबाबत तुम्हाला त्याची खात्री पटवून द्यावी लागेल. याबाबत मी तुमच्यावर अवलंबून आहे. "

" तुमचा नवरा सहजपणे घाबरतो का ? " मी विचारलं.

" त्याचं त्याच्या मुलीवर खूप प्रेम आहे. " तिनं शांतपणे सांगितलं. " त्यामुळं अशा परिस्थितीत तो घाबरेल."

" त्या नंतर मी काय करायचं ?" मी विचारलं.

" त्याने पैसे कसे द्यायचे हे तुम्ही ठरवायचं. पैसे घायचे. तुमचा हिस्सा काढून उरलेले पैसे मला द्यायचे."

" आणि अर्थातच तुमच्या सावत्र मुलीला द्यायचे. "

ती थोडा वेळ थांबली आणि मग बोलली," हो अर्थातच. "

" हे ऐकायला खूपच सोपं वाटतंय. पण एक अडचण अशी आहे की तुम्ही जितकं समजता, तितकं तुमच्या नवऱ्याला ओळखत नसाल. कदाचित तो इतक्या सहजासहजी घाबरणार नाही. कदाचित तो पोलिसांना फोन करेल, बोलावेल. ज्या माणसान इतकी संपत्ती मिळवलीय, त्याच्याकडे काहीतरी सेन्स असणारच. तुम्हांला कळतंय मी काय म्हणतोय ते ?"

" तुम्हांला सांगितलं ना मी माझ्या नवऱ्याला सांभाळू शकते म्हणून ?" तिनं तिची सिगारेट झाडली. त्यामुळे राख खाली पडल्यामुळं सिगारेटचं थोटूक लाल दिसायला लागलं आणि अंधारात त्यामुळे तिचा चेहरादेखील लाल दिसायला लागला.

" तो आजारी आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी कदाचित हे शक्य झालं नसतं. पण आता तो इतका अशक्त झालाय की त्याच्या जवळची प्रिय व्यक्ती संकटात सापडलेली पाहायची सहनशक्ती त्याच्यात उरलेली नाही. "

" याबाबतीत माझ्या पेक्षा तुम्हांलाच जास्त माहिती असावी. " मी म्हणालो.

पुन्हा काही वेळ शांतता पसरली.

" मग ? तुम्ही हे काम करणार आहात की नाही ?"

मी पुन्हा मला मिळणाऱ्या पंचवीस लाखांचा विचार केला. हे काम इतकं सोपं नव्हतं. पण थोडं विचारपूर्वक योजना आखून केलं तर यश मिळण्याची शक्यता होती.

" मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवाय. मी तुम्हांला उद्या माझा निर्णय सांगेन. "

ती उठून उभी राहिली. तिच्याजवळ असलेल्या बॅगमधून तिनं नोटांचं छोटं बंडल काढलं आणि आमच्यामध्ये असलेल्या टेबलवर टाकलं.

" हे या केबीनचं भाडं आणि तुम्ही केलेल्या इतर खर्चासाठी ! मी तुम्हांला उद्या फोन करेन. "

नंतर जशी ती अंधारातून आली होती, तशीच एखाद्या भुताप्रमाणं अचानकपणे निघून गेली.

तिनं टेबलवर टाकलेले पैसे मी उचलले. पाचशेच्या नोटांचं बंडल होतं ते. त्यावेळी रात्रीचे दहा वाजून दहा मिनिटे झाली होती. मी तिथल्या चंद्रप्रकाशात बसून समुद्राकडे बघत तिच्या ऑफरवर विचार करायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक बाजूने मी विचार करायला सुरुवात केली. विशेषतः त्यामध्ये असलेल्या धोक्यांबद्दल !

साधारणपणे बारा वाजून गेल्यावर मी माझा निर्णय घेतला. निर्णय घेणं इतकं सोपं नव्हतं. पण मी मला मिळणाऱ्या पैशांनी मोहित झालो होतो. त्या पैशांनी मी आणि वीणा एक नवं आयुष्य सुरु करू शकत होतो. शेवटी माझ्या अटींवर आणि फक्त माझ्या अटींवर मी ते काम करायचं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी, मी लवकर केबिनकडे गेलो. आणि त्याचा मालक -जयराम उसगावकरला अजून काही दिवस केबिन हवी असल्याचं सांगितलं आणि दोन दिवसांचं भाडं दिलं.

मी सकाळी अकरा वाजेपर्यंत केबिनबाहेरच ऊन खात बसलो. बरोबर अकरा वाजता फोनची रिंग वाजली. मी रिसिव्हर उचलला.

" हरीश बोलतोय " मी म्हणालो.

" काय ठरलं ? हो की नाही ? "

" हो. " मी म्हणालो. " पण माझ्या काही अटी आहेत. मला तुमच्याशी आणि दुसऱ्या पार्टीशी बोलायचं आहे. तुम्ही तिला घेऊन आज रात्री इथं या. " आणि ती काही बोलण्या आधीच मी रिसिव्हर ठेवून दिला. मला तिला दाखवून द्यायचं होतं की बाजी आता तिच्याकडून सटकून माझ्या हातात आली आहे आणि इथून पुढेदेखील माझ्याकडेच राहणार आहे.

फोनची रिंग पुन्हा वाजायला लागली. पण मी रिसिव्हर उचलला नाही. मी सरळ केबिनच्या बाहेर पडलो आणि दार लावून घेतलं. पाठीमागे रिंग वाजतच राहिली.

---------------------------


सहा वाजता परत मी केबिनकडं परतलो. दरम्यानच्या काळात घरात राहून मी काही वस्तू गोळा केल्या. वीणा कुठंतरी बाहेर गेली होती, जे माझ्या दृष्टीनं चांगलंच होतं. मी गोळा केलेल्या वस्तू - ज्यामध्ये एक वायर, एक टूल किट आणि टेपरेकॉर्डर - हे सगळं कशाला असं तिनं विचारलं असतं आणि तिला ते सांगावं लागलं असतं.

आदल्या दिवशीची रात्र मी संपूर्ण रिना फर्नांडिसच्या योजनेवर विचार करण्यात घालवली. तिचा प्लॅन फसून चालणार नव्हतं. मला लवकरच समजून चुकलं की उद्या जर काही विघ्न निर्माण झालं तर या दोघी मायलेकींनी मला एकट्याला पुढं करून आपण नामनिराळं राहू नये- हे माझ्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं गरजेचं होतं. त्या रात्री मी आमच्यातील संभाषण त्यांच्या नकळत रेकॉर्ड करायचं ठरवलं. कारण उद्या जर फर्नांडिसनं पोलिसांना बोलावलं आणि तशी शक्यता दाट होती-तर या दोघी नामनिराळं राहू शकल्या नसत्या.

जेव्हा मी केबिनमध्ये पोहोचलो, तेव्हा बाहेरील खोलीला लागून असलेल्या बेडरूममधील एका कपाटात ठेवला. रेकॉर्ड कोणत्याही आवाजाशिवाय होत होतं. पण जर मी बाहेरच्या खोलीत ते रेकॉर्डर ठेवला असता,तर सुरु होताना आवाज ऐकू जाण्याची शक्यता होती. मी बेडरूममधील कपाटाला एक छोटंसं होल करून त्यातून वायर बाहेर काढली आणि टू-वे अडॅप्टर मध्ये अडकवली जो में स्विचने ऑपरेट व्हायचा. मी खात्री करून घेतली की रूममध्ये एंट्री केल्यावर लाईट सुरु करताच बेडरूममधील टेप देखील सुरु होतोय, तेव्हा मला समाधान वाटलं.

काही वेळ मी मायक्रोफोन कुठं लपवायचा यावर विचार करण्यात घालवला. शेवटी खोलीतील एका कोपऱ्यात असलेलं टेबल यासाठी मला सोयीचं वाटलं.

सात वाजण्याच्या सुमारास मी संभाषण रेकॉर्ड करण्याची एक ट्रायल घेतली. हे बघून मला खूपच समाधान वाटलं की खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यातून बोललेला माझा आवाज टेप अगदी व्यवस्थित रेकॉर्ड करत होता.

फक्त दोन अडचणींची शक्यता होती. एक म्हणजे दोघी केबिनमध्ये आल्याच नाहीत तर ? आणि दुसरी म्हणजे त्यांनी लाईट लावूच दिला नाही तर ? नंतर मी विचार केला की मी त्यांची समजूत काढेन की रात्रीच्या वेळी कुणी किनाऱ्यावर सहज म्ह्णून फिरायला आलं आणि आपण बाहेर बसलो आणि त्यांनी पाहिलं तर ? त्यापेक्षा आत बसणं कधीही सुरक्षित. दुसरं त्यांनी लाईट बंद करायला लावला तर लाईटचा स्विच बंद करताना मी टेपच बटन ऑन करेन.

बीचवर अजूनही लोक होते. पण त्यातील बरेच लोक आता परतीच्या मार्गाला लागले होते. आणखी तासाभरात किनारा पूर्ण एकाकी झाला असता.

मी माझी टूल्स गोळा करीत होतो तेवढ्यात दारावर टकटक झाली. मी माझ्या कामात इतका गुंग होऊन गेलो होतो की क्षणभर पुतळ्यासारखा स्तब्धच होऊन दाराकडे पाहत राहिलो. नंतर भानावर येताच मी टूल किट गाडीखाली सरकवलं आणि दार उघडलं.

जयराम उसगावकर दारात उभा होता.

" माफ करा मि. हरीश," तो म्हणाला. " तुम्हांला त्रास द्यायचा नव्हता पण एवढंच विचारायचं होतं की तुम्हांला उद्या पण ही केबिन लागणार आहे का ?"

" मला अजून एक आठवड्यासाठी केबिन लागेल जयराम " मी म्हणालो, " मी काही आर्टिकलवर काम करतोय आणि त्यासाठी ही जागा छान आहे. आपण आठवड्याच्या शेवटी काय असेल तो हिशोब करू. चालेल ?"

" नक्कीच मि. हरीश. आता एक आठवडा तुम्ही या केबिनचे मालक. " तो आनंदाने निघून गेला. तो गेल्यावर मी गादीखाली सरकवलेलं टूल किट काढलं, त्याला कुलूप लावलं आणि माझ्या गाडीकडे गेलो. माझा लगेच घरी जायचा मूड नसल्याने मी तिथून एक दोन किलोमीटरवर असलेल्या सी फूड रेस्टोरंट मध्ये -जिथं फिश फूड मस्त बनायचं - माझं डिनर केलं. तेव्हा रात्रीचे आठ वाजून चाळीस मिनिटं झाली होती.

अंधार खूप झाला होता.

मी पुन्हा केबिनकडे परतलो. किनारा आता सुनसान झाला होता. मी लाईट लावण्याचं जाणीवपूर्वक टाळलं. (माझ्या मोहिमेचा तो अत्यंत महत्वाचा भाग होता.) आतमध्ये मी एअरकण्डिशनर चालू ठेवला होता, कारण बाहेर खूप उकाडा होता. त्या दोघी जेव्हा पण आत येतील, तेव्हा त्यांना एकदम थंडगार वाटणं गरजेचं होतं. मी बाहेर येऊन खुर्चीत बसलो.

मी खूप टेन्शनमध्ये होतो. रिया पुन्हा उशीर करते की काय ? आणि तिची ती सावत्र मुलगी .... ती कशी असणार होती कुणास ठाऊक ?

माझ्या बोलण्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतील ? माझ्या योजनेप्रमाणे वागणं त्या पसंत करतील काय ?

नऊ वाजायला काही मिनिटे बाकी असताना मला हालचाल जाणवली. मी माझ्या डाव्या बाजूला पाहिलं तर रिया व्हरांड्यापासून तीन पावलांवर उभी होती.... एकटीच.

मी उठून उभा राहिलो.

" गुड इव्हिनिंग मि.हरीश" खुर्चीकडे जात ती म्हणाली.

" आपण आत जाऊया." मी म्हणालो," आत्ताच इथून कुणीतरी गेलं. आपण एकत्र दिसणं बरोबर नाही." मी केबीनचं दार उघडलं आणि लाईट लावला. " तुमची सावत्र मुलगी कुठं आहे ?"

ती माझ्यामागून चालत आत आली आणि मी दार लावून घेतलं. " ती येईलच इतक्यात." ती बेफिकिरीनं म्हणाली व तिथल्या एका रिकाम्या खुर्चीत बसली. तिनं निळसर रंगाचा स्लीव्हलेस पोशाख घातला होता. तिचे नाजूक पाय खूप आकर्षक वाटत होते. तिनं उंच टाचांचे सॅन्डल घातले होते. डोक्यावर घेतलेला स्कार्फ तिनं काढला आणि आपले केस मोकळे सोडले. डोळ्यांवर तिनं अजूनही ग्रीन कलरचा गॉगल घातला होता तो काढला नव्हता.

" जो पर्यंत मी तिच्याशी बोलत नाही, तोपर्यंत मी हे काम स्वीकारू शकत नाही." मी म्हणालो, " माझी खात्री व्हायला हवी की तिला या अपहरणाबद्दल सगळं माहित आहे आणि हे सर्व करायला ती तयार आहे. "

तिनं माझ्याकडं डोळे रोखून पाहिलं.

" अर्थातच ती तयार आहे." ती ओरडली, " तुम्हांला काय म्हणायचंय ?"

" मला हे तिच्या तोंडून ऐकायला आवडेल." मी शांतपणे म्हणालो आणि खुर्चीवर बसलो. नंतर मला हवे असलेले सर्व मुद्दे रेकॉर्डिंगमध्ये यावेत म्हणून मी विस्तारपूर्वक बोलायला सुरु केलं. " माझी मागणी अगदीच गैरवाजवी नाहीय. तुम्हीच सांगा, तुम्ही आणि तुमच्या मुलीने मिळून एक खोट्या अपहरणाची योजना आखलीय, ज्यात तुमच्या सावत्र मुलीचं अपहरण होणार. तुम्हा दोघींना दोन कोटी रुपयांची तातडीची गरज आहे आणि ही रक्कम तुमच्या नवऱ्याकडून मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे - अपहरण. जर मी तुम्हांला मदत केली तर त्यातील पंचवीस लाख तुम्ही मला देणार. आता अपहरण हा एक गंभीर गुन्हा आहे. त्यामुळं मला नक्की कळलं पाहिजे की तुमची सावत्र मुलगी जे काही करतेय, त्याची तिला पूर्ण कल्पना आहे."

रिया पटकन म्हणाली, " नक्कीच तिला माहितीय ती काय करतेय ते.... ती काही कुक्कुलं बाळ नाही. "

" आणि तुम्हांला याची देखील खात्री आहे की तुमचा नवरा पोलिसांना बोलवणार नाही ?" मी म्हणालो.

तिचा संताप आता अनावर झाला. ती खुर्चीवर हात आपटत म्हणाली," टाईमपास करायला तुम्हांला पहिल्यापासून आवडतं वाटतं ? आपण या गोष्टींवर पूर्वीच बोललोय असं नाही वाटत तुम्हांला ?"

मला आता समाधान वाटलं. आमच्या या छोट्याशा संभाषणातून मला जे काही हवं होतं, ते टेपवर रेकॉर्ड झालं होतं. आता उद्या जरी मी पकडला गेलो, तरी रिया मला एकट्याला जबाबदार ठरवू शकणार नव्हती.

मी घड्याळाकडे पाहिलं. साडेनऊ वाजून गेले होते. " तुमची मुलगी आल्याशिवाय मी पुढं पाऊल टाकणार नाहीय. " मी म्हणालो.

" मी तिला यायला सांगितलंय." ती म्हणाली. " पण ती लहरी स्वभावाची आहे. बोलल्याप्रमाणे क्वचितच वागते आणि मी तिला इथं हाताला धरून खेचून तर आणू शकत नाही ना ?"

मला बाहेर कुणाची तरी चाहूल लागली.

" कदाचित ती आली असेल. मी बघतो." मी म्हणालो.

मी दाराजवळ गेलो आणि दार उघडलं.

माझ्याकडं पाहत पायऱ्यांशी एक मुलगी उभी होती. खूप वेळ आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. नंतर " हॅलो" म्हणत तिनंच सुरुवात केली.

प्रिया फर्नांडिस एक वयात आलेली मुलगी होती. तिनं पिसांसारखा हलका पांढऱ्या रंगाचा टॉप आणि चित्त्याच्या कातडीसारख्या रंगाची टाईट जीन्स घातली होती. तिच्या कपड्यातून तिचं प्रमाणबद्ध शरीर उठून दिसत होतं. तिचे केस माझ्या वीणा सारखे काळे होते, जे तिने मोकळे सोडले होते. तिचा चेहरा बदामाच्या आकाराचा होता. तिचं वय सोळा ते पंचवीसच्या दरम्यान असावं. तिचे डोळे राखाडी रंगाचे होते. तिचं नाक चपटं आणि छोटं होतं.तिचे ओठ कुठल्याशा लिपस्टिकने माखले होते. एका वाहवत गेलेल्या मुलीचं प्रतीक होती ती ! अशा टिपिकल मुली तुम्हांला कुठंही तरुण तरुणींच्या घोळक्यात दिसतील. उर्मट, बंडखोर, निराश, तारुण्याचा पुरेपूर उपभोग घेतलेल्या तरुणींपैकी एक होती ती.

" मिस फर्नांडिस ?"

ती हसली आणि सावकाश पायऱ्या चढून वर आली.

" तू नक्कीच अलिबाबा असणार. चोर कसे आहेत ?"

" प्रिया आत ये" रिया आतूनच ओरडली, " आणि तुझे फालतू जोक्स तुझ्या फालतू मित्रांसाठी राखून ठेव"

तिनं तिरस्कारानं नाक मुरडलं, माझ्याकडे पाहून डोळा मारला आणि माझ्या समोरून आत केबिनमध्ये गेली. चालताना तिनं मुद्दाम आपल्या हालचालीत मादकता आणली होती, अगदी रॅम्प वर चालताना आणतात तशी. मी पण आत आलो आणि दार लावून घेतलं.

माझ्या मनात रेकॉर्डिंगचा विचार आला. कॅसेट ४० मिनिट चालणार होती. तेवढ्या वेळात सगळं संभाषण रेकॉर्ड होणं गरजेचं होतं.

" हॅलो डियर रिया " प्रिया म्हणाली. तिनं बसण्यासाठी माझ्या जवळची खुर्ची निवडली. " किती हँडसम आहे ना हा ?"

" शट अप प्रिया. तोंड बंद ठेव आणि मि. हरीश जे काही सांगतील ते नीट ऐक."

प्रियानं माझ्याकडं पाहिलं, पापण्यांची उघडझाप केली आणि लहानमुलांसारखं तोंडावर बोट ठेवून बसली आणि म्हणाली " हं. सुरु करा "

मी सरळ तिच्या डोळ्यांत पाहिलं. तिच्या पोझमुळं मला हसू नाही आलं. उलट दुःखाची झलक दिसली. तिचे डोळे फारच बोलके होते.

" मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे," मी म्हणालो " की तू नकली अपहरणाचा भाग आहेस."

तिनं आधी रीनाकडे नंतर माझ्याकडं पाहिलं. " अर्थातच. मी आणि माझी लाडकी स्टेप मॉम रीनानं ही योजना आखलीय. मस्त आहे ना ?"

" खरंच ?" मी तिच्याकडं पाहत म्हटलं, " पण तुझे वडील असा विचार करणार नाहीत."

" त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही." रिना तावातावाने ओरडली. " आता तुमचं समाधान झालं असेल तर आपण पुढची चर्चा करूया."

" ठीकाय. " मी म्हणालो. " अपहरण कधी होणार ?"

" ते लवकरच ठरवलं जाईल. कदाचित परवा." रिया म्हणाली.

"मिस प्रिया नाहीशी होईल - पण ती कुठं जाणार आहे ?"

" मला फक्त प्रिया म्हणा. " ती मुलगी म्हणाली. बोलताना ती जाणीव पूर्वक माझ्या कडे झुकली. " माझे सर्व मित्र मला असेच बोलवतात."

तिच्याकडं दुर्लक्ष करत रिया म्हणाली," वास्को ला एक हॉटेल आहे. प्रिया तिथं दोन-तीन दिवस राहील."

" आणि तिथं ती कशी जाणार आहे ?" मी विचारलं.

" तिच्याजवळ कार आहे."

" खूप सुंदर कार आहे. " प्रिया माझ्याकडे पाहत म्हणाली. " काय स्पीड आहे तिचा ! वाऱ्याच्या वेगानं धावते.... "

" मग चालणार नाही. कुणाच्या ही नजरेत अशी कार पटकन येईल. " मी म्हणालो. " आणि इथं राहणारे बहुतेक लोक तुम्हांला ओळखत असतील."

तिनं आश्चर्यानं माझ्याकडं पाहिलं. " बरोबर आहे तुम्ही म्हणता ते." मी रिनाकडं पाहिलं.

" तुमच्या कल्पनेनुसार अपहरणाची बातमी फक्त तुमच्या, तुमच्या सावत्र मुलीच्या आणि तुमच्या नवऱ्यापुरतीच मर्यादित राहणार आहे ना ? "

रिनाने गोंधळून माझ्याकडं पाहिलं.

" हो. अर्थातच. "

" नाहीसं होणं तुमच्यासाठी इतकं सोपं आहे ?" मी प्रियाकडं पाहत विचारलं.

" तुमचे कुणी मित्र नाहीत?" आणि नोकरांचं काय?"

तिनं खांदे उडवले.

" मी नेहमीच बाहेर जात असते."

मी रिनाकडं पाहिलं.

" मी जर तुमच्या नवऱ्याच्या जागी असतो आणि मला जर कुणी फोनवरून सांगितलं असतं की तुमच्या मुलीचं अपहरण करण्यात आलंय आणि ती सुखरूप हवी असेल तर दोन कोटी रुपये दयावे लागतील, तर मी पैसे देण्याची अजिबात घाई केली नसती. उलट मी पोलिसांना बोलावलं असतं."

" हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्याला फोनवरून कसं पटवून देता." रिया म्हणाली, " मी यासाठीच तर तुम्हांला पैसे देतेय."

" ते माझ्यावर सोपवा." मी म्हणालो, " पण समजा त्यानं पोलिसांना बोलावलं तर ? तुम्ही काय करणार आहात? त्याला सांगणार की ही सर्व केवळ थट्टा होती म्हणून ? थोडीशी गंम्मत करायची होती .... "

" मी तुम्हांला सांगितलंय... " रिया संतापाने ओरडली.

" मला ठाऊक आहे तुम्ही सांगितलंय ते " मी तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणालो, " पण माझा तुमच्यावर विश्वास नाही. जर पोलीस यामध्ये आले तर तुम्ही काय करणार आहात? हे थांबवणार कि पुढे चालू ठेवणार आहात ?"

" आपण पुढे चालू ठेवू " प्रिया म्हणाली," आम्हांला पैसे हवेत. काही झालं तरी."

तिच्या आवाजात धार होती. मी तिच्याकडं आश्चर्यानं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा थंडपणा होता. आणि ती माझ्याकडे नाही तर तिच्या सावत्र आईकडे-रिनाकडे पाहत होती.

" प्रिया म्हणते ते बरोबर आहे.आम्हांला पैसा हवाच आहे. पण हे पण सांगते अगदी शंभराव्या वेळेला की पोलीस यात येणार नाहीत. " रिया म्हणाली.

" असं घडलं तर आपल्यासाठी ते चांगलंच असेल." मी म्हणालो. " ठीकाय. आपण असं गृहीत धरू की तुमचा नवरा ते पैसे देईल. पण जेव्हा त्याची मुलगी परत येईल, तेव्हा तो पोलिसांना नक्कीच सांगेल आणि ते चौकशीला सुरुवात करतील. ज्या माणसानं इतका पैसा कमावलाय, तो इतका मूर्ख नक्कीच असणार नाही. तुम्हांला कसं कळणार की त्यानं नोटांवर खुणा केलेल्या नाहीत ? आणि असं असेल तर त्या पैशाचा काय उपयोग जो वापरताच येणार नाही ?"

" तो असं काही करणार नाही याची मी काळजी घेईन. याबाबतीत आपल्याला काळजी करायची गरज नाही."

" खरंच ? मलाही तुमच्यासारखं निश्चिन्त व्हायला आवडेल." मी म्हणालो.

" माझा नवरा आजारी आहे." रीनाचा आवाज थंड आणि कठोर होता. " मी त्याला जे सांगेन , तेच तो करतो."

तिचं ते बोलणं ऐकून एक थंड शिरशिरी माझ्या शरीरातून सरकत गेली. मी प्रियाकडं पाहिलं तर ती सुद्धा आता एक परिपक्व स्त्री वाटायला लागली होती... अगदी तिच्या सावत्र आई-रिनासारखीच.

" मी असं समजून चाललोय की तुमचा नवरा पोलिसांना बोलावेल." मी म्हणालो. " मी बनवलेली योजना तुमच्यासमोर मांडतो. तुम्हांला पसंत नाही पडली तर मी यातून बाहेर पडेन."

दोघी पण माझं बोलणं ऐकतायेत हे पाहून मी पुढं बोलायला सुरुवात केली.

" आज मंगळवार आहे. आपण शनिवारी सुरुवात करू. शनिवारी तू मैत्रिणीसोबत मुव्हीला जायचा बेत ठरव.... जमेल तुला ?" मी प्रियाकडं पाहत विचारलं.

तिनं आश्चर्यानं पाहत होकारार्थी मान हलवली.

" डिनर तू घरीच करायचं आणि तुझ्या वडिलांना तू कुठं जाणार आहेस ते सांगायचं. बाहेर पडताना तू असा ड्रेस घाल की ज्यामुळं तुझ्याकडं इतरांचं झटकन लक्ष जाईल. तू तुझ्या मैत्रिणीला रात्री आठ वाजता भेटू असं सांग. पण तू तिला भेटायचं नाहीस. तू सरळ 'टॉप-इन-टाऊन' क्लबमध्ये जाशील. इथून साधारण दोन किलोमीटर वर असलेला तो एक बार-कम-क्लब आहे. तुला कदाचित माहित असेल."

प्रियानं होकारार्थी मान हलवली.

" पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करून तू सरळ आतमध्ये एखादं ड्रिंक घेण्यासाठी आत जा. त्यावेळी तिथं गर्दी असेल. तुझे मित्र इथं येण्याची काही शक्यता नाही ना ?"

" नो वे " प्रिया म्हणाली," माझे मित्र अशा ठिकाणी जात नाहीत."

"छान. म्हणूनच मी ती जागा निवडलीय. तिथल्या लोकांचं तुझ्याकडं लक्ष जाईल असं काहीतरी तुला करावं लागेल. त्यानंतर काही वेळाने तू तिथून बाहेर पड. तिथं तू कुणासोबत अडकून राहणार नाहीस याची काळजी घे. बाहेर पार्किंग लॉटमध्ये माझी गाडी उभी असेल. कुणी पाहत नाही याची खात्री करून तू माझ्या गाडीत बस. इथं तुझ्यासाठी एक ड्रेस आणि लाल केसांचा विग ठेवलेला असेल. तो तू घाल. तू कपडे बदलेपर्यंत मी माझी गाडी शहरातील एका मोठ्या पार्किंग लॉट कडे नेईन. माझ्या गाडीतून तू माझ्या मागोमाग ये. मी तुझी गाडी तिथल्या पार्किंगलॉट मध्ये सोडेन. आपल्याला पुन्हा तिची गरज लागेपर्यंत कुणाचंही लक्ष तुझ्या गाडीकडे जाणार नाही. त्यानंतर तू आणि मी माझ्या गाडीतून एअरपोर्टवर जाऊ. तिथं मी तुझ्यासाठी मुंबईचं तिकीट बुक केलेलं असेल. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये मी तुझं बुकिंग केलेलं असेल. तू तिथं जा आणि तिथल्या मॅनेजरला तुझी तब्येत बरी नसल्याचं सांग. तुझं जेवण, नाश्ता आणि इतर गरजेचं सामान तुझ्या रूम वरच मागव. जो पर्यंत मी तुला परत बोलावत नाही, तोपर्यंत तू या पद्धतीने तिथं राहायचंस. मी तुझ्याशी फोनवरून संपर्कात राहीन. इथं पर्यंत लक्षात आलं ?

तिनं होकार दिला. आता ती उत्सुकतेने माझं बोलणं ऐकत होती.

" या सगळ्याची काहीच आवश्यकता नाहीय. " रिया म्हणाली," ती इथल्याच लोकल हॉटेलमध्ये राहिली.... "

" तुम्हांला हे पैसे हवेत की नकोत ? " मी तिचं बोलणं मधेच तोडत म्हणालो.

" मी तुम्हांला किती वेळा सांगू आम्हांला हा पैसा हवाय म्हणून, ते ही कोणत्याही परिस्थितीत ?"

" मग तुम्हांला तो माझ्या पद्धतीनेच मिळेल नाहीतर नाही. "

" मला वाटतं हरीश सांगतायेत ते बरोबर आहे, रीना. हरीश तुम्ही सांगाल तसंच मी करेन....मी तुला अरे तुरे केलं तर चालेल का ? " प्रियानं विचारलं.

" जोवर तू माझ्या सांगण्यानुसार वागणार आहेस तोवर तू कसं ही बोल. मला फरक पडत नाही." मी म्हणालो. नंतर मी रीनाकडे वळलो.

" ज्यावेळी प्रियाचं विमान टेक ऑफ करेल, तेव्हा मी तुमच्या नवऱ्याला फोन करेन.तो एक अब्जाधीश आहे. माझा त्याच्याशी डायरेक्ट संपर्क कसा होणार ? "

" त्याचा सेक्रेटरी फोन घेईल." रिया म्हणाली. " जेव्हा तुम्ही त्याला सांगाल की प्रियाविषयी तुम्हांला त्याच्याशी बोलायचंय, तेव्हा तो माझ्या नवऱ्याला तुमच्याशी बोलायचं आहे का असं विचारेल.तेव्हा मी तिथंच असेन. मी त्याला फोन घ्यायला सांगेन."

" तोपर्यंत उशीर झालेला असेल. तोपर्यंत प्रियाच्या मैत्रिणीचा फोन आलेला असेल की प्रिया कुठं गेलीय म्हणून " मी प्रियाकडं पाहिलं." तुला काय वाटतं ती फोन करेल ?"

" हो. नक्कीच करणार ती फोन. " प्रियानं तात्काळ उत्तर दिलं.

मला पण तेच अपेक्षित आहे.त्यामुळं मला हवी तशी परिस्थिती निर्माण होईल. मी फोन करेपर्यंत तू गायब असल्याचं कळायला हवंय."

" ती नक्की फोन करेल. " प्रिया ठामपणे म्हणाली.

" ठीकाय तर मग. मी दोन दिवसांत तुझ्या वडिलांना पैसे तयार ठेवायला सांगेन. तसंच पुढील सूचनेसाठी वाट पाहायला सांगेन." मी रिनाकडं पाहत म्हणालो.

" कोणत्याही प्रकारची चलाखी तुमचा नवरा करणार नाही याची खबरदारी तुम्ही घायची. जसं की पोलिसांना फोन करणं किंवा बँकेला नोटांचे नंबर्स नोट करायला सांगणं असलं काही तो करणार नाही हे तुम्ही पाहायचं. जर तुम्ही हे केलं नाही, तर मिळालेले पैसे तुम्ही वापरू शकणार नाही."

" मी त्याची काळजी घेईन." रिया म्हणाली.

" गुड. मी पहिला फोन केल्यावर दोन दिवसांनी दुसरा फोन करेन. तुमचा नवरा ते पैसे स्वतः घेऊन येऊ शकतो का ? "

तिनं होकारार्थी मान हलवली."तो स्वतः शिवाय दुसऱ्या कुणावरही अशा कामात विश्वास ठेवत नाही."

मी आश्चर्यानं तिच्याकडं पाहिलं. " तुमच्यावर पण नाही ?"

यावर प्रिया तोंडावर हात ठेवून हसायला लागली. रिनानं रागानं तिच्याकडं पाहिलं.

" नक्कीच त्याचा माझ्यावर विश्वास आहे. "रिया ओरडली. " पण यात धोका आहे असं त्याला वाटणार त्यामुळं तो मला त्याच्याबरोबर येऊ देणार नाही."

"ठीकाय." मी सिगारेट पेटवली. " मी त्याला पहाटे दोन वाजता घराबाहेर पडायला सांगेन आणि किनाऱ्याच्या बाजूने जाणाऱ्या रोडवर यायला सांगेन. तो रोल्स गाडी घेईल, ज्यामुळं त्याला ओळखणं मला सोपं जाईल. रोडवरच कुठंतरी त्याला बॅटरीचा लाईट दिसेल. तो लाईट क्रॉस केल्यावर तो पैशांची ब्रिफकेस खाली टाकेल आणि गाडी तशीच पुढं घेऊन जाईल. तो थांबणार नाही. तोपर्यंत प्रिया मुंबईहून परत आलेली असेल. ती इथं केबिनमध्ये माझी वाट पाहील. मी माझा हिस्सा घेऊन उरलेली रक्कम तिच्या हवाली करेन. नंतर त्या रकमेचं तुम्ही काय करता याच्याशी मला कर्तव्य नाही. पण तुम्ही सावध रहा."

" नाही. मला हे मान्य नाही. तुम्ही तो पैसा प्रियाला नाही, मला देणार आहात." रिया ओरडली.

आता प्रियादेखील तावातावानं उठली. " का नाही ? तो पैसा मला का नाही द्यायचा त्याने ?"

" पैशाच्या बाबतीत मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. " रिया म्हणाली. " हरीश माझ्याकडे पैसे देतील. "

" तुला काय वाटतं माझा तुझ्यावर विश्वास आहे?" प्रिया म्हणाली. आता तिचाही आवाज चढला होता." एकदा का रक्कम तुझ्या हातात आली की.... "

" ठीकय. ठीकय. भांडू नका." मी तिचं बोलणं मध्येच तोडलं. " आपण उगाच वेळ वाया घालवतोय. माझ्याकडं एक दुसरा मार्ग आहे. मी प्रियाच्या हॅन्डरायटिंगमध्ये पत्र लिहून ते तिच्या वडिलांना पाठवेन. यामुळं तिसऱ्यांदा फोन करायचा माझा त्रास वाचेल. या पत्रात त्यानं रक्कम कशी द्यायची आणि ती दिल्यावर प्रिया कुठं भेटेल याचा उल्लेख असेल. त्यात त्यानं पैसे दिल्यावर प्रियाची गाडी जिथं पार्क केलीय तिथं यायला सांगितलेलं असेल. तो तिथं पोचायला अर्धा तास जाईल. इतक्या वेळात तुम्ही दोघी इथं येऊन तुमचा हिस्सा घेऊ शकता. ओके ? "

" पण तिथं पोचल्यावर त्यांना मी तिथं नाही दिसले तर ? तर ते पोलिसांना फोन करतील." प्रिया म्हणाली.

त्या दोघी केबिनमध्ये आल्यापासून पहिल्यांदा कुणीतरी शहाणपणाची गोष्ट केली होती. " तुझं म्हणणं बरोबर आहे. मग आपण असं करू की पार्किंग लॉट मध्ये त्याला प्रिया कुठं असेल हे सांगणारी चिट्ठी मिळेल असं पहिल्या चिठ्ठीत लिहू. तू घरी परतली आहेस असं त्या चिठ्ठीत लिहू. चालेल ?" मी विचारलं.

रिया माझ्याकडं आ वासून पहायला लागली. " आणि पैशांच्या बाबतीत आम्हांला सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून रहावं लागणार. " मी तिच्याकडं पाहून हसलो. " जर याबाबतीत तुमचा माझ्यावर विश्वास नसेल, तर तुम्ही मला निवडायला नको होतं. यापेक्षा चांगली योजना तुमच्याकडं असेल तर सांगा मला." त्या दोघीनी एकमेकींकडं पाहिलं.

" ठीकाय. तुम्ही घ्या पैसे. तोपर्यंत मी इथं येईन. माझ्याकडं यापेक्षा दुसरा प्लॅन नाही." रिया म्हणाली.

" व्वा. म्हणजे तिचा तुझ्यावर विश्वास आहे, पण माझ्यावर नाही. काय प्रेमळ सावत्र आई आहे !" प्रिया फणकाऱ्यानं म्हणाली.

" तिला विश्वास ठेवावा लागेल. आता तू मला सांग, तू तुझ्या मैत्रिणीला टॉकीजमध्ये का भेटली नाहीस? तू त्या बार अँड क्लबमध्ये कशाला गेलीस? तुला कुणी किडनॅप केलं? "

प्रिया मुर्खासारखी माझ्याकडं बघायला लागली.

" मला काय माहित? तुझा प्लॅन आहे. तू सांग." प्रिया मला म्हणाली.

" तुला नाही वाटत की या प्रश्नांची तूच चांगली उत्तरं देऊ शकशील? तूच म्हणतेस की एकदा का तू घरी परत आलीस तुझे वडील तुला प्रश्न विचारतील, पोलिसांना बोलावतील. आणि हे पोलीस पक्के प्रोफेशनल असतात. एकदा का त्यांच्या लक्षात आलं कि तू खोटं बोलत आहेस तर ते तुझ्याकडून खरं काय ते काढल्याशिवाय राहणार नाहीत."

आता तिचा सगळा उत्साह मावळला आणि बैचेन होऊन तिनं रिनाकडं पाहिलं.

" पण मला पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार नाहीत असं रीनाच म्हणाली."

" खरंय ते. " रिया म्हणाली.

" तुम्हां दोघींना जरा जास्तच खात्री दिसतेय पोलिसांबाबत." मी म्हणालो, " पण मला नाही."

" माझ्या नवऱ्याला बॅड पब्लिसिटीची खूप भीती वाटते." रिया म्हणाली," हे सगळं पेपरमधून जगाला कळण्यापेक्षा पैसे गेलेले परवडले असं त्याला वाटेल."

" माफ करा. पण मी आश्वस्थ नाही. जर पोलीस यामध्ये पडले तर तुम्ही देत असलेल्या मोबदल्याचा मला काही मोल वाटणार नाही." मी म्हणालो. " जर पोलीस यामध्ये आले तर तिच्याकडे तिची स्टोरी तयार असायलाच हवी. मी तिच्यासाठी तयार करेन." नंतर मी प्रियाकडं वळलो. " तू उद्या रात्री इथं येशील ? म्हणजे मी तुला या साठी तयार करेन. जर तुला पैसे हवे असतील तर बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील."

" त्याची काही गरज नाहीय. " रिया म्हणाली. " मी कितीवेळा सांगितलंय, माझा नवरा पोलिसांना बोलवणार नाही म्हणून. "

" आणि मी देखील तुम्हांला सांगितलंय की हे काम मी माझ्या पद्धतीने, माझ्या अटींवर करेन म्हणून. एक तर माझ्या अटींनुसार वागा नाहीतर हे काम मी सोडतो."

" मी उद्या नऊ वाजता इथं येईन." प्रिया माझ्याकडं पाहून हसत म्हणाली. " ठरलं तर मग. " मी उठून उभा राहत म्हणालो, " आणखी एक गोष्ट. तुम्ही तिच्यासाठी एक ड्रेस विकत घ्या. स्वस्तातला ड्रेस असावा, कॉलेजला जाताना सर्वसाधारण मुली जसे ड्रेस घालतात, तसा . त्याच बरोबर एक लाल केसांचा विग पण घ्या. विग घेताना काळजी घ्या तो इथं घेऊ नका. दुसऱ्या शहरात जाऊन घ्या. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ती टॉप इन टाउन मधून गायब होणार आहे. ती तिथं दिसेल. बाहेर पडताना दिसेल. पण त्यानंतर ती नाहीशी होईल. पुन्हा परत येई पर्यंत तिचा मागमूस देखील कुणाला लागता कामा नये."

रिया थरारली.

" जर तुम्हांला हे सर्व करणं गरजेचं वाटत असेल, तर मी ते करेन." रिया म्हणाली.

" प्रिया, तू उद्या येताना लाल केसांचा विग आणि ड्रेस घेऊन ये. तोपर्यंत मी तुझ्यासाठी पत्र आणि स्टोरी तयार ठेवेन. " मी दाराजवळ गेलो. बाहेर पाहिलं तर किनारा ओसाड पडला होता. " उद्या भेटू. " मी त्यांना म्हणल्यावर पहिल्यांदा रिया निघून गेली माझ्याकडं न पाहता. तिच्यामागून प्रिया गेली. जाताना ती माझ्याकडं पाहून हसली आणि डोळे मिचकावले.

मी त्या दोघीना अंधारातून जात असताना पाहत राहिलो. नंतर बेडरूममध्ये येऊन टेपरेकॉर्डर बंद केला.

-----------------------------------------------

प्रकरण ४ थे

दुसऱ्या दिवशी रात्री नऊ नंतर काही मिनिटांनी प्रिया केबिनच्या पायऱ्यांशी येऊन थांबली आणि माझ्याकडं पाहत राहिली. त्यावेळी आकाशात पूर्ण चन्द्र होता. त्यामुळं मी तिला पाहू शकलो. तिनं एक साधा सफेद रंगाचा ड्रेस घातला होता. बरोबर एक सुटकेस आणली होती. त्यावेळी ती खूपच सुंदर एट्रॅक्टीव्ह दिसत होती.

" हाय हरीश. आय एम हिअर."

मी पायऱ्या उतरून खाली गेलो आणि तिच्या हातातून सुटकेस घेतली. ती एकटी आल्यामुळं मी थोडासा अस्वस्थ झालो होतो.

" चल. आत जाऊ." मी तिला म्हणालो. " मिसेस फर्नांडिस नाही आल्या ?"

प्रियानं माझ्याकडं पाहिलं आणि हसली. " तिला बोलवलं होतंस ? एनी वे ती येणार नाहीय."

आम्ही एकत्रच आत गेलो. मी दार बंद केलं आणि लाईट चालू केली. त्याचवेळी बेडरूम मधला टेंपरेकॉर्डर देखील सुरु झाला. यावेळी मी त्यात नवीन कॅसेट टाकली होती.

प्रियाला जे काही शिकवायचं होतं त्यावर वर्कआऊट करण्यात माझा सगळा दिवस धावपळीत गेला होता. मी तिच्यासाठी पत्र तयार केलं होतं. मी टेप केलेली कॅसेट ऐकली आणि समाधान वाटलं की माझं रिनाचं आणि प्रियाचं संभाषण अगदी छान रेकॉर्ड झालं होतं. त्या कॅसेटचं पार्सल बनवलं आणि बँकेत लॉकर मध्ये ठेवलं.

आता मी टेन्शन फ्री झालो होतो. आणि माझ्या हिश्याची रक्कम घेण्यासाठी माझे हात आता शिवशिवत होते.

आता मला खात्री होती की जरी कुठं काही चुकलं तरी मी एकटा त्यात अडकला जाणार नव्हतो, त्या दोघी पण अडकणार होत्या. आणि ऍंथोनी फर्नांडिसने त्यांना कोणत्याही परिस्थितीत तुरुंगात जाऊ दिलं नसतं.

" सुरु करूया " खाली बसत मी म्हणालो. " खूप काही करायचं आहे आपल्याला आणि वेळ खूप कमी आहे."

ती खुर्चीकडे जाऊन बसेपर्यन्त मी तिला न्याहाळत होतो. ती जाणून बुजून असं चालत होती की काय कळलं नाही पण तिच्या चालीत मादकपणा भरला होता. बसल्यानंतर तिनं पाय पुढं सोडले आणि स्कर्ट सरळ केला. आणि माझ्याकडं उत्सुकतेनं पाहायला लागली. तिच्या त्या नजरेनं माझी बैचेनी वाढायला लागली. ती काय करतेय ते मला लक्षात येत होतं. मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न चालला होता तिचा.

" मला वाटलं रिया स्मार्ट आहे आणि आम्हांला मदत करण्यासाठी तिनं तुला जाळ्यात ओढलंय " प्रिया म्हणाली, " पण आता वाटतंय तू तिच्यापेक्षा स्मार्ट आहेस."

" तिनं मला जाळ्यात वैगेरे काही ओढलेलं नाही. तुला काय म्हणायचंय नेमकं ?"

" तिनं तेच केलंय खरं तर. कित्येक दिवसांपासून तुझ्या मागावर होती ती. जेव्हा तू तुरुंगातून बाहेर पडलास, तेव्हा तिनं तुला पकडलं. टेलिफोन बूथ मध्ये पैशांची बॅग ठेवण्याची आयडिया तिचीच. मी म्हणाले होते की तो पैसे घेणार नाही. आमची यावर पैज पण लागली होती. पण मी हरले."

मी तिच्याकडं अवाक होऊन पाहतच राहिलो.

" मी त्यावेळी प्यायलो होतो." मी म्हणालो.

तिनं व्हू केअर्स स्टाईलने खांदे उडवले.

" मला माहित आहे. तुला फक्त एवढंच सांगते, तिच्यापासून सावध रहा.ती अक्षरशः नागीण आहे. तिच्यावर विश्वास ठेवू नकोस." प्रिया म्हणाली.

" तुला हे पैसे कशासाठी हवेत ?" मी तिला विचारलं.

तिनं माझ्याकडं पाहून नाक मुरडलं. " तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आता मला सांग मी काय करायला हवंय? माझी स्टोरी तयार आहे का ?"

मी बराच वेळ प्रियाकडं सुन्न होऊन पाहत राहिलो. रिनानं मला प्लॅन करून अडकवलं होतं हे ऐकून मला धक्काच बसला होता. मी रिनावर पाळत ठेवायला हवी होती.

" तू शनिवारी मुव्हीचं फायनल केलंस का ?" मी प्रियाला विचारलं.

" होय. मी आणि माझी मैत्रीण श्वेता दोघी मिळून मुव्हीला जाणार आहोत. आम्ही नऊ वाजता बाहेर भेटायचं ठरलंय."

" तुझा असा कुणी मेल फ्रेंड आहे का ज्याच्याबरोबर तू नेहमी फिरायला जातेस ? अगदी रेग्युलर नाही. अधून मधून भेटणारा ?

ती थोडी गोंधळलेली वाटली.

" असे तर खूप आहेत."

" एक पुरे. नाव सांग."

" विकी परेरा "

" तुला तो घरी फोन करतो ?"

" हो."

" जेव्हा कुणी घरी कॉल करतं तेव्हा उत्तर कोण देतं ?"

" आमचा नोकर."

" तो विकीचा आवाज ओळखतो का ?"

" मला नाही वाटत. कारण विकीने फोन करून आता जवळ जवळ दोन तीन महिने झालेत."

" आता मी जे सांगतोय ते नीट ऐक: तू तुझ्या वडिलांना सांगशील की तू आणि तुझी मैत्रीण रात्री मुव्हीला जाणार आहात. रात्रीच्या जेवणानंतर मी पावणे नऊला कॉल करेन आणि तुझ्या बद्दल विचारेन. मी विकी बोलतोय असं तुमच्या नोकराला सांगेन. उद्या जर पोलीसांसमोर जावं लागलं तर त्याची तयारी मी करतोय. विकी म्हणून बोलताना मी सांगेन कि मी श्वेताला -तुझ्या मैत्रिणीला भेटलोय आणि आमचा टॉप इन टाऊन क्लब ला जायचा प्लॅन ठरलाय तू तिथं ये. तू थोडी आश्चर्यचकित होशील पण तयार होशील. तू कुठं चाललीयेस हे तुझ्या वडिलांना सांगू नकोस, कारण ते तुला अशा ठिकाणी जायला परवानगी देणार नाहीत. तू तिथं येशील. तुला कुणी ही तिथं भेटणार नाही. म्ह्णून तू तिथून बाहेर पडशील. अंधारातून पार्किंग क्रॉस करताना तुझ्यावर चादर टाकली जाईल. त्यात तुला गुंडाळून कारमध्ये टाकलं जाईल. इथं पर्यंत समजलं ?"

तिनं हो म्हटलं. " कमाल आहे. हे सगळं तू फारच सिरियसली घेतलं आहेस, नाही ?"

" हो. कारण हे तितकं गंभीर होऊ शकतं." मी म्हणालो.

" जर पोलीस यात आले तर ते आधी विकीला चेक करतील. तो शप्पथ घेऊन सांगेल की त्यानं कॉल नाही केला म्हणून. त्यांना कळेल की ही किडनॅपर्सची आयडिया होती की तुला टॉप इन टाऊन पर्यंत आणायचं. त्यांना आश्चर्य वाटेल की विकीचा आवाज तू कसा ओळखला नाहीस. तू सांगशील की लाईन क्लियर नव्हती आणि बॅकग्राऊंडला बाकी आवाज पण होते. आणि तो विकी नसेल अशी शंकासुद्धा मनात आली नाही. म्हणून तू टॉप इन टाऊन मध्ये गेलीस. ओके ?"

" तुला असं वाटतं की पोलीस यात येतील ?" प्रिया नखं कुरतडत म्हणाली.

" मला नाही माहित. तुझी सावत्र आई म्हणते की नाही येणार. पण मी तयारीत राहणार आहे. आता ऐक. पोलिसांना तू स्टोरी सांगायची आहेस ती अशी : तुझ्यावर चादर टाकून तुला गुंडाळून कारमध्ये टाकण्यात आलं आणि ज्यानं तुला घट्ट धरून ठेवलं होतं, त्यानं तुला मुंबई स्टाईलमध्ये बोलत ओरडलीस तर जीव घेईन अशी धमकी दिली. कारमध्ये तीन व्यक्ती असाव्यात असा तू अंदाज बांधलास. तिथं तुमचं झालेलं संभाषण मी लिहून काढलंय. ते तुला तोंडपाठ करावं लागेल. त्यानंतर पुढं तू सांगशील : कार खूप वळणं घेत होती. त्यामुळे तू में रोडवर नाहीस हे तुला कळलं. शेवटी दोन तासाचा प्रवास केल्यावर कार थांबली. तू कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकलास, फाटक उघडण्याचा आवाज ऐकलास. त्यानंतर कार पुढं गेली आणि थांबली.

हे सगळं तुला लक्षात ठेवावं लागेल. पोलीस यात आले तर ते सर्व तुला अगदी खोदून खोदून विचारतील. बऱ्याचवेळा त्यांनी किडनॅपर्सना- त्यांनी किडनॅप केलेल्या व्यक्तीने ऐकलेल्या कुत्र्याच्या आवाजावरून, विहिरीत सोडलेल्या बदलीच्या आवाजावरून पकडलंय. तेव्हा ते तुझ्या स्मरणशक्तीला अगदी कसून तपासतील. तुला या सगळ्यासाठी तयार रहावं लागेल."

ती हो म्हणताना तिचे डोळे अतिशय उत्सुक दिसत होते.

" आता मला कळलं की तू मला इथं का बोलावलंस. " ती म्हणाली. " जरी पोलीस यात आले नाहीत, तरी माझे वडील मला असे प्रश्न नक्की विचारतील. ते खूप धूर्त आहेत."

" बरोबर. तू किडनॅप केलेल्या ठिकाणी तीन दिवस आणि रात्री राहणार आहेस. पोलीस जर यात आले तर ते तुला त्या जागेचं वर्णन करायला सांगतील आणि न गोंधळता तुला ते करावे लागेल.तिथल्या मुक्कामाच्या दरम्यान तू कुत्र्याचा, कोंबड्यांचा, गाड्यांचा आवाज ऐकशील. त्यामुळे ते एक फार्म हाऊस असावं असा निष्कर्ष तू काढशील. तुझ्या किडनॅपर्सपैकी तू फक्त दोघांना पाहिलेलं असशील. एक पुरुष आणि एक स्त्री, जे तुझ्या संपर्कात होते. मी त्यांचं सगळं वर्णन लिहून ठेवलंय.ते तुला पाठ करावं लागेल. पोलीस यात पडले तर तू तुझ्या स्टोरीला चिकटून राहायला हवंस. त्यांच्या उलटसुलट प्रशांच्या जाळ्यात अडकता कामा नयेस."

प्रिया खूपच उत्सुकतेने ऐकत होती. " समजलं." ती म्हणाली. " ज्या खोलीत तू होतीस,तिथं अगदी बाहेरच्या बाजूस टॉयलेट असेल. हा एक अडचणीत टाकणारा प्रश्न ते विचारणारच. जेव्हा गरज वाटेल तेव्हा तिथं जायची तुला परवानगी होती, असं तू सांगशील. एक स्त्री तुला तिथं घेऊन जायची. तेव्हा घराचा काही भाग बघायला मिळाला असं तू सांगशील. फारसा नाही. एक पॅसेज त्यात एका बाजूला तीन बंद दारं आणि टॉयलेटमध्ये मोडलेल बेसिन आणि फ्लश साठी बटन नव्हतं. या डिटेल्समुळे तुझी स्टोरी भक्कम होईल. तीन दिवसात तुला कसं जेवण मिळत होतं ते पण मी लिहून ठेवलंय. ते देखील तू चांगलं डोक्यात ठेव.

तिनं ओठांवरून जीभ फिरवली.

" मला तर असं वाटतंय की माझं खरंच अपहरण होणाराय."

" तुला असंच वाटायला हवंय." मी तिला म्हणालो. " मी एक पत्र तयार केलंय, जे तुला लिहायचंय, जे तुझ्या वडिलांना मी पाठवणार आहे. तू आत्ताच ते लिहून काढ, ते बरं होईल."

मी उठलो आणि मी आणलेल्या ब्रिफकेसकडे गेलो. त्यातील हलक्या प्रतीच्या कागदांना, जे मी एका स्टोअर मधून घेतले होते, त्यांना हात लावण्यापूर्वी हातमोजे घातले.

ती टेबलाजवळ येऊन बसली. त्यानंतर मी लिहिलेलं पत्र तिला पुन्हा लिहिताना आणि त्यावर पत्ता लिहिताना तिला पाहत राहिलो. त्यानंतर मी तिला ते पत्र घडी करून लिफाफ्यात घालायला लावलं आणि तो लिफाफा ब्रिफकेसमध्ये ठेवला.

त्यानंतर मी तिला तिच्यासाठी तयार केलेल्या स्टोरीचे पेपर वाचायला दिले.

" हे घे आणि अगदी तोंडपाठ कर." मी तिला सांगितलं." उद्या तू पुन्हा तयारी करून ये.तुझी कितपत तयारी झालीय हे मी बघेन. त्यानंतर आपण रेडी असू."

तिने ते पेपर्स तिच्या पर्समध्ये ठेवले.

" इथून जाण्यापूर्वी एकदा तू आणलेला ड्रेस आणि विग घालून दाखव. मला पाहायचय." तिनं सुटकेस उघडली आणि त्यातून स्वस्तातला निळा-पांढरा ड्रेस आणि लाल रंगाचा विग काढला.

" आत जा आणि हे घालून ये, तू यात कशी दिसतेस ते बघू." मी तिला म्हणालो.

" ऑर्डर्स कशा द्यायच्या हे तुला चांगलंच कळतं नाही ?" ती म्हणाली, " पण मला आवडलं. काहीतरी वेगळं वाटलं.मला माझ्यापेक्षा वयानं मोठे असलेले पुरुष आवडतात. ते खूप मॅच्युअर असतात."

" लवकर आटप. तुला घरी जायचंय." मी म्हणालो.

तिनं नाक मुरडलं आणि बेडरूममध्ये जाऊन दार बंद केलं. आता मी जास्तच सावध झालो होतो. कारण आता ती माझ्यासोबत एकटी होती. तिनं माझ्यात काहीतरी वाईट जागवलं होतं, जे कुणाही पुरुषात जागलं असतं. माझं लग्न झाल्यापासून मी कुणाही दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंतलो नव्हतो. आता देखील ती सहज मला मिळू शकते हे माहित असून पण माझी तशी ईच्छा नव्हती. मी तिला थोडी जरी हिंट दिली असती, तरी ती काहीही करायला तयार झाली असती.

थोडा वेळ मी बाहेरील रूम मध्ये येरझाऱ्या घालायला लागलो, तेवढ्यात बेडरूमचं दार उघडून ती बाहेर आली. लाल विगमुळं तिच्यात आश्चर्यकारक बदल झाला होता. मी खूप मुश्किलीने तिला ओळखू शकलो.

" ड्रेसला पाठीमागं चेन असणं म्हणजे जाम वैतागच आहे. " पुढून ड्रेस पकडून तिची पाठ माझ्याकडे करत ती म्हणाली. " जरा चेन लावशील का ? माझा हात पोचत नाहीय तिथं.

मी चेनचा हूक हातात पकडला. माझे हात थरथरत होते. माझ्या बोटांना तिच्या थंड पाठीचा स्पर्श झाला. तिनं खांद्यावरून माझ्याकडे पाहिलं. मी चेन वर ओढली.माझं हृदय धडधडायला लागलं होतं.ती माझ्याकडे वळली आणि आपले दोन्ही हात तिने माझ्या खांद्याभोवती टाकले. तेवढ्या वेळात तिनं तिच्या शरीराचा संपूर्ण भार माझ्यावर टाकला, पण मी लगेच तिला मागे ढकललं.

" आपण असं काही करता कामा नये." मी म्हणालो. " फक्त कामाशी मतलब ठेवलं पाहिजे."

तिनं एका बाजूवर डोकं टेकवलं आणि म्हणाली," मी तुला आवडत नाही का ? "

" तू खूप सुंदर आहेस. बस्स. आता हे सर्व विसर."

तिनं थोडंसं तिरस्काराने माझ्याकडे पाहिलं आणि प्रकाशात उभी राहिली. " मी पास झाले का ?"

" हो. तू जर डोळ्यांवर गॉगल घातलास, तर तुला कुणी ओळखणार नाही." मी रुमाल काढून हातांना आलेला घाम पुसला.

" ठीकाय. आता कपडे बदल आणि पोशाख आणि विग इथंच ठेव. उद्या पुन्हा आपण इथंच भेटू, नऊ वाजता."

तिनं मानेनंच हो म्हटलं आणि बेडरूम मध्ये गेली... दरवाजा उघडाच ठेवून. मी सिगारेट पेटवली आणि बाहेरच्या खोलीतील टेबलाच्या कोपऱ्यावर बसून तिची बाहेर येण्याची वाट पाहत बसलो.

" हरीश.... " तिनं मला हाक मारली." मला ही चेन खोलता येत नाहीय." मी काही वेळासाठी गोंधळलो, नंतर सिगारेट विझवली. " हरीश ... " मी खरं तर आत जाणार नव्हतो, पण या दुसऱ्या हाकेनं मी मोडलो. केबीनचं बाहेरच दार बंद केलं, लाईट बंद केली आणि शांतपणे प्रियाजवळ बेडरूममध्ये गेलो.

--------------------------------------------------------

II

जेव्हा मी माझी कार माझ्या बंगल्यासमोरील गेटमधून माझ्या गॅरेजमध्ये घेत होतो, तेव्हा राहूल ची बाईक बंगल्याबाहेर उभी असलेली मला दिसली. त्याची बाईक बघून क्षणभरासाठी मी हादरलोच.तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याने मला घरी सोडल्यावर कित्येक आठवडे मी त्याला भेटलो नव्हतो.

तो इथं काय करत होता ? माझं मन अगदी गांगरून गेलं. वीणा नं त्याला नक्कीच माझ्या जनगणनेच्या कामाविषयी सांगितलं असणार. त्याच्या मनात आलं तर तो नक्कीच हे शोधून काढेल की मी खोटं बोलत होतो म्हणून. पोलिसांशी संबंध असलेल्या कुणाचाही मला संपर्क नको होता आणि आता तर मी नकली अपहरण करायला निघालो होतो. शिवाय माझ्या मनात अपराधीपणाची भावनादेखील बोचत होती. प्रियाबरोबर काल रात्री माझ्या हातून जे काही घडलं त्याचं दुःख मला सतावत होतं. आता मला खात्री वाटत होती की तिनं जाणून बुजून तिला स्वतःला माझ्याकडे सोपवलं होतं, तिची ताकद आणि तिचं पुरुषांवरचं प्रभुत्व दाखवण्यासाठी. आमचा काल रात्रीचा प्रणय -अर्थात त्याला तुम्ही प्रणय म्हणणार असाल तर - दुसरं तिसरं काही नसून शारीरिक वासनेचा केवळ स्फोट होता. त्यानंतर तिनं माझ्यापासून झटकन दूर होत माझ्याकडे दुर्लक्ष करत कपडे बदलले. " मी तुला परवा रात्री भेटेन." असं अंधारातूनच तिनं सांगितलं.

" तोपर्यंत बाय " असं म्हणत ती निघून गेली, मला तसंच बेड वर ठेवून. शरमेनं स्वतःवरच चिडलेल्या आणि तिचा तिरस्कार करणाऱ्या मला मागं ठेवून.

जेव्हा मी केबीनचं दार तिच्यापाठीमागं धाडकन बंद होण्याचा आवाज ऐकला, तेव्हा मी बिछान्यातून उठलो आणि टेप बंद केला, कॅसेट कव्हरमध्ये टाकली. नंतर शॉवर घेतला आणि बाहेरच्या खोलीत जाऊन व्हिस्कीचे एका मागोमाग एक, दोन पेग रिचवले. पण कशामुळंही माझी अपराधीपणाची, वीणाला [- जी आमच्यासाठी दिवसरात्र राबत होती -तिला धोका दिल्याची भावना कमी नाही झाली. ना शॉवरमुळे ना व्हिस्कीमुळे.

मी तिथून बाहेर पडून घरी आलो. गाडी गॅरेजमध्ये पार्क केली आणि घराची किल्ली खिशातून काढून बाहेरच दार उघडलं. हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा हॉलमधील घड्याळात रात्रीचे ११ वाजून १० मिनिटं झाली होती. आतल्या खोलीतून राहूल च्या आणि नीनाच्या हसण्याचा आवाज ऐकू आला. मी गोंधळून तिथंच उभा राहिलो.

राहूल आणि मी वीस वर्षांपासून जिवलग मित्र होतो. आम्ही शाळेतसुद्धा एकत्र गेलो होतो. तो एक सरळसाधा, चांगला पोलीस होता. सध्या तो पोलिसातील चांगल्या पदावर, चांगल्या पगारावर काम करत होता. जर आमची अपहरणाची योजना अपयशी ठरली, तर सर्व प्रथम त्यालाच चौकशीसाठी नेमलं जाणार होतं. आणि मला ठाऊक होतं की तो मूर्ख नव्हता. तो अतिशय तल्लख बुद्धीचा, चतुर पोलीस होता. त्याच्या ग्रुपमधील सर्वात टॉपचा पोलीस होता तो ! ही केस जर त्याच्या हातात गेली, तर मी चांगलाच अडचणीत येणार होतो.


स्वतःला खंबीर करत मी खोलीत पाऊल टाकलं. वीणा बागेत ठेवण्याच्या कुंडीवर काम करत होती. राहूल तिचं काम पाहत आरामखुर्चीत बसला होता.

वीणा नं जसं मला पाहिलं, तसं हातातलं काम टाकून ती धावत माझ्याकडे आली. माझ्या गळ्याभोवती हात टाकून तिने मला किस केलं. त्या किस ने मला मेल्याहून मेल्यासारखं झालं, कारण मला प्रियाच्या गरम, उष्ण चुंबनाचा वर्षाव आठवत होता. मी शांतपणे तिला बाजूला केलं. आणि राहूल ला पाहून स्मित हास्य केलं. तो उठून उभा राहिला.

“ हॅलो राहूल “ मी त्याच्यासोबत शेकहॅन्ड करत म्हणालो, “ खूप दिवसांनी फिरकलास ?”

एकदा झालेला पोलीस हा शेवट्पर्यंत पोलिसच असतो. मी त्याची स्थिर गोंधळलेली नजर पाहिली. काहीतरी चुकतंय असं त्याला वाटलं असावं. त्यानं माझा हात घट्ट धरून आवळला. त्याचं हसणं देखील औपचारिक होतं, माझ्यासारखंच.

“ यात माझी काही चूक नाहीय हरीश “ तो म्हणाला. “ गेल्या महिन्यात मी दिल्लीला होतो. मी आत्ताच परत आलोय. तू कसा आहेस ? मी असं ऐकलं की तुला काम मिळालंय म्हणून ?”

“ हं . तस म्हणायला हरकत नाही. “ मी म्हणालो. “ काही न करण्यापेक्षा बरं.” मी तिथल्या एका आरामखुर्चीत बसलो. वीणा माझ्या खुर्चीच्या हातावर बसली. राहूल पुन्हा आपल्या खुर्चीकडे परत गेला.

“ हे बघ हरीश “ तो म्हणाला, “ हे असं फार दिवस नाही चालणार. तुला स्थिर व्हायलाच हवं. मी आमच्या बॉसशी तुझ्याबद्दल बोलतो, तू म्हणत असशील तर. “

“ कशासाठी ?”

“ आम्हाला एका चांगल्या पी. आर. ओ. (पब्लिक रिलेशन ऑफिसर) ची गरज आहे. आणि तू त्यासाठी अगदी योग्य माणूस आहेस. “

“ मी ? मला नाही वाटत असं.” मी म्हणालो. “ त्यांनी ज्या प्रकारे मला तुरुंगात पाठवलं, कितीही पैसे मिळाले तरी मी त्यांच्यासाठी काम नाही करणार. “

वीणा ची माझ्या हातावरची पकड घट्ट झाली.

“ थोडं समजून घे हरीश. “ राहूल म्हणाला. “ जुन सर्व बदललंय. आता तुला खूप मोठी संधी आहे.

पगार किती मिळेल हे नाही सांगू शकत, पण काहीतरी चांगली अमाऊंट असेल हे नक्की. माझ्या बॉसला तुझ्या केस बद्दल आणि तुझ्या पत्रकारितेबद्दल सर्व काही ठाऊक आहे.”

माझ्या मनात विचार आला की चांगलं काम मिळतंय तर ते सोडू नये पण लगेच मला रिनाकडून मिळणाऱ्या मोठ्या घबाडाची आठवण झाली. पैसे माझ्या डोळ्यासमोर नाचायला लागले. त्या पैशांमुळे मला कधीच कुणाची गुलामगिरी करायची गरज पडणार नव्हती.

“ मी विचार करेन.” मी म्हणालो. “ जरी जुनं सर्व बदललेलं असलं, तरी माझ्या मनाची अजून तयारी नाही झालीय या शहरासाठी काम करायची. तरी पण मी विचार करेन.

“ पण तुला असं नाही का वाटत हे काम घ्यावं असं ?” नीनानं उत्सुकतेने विचारलं. “ हे काम तुला आवडतं आणि तू ..... “

“ मी म्हणालो, मी विचार करेन म्हणून. “ मी जोरात ओरडलो.

राहूल नाराज झाला.

“ ठीकय. सॅलरीचा आकडा अजून निश्चित नाही झालेला. तो कळला की मला तुझा निर्णय लगेच हवा. कारण इतरही लोक हा जॉब मिळवायला टपून बसलेत.” राहूल म्हणाला.

“ ते नेहमीच बसलेले असतात. तरी पण ऑफर दिल्याबद्दल धन्यवाद. मी माझा निर्णय लवकरच कळवेन.”

राहूल ने हताशपणे खांदे उडवले आणि उठून उभा राहिला.

“ ठिकाय. आता मला गेलं पाहिजे. मी तुला हेच सांगण्याकरता आलो होतो. तुझा निर्णय फोन ने कळव.”

जेव्हा तो निघून गेला,तेव्हा वीणा मला म्हणाली, “ तू ही संधी सोडू नकोस.. नाही ना सोडणार ? तुला माहीतच आहे … “

“ सांगितलं ना, मी विचार करतो. चल आता झोपूया.” मी तिला म्हणालो.

तिनं माझ्या खांद्यावर हात ठेवला. “ माझी इच्छा आहे तू हे काम घ्यावंस. हे आपलं असं फार दिवस नाही चालणार.” ती म्हणाली.

“ तू मला माझ्या पद्धतीने जगू देणारेस का ?” मी तिच्यावर खेकसलो, “ मी मघाशी सांगितलं ना एकदा, विचार करेन म्हणून ? मग मी विचार करेन.”

(पान ५४)


मी बेडरूममध्ये गेलो. रेकॉर्ड केलेली टेप ड्रॉवरमध्ये सरकवली आणि कपडे काढले. वीणा चा स्वयंपाक घरातील स्वच्छता करण्याचा आवाज मला ऐकू येत होता. मी सरळ बिछान्यात घुसलो.

मी पुन्हा रिनाच्या आणि राहूल च्या ऑफरची तुलना केली. राहूल च्या ऑफरमध्ये कदाचित मला तुरुंगात जावं नसतं. आणि अपहरणात काही विघ्न पण येऊ शकलं असतं. नशिबानं साथ दिली तर कदाचित दोन्ही ऑफर्स एकदम स्वीकारता येतील.

वीणा आत आली. तिची चाहूल लागताच मी गाढ झोपी गेल्याचं नाटक केलं. माझ्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांतून तिला कपडे बदलताना पाहिलं. ती माझ्या शेजारी येऊन झोपली. जेव्हा ती माझ्याजवळ सरकली, तेव्हा मी तिच्यापासून दूर सरकलो. मला इतकी लाज वाटत होती की, मी तिचा स्पर्शदेखील सहन करू शकलो नाही.

दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. वीणाला तिची भांडी घेऊन जाण्यासाठी कार हवी होती. आणि मला त्या दिवशी काहीच काम नव्हतं. त्यामुळं दिवसभर घरात थांबून मी प्रियाचा विचार डोक्यात घोळवत राहिलो.

आता माझ्या मनातील अपराधीपणाची भावना नाहीशी झाली होती. काल रात्री बीचवरच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर माझ्यात आणि प्रियामध्ये जे काही घडलं त्याची पुनरावृत्ती परत होऊ द्यायची नाही असं स्वतःला मी बजावलं होतं. पण आज सकाळपासून माझ्या मनात वेगळेच विचार घोळायला लागले होते.

आता पुन्हा प्रियाबरोबर प्रणय करताना वीणाला दुखावणं वैगेरे काही नव्हतं. पहिल्या वेळेसच मी ती गोष्ट केली नसती तर गोष्ट वेगळी होती. पण आता एकदा चोर -तो कायमचा चोर. या शिवाय तिचं क्रूर वागणं, आलिंगन याचा मी आनंदच घेतल्याची जाणीव मला व्हायला लागली. जसजशी वेळ पुढं सरकायला लागली तसतसा मी येणाऱ्या रात्रीची आतुरतेनं वाट पाहायला लागलो.

नंतरच्या दिवसभरात मी बँकेत गेलो आणि दुसरी रेकॉर्ड केलेली कॅसेट लॉकरमध्ये ठेवली. त्या नंतरचा संपूर्ण दिवस मी केबिनकडे जाऊन समुद्रात पोहण्यात आणि वाळूवर पडून राहण्यात घालवला. माझ्या मनाला आता प्रियाची ओढ लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी आणि वीणा नाश्ता करत होतो,

तेव्हा वीणा म्हणाली,” राहूल च्या ऑफर बद्दल काय ठरवलंस ?”

“ अजून काही नाही.” मी म्हणालो, “ पण विचार करतोय.”

तिनं माझ्याकडं रोखून पाहिलं आणि मला नजर दुसरीकडं वळवावी लागली. “ ठीकय. तू विचारच करत बस. पण तोवर आपल्याला तीन बिलं भरावी लागणार आहेत आणि माझ्याजवळ पैसे नाहीयेत.” तिनं बिलं माझ्यासमोर टाकली. “ विजेचं बिल, दुधाचं बिल, आणि गॅरेजवाल्याचं बिल. “

रिनाने दिलेल्या सुरुवातीच्या रकमेपैकी माझ्याजवळ काही रक्कम शिल्लक होती. त्यातून यातली दोन बिलं तरी मी भागवू शकत होतो.

“ ठीकय. मी बघतो ते. “ मी म्हणालो, “ गॅरेजवाल्याचं नंतर बघू. गॅस किती शिल्लक आहे ?

“ अर्ध सिलेंडर असेल. “

“ आपण शक्यतो कार न वापरता बसने प्रवास करायला पाहिजे.” मी म्हणालो.

“ माझ्याजवळ चार पॉट्स आहेत जी मला उद्या पोहोचवायची आहेत. मी बसने जाऊ शकत नाही.” ती म्हणाली. तिच्या आवाजातील रागीटपणा, जो आजपर्यंत मला कधीही जाणवला नव्हता, तो आज जाणवला. मी तिच्याकडं पाहिलं. तिनं देखील माझ्या नजरेला नजर भिडवली. तिचे डोळे रागीट आणि दुखी होते. हे बघून मला पण राग आला. “ तू कार वापरू नकोस असं नाही म्हटलं मी. फक्त एवढंच म्हणालो की शक्य असेल तेव्हा आपण बसने प्रवास करायला हवा.

“ मी ऐकलं ते. “ ती ओरडली.

“ बरं झालं मग.” मी त्याच सुरात ओरडलो.

ती गोंधळली. तिला त्यावर काही बोलायचं होतं, पण त्याऐवजी ती तिथून निघून गेली.

मला वाईट वाटलं. आमचं भांडण होता होता राहिलं होतं. दोन बिलं- एक लाईटचं.. आणि दुसरं दुधाचं. ही दोन बिलं भरल्यानंतर माझ्याकडं फारच थोडे पैसे शिल्लक राहिले होते. आठवड्याच्या शेवटी केबीनचं भाडं पण भरावं लागणार होतं. पण त्यावेळी माझाकडे भरपूर पैसे असणार होते.

उरलेला सगळा दिवस मी केबिनमध्ये आणि समुद्रकिनाऱ्यावर घालवला. प्रियाच्या येण्याची वेळ जवळ येत चाललेय हे मी पाहत होतो..


पुन्हा एकदा रात्री साडेआठ नंतर किनारा सुनसान झाला. मी व्हरांडयात बसलो होतो. एखादा तरुण जसा आपल्या पहिल्या प्रेमात प्रेयसीची आतुरतेने वाट पाहतो तसा.

नऊ वाजल्यानंतर ती अंधारातून बाहेर आली. ती पायऱ्यांजवळ येताच मी वेड्यासारखा उत्तेजित झालो, ताडकन खुर्चीतून उठलो आणि धावतच तिच्याजवळ जाऊन तिला जवळ ओढलं.

त्याचवेळी मला जबरदस्त धक्का बसला ! तिनं माझ्या छातीवर हात ठेवून मला जोरात पाठीमागं ढकललं.

“ पुन्हा हे धाडस करू नकोस.” ती थंड आणि कोरड्या स्वरात म्हणाली.

“ जेव्हा मला असं काही वाटेल तेव्हा सांगेन मी “ आणि मला ओलांडून ती आत केबिनमध्ये गेली.

कुणीतरी माझ्यावर थंड पाणी ओतल्यासारखं वाटलं तेव्हा. क्षणभर मी गोंधळलो. नंतर तिच्या मागोमाग केबिनमध्ये जाऊन केबीनचं दार लावून घेतलं.

तिनं निळ्या रंगाची जीन्स आणि पांढरा टॉप घातला होता. तिचे केस तिने यावेळी रबर ने पाठीमागे बांधले होते. ती खूप आकर्षक दिसत होती. तिनं स्वतःला एका खुर्चीत झोकून दिलं.

“ कधीही झटकन उठून एखाद्या निष्कर्षावर पोहोचू नये,” ती हसून माझ्याकडं पाहत म्हणाली,” कधीही एखाद्या स्त्रीला आसुसलेली, तयार समजू नकोस. काल रात्री तू मला छान एन्टरटेन केलंस. पण आज नाही.”

त्यावेळी मी इतका चिडलो होतो की तिचा गळा घोटून ठार मारायची झाली होती मला. मी तिच्यावर बळजबरी पण करू शकलो असतो. पण तिच्या शब्दांनी फुगा फोडणाऱ्या सुईचं काम केलं.

मी खाली बसलो. थरथरणाऱ्या हातांनी सिगारेट पेटवली.

“ मला आनंद होतोय की मी तुझा बाप नाही. “ मी म्हणालो. “ खरंच माझं नशीब चांगलं. “

“ माझ्या वडिलांचा यात काय संबंध ? मी तुला मिळाले नाही म्हणून तू माझ्यासाठी वेडा झालायेस. कारण तू जसा विचार केलास तशी मी काही खेळणं नाही. सगळे पुरुष एका माळेतले मणी. मूर्ख ! सेक्समध्ये अपयशी असलेले लोक. ते सगळं सोड. कामाचं बोलायचं ? “

त्यावेळी जगातल्या इतर कोणाचाही केला नसेल इतका मी तिचा तिरस्कार केला.


माझ्या विचित्र अवस्थेमुळं मला ब्रिफकेस उघडताना आणि त्यातले कागद बाहेर काढताना अवघड जात होतं, ज्यात तिच्यासाठी मी तयार केलेले प्रश्न होते. “ मी तुला प्रश्न विचारेन.” माझ्या आवाजातसुद्धा कंप होता. “ तू त्याची उत्तरं दे. “

“ इतका अपसेट होऊ नकोस. “ ती म्हणाली,” तुला चांगला मोबदला मिळणार आहे.”

“ चूप बस “ मी तिच्यावर ओरडलो. “ मला तुझ्या फालतू कॉमेंट्स ऐकायच्या नाहीयेत.” नंतर मी प्रश्न विचारायला सुरुवात केली. “ तू टॉप -इन -टाउन मध्ये का गेलीस ? तुला कैद करून ठेवलं होतं ती खोली कशी होती ? तुला जेवण देणारी स्त्री कशी होती ?जेव्हा तू फार्महाऊस वर होतीस तेव्हा तू त्या स्त्रीला सोडून इतर कुणाला पाहिलंस का ? आणि इतरही बरेचसे प्रश्न.

तिची उत्तरं सरळ आणि सफाईदार होती. तिनं कुठंही चूक केली नाही किंवा गोंधळली नाही.

साधारण दोन तास आमचा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम चालला. त्या दोन तासात तिनं एकही पाऊल चुकीचं टाकलं नाही. शेवटी मी म्हणालो, “ आता शेवट्पर्यंत या स्टोरीला चिकटून रहा आणि पोलिसांच्या कोणत्याही प्रश्नाच्या जाळ्यात अडकणार नाहीस याची काळजी घे.”

तिनं माझ्याकडं पाहून स्मितहास्य केलं.

“ मी जाळ्याकडं लक्ष ठेवेन…. हरीश “
मी उठून उभा राहिलो.

“ ठीकय. आपण शनिवारी तयार राहू. मी बरोबर सव्वा नऊ ला टॉप -इन -टाउन जवळ असेन.

“होय. मला माहित आहे काय करायचंय ते .”

आम्ही एकमेकांकडं पाहिलं. नंतर तिचा चेहरा निवळला.

“ पुअर मॅन …. आता हवं तर तू मला मिठीत घेऊ शकतोस. मला वाईट नाही वाटणार.”

मी तिच्या जवळ येण्याची वाट पाहिली, नंतर ती जवळ येताच तिच्या गालावर सणसणीत थप्पड मारली. तीच डोकं एका बाजूला वळलं. मी आणखी एक थप्पड मारली.

स्वतःचे गाल चोळत ती मागं सरली. तिचे डोळे तिरस्काराची आग ओकत होते. .

-----------------


“ हरामखोर “ ती किंचाळली. “ मी लक्षात ठेवेन ही थप्पड. नीच ! तुला चांगलंच महागात पडेल हे. “

“ चालती हो इथून.” मी पण जोरात ओरडलो. “ आणखी थप्पड लावण्यापूर्वी चालती हो. “

ती पाय आपटत दाराकडे गेली. दाराजवळ गेल्यावर ती थांबली. तिनं माझ्याकडं पाहिलं.

“ मला आनंद होतोय, मी तुझी बायको नाहीय “ ती म्हणाली. त्यानंतर लगेच फिदीफिदी हसली आणि किनार्यावर दूरवर वाळूतून चालत गेली.

मला स्वतःची इतकी घृणा वाटली की स्वतःचा गळा कापून घ्यावसं वाटलं.

प्रकरण ५ वे

I

शनिवारी सकाळी जेव्हा मी उठलो, तेव्हा आभाळ भरून आलं होतं. मला निराश आणि अस्वस्थ वाटत होतं. माझ्या मनात कामाविषयी सारखा संशय घोळायला लागला होता. फक्त मिळणारे पैसे मला उत्तेजित करत होते.

“ आज रात्री मला यायला उशीर होईल.” नाश्त्याची तयारी करत असलेल्या वीणाला मी सांगितलं.

“ ट्रॅफ़िक मोजायची आज शेवटची तारीख आहे.”

तिनं उत्सुकतेने माझ्याकडं पाहिलं.

“ तू राहूल ला भेटणार आहेस ?”

“ मी त्याला सोमवारी भेटणार आहे. त्याच्याकडं माझ्यासाठी काही बातमी असती, तर त्याने मला फोन केला असता.

“ तू त्याची ऑफर स्वीकारणार आहेस हरीश ?” तिनं गोंधळून विचारलं.

“ कदाचित. ते पगार किती देणार यावर अवलंबून आहे.”

“ राहूल म्हणाला होता की पगार चांगला असेल म्हणून. “ ती माझ्याकडं पाहून हसली.

“ मला खूप आनंद झालाय हे ऐकून. तू मला तर काळजीतच टाकलं होतंस. “

“ मलासुद्धा खूप काळजी वाटत होती.” मी शांतपणे म्हणालो. “ आज रात्री मला कार लागेल. पाऊस पडेल असं वाटतंय.”

“ गाडीत पेट्रोल खूप कमी आहे हरीश. “

“ मी बघतो ते. “

नंतर मी बीचच्या केबिनवर गेलो. मी माझा स्विमिंग सूट चढवत होतो तेवढ्यात केबिनचा इन्चार्ज जयराम उसगावकर माझ्यासमोर येऊन उभा राहिला.

आम्ही इकडतिकडच्या गप्पा मारल्या. त्यानंतर मी बराच वेळ पोहण्यात घालवला. त्यानंतर मी केबिनमध्ये येऊन बसलो. किनारा ओसाड होता. माझ्या दृष्टीनं ते चांगलंच होतं. माझ्या अंदाजानुसार पाऊस दिवसभर पडणार होता.

दुपारी एकच्या सुमारास मी एका रेस्टोरंट मध्ये गेलो जे रिकामंच होतं. तिथं मी एक सँडविच मागवलं आणि बियर घेतली. जेव्हा मी केबिनकडं परतलो आणि दार उघडलं, त्याचवेळी टेलिफोनची रींग वाजली.

रिना लाईनवर होती.

“ सगळी तयारी झालीय ? “ तिनं विचारलं. तिच्या आवाजात उत्सुकता होती.

“ माझ्याकडून तरी सर्व तयारी झालीय. आता सर्व काही प्रियावर अवलंबून आहे.” मी म्हणालो.

“ तिची काळजी करू नका.”

“ मग ठीकय.तर. रात्री पावणे नऊ वाजता मी माझ्या कामाला सुरुवात करेन.” मी म्हणालो.

“ मी तुम्हाला उद्या अकरा वाजता फोन करेन.” ती म्हणाली.

“ मला काही पैसे हवेत.” मी म्हणालो, “ मला केबिनचं भाडं द्यायचं आहे.” तुम्ही उद्या सकाळी इथं आलात तर बरं होईल. मी उद्या सकाळी इथं असेन.”

“ मी येते.” एवढं म्हणून रीनानं फोन ठेवला. त्यानंतरचा उर्वरित दिवस मी केबिनमध्ये बसून काढला.

रात्री पावणे नऊला मी फर्नांडिसच्या घरी फोन केला. मला लगेच उत्तर मिळालं. “मि. फर्नांडिस?”

पलीकडून आवाज आला,” कोण बोलतंय?”

“ मला मिस प्रिया फर्नांडीसशी बोलायचंय. मी विकी परेरा बोलतोय. “

“ कृपया होल्ड करा. मी , मिस फर्नांडिस आहेत का ते पाहतो.”

थोड्या वेळाने प्रिया फोनवर आली.

“ हॅलो?”

“ कुणी ऐकतंय?” मी विचारलं.

“ कुणी नाहीय हरीश.” ती म्हणाली,” तू पहिली व्यक्ती आहेस जिने माझ्यावर हात उगारण्याचं धाडस केलं. तू वेगळाच आहेस.”

“ मला ठाऊक आहे आणि पुनः हे घडणार नाही याची काळजी घे.

तुला माहित आहे ना तुला काय करायचंय ? मी वीस मिनिटांत टॉप-इन- टाऊन ला पोचेन. तिथं पार्किंगला उजव्या हाताला लांबवर माझी कार पार्क केलेली असेल. त्यात मागच्या सीट वर तुझा ड्रेस असेल. काही विसरली नाहीयेस ना ?”

“ नाही. “

“ मग बाहेर पड तर. मी तुझी वाट पाहतोय.” आणि मी फोन ठेवला.

मला टॉप-इन-टाऊन ला पोहोचायला पंधरा मिनिटं लागली. पार्किंग लॉटमध्ये पार्किंग फुल्ल होतं. पण मी ऍडजस्ट करून मला हव्या असलेल्या जागी माझी कार पार्क केली.

पार्किंग लॉटमध्ये कुणी नव्हतं, जे माझ्या फायद्याचंच होतं. आतमध्ये कुणीतरी गात होतं. आतमध्ये गर्दी पण खूप होती, हे मला खिडकीतून पाहिल्यावर दिसत होतं. मी माझ्या कारमध्ये बसून तिची वाट पहायला सुरुवात केली.

पार्किंग लॉटमध्ये येणारी प्रत्येक कार मला तिचीच कार वाटायची. नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी एक गाडी आत आली आणि माझ्या कारपासून काही अंतरावर पार्क झाली.

प्रिया त्यातून बाहेर पडली. तिनं सफेद रंगाची सलवार व त्यावर केशरी रंगाचा कुर्ता घातला होता. आपल्या कार जवळ थांबून तिनं माझ्या दिशेने पाहिलं.

मी माझ्या कारच्या खिडकीतून बाहेर डोकं काढून तिच्याकडं पाहिलं. मघापासून बारीक पडणाऱ्या पावसाची सर आता मोठ्या पावसात रूपांतरित व्हायला लागली होती. ती मागे वळली आणि झटकन रेस्टोरंटच्या दिशेने चालू लागली.

मी माझ्या कार मधून बाहेर पडलो आणि तिच्या कार जवळ गेलो. कुणी पाहत नाही याची खात्री करून घेतली आणि तिच्या गाडीच्या मागच्या सीटवर असलेली सुटकेस उचलली आणि माझ्या कार कडे परत निघालो. जाताना खिडकीतून पाहिलं तेव्हा मला प्रिया बारमन सोबत बोलताना दिसली. नंतर त्यानं नकारार्थी मान हलवल्यावर ती तिथून बाजूला झाली आणि गर्दीत मिसळून गेली.

मी माझ्या हातातल्या घडाळ्याकडं पाहिलं. मुंबईला जाणारं विमान रात्री दहा तीस ला सुटणार होतं. अजून आमच्याकडं बराच वेळ होता. मी तिच्यासाठी ज्युलिया रॉबर्ट नावाने फोनवरून तिकीट रिझर्व्ह केलं होत. आणि बुक करणाऱ्या व्यक्तीला सांगितलं होतं की तिकीट घेताना ती पैसे देईल. मुंबईमध्ये मी एका छोट्या लॉजवर राहिलो होतो एकदा, तिथंच प्रियासाठी मी रूम बुक केली होती. तो लॉज शहरी गजबजाटापासून दूर एका बाजूला होता. तिथं ती सुरक्षित राहील याची मला खात्री होती.

मी प्रियाला रेस्टोरंट अँड बार मधून बाहेर पडताना पाहिलं. पण येताना ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत एक माणूस होता हे पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला.

तिनं माझ्या गाडीच्या दिशेने चालायला सुरु केलं,तेवढ्यात त्या माणसानं तिचा हात धरून तिला मागे ओढायला सुरुवात केली. मी त्याला जास्त बारकाईने पाहू शकलो नाही. पण तो एक बुटका आणि जाड्या होता. त्यानं फिक्कट रंगाचा कोट घातला होता एवढं मात्र कळलं.

“ कम ऑन बेबी “ तो मोठ्यानं ओरडत होता. “ चल धमाल पार्टी करू. तूम भी अकेले ,हम भी अकेले मजा आ रहा है “ कुठल्यातरी ओळखीच्या सिनेमातलं गाणं होत ते, जे तो भसाड्या आणि बेसुऱ्या आवाजात म्हणत होता.

“ गेट लॉस्ट “ प्रिया ओरडली,” तुझे घाणेरडे हात लांब ठेव माझ्यापासून. “

या पोरीनं जर त्याला व्यवस्थित हॅन्डल केलं नाही, तर आम्ही चांगलेच अडचणीत येणार होतो आता. मी बाहेर पडण्याचं धाडस करू शकत नव्हतो. तो जेवढा प्यायलेला वाटत होता, तेवढा कदाचित नसेलही. आणि तसं असेल तर उद्या जर काही बिनसलं तर तो चेहरा लक्षात ठेवू शकत होता.

“ चालता हो म्हटलं ना “ प्रिया त्याच्यावर पुन्हा ओरडली. आणि माझ्या कारच्या दिशेने चालू लागली. तो दारुड्या थोडासा गोंधळला, पण पुन्हा तिच्या मागून यायला लागला. मी माझ्या कारच्या मागच्या बाजूला गेलो. मला तिला माझ्या कारपासून दूर राहायला सांगायचं होतं, तो कदाचित गाडीचा नंबर लक्षात ठेवेल म्हणून. पण ती पुढं येतच राहिली.दारुड्या तिच्यामागून झोकांड्या खात आला, तिचा हात धरून तिच्याभोवती फिरायला लागला.

“ ए अशी दूर जाऊ नको. चल मागे फिर. एक एक ड्रिंक हो जाये फीर सारी रात अपनी.”

तिनं त्याच्या गालावर एक सणसणीत थप्पड लावली. एखादा छोटा दिवाळीचा बॉम्ब फुटावा तसा आवाज झाला.

“ तू अशी ऐकणार नाहीस तर “ म्हणत तो तिला जबरदस्तीनं किस करायला लागला. आता मात्र मला काहीतरी कराव लागणार होतं. ती खूप प्रयत्न करत होती त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून. पण तो तिच्यापेक्षा जास्त ताकदवान होता. त्यावेळी आरडाओरडा न करता सुटका करण्याची तिची धडपड बघून मला तिचं कौतुक वाटलं.

माझ्या कारच्या डिक्कीमध्ये मी नेहमी एक जाडजूड बॅटरी ठेवायचो. आता मला तिची प्रचंड गरज वाटली.अंदाजे एक फूट लांबीची ती टॉर्च चांगलीच वजनदार होती.


त्यावेळी भरपूर अंधार होता. आणि आम्ही गेटवर असलेल्या एकमेव दिव्या पासून खूप लांब होतो. त्याच्या पाठिमागं पोहोचण्यासाठी मी लांबचा वळसा घेतला. त्यावेळी मी इतका घाबरलो होतो की माझे दात एकमेकांवर घट्ट आवळले होते.

जसा मी त्याच्या मागे आलो, प्रियाने त्याच्यापासून सुटका करून घेतली. दारुड्याला मी आल्याची जाणीव झाली आणि तो मागे वळला.

मी त्याच्या डोक्यात जोराने टॉर्चचा प्रहार केला. त्यामुळे तो गुढग्यात वाकला. प्रियाने मोठ्या मुश्किलीने स्वतःला किंचाळण्यापासून रोखलं.

मला शिव्या देत दारुड्यानं माझ्यावर हल्ला केला, पण मी पुन्हा त्याच्यावर बॅटरीने प्रहार केला. यावेळी मी पूर्वीपेक्षा जास्त जोराने तडाखा हाणला. आता मात्र तो माझ्या पायाशी कोसळला.

“ माझी गाडी घे आणि इथून बाहेर पड.” मी प्रियाला म्हणालो, “ मी तुझ्या मागोमाग येतो.”

“ तू त्याला मारलंस ?” तिन दारुड्याकडे पहात विचारलं.

“ इथून बाहेर पड.” मी तिच्यावर ओरडलो.

मी धावतच तिच्या कारजवळ गेलो आणि कार सुरू केली. जर कुणी आता त्या ‘टॉप- इन- टाऊन’ मधून बाहेर पडल असतं आणि त्या दारुड्याला पाहिलं असतं तर आम्ही चांगलेच अडचणीत येणार होतो.

मी तिची कार रिटर्न घेत असताना माझी कार पण सुरू झाल्याचा आवाज आला. मी तिला आधी गेटमधून बाहेर पडू दिलं, मग पाठोपाठ मी बाहेर पडलो.

तिला किनाऱ्याकडच्या रस्त्यानं जाण्यासाठी सांगावं लागलं नाही. एक मैेलभराचा प्रवास केल्यावर मी तिला ओव्हरटेक केलं आणि थांबायला सांगितलं. रस्ता सुनसान होता. पाऊस पण आता कमी झाला होता. मी तिच्या कारमधून बाहेर पडलो आणि माझ्या कारकडे धावलो.

“ पटकन कपडे बदल.” मी म्हणालो,आणि माझ्या मागून ये.”

“ तू त्याला खरंच मारलंस ?” कपडे बदलण्यासाठी मागच्या सीट वर जाताना तिनं विचारलं.

“ ते सगळं सोड. तू ती काळजी करू नको. पटकन कपडे बदल. आपल्याकडं वेळ खूप कमी आहे.”

मी पुन्हा तिच्या कारकडे धावत गेलो आणि पोलीस गस्त पथक इकडं येऊ नये म्हणून प्रार्थना करायला लागलो.

पाच मिनिटांनंतर - जी मला एका युगाप्रमाणं भासली - तिनं हॉर्न वाजवल्याचं मी ऐकलं. मागे वळून पाहिलं तर तिने माझ्या दिशेनं हात हलवला. याचा अर्थ ती तयार झाली होती. मी तिची कार सुरु केली आणि वेगाने जिथं कार पार्किंग करण्याच्या दिशेने पळवली. तिनं माझं अनुकरण केलं.

मी सारखा माझ्या हातातल्या घड्याळाकडे पाहत होतो. अजूनही एयरपोर्टवर पोहोचायला आमच्याकडं खूप वेळ शिल्लक होता. पार्किंग जागेपासून एयरपोर्ट दोन मैलांवर होता. माझ्या डोक्यात सारखा विचार येत होता की मी त्याला जास्त जोरात तर मारलं नाही ना ? पण आता यावर विचार करून काहीही उपयोग नव्हता. जे घडायचं ते घडून गेलं होतं. कदाचित फार जखमी झाला नसेलही तो ! उद्या जर प्रियाला पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं, तर याचा फायदाच होईल. अर्थात तो मेला नसला तर !

मी ठरवलेली पार्किंग प्लेस तिथल्या भागातील बंगल्यांच्या कॉलनीसाठी वापरली जात होती. तिथले रहिवासी त्या जागेचा वापर कायमस्वरूपी कार पार्किंगसाठी करायचे. मला खात्री होती, प्रियाच्या कारला तिथं कुणी ओळखलं नसतं. त्या जागेजवळ आल्यावर मी प्रियाला कार थांबवायला सांगितलं. मी कार ताब्यात घेतली आणि पार्किंग प्लेस मध्ये घुसवली.

पार्क केलेल्या गाड्यांच्या मध्ये अतिशय निमुळती जागा होती.त्यात मी प्रियाची कार घुसवली आणि हेडलाईट्स सुरु ठेवून पार्किंगसाठी रिकामी जागा शोधू लागलो.

अचानक एक गाडी कोणतीही सूचना वैगेरे न देता त्या रिकाम्या जागेत घुसली. त्या गाडीचे हेडलाईट्स पण बंद होते. ती गाडी इतक्या वेगानं आली की मला तिला टाळायची संधीच मिळाली नाही. तिचं मागचं बंपर प्रियाच्या मी चालवत असलेल्या कारवर जोरानं आदळलं आणि बंपर चिरडल्याचा जोरात आवाज झाला.

एका क्षणासाठी मला फ्रिज झाल्यासारखं झालं. हीच अशी गोष्ट होती, जिचा मी योजना आखताना विचार केला नव्हता- ऍक्सीडेन्ट- अपघात. आता हा मूर्ख माझं नाव, पत्ता विचारणार, गाडीचा नंबर घेणार. आणि त्यावरून प्रिया पर्यंत पोहोचणं अवघड नव्हतं. आणि मग मी तिथं काय करत होतो ? तिची कार माझ्याकडं कशी ? हे सगळं विचारचक्र माझ्या डोक्यात चालू असताना त्या गाडीचा ड्रायव्हर गाडीतून उतरला.

नशीब, की त्यावेळी पार्किंगमध्ये अंधार होता. जसा तो माझ्याकडं यायला लागला, मी कारचे हेडलाईट्स बंद केले. तो माणूस बुटका आणि टकल्या होता. पण यापेक्षा जास्त स्पष्ट मी त्याला पाहू शकलो नाही.

“ माफ करा हं. “ त्या माणसानं थरथरत्या आवाजात म्हटलं. “ मी तुम्हांला येताना पाहिलं नाही. माझीच चूक झाली. मी दोषी आहे.”

तेवढ्यात एक जाडजूड बाई त्या गाडीतून बाहेर पडली. “तुझी काही चूक नाहीय किशोर.” ती रागानं म्हणाली. “ त्यानं असं गुपचूप यायला नको होतं. तू काही अंगावर घेऊ नको. तो केवळ अपघात होता.”

“ तुमची गाडी पुढं घ्या.” मी म्हणालो.” तुम्ही माझ्या कारची पुढं जाण्याची वाट अडवलीय.”

“ गाडी अजिबात हलवू नकोस किशोर.” ती बाई म्हणाली. “ आपण पोलिसांना बोलवूया.”

मला आता घाम फुटायला लागला.

“ तुम्ही ऐकलं मी काय म्हणालो ते “ मी त्या बुटक्यावर खेकसलो. “ तुमची गाडी बाजूला करा.”

“ ए, माझ्या नवऱ्याशी असं बोलायचं नाही समजलं ?” ती बाई ओरडली. ती माझ्याकडं लक्ष देऊन पाहत होती. “ ही तुझी चूक आहे. उगाच माझ्या नवऱ्यावर ढकलू नकोस. “

वेळ निघून चालला होता. त्यांना नाव, पत्ता द्यायचं धाडस मला करायचं नव्हतं. माझ्या हातात एकच गोष्ट होती आणि मी तीच केली.

मी कार सुरु केली आणि पुढं दामटली. गाडी पुढंच्या त्या माणसाच्या गादीवर आढळल्यावर, त्याच्या गाडीचं बंपर बाहेर पडलं. मी चालवत असलेल्या प्रियाच्या गाडीचं पण पुढचं बंपर उडालं. मी गाडी सुरूच ठेवली.” गाडीचा नंबर घे किशोर.” मी त्या बाईला ओरडताना पाहिलं.

पार्किंगच्या दुसऱ्या टोकापर्यंत मी कार नेली आणि रिकामी जागा दिसल्यावर तिथं गाडी घुसवून मी गाडीच्या बाहेर उडी मारली. मी हातमोजे घातले असल्यामुळं मला स्टेअरिंगवरचे हातांचे ठसे पुसायची गरज नव्हती. मी पाठीमागं वळून पाहिलं. ती बाई अजून माझ्या दिशेने पाहत होती. तो बुटका माणूस खाली पडलेलं बंपर उचलत होता.

माझ्या बरोबर समोरच बाहेर पडण्याचा मार्ग होता. मी तिकडं धावलो. ते पोलिसांत जातील ? खरं तर चूक त्यांची होती. त्यामुळं ते पोलिसांत जाण्याची शक्यता कमी होती. पण जर ते गेले तर ?त्या कारमुळं पोलीस प्रियापर्यंत पोहोचले असते आणि मग पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या माणसाचा शोध सुरु केला असता.

मी माझ्या कारकडं जात असताना माझ्या शरीरातून भीतीची एक लाट पसरली होती. मी जशी योजना आखली होती, त्याप्रमाणं काहीच आत्ता पर्यंत घडत नसल्याचं आता माझ्या लक्षात यायला लागलं. आधी तो दारुड्या आणि आता हा अपघात. आणखी काय काय पुढं घडणार होतं कोण जाणे !


दुसऱ्या दिवशी फोनची रिंग वाजल्यामुळे मला गाढ झोपेतून जागं व्हावं लागलं. अर्धवट झोप- अर्धवट जागा असलेल्या अवस्थेत मी बिछान्याजवळच्या टेबलवरील घड्याळाकडं पाहिलं. आठ वाजायला अजून वीस मिनिटं बाकी होती.

वीणाला कुणाशी तरी बोलताना मी पाहिलं आणि पुन्हा बिछान्यावर आडवा झालो. हाताजवळच असलेल्या सिगारेटच्या पाकिटातून एक सिगारेट काढली आणि ती पेटवली. ती पेटवत असताना काल रात्रीचे प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून सरकायला लागले. एयरपोर्ट वर प्रियाला पोहोचवून मी तिचा निरोप घेतला होता. मी तिला तिच्या गाडीला झालेल्या अपघाताबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. तिला हे सर्व सांगून टेन्शन देण्यात काहीच अर्थ नव्हता. तिला न सांगतासुद्धा मला खूप टेन्शन आलं होतं, तेच खूप होतं. ती व्यवस्थित आनंदानं गेली होती. गाडीतून एयरपोर्ट कडे जात असतानाच मी तिला हे चांगल्या पद्धतीनं पटवून दिलं होतं की मी त्या दारुड्याला गंभीर इजा केली नव्हती. त्यामुळे तो तो विषय तिनं डोक्यातून त्याचवेळी काढून टाकला होता. पण मी मात्र दोन्ही घटना विसरू शकलो नव्हतो - एक तो दारुड्या आणि दुसरा गाडीचा अपघात.

एयरपोर्ट वरून परत येताना मी माझी समजूत काढली की योजना व्यवस्थित पार पडणार होती. तो दारुड्या, त्यानं प्रियाची छेड काढली होती, त्यामुळं तो काही पोलिसात आपणहून जाणार नाही आणि दुसरी घटना- गाडीची टक्कर; तिथं पण दुसऱ्या गाडीवाल्याची चूक होती. त्यामुळं ते पण पोलिसात जाणार नाहीत. जेव्हा मी पणजी जवळ पोहोचलो, तेव्हा रस्त्याकडेला असलेल्या एका शांत बारमध्ये घुसलो. तिथं मी दोन पेग घेतले. बाहेर पाऊस असल्यामुळं बरेच लोक आत शिरले होते, पण माझ्याकडं कुणीही लक्ष दिलं नाही.

थोड्या वेळानं तिथं असलेल्या एका पब्लिक टेलिफोन बूथ मध्ये मी घुसलो आणि ऍंथोनी फर्नांडिसच्या घरी फोन लावला. तोपर्यंत प्रिया हॉटेलवर पोहोचली असेल असा विचार माझ्या मनात आला. थोड्या वेळात मी त्याच्या घरच्या नोकराचा आवाज रिसिव्हर वर ऐकला.

“ मि. फर्नांडिस ना फोन दे “ मी माझा आवाज बदलून थोडा खरखरीत आवाज काढत बोललो, “ त्यांच्या मुलीचा निरोप मला द्यायचा आहे.”

“ कोण बोलतंय ?”

“ सांगतोय तेवढं कर “ मी त्याच्यावर ओरडलो,” फर्नांडिसना फोन दे “

“ तुम्ही थोडा वेळ होल्ड करता का ?” थोड्या घाबरलेल्या आवाजात त्यानं विचारलं.

मी त्याला रिसिव्हर खाली ठेवताना ऐकलं. मला इकडं घाम फुटायला लागला होता. टेलिफोन बुथच्या काचेतून मी बारमधल्या लोकांना पाहत होतो. पण कुणीही माझ्याकडं पाहत नव्हतं. नंतर एक शांत आवाज माझ्या कानावर पडला.

कमीत कमी या बाबतीत रियानं मला थाप मारली नव्हती. तिनं सांगितलं होतं की ती त्यालाच फोन घ्यायला लावेल आणि खरंच तो फोनवर आला होता.

“ आता लक्ष देऊन ऐक “ मी हळू आवाजात शांतपणे बोललो होतो जेणेकरून त्याच्या ऐकण्यात काही चूक होऊ नये. “ आम्ही तुझ्या मुलीचं अपहरण केलंय. आम्हांला ५ कोटी रुपये हवेत. ऐकलंस ? ५ कोटी आणि ते सुद्धा जुन्या नोटांमध्ये -सिरीयलच्या नोटा नकोत. कळलं ? जर तू हे पैसे दिले नाहीस, तर तुझी मुलगी प्रिया तुला पुन्हा कधीच दिसणार नाही. पोलिसांना कळवायच्या किंवा कोणतीही चलाखी करायच्या भानगडीत पडू नकोस. तुला जर तुझी मुलगी परत हवी असेल ,तर मी सांगेन तसंच वाग.”

थोडा वेळ थांबल्यावर तो म्हणाला, “ समजलं. मी पैसे देईन. मी पैसे कसे द्यायचे आणि माझी मुलगी परत कधी येईल ते सांगा.”

एखाद्या मुरलेल्या राजकारणी माणसासारखं तो शांत आणि सहजपणे बोलत होता.

“ मी तुला सोमवारी फोन करेन.” मी म्हणालो. “ किती लवकर तू पैशांची व्यवस्था करू शकशील ? जितक्या लवकर करशील, तितकं तुझ्या मुलीसाठी चांगलं. “

“ मी उद्याच तयार ठेवेन.”

“ उद्या रविवार आहे.”

“ तरी पण माझे पैसे तयार असतील.”

“ ठीकाय. मी सोमवारी सकाळी फोन करेन.पैसे कुठं आणि कसे द्यायचे याबद्दल सूचना तुला त्यावेळी मिळतील. एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव. जर पोलिसांना याबद्दल सांगितलंस, तर प्रिया तुला पुन्हा जिवंत दिसणार नाही. ती गटारात पडलेली दिसेल. पण त्यापूर्वी आम्ही तिच्याबरोबर मजा मारलेली असेल. “

मी रिसिव्हर खाली ठेवला आणि माझ्या कारकडे गेलो.

मला हे केल्याचा अभिमान वैगेरे काही वाटत नव्हता. उलट या प्रकरणातली रक्कम मोठी असल्यानं काळजी वाटत होती. घरी आल्यावर वीणा झोपलेली बघून आनंद झाला. नाहीतर मला तिच्या प्रश्नांच्या भडिमाराला सामोरं जावं लागलं असतं. त्या रात्री मला फारशी झोप मिळाली नाही. त्यामुळं फोनची रिंग वाजल्यावर मला कुणीतरी झोपेतून खेचून बाहेर काढल्यासारखं वाटलं. मी आता लक्षपूर्वक वीणाचं फोनवरचं बोलणं ऐकत होतो. जेव्हा तिच्या पावलांचा आवाज ऐकला, तेव्हा मी तयार होऊनच बसलो.


बेडरूमचं दार उघडून वीणा आत आली.

“ हरीश, …. राहूल चा फोन आहे. त्याला तुझ्याशी बोलायचंय, अर्जंट.”

मी चादर दूर फेकली. आणि तिनं पुढं केलेल्या स्लीपिंग गाऊनकडे धावलो.

“ काय अर्जंट काम आहे ? त्यानं तुला काही सांगितलं ?”

“ नाही. तो तुला विचारत होता.”

“ ठिकय. मी बोलतो त्याच्याशी.”

मी बाहेरच्या खोलीत गेलो आणि रिसिव्हर उचलला.

“ राहूल , मी हरीश बोलतोय.”

“ हॅलो हरीश “ राहूल म्हणाला. त्याच्या आवाजात जोश होता. “ नीट ऐक. मी तुझं काम नक्की केलंय. बहुतेक खळबळजनक काम करायची संधी तुला मिळणार असं दिसतंय. तू ताबडतोब इकडं निघून ये. मी पोलीस हेड क्वार्टरमधून बोलतोय. ते तुला पंधरा हजार आणि इतर खर्च द्यायला तयार आहेत. आपल्याकडं असं काही आहे जे बर्फ सुद्धा वितळवेल. तू ऍंथोनी फर्नांडिस बद्दल ऐकलं असशील. तो कोट्याधीश. त्याच्या मुलीचं बहुतेक अपहरण झालेलं दिसतंय. हे नक्कीच खळबळजनक आहे. तू हे प्रकरण चांगलं हाताळू शकतोस. तू लगेच इकडं निघून ये. पोलीस कमिशनरना तुझ्याशी बोलायचं आहे.”

कुणीतरी माझ्या छातीत सुरा खुपसावा तसं झालं मला.

“ एक मिनिट थांब.” मी थरथरत्या आवाजात म्हणालो. “ मी तुला काम करेन असं अजूनही म्हणालो नाहीय.”

“ प्लिज असं म्हणू नको हरीश “ राहूल चा आवाज एकदम वाढला. “ असं काही घडलं असेल तर पणजी शहराला हादरवून टाकणारी घटना असेल ही. तुला नाही वाटत हे तू हॅन्डल करावं ? “

मला माहित होतं की माझं बोलणं वीणा दारात उभी राहून ऐकतेय. माझा हात घामानं इतका थबथबला होता की रिसिव्हर पकडणं मुश्किल झालं होतं. शेवटी जे घडू नये तेच घडलं होतं. तो म्हणाला की तिचं अपहरण झाल्यासारखं वाटतं. नक्की काही बोललेला नाही. जर मी त्यांच्यासोबत काम केलं, तर निदान त्यांच्या हालचाली तरी काय होतायेत ते मला कळेल. थोडा वेळ थांबून मग मी त्याला म्हणालो,” ठिकय. मी येतोय.”

“ गुड हरीश …. लवकर निघ “ राहूल म्हणाला,” मी वाट बघतोय.”

मी रिसिव्हर खाली ठेवला.

“ काय झालं हरीश ?” नीनानं विचारलं.


“ मला माहित नाही. तो कशामुळं तरी एक्साईट झालाय. त्यानं काही सांगितलं नाही. तो म्हणाला ऑफिसमध्ये ये . ते मला पंधरा हजार आणि इतर खर्च द्यायला तयार झालेत. “

“ ओह माय डार्लिंग” वीणानं मला मिठी मारली. “ आय एम सो हॅप्पी हरीश “ तिनं मला किस केलं. “ मला माहित होतं, हे काम तुलाच मिळेल.”

मी आता रोमँटिक मूडमध्ये नव्हतो. त्यामुळं हलकेच थोपटून तिला बाजूला केलं.

“ मला लगेच तिकडं जावं लागेल.”
मी बेडरूममध्ये गेलो आणि कपडे बदलले. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मला श्वास घेणं कठीण जात होतं. शेवटी रियाचा विश्वास फाजील आत्मविश्वास ठरला तर ! फर्नांडिसनं पोलिसांना कळवलेलं दिसत होतं.

आता सगळं संपलं होतं. आता मला पन्नास लाख मिळणार नव्हते. ठीकाय. कमीत कमी महिन्याला पंधरा हजारचं काम तरी मिळालं होतं.

पण अचानक मी आवरता आवरता थांबलो.

मला खरंच काम मिळालं होतं ?

जर पोलिसांनी शोधून काढलं की या खोट्या अपहरणात मी सामील होतो, तर पाच मिनिटं सुद्धा हे काम माझं राहणार नव्हतं. कदाचित त्या रेकॉर्ड केलेल्या टेप्समूळ मी तुरुंगात जाण्यापासून वाचेन. पण काम वाचवू शकणार नव्हतो.

सकाळी नऊ वाजून काही मिनिटं झाली असतील. मी पोलीस हेडक्वार्टरमध्ये पोहोचलो.

“ ये हरीश “ राहूल टेबलमागच्या खुर्चीतून उठून बाहेर येत म्हणाला. “ हे खूप बरं झालं, तू आमच्यासोबत काम करायचं ठरवलंस ते. तुला याचा कधीच पश्चाताप होणार नाही. कमिशनर इकडं यायला निघालेत. कधी ही पोचतील ते इथं. “

मी तिथं ठेवलेल्या खुर्चीच्या एका हातावर बसलो आणि त्यानं दिलेली सिगारेट पेटवली.

“ तू एवढा एक्साईट कशानं झालायेस ?” मी शक्य तितक्या शांत आणि सहजपणे त्याला विचारलं. “ या फर्नान्डिसच्या मुलीची काय भानगड ?”

तेवढयात दारावर टकटक झाली. एक पोलीस आत आला. “ कमिशनर साहेब आलेत. “ राहूल उठून उभा राहिला. “ चल कमिशनरना भेटूया.“

चालता चालता तो म्हणाला,” त्याच्या बरोबर काम करताना काळजी घे. तसा तो चांगला आहे. पण थोडासा तापट आहे. तुझ्याबद्दल त्याला सगळी माहिती आहे. त्याला तुझ्या कामाबद्दल आदर वाटतो आणि ज्या प्रकारे तू कारस्थानाला बळी पडलास, त्यातून बाहेर आलास ते देखील त्याला सारं माहित आहे. तू फक्त तुझं काम चोख कर. तुला त्याच्यापासून कसलाही त्रास होणार नाही.” तो दाराजवळ थांबला आणि दारावर टकटक करून आत शिरला. पाठोपाठ मी ही आत शिरलो.

आतमध्ये पांढऱ्या केसांचा एक जाडजूड माणूस सिगार पेटवत खिडकीजवळ उभा होता. आमची चाहूल लागताच त्यानं वळून पाहिलं. त्याची भेदक नजर माझ्या सर्वांगावरुन फिरली. त्याचं साधारणपणे पन्नाशीच्या आसपास असावं. त्याचा लालबुंद चेहरा, पुढं आलेली हनुवटी आणि बारीक तोंड या सगळ्यामुळं तो अगदी क्रूर असणार असं वाटत होतं.

“ हा हरीश “ राहूल नं माझी ओळख करून दिली. “ आजपासून हा आपल्याबरोबर काम करेल. “

पोलीस कमिशनरनं आपला थंड आणि कडक हात पुढं केला.

“ ऐकून आनंद वाटला.” तो म्हणाला,” मी तुझ्याबद्दल ऐकलंय हरीश आणि जे ऐकलंय ते चांगलंच ऐकलंय.”

मी त्याच्या सोबत शेक हॅन्ड केलं.

आपल्या ओठांतून सिगारच्या धुराची वलयं सोडत तो टेबलाकडे गेला आणि खुर्चीवर बसत त्यानं आम्हालादेखील बसायची खूण केली.

“ तू माझ्या सुट्ट्यांचा पार बोऱया वाजवलास” तो राहूल ला म्हणाला. “ या वीकएंडला मी फॅमिली सोबत बाहेर फिरायला जायचं ठरवलं होतं. ही काय भानगड आहे ?”

राहूल एका खुर्चीत बसला आणि त्यानं पाय मोकळे सोडले.

“ आपल्या हातात बहुतेक किडनॅपिंगची केस येणारेय सर. “ तो म्हणाला. “ तुम्ही यात सुरुवातीपासून असावं असं मला वाटलं. आज सकाळी-सकाळी पणजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मॅनेजरचा मला फोन आला.” त्यानं माझ्याकडं पाहिलं. “ आपलं सगळ्या बँकांबरोबर असं ठरलंय की अचानक आणि विनाकारण कुणी मोठ्या रकमा काढल्या की त्यांनी आम्हांला कळवायचं. कारण आत्तापर्यंतच्या अनुभवातून असं निदर्शनास आलंय की अशा रकमा या मोठ्या मागण्या पूर्ण करण्यासाठीच काढल्या जातात.” मी माझा रुमाल काढून चेहऱ्यावर आलेला घाम पुसला. हे माझ्यासाठी नवीन होतं.

आणि मी याची अपेक्षा पण केली नव्हती.

“ मॅनेजर म्हणाला की नुकताच त्याला फर्नांडिसचा फोन आला होता की बँक उघडून त्यानं तात्काळ पाच कोटी रुपये तयार ठेवावेत. आज अर्थातच रविवार असल्यानं मॅनेजरनं त्याला सोमवार पर्यंत थांबायला सांगितलं. पण फर्नांडिस; जो त्यांचा सगळ्यात मोठा आणि चांगला ग्राहक आहे ; त्यानं काहीही ऐकून न घेता ताबडतोब ही रक्कम तयार ठेवायला सांगितली. यात काहीतरी घोटाळा असल्याचं वाटल्यानं आणि आमचं पूर्वीच ठरलं असल्यानं त्यानं मला फोन करून कळवलं.”

कमिशनर विचारात पडल्यासारखा दिसला.

“ कदाचित फर्नांडिस आपल्या धंद्याशी संबंधित एखादं डील पूर्ण करत असेल.”

“ मी देखील हाच विचार केला आणि चेक करायचं ठरवलं “ राहूल ने माझ्याकडं पाहून म्हटलं. “ तुला तर माहीतच आहे हरीश. साधारणपणे किडनॅपिंगच्या केसमध्ये किडनॅप झालेल्या मुलांचे आईवडील मुलांचं काहीतरी बरंवाईट होईल म्हणून इतके घाबरलेले असतात की ते आमच्याशी सल्ला मसलत केल्याशिवायच किडनॅपर्सना पैसे देऊन मोकळे होतात. आम्हांला किडनॅपर्ससाठी सापळा रचायची किंवा नोटांवर खुणा करायची संधी देखील देत नाहीत. नंतर जेव्हा मुलं परत येत नाहीत, तेव्हा हे आमच्याकडं धाव घेतात आणि आम्ही त्यांना शोधून काढावं अशी अपेक्षा ठेवतात. आमच्याकडं न येण्याबद्दल मी त्यांना दोष नाही देत. कारण किडनॅपर अतिशय क्रूर असा अपराधी असतो. तो नेहमीच आपल्या सावजाला धमकी देतो की जर पोलिसांना कळवलं तर तुमची मुलं जिवंत राहणार नाहीत. पण आमच्याकडं न येऊन हे पालक आमची अडचण करून ठेवतात. मग शोध घेताना आमची पंचायत होते. म्हणून ही मॅनेजरबरोबर संधान साधण्याची आयडिया. अर्थात आम्ही फक्त माहितीवरून ऍक्शन कधीच घेत नाही. पण आम्ही ऍक्शन घेण्याच्या तयारीत तर राहू शकतो.

“ तुला कशावरून वाटलं की मुलीचं अपहरण झालंय म्हणून ? “ काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारलं.

“ ती नाहीशी झालीय.” राहूल म्हणाला. “ फर्नांडिसचा ड्रायव्हर एक माजी पोलीस आहे. भरपूर श्रीमंत असलेल्या लोकांना त्रास देणारे पण भरपूर लोक असतात. तेव्हा त्यानं आमच्याकडं एका भरपूर अनुभवी माणसाची मागणी केली. जो त्याचा ड्रायव्हर पण बनेल आणि वेळेला त्याचा बॉडीगार्ड पण . वागळे ला पण काहीतरी काम हवं होतंच. तो एक चांगला पोलीस होता.


आणि त्या काळात पोलीस दलात घडणाऱ्या गोष्टींबद्दल तो नाराज पण होता. त्यानं हा जॉब स्वीकारला. मी त्याच्याशी बोललोय. तो म्हणाला प्रिया- फर्नांडिसची मुलगी काल रात्री सिनेमाला जाणार होती. पण काल ती थियेटर वर पोहोचलीच नाही आणि घरी पण आली नाही.”

“ त्याला काय माहित ती सिनेमाला गेलीच नाही ते ?” कमिशनरनं विचारलं.

“ मैत्रिणीनं घरी फोन केला आणि वागळेनं तो उचलला. “

“ फर्नांडिसनं मदत मागितली नाही ?”

“ नाही “ राहूल म्हणाला. त्यानं ऑफिसमध्ये येरझाऱ्या मारायला सुरुवात केली.

“ मी बँकेवर लक्ष ठेवण्यासाठी एका माणसाला नेमलंय. फर्नांडिसनं पैसे काढताच तो लगेच मला कॉल करेल.”

“ बँकेचा मॅनेजर नोटांचे नंबर्स नोट करणार आहे का ?”

राहूल नं नकारार्थी मान हलवली.

“ मला नाही वाटत. पाच कोटीच्या छोट्या नोटांचे नंबर्स नोट करणं मोठं वेळखाऊ काम ठरेल.”

“ आणि त्या मुलीचं काय ? तिच्याबद्द्ल काही समजलं ? ती लग्न करण्यासाठी पळून गेली नसेल कशावरून ?”

“ मग फर्नांडिसला इतकी मोठी रक्कम कशाला हवीय ?”

“ ब्लॅकमेल ?”

राहूल नं खांदे उडवले.

“ मला तोच संशय येतोय. जास्त करून किडनॅपिंगचा. कारण ती मुलगी तरुण आहे, सुंदर आहे. ती सारखी भटकत असते आणि उधळण्यासाठी तिच्याकडं फालतू पैसा पण आहे. आपल्याकडं तिच्या फिंगरप्रिंट्स आहेत आणि प्रेसकडून आपल्याला तिचे फोटो पण मिळू शकतील.”

कमिशनर बराच वेळ गप्प बसला. नंतर म्हणाला,” जर हे किडनॅपिंग असेल तर हे चांगलंच खळबळ उडवून देणार. आपण चांगलेच प्रसिद्ध होणार आहोत.” त्यानं माझ्याकडं पाहिलं. “ इथून तुझं काम सुरु होतं हरीश. प्रेसला हॅन्डल करणं आणि देशातल्या प्रत्येक प्रमुख पेपरचा रिपोर्टर इथं येईल याची काळजी तू घ्यायची. मला प्रसिद्धी आवडते. आणि चांगली प्रसिद्धी तर नक्कीच. समजलं ? ती जास्तीत जास्त मला मिळवून द्यायचं काम तुझं. यासाठीच आम्ही तुला पैसे देतोय. पणजी शहराला देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध करायचं काम तुझं. हे किडनॅपिंग असं आहे ज्यामुळं पणजी शहर रातोरात सगळ्या जगाला माहित होईल. तुझं काम फार जबाबदारीचं आहे. म्हणूनच आम्ही तुझी निवड केलीय.

“ मला समजलं सर “ मी म्हणालो.

कमिशनर राहूल कडे वळला.

“ तिची कार पण हरवलीय काय ?”

“ होय. एक छोटीशी कार आहे ती. मी तिचा नंबर मिळवलाय. आपण मोठ्या प्रमाणावर शोधाशोध करू शकत नाही. पण पोलिसांना गाडी शोधायला सांगितलीय मी. जोवर फर्नांडिस आपल्याला बोलवत नाही, तोवर आपण फार काही करू शकत नाही. स्टेट पोलीसबरोबर याबाबत बोललेलं बर होईल नाही ? “ राहूल म्हणाला.

“ ठीकय मग. सुरु करा तर.” कमिशनर म्हणाला. “ सध्या आम्हांला तुझी गरज नाहीय हरीश.आजचा दिवस तू मजेत घालव. फक्त दर दोन दिवसांनी राहूल ला फोन करून काही नवीन घडलंय का याची चौकशी कर म्हणजे झालं.” तो मला म्हणाला.

मी उठून उभा राहिलो.

“ नक्कीच.” मी थोडासा घुटमळलॊ. नंतर पुढं म्हणालो,” एक सुचवायचं होतं सर. आपण फर्नांडिसवर पैसे काढल्यावर पाळत ठेवली तर ? तो पैसे देताना त्याचा पाठलाग केला तर ? “

कमिशनरने नकारार्थी मान हलवली.

“ आपण असं काहीही करणार नाही आहोत.” तो म्हणाला. “ जो पर्यंत तो आपल्याला सांगत नाही तो पर्यंत आपण असं काही करायचं नाही. समजा आपण त्याचा पाठलाग केला आणि जर समज आपल्याला किडनॅपर्सनी बघितलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवणारे पुरावे नष्ट केले आणि मुलीला ठार केलं तर ? नाही नाही. मी हा धोका पत्करू शकत नाही. जोवर फर्नांडिस आपल्याकडे रीतसर तक्रार करत नाही, तोवर आपण काही करणार नाही आहोत.”

चला इथं एक संधी आहे असा मी विचार केला आणि होकारार्थी मान हलवली.

“ वेल. मी तुला साडे अकरा ला फोन करेन राहूल .” मी राहूल ला सांगितलं.

मी दरवाज्याकडं निघालेलो असताना कमिशनर फोनकडे वळला. राहूल आधीच फोन वर होता.

मी दार बंद केलं आणि पॅसेजमधून खाली आलो. माझं लक्ष आता रिया फर्नांडिसबरोबरच्या मीटिंगकडं लागलं होतं.


प्रकरण ६ वे

I

मी बीच केबिनवर पोहोचलो नसेन तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. खूप थंडगार वारं वाहत होतं. समुद्र देखील खूप खवळला होता. तो दिवस किनाऱ्यावर मजेत घालवण्यासारखा नव्हता. त्यामुळे दूरवर कुणीही दिसत नव्हतं. मी गाडी पार्क करून केबिनमध्ये गेलो, दार बंद केलं आणि मुंबईमधील प्रिया थांबलेल्या हॉटेलला फोन लावला.

काही वेळाने मी प्रियाशी बोलत होतो. “ मी हरीश” मी म्हणालो,” आता लक्ष देऊन ऐक. बहुतेक आपण अडचणीत येणार आहोत. मी फोनवर सगळं सांगू शकत नाही. पण तू एवढंच कर. खोलीतच रहा. मी पुन्हा तुला कॉल करेन. कदाचित उद्याच तुला यावं लागेल.”

मी तिचा श्वासोच्छवास ऐकला.

“ त्या दारुड्यामुळ ?” तिनं विचारलं.

“ नाही. त्यापेक्षा वाईट. जे लोक यात नंतर येतील असं वाटत होतं, ते आधीच आलेत. तुला समजलं ?”

“आपण काय करायचं ?”

अजूनही फारसं बिघडलेलं नाहीय. तू फक्त कुणाच्या नजरेत येऊ नकोस. खोलीतच रहा. मी तुला रात्री फोन करेन.

“ पण झालंय तरी काय ? “ तिच्या आवाजात थोडं टेन्शन होतं.” तू सांग ना मला काय झालंय ?”

“ फोनवर नाही. फक्त तू जिथं आहेस तिथंच रहा. बाहेर पडू नकोस. “ आणि मी फोन ठेवला.

मला तिच्याबद्दल वाईट वाटत होतं. पण मी तिला सांगायचं धाडस करू शकत नव्हतो. हॉटेलमधला टेलिफोन ऑपरेटर आमचं संभाषण ऐकण्याची शक्यता होती. मी खिडकीजवळ गेलो आणि बाहेर पाहिलं. मुसळधार पाऊस बाहेर अजून कोसळत होता. संपूर्ण किनारा त्यामुळं सुनसान आणि भकास दिसत होता. मी सिगारेट पेटवली आणि खोलीत येरझाऱ्या मारायला सुरुवात केली.

कमीत कमी फर्नांडिसनं तरी पोलिसांना बोलावलं नव्हतं. पण जर पोलिसांनी प्रियाची कार ; ती पण मोडतोड झालेल्या अवस्थेत शोधून काढली, तर पोलीस त्याला बोलावून घेतील आणि त्यावेळी कदाचित प्रिया नाहीशी झाल्याचं तो स्वीकार करेल.

रियाला किनाऱ्यावरून येताना मी पाहिलं. तिनं ब्लॅक कलरचा रेनकोट घातला होता. आणि डोकयावर छत्री पण धरली होती. पावसाळ्यात हा एक फायदा असतो. तुम्हाला रेनकोट घातल्यावर आणि डोक्यावर छत्री असताना सहजासहजी कुणी ओळखू शकत नाही.

केबिनच्या मालकानं-जयरामनं तिला पाहिलं जरी असतं, तरी तिला तो ओळखू शकला नसता.

ती पायऱ्यांवर आल्यावर मी दार उघडलं.

“ तो बँकेतून पैसे काढतोय आज “ तिनं छत्री मिटवत आणि पावसाचं पाणी झाडत म्हटलं. “ त्याला मी प्रियासाठी प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये जातेय असं सांगून आलेय.”

मी काही खूप धार्मिक नाही. पण तिचं बोलणं ऐकून मला तिचा तिरस्कार वाटला.

“ तुम्ही पैसे कधी मागणार आहात ?” तिनं रेनकोट काढता काढता विचारलं. खोलीतल्या एका आरामखुर्चीत ती बसली. मी तिचा रेनकोट घेतला.

“ मला हे सगळं घडेल याची खात्री वाटत नाही.” मी म्हणालो.

ती रागानं ताठ झाली.

“ काय म्हणायचंय तुम्हांला ?”

“ कदाचित तुम्हांला आश्चर्य वाटेल “ तिचा रेनकोट टेबलावर ठेवता ठेवता मी म्हटलं. “ तुमच्या नवऱ्याच्या बँक मॅनेजरनं आणि ड्रायव्हरनं त्यांची तोंडं बंद ठेवलेली नाहीयेत. प्रियाचं किडनॅपिंग झाल्याचं पोलिसांना आधीच समजलंय.

माझ्या शब्दांचा परिणाम तिच्या थोबाडीत मारल्यापेक्षा जास्त झाला.

“ तुम्ही खोटं बोलताय.” ती ताडकन उठून उभी राहिली. तिचा चेहरा पांढराफट्ट पडला. “ तुमचा तोल सुटलाय. तुम्हांला पैसे घ्यायची भीती वाटायला लागलेय.”

“ तुम्हांला असं वाटतं ?” तिच्या घाबरलेल्या अवस्थेमुळं मला स्थिर व्हायला मदत झाली. “ आज सकाळी तुमच्या नवऱ्याच्या बँकेच्या मॅनेजरनं पोलिसांना फोन केला आणि तुमच्या नवऱ्याला तातडीनं मोठ्या रकमेची गरज असल्याचं सांगितलं. माझा असा अंदाज आहे की पोलीस आणि मॅनेजरमध्ये असं ठरलंय की जर छोट्या नोटांच्या रूपात मोठ्या रकमेची मागणी कुणी बँक ग्राहकाने केली, तर मॅनेजरने लगेच पोलिसांना कळवायचं. पोलिसांना आपोआप समजेल की ही रक्कम कुणाची तरी डिमांड पूर्ण करण्याकरिता काढलेली आहे. “

“ आणि हे तुम्हांला कसं कळलं ?” तिनं ओरडून विचारलं.

मी तिला माझ्या नव्या जॉब बद्द्दल सांगितलं. आणि माझं पोलिसांशी झालेलं बोलणं देखील. “ माझा पोलीस मित्र राहूल तुमच्या ड्रायव्हरशी आधीच बोललाय.” मी बोलणं सुरु ठेवलं. “ कदाचित तुम्हांला माहित नसेल की तुमचा ड्रायव्हर एक माजी पोलीस आहे. त्यानं राहूल ला, प्रिया तिच्या मैत्रिणीला भेटली नसल्याचं आणि ती घरी परतली नसल्याचं सांगितलंय. या गोष्टींना एकत्र करून पोलिसांनी दोन अधिक दोन चार असा सरळ अर्थ काढून प्रियाचं अपहरण झाल्याचा निष्कर्ष काढलाय. आणि आता तो या परिस्थितीला तोंड द्यायला पूर्ण तयार आहे.”

रिया ताड्कन खुर्चीत कोसळली. आता ती सुंदर दिसत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट होतं. तिचा चेहरा कुरूप वाटत होता.

“ आता आपण काय करायचं ?” शेवटी ती म्हणाली. विमनस्क अवस्थेत तिनं खुर्चीवर हाताची मूठ बडवायला सुरुवात केली. “ मला कसंही करून पैसा हवाय.”

“ मी तुम्हांला आधीच सावध केलं होतं “ मी म्हणालो. “ तुम्हांला सांगितलं होतं की पोलीस यात येणार म्हणून. “

“ तुम्ही काय सांगितलं ते मरु दे. आता पुढं काय करायचं ते बोला “

“ तुम्ही आधी सगळं पूर्ण ऐकून घ्या. मग काय करायचं ते ठरवा. “

मी तिला सगळं सांगितलं. दारुड्याबद्दल, प्रियाच्या कारला झालेल्या धडकेबद्दल आणि पोलीस प्रियाच्या गाडीला शोधायला लागलेत इथपर्यंत. आणि हे देखील सांगितलं की जर त्यांनी तिची कार शोधून काढली तर ते तिच्या नवऱ्याला बोलावतील आणि प्रश्नांची सरबत्ती त्याच्यावर सुरु करतील.

ती एकदम पुतळ्यासारखी स्थिर झाली.

“ तर हे सगळं असं आहे.” मी म्हणालो. “ आपल्या बाजूनं एक गोष्ट आहे. जोपर्यंत तुमचा नवरा पोलिसांना बोलावत नाही, तोपर्यंत ते कारवाई करणार नाहीत. ज्यावेळी तुमचा नवरा पैसे देण्यासाठी जाईल त्यावेळी देखील ते त्याच्या मागून येणार नाहीयेत. प्रत्येक गोष्ट तुमच्या नवऱ्यावर अवलंबून आहे. तुम्हांला काय वाटतं ? पोलीस ज्यावेळी प्रियाच्या गाडीबद्दल त्याला विचारतील तेव्हा तो तिच्या किडनॅपिंगबद्दल काय सांगेल ?”

“ नाही. तुमच्या फोन कॉल नंतर तो म्हणाला की तो पोलिसांना बोलवणार नाही. यासाठी मला त्याला रिक्वेस्ट पण करावी लागली नाही. प्रिया परत यावी म्हणून तो पैसे द्यायला तयार आहे. “ ती म्हणाली.

“ ठिक आहे. तुम्हांला जर इतका ठाम विश्वास असेल तर आपण अजूनही योजना पुढे सुरु ठेवू शकतो.”

“ मला खात्री आहे. “

मी माझ्या हातातल्या घड्याळाकडं पाहिलं. बरोबर साडे अकरा वाजले होते.

“ मी बघतो पोलिसांनी नवीन काय शोधलंय ते.” मी म्हणालो आणि फोनकडे गेलो. राहूल ला फोन लावला व तो फोनवर आल्यावर त्याला मी विचारलं “ काही नवीन?”

“ सध्यातरी नाही “ तो म्हणाला. अजून आम्हांला तिची कार सापडलेली नाहीय. फर्नांडिसनं दहा मिनिटांपूर्वीच पैसे काढलेत. सर्व पोलीस तयारीत आहेत. मला तीन वाजता फोन कर. तोवर आम्हांला कार सापडलेली असेल.”

मी हो म्हणून फोन ठेवला.

रिया माझ्याकडं पाहायला लागली.ती खूप टेन्शन मध्ये आली होती.

“ त्यांना अजून प्रियाची कार मिळालेली नाहीय आणि कदाचित ती सापडणार देखील नाही.” मी म्हणालो.

“ आता पुढचं काम म्हणजे प्रियाचं पत्र तुमच्या नवऱ्यापर्यंत पोहोचवणं.” मी कादंबरीतून ते पत्र बाहेर काढलं. माझ्या बोटांचे ठसे त्यावर उमटू नयेत म्हणून मी ते प्लॅस्टीकच्या पिशवीत घातलं होतं.

“ तुमचं पत्र तुम्हांला कसं मिळतं ?”

“ गेटवर पत्रपेटी आहे.”

जेव्हा तुम्ही परत जाल, तेव्हा हे पत्र त्या पेटीत टाका. या पत्रात उद्या पैसे देण्याविषयीच्या सूचना आहेत.” तिनं

पत्र घेताच मी म्हणालो,” हे करताना तुमच्या बोटांचे ठसे त्यावर उमटणार नाहीत याची काळजी घ्या.”

तिनं ते पत्र तिच्या पर्समध्ये ठेवलं.

“ तर तुम्ही हे पुढं सुरु ठेवणार आहात ?” तिनं विचारलं.

“ त्यासाठीच तर तुम्ही मला पैसे देणार आहात.बरोबर ना ? आपण हे करू शकू. कमीत कमी मी आता पोलिसांबरोबर काम करत असल्यानं त्यांच्या हालचालींची आपल्याला माहिती मिळत राहील. जर काही वाईट घडतंय असं वाटलं तर मी तुम्हांला कळवेन.आता पुढचा प्लॅन असा आहे : मी प्रियाला फोन करेन आणि उद्या रात्री ११ च्या फ्लाईटनं तिला बोलावून घेईन. ती इथं एक वाजेपर्यंत पोहोचेल आणि इथंच वाट पाहत बसेल. तुमचा नवरा किनाऱ्याजवळील रस्त्यावरून गाडी चालवत राहील आणि बॅटरीचा प्रकाशझोत दिसताच पैशांची बॅग तिथंच टाकून सरळ पुढं प्रियाला घेण्यासाठी निघून जाईल. रात्री अडीच पर्यंत पैसे माझ्या ताब्यात येतील.तुम्ही इथं याल आणि मी तुम्हा दोघीना पावणे- तीन पर्यंत भेटेन.आपण पैसे वाटून घेऊ. तुमच्या नवऱ्याला प्रिया न भेटल्यानं तो घरी परत जाईल.आणि तुम्ही दोघी तिथं त्याची वाट पाहताना त्याला दिसाल. तुम्ही त्याला सांगाल तो बाहेर पडल्या पडल्या प्रिया घरी आली म्हणून. मी तिला सगळं काही शिकवलंय. ती त्याची खात्री पटवेल. असा प्लॅन आहे. “

तिनं बराच वेळ विचार केला आणि नंतर हो म्हटलं.

“ ठिकय … तर मग उद्या रात्री पावणे तीन वाजता इथंच !”

“ तुमच्या नवऱ्याच्या ड्रायव्हरकडं लक्ष द्या. तुम्ही बाहेर पडताना त्याच लक्ष जाणार नाही याची काळजी घ्या. हा माणूस पोलिसांचा हेर आहे. त्याला जे काही संशयास्पद आढळेल ते तो पोलिसांच्या कानावर घालेल.तेव्हा जपून.”

“ आलं लक्षात.” ती म्हणाली.

“ ठिकय. आता मला काही पैसे हवेत.” मी म्हणालो.” केबीनचं भाडं द्यायचं आहे.”

तिनं पैसे दिले.

“ उद्या रात्री भेटू. “

“चालेल.” ती म्हणाली. तेव्हा तिच्यात काहीतरी वेगळपण जाणवलं. पण नक्की काय ते समजलं नाही. पण त्यामुळे मी अस्वस्थ झालो.

तिनं माझ्याकडं पाहिलं.

“ तुम्हांला खात्री आहे हे सगळं तुम्ही व्यवस्थित हॅन्डल करू शकाल याची ?”

“ मला नसती तर हे काम मी घेतलंच नसतं. “

“ मला पैशांची खूपच गरज आहे. आय होप तुम्ही ते माझ्यासाठी मिळवाल आणि यासाठी मी तुम्हांला योग्य तो मोबदला देतेय.”

ती दाराकडे वळली, छत्री उचलली आणि पावसात दिसेनाशी झाली.

मी तिला कार पार्किंगकडे जाताना पाहत राहीलो.

नंतर जेव्हा ती निघून गेली तेव्हा मी केबिनच्या मालकाच्या ऑफिसमध्ये आलो आणि केबीनचं भाडं दिलं.

“ काम कसं चाललंय मि. हरीश ?” पावती देता देता त्यानं विचारलं. क्षणभरासाठी मला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळलाच नाही. मग लक्षात आल्यावर मी हसलो.

“ छान चाललंय “ मी म्हणालो.” मला आणखी एका रात्रीसाठी केबिन लागेल. चालेल ना ? “

“ ऍज यू विश “ तो म्हणाला. त्यानं खिडकीच्या बाहेर पाहिलं. “ असा पाऊस मी कधी पहिला नाही. माझ्या धंद्याची पार वाट लावणार हा. “

“ उद्या निवळेल वातावरण “ मी समजावत त्याला म्हणालो. “ एवढं वाईट वाटून घेऊ नकोस. मी आत्ताच तुला भाडं दिलंय ना ? मग ? “

त्याला ऑफिसमध्ये सोडून मी केबिनकडे परतलो. मी तिथं दोन वाजेपर्यंत वेळ काढला. नंतर पावसातूनच धावत रस्त्यापलीकडील रेस्टोरेंट मध्ये गेलो आणि सॅन्डविच खाल्लं. त्यानंतर मी केबिनमध्ये परतलो व वीणाला फोन करून मला घरी यायला कदाचित वेळ होईल असं सांगितलं.

“ कामाचं नक्की झालं हरीश ?”

“ होय” मी म्हणालो.” आजपासून आपल्याला काळजी करायची गरज नाही.”

वास्तविक असं असतं तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटलं. कारण काळजी करण्यासारखं पुष्कळ माझ्याजवळ होतं.

“ खूप आनंदाची बातमी दिलीस.” तिच्या बोलण्यानं मला जास्तच लाज वाटली. “ तुला राहूल नं कशाला बोलावलं होतं ?”

“ मी घरी आलो की सांगेन आता फोनवर नाही बोलू शकत “

“ ठीकाय. लवकर घरी ये. मी तुझी वाट बघते. “

“ शक्य तितक्या लवकर येतो.”

तीनला पाच मिनिट असताना मी राहूल ला फोन केला. खूप वेळानं तो लाईनवर आला.


“ हरीश, अगदी वेळेवर फोन केलास” तो उत्तेजित वाटत होता. “ आम्हांला तिची कार सापडलीय. तुला पणजीचा पार्किंग लॉट माहिताय ?” शक्य तितक्या लवकर मला तिथं भेट. मी तिकडेच चाललोय. “

हे ऐकून माझ्या घशाला कोरड पडली. हृदय जोरात धडधडलं. मी त्याला येतो म्हणून सांगून फोन ठेवला.

II


एक लालबुंद चेहऱ्याचा पोलीस प्रियाच्या गाडीजवळ होता. राहूल आणि त्याच्यासोबत दोन इतर पोलीस ; गाडीची तपासणी करण्यात गुंतले होते. पाऊस थांबला होता. सूर्य बाहेर आला होता.

मी तिथं पोहोचल्यावर राहूल मला म्हणाला “ हे बघितलंस हरीश ? आपलं नशीब खूप जोरावर आहे. -मोडलेला पंखा बघ हा “

“ नक्की तिच्याच गाडीचा आहे ?” काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं.

“ आम्ही गाडीचा नंबर, लायसन्सचा पत्ता बघितलाय. नक्की तिच्याच गाडीचा आहे हा.” असं म्हणून तो त्याच्या सोबतच्या दोन पोलिसांकडे वळला.” गाडीवरचे ठसे तपासा आणि गाडी हलवू नका. तुमचं काम संपलं की गाडी आहे त्याच अवस्थेत ठेवा. आणि मला रिपोर्ट कळवा.”

राहूल पुन्हा माझ्याकडं वळला. “ मी आता फर्नांडिसशी बोलणार आहे. या मोडलेल्या पंख्यामुळं मला त्याच्याशी बोलायची संधी मिळालीय. आपण तुझी गाडी घेऊया म्हणजे फर्नांडिसशी बोलल्यानंतर तू मला हेड क्वार्टरला सोडशील.”

मला त्या क्षणी वाटलं की आम्ही येतोय म्हणून रियाला सावध करावं. पण तशी संधीच मिळाली नाही. फर्नांडिसच्या घरी पोहोचायला आम्हांला दहा मिनिटं पण लागली नाहीत.

फ़र्नांडीसचं घर उंच उंच भिंतींनी वेधलं होतं. जसे आम्ही लाकडाच्या भक्कम फाटकाजवळ पोहोचलो, एक दणकट शरीरयष्टीचा, राखाडी रंगाचा पोशाख घातलेला माणूस त्याच्या फाटकाजवळच्या केबिनमधून बाहेर आला आणि चौकस बुद्धीनं आम्हांला पाहायला लागला.

“ मिस प्रिया फर्नांडिसला बोलवा.” राहूल त्याला म्हणाला. त्यानं नकारार्थी मान हलवली.

“ त्या घरात नाहीत.” तो म्हणाला
.” कुठं भेटेल ?”

“ माहित नाही.”

“ मग मला मिस्टर फर्नांडिसशी बोलावं लागेल.”

“ अपॉइंटमेंटशिवाय भेटता येणार नाही.”

“ मी पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि हे कायद्याचं प्रकरण आहे समजलं ? “

त्यानं थोडं आश्चर्यानं पाहिलं.

“ अच्छा असं आहे तर. थोडं थांबा साहेब” असं म्हणून तो त्याच्या केबिन मध्ये गेला. त्याला फोन करताना मी खिडकीतून पाहिलं. थोड्या वेळानं बाहेर येऊन त्यानं फाटक उघडलं.

“ आपण जाऊ शकता साहेब.”

आम्ही वाळूच्या रस्त्यावरून पुढं निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत आणि फुलं पसरली होती. त्या दोघांचा मिलाफ खूप सुंदर दिसत होता. आम्ही घराजवळ पोहोचलो. ते स्पॅनिश पद्धतीनं बांधलेल टेरेसचं घर होतं. घर पाहिल्यावरच ते एखाद्या कोट्याधिशाचं असणार याची खात्री होत होती.

“ जबरदस्त घर आहे “ मी माझी कार चमचमत्या रोल्स शेजारी पार्क करत असताना राहूल म्हणाला,” तुझ्या जवळ अशा कार्स असतील तर ?”

“ झकास ...मस्त वाटेल “ मी म्हणालो. खरं तर मला खूप टेन्शन आलं होतं. पैसे मला मिळणार की नाहीत हे आता फर्नांडिस काय बोलतो त्याच्यावर ठरणार होतं.

मुख्य दरवाजावर नोकर आमची वाट पाहत उभा होता. हा नोकर जाडजूड, म्हातारा आणि दुसऱ्याला तुच्छतेनं बघणारा माणूस होता.

“ पोलीस इन्स्पेक्टर राहूल “ राहूल नं त्याची ओळख करून दिली. “ मला मि. फर्नांडिसना भेटायचंय.”

“ माझ्या मागून या. “

त्या नंतर आम्ही घरातला हॉल ओलांडून त्याच्या मागोमाग समुद्राकडे तोंड असलेल्या टेरेसवर गेलो. रिया आरामखुर्चीत हातात कुठलंसं मासिक चाळत बसली होती. तिनं डोळ्यावर गॉगल घातला होता. आम्ही टेरेसवर पोहोचताच तिनं आम्हांला पहिलं.

एक उंच, बारीकसा लाल निळा शर्ट घातलेला माणूस एका आरामखुर्चीत बसला होता. हा नक्कीच फर्नांडिस असला पाहिजे असं मला वाटलं. तो हँडसम दिसत होता. त्याचे दाट केस राखाडी रंगाचे होते. त्याचे स्थिर निळे डोळे अगदी जिवंत वाटत होते. त्याच्याकडं पाहिल्यावर तो आजारी आहे यावर विश्वास ठेवणं जड जात होतं.

“ मि. फर्नांडिस ?” राहूल नं विचारलं.

“ अगदी बरोबर, इन्स्पेक्टर… बसा. मी तुमच्यासाठी काय करू शकतो ?” त्याचा आवाज कोरडा आणि शांत होता. त्याचे डोळे त्याच्या शब्दांना साथ देत नव्हते.

“ हे मि. हरीश “ माझी ओळख करून देत राहूल म्हणाला. “ हे माझ्यासोबत काम करतात. “ तो खाली बसला नाही. फर्नांडिसच्या बोलण्यातून त्यानं ताडलं असावं की आमचं येणं त्याला आवडलं नव्हतं. “ मी मिस प्रिया फर्नांडिसला भेटायला आलो होतो. पण ती इथं नाही असं समजलं. “

“ बरोबर आहे. मग ?”

“ मला तुम्हाला त्रास देण्याबद्दल वाईट वाटतंय मि. फर्नांडिस” राहूल अगदी सौम्य भाषेत म्हणाला,” पण मी एका अपघाताच्या केसवर काम करतोय. काल रात्री एका अपघातात एक स्त्री गंभीररीत्या जखमी झालीय आणि दुसऱ्या गाडीचा ड्रायव्हर पळून गेला. त्यामुळे दिवसभर आम्ही सगळ्या गाड्या तपासत फिरतोय. आणि आम्हांला तुमच्या मुलीची कार पणजीच्या मोठ्या पार्किंग लॉट मध्ये मिळाली. तिच्या गाडीचा एक पंखा फारच वाईटरित्या मोडलाय. या अपघाताबद्दल आम्हांला कळालं तर बरं होईल.

मी फर्नांडिसकडं पाहिलं आणि मला घाम फुटला. तो राहूल ला सांगेल की त्याच्या मुलीला किडनॅप केलंय म्हणून ? त्याचा चेहरा भावनाशून्य होता. त्यानं राहूल ला बारकाईनं न्याहाळलं , ते ही कोणतीही उत्सुकता न दाखवता.

“ जर माझ्या मुलीनं कुणाला ठोकरलं असेल तर ती अशी पळून जात नाही. मला खात्री आहे ती तिच्या मित्रांसोबत आहे. ते कोण आहेत ते मला नाही माहित. पण आजकालची मुलं सगळ्याच गोष्टी आईवडिलांना कुठं सांगतात ?”

मी रियाकडं पाहिलं. तिनं परत मासिक चाळायला सुरु केलं होतं. जे काही चाललंय त्यात तिला जराही इंटरेस्ट नाही असं ती दाखवत होती.

“ ती परत केव्हा येणार आहे ?” राहूल नं विचारलं.

“ काही दिवसांत येईल ती. ती आली की मी तिच्याशी याबद्दल बोलेन. पण मला खात्री आहे की तिचा या अपघाताशी काही संबंध नाहीय.

“ तिची कार पार्किंग लॉट मध्ये का आहे सांगू शकाल ?”

“ नाही. माझी मुलगी तिच्या गाड्यांचं काय करते या गोष्टीत मला इंटरेस्ट नाही. “ तो उठला आणि समोरच्या टेबलवर पडलेलं पुस्तक त्यानं उचललं.

“ प्रिया परत आल्यावर जर तुमची भेट घेणं गरजेचं वाटलं तर तशी मी व्यवस्था करेन. पण मला खात्री आहे की तोपर्यंत तुमच्या अपघाताची जबाबदार व्यक्ती तुम्हांला सापडलेली असेल. तोपर्यंत गुड डे इन्स्पेक्टर.”

“ ठीकाय तर “ असं म्हणून राहूल आणि मी माझ्या कारकडे निघालो.

“ फारच थंड डोक्याचा आहे नाही ?” राहूल मला म्हणाला.

मला अगदी मरगळल्यासारखं वाटत होतं.

“ आपल्याला अजून नाक्की तिचं अपहरण झालंय की नाही याची खात्री नाहीय.” मी म्हणालो,” कदाचित त्याच्या बिझनेसच्या कामासाठी त्याला ते पैसे हवे असतील.”

राहूल नं नकारार्थी मान हलवली.

“ मला नाही वाटत तसं. एखादा कोट्याधीश जरी असला तरी जीवन मरणाचा प्रश्न असल्याखेरीज तो बँक मॅनेजरला रविवारी बँक उघडायला लावणार नाही. मी अगदी पैजेवर सांगतो तिचं अपहरण झालंय. आपण हे कमिशनरला सांगितलं पाहिजे. “

आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो त्यावेळी कमिशनर विझलेली सिगार तोंडानं चावत बसला होता.

राहूल नं त्याला प्रियाच्या सापडलेल्या कारबद्दल, मोडलेल्या पंख्याबद्दल आणि फर्नांडिसबरोबर झालेल्या मुलाखतीबद्दल सांगितलं.

“ तो काहीच बोलायला तयार नाही.” शेवटी तो म्हणाला. “ त्यालाही दोष देण्यात काहीच अर्थ नाही. आपण आपल्यातर्फे मुलीचा शोध घ्यायला सुरु करायचं काय ?”

कमिश्नरनं आपली सिगार कचऱ्याच्या पेटीत भिरकावली.

“ नको. आपण वाट बघू. मला माझी मान उगाचच मुसळात घालायची नाही. फर्नांडिस फार मोठी असामी आहे. त्याचे हात वरपर्यंत पोचलेले आहेत. आणि अशावेळी आपण जर काही हालचाल केली आणि त्याच्या मुलीचं काही बरंवाईट झालं तर मला एकट्याला तोंड द्यावं लागेल. त्यापेक्षा वाट पाहू. “

“ ठीकाय. जशी तुमची इच्छा.” असं म्हणून राहूल माझ्याकडं वळला. “ फोनजवळच रहा. कदाचित तुझी तातडीनं गरज लागेल. तू घरी निघालंयेस का ? “

“ होय. मी जर कुठं बाहेर गेलो तर मी माझा फोन नंबर नीनाकड देऊन जाईन. म्हणजे तू मला कॉन्टॅक्ट करू शकशील.”

“ ठीकाय” राहूल म्हणाला.

त्यानंतर मी घरी निघून आलो.

वीणा बागेमध्ये ठेवण्याच्या भांड्यांवर रंगकाम करत होती. मला बघताच तिनं रंगवायचा ब्रश खाली ठेवला व माझ्याकडं धावत आली.

“ माझ्या लाडक्या …. मला किती आनंद झालाय म्हणून सांगू” तिनं मला जवळ जवळ मिठीच मारली.

“ सगळं ठीक झालं ना ?”

मी तिला जवळ घेऊन सोफ्यावर बसलो.

“ सारं काही ठीक झालंय. मी पुन्हा जॉब मिळवलाय. आणि तो सुद्धा माझा आवडता.”


तिनं मला विचारलं की आज रविवार असताना एवढ्या तातडीनं का बोलावलं होतं ? मी तिला फर्नांडिसबद्दल सांगितलं.

“ राहूल ला वाटतं त्या मुलीचं अपहरण झालय. पण जोवर आमची खात्री होत नाही तोवर मला याबद्दल विचार करायची गरज वाटत नाहीय. मला तर असं वाटतं की फर्नांडिसला त्याच्या बिझनेससाठी ते पैसे हवे असणार. “ तिचं लक्ष दुसरीकडं वळवण्यासाठी मी तिला तिच्या कामाबद्दल विचारलं.

“ आता तू जॉब सोडलास तरी हरकत नाही. “ मी म्हणालो.

“ मला वाटत सुरु ठेवावा. कमीतकमी हा सिझन संपेपर्यंत तरी.” ती म्हणाली.


रात्रीचं जेवण उरकल्यावर मी तिला सांगितलं की मी जरा पोलीस हेडक्वार्टरला जाऊन चक्कर टाकून नवीन काही घडलंय का ते पाहून येतो.

“ फार वेळ नाही लागणार. पण तिथं जाऊन आलेलं बरं.” मी तिला म्हणालो. नंतर मी जवळच्याच एका स्टोअरकडे गाडी वळवली आणि तिथून प्रियाला फोन लावला.

“ उद्या रात्री ठरलंय” मी म्हणालो. “ ठरल्याप्रमाणं सगळं होतंय. आता तू उद्या रात्री 11 च्या प्लेनने इकडं ये. तिथून बसने पणजी स्टॅन्डला ये. साधारण एक वाजेपर्यंत तू पोहोचशील. मी तुझी तिथं वाट पाहीन. तिथून मी तुला केबिनला सोडेन. त्यानंतर मी वस्तू ...तुला माहिताय ती.. कलेक्ट करेन आणि परत येईन.”

तिनं सगळं समजल्याचं सांगितलं. तिच्या आवाजात उत्सुकता होती.

“ तुला खात्री आहे सारं काही व्यवस्थित होईल ? “

“ होय… काळजी करू नकोस. मी तुझी पणजी स्टॅण्डवर वाट पाहीन आणि तुला पीक अप करेन.” एवढं बोलून मी फोन ठेवला. नंतर मी पोलीस हेडक्वार्टरला फोन लावला. तिथल्या ड्युटीवरच्या पोलिसानं राहूल घरी गेल्याचं सांगितलं. काहीही नवीन घडलेलं नसणार म्हणूनच तो घरी गेला असणार असा विचार करून मी पण घरी परतलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ नंतर मी पोलीस क्वार्टर ला गेलो. इतक्या वर्षांनंतर नेहमीच आयुष्य जगताना वेगळंच फील येत होतं आणि त्यापेक्षा वेगळं वाटत होतं टेबल वर्क करताना.

राहूल च्या सेक्रेटरीने मला फायलींचा गठ्ठाच दिला व त्या वाचून काढायला सांगितलं.

मी फाईल्स चाळायला सुरुवात केली. राहूल सकाळी. ११ नंतर आला . आल्यावर तो माझ्या टेबलच्या कोपऱ्यावर बसला.

“ कसं वाटतंय पुन्हा काम करताना ?” तो म्हणाला.

“ ठीकाय.” मी म्हणालो, “ हे माझ्या आवडीचं काम आहे. फर्नांडिसबद्दल नवीन काही कळलं ?”

“ नवीन काही नाही. पार्किंग जवळ मी एक माणूस ठेवलाय गाडीवर लक्ष ठेवायला. जर ती गाडी न्यायला आली तर तो मला फोन करेल. यापेक्षा जास्त मी काही करू शकत नाही.आपली सगळी यंत्रणा मी तयार ठेवलीय मात्र. “

“ जर फर्नांडिसनं पैसे दिले आणि मुलगी परत आली तर तुला काहीच ऐकायला मिळणार नाही.” मी म्हणालो.


आजकाल अपहरणकर्ते सहसा आपल्या सावजाला जिवंत सोडत नाहीत. सावज मरणंच त्यांच्यासाठी सेफ असतं.” राहूल म्हणाला. “ जर तीच अपहरण झालं असेल तर मी पैज लावून सांगतो की फर्नांडिस आपल्याला बोलावेलच.” तो टेबलवरून उठला. “ चल, मलाही इतर कामं आहेत. तुला काही लागलं तर मी पलीकडंच आहे.”

तो तिथून गेल्यावर मी फाईल्स बाजूला सारून सिगारेट पेटवली. उद्या सकाळी, नशिबानं मी पंचवीस लाखांचा मालक होणार होतो यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं. पैसे लहान नोटांच्या रूपात असणार होते. आधीच ठरवलं होतं की एक सेफ डिपॉजिट भाड्यानं घ्यायचं आणि सगळे पैसे तिथं ठेवायचे. गरज लागेल तसे पैसे काढायचे. मी सावध राहणं खूप गरजेचं होतं. मी माझं राहणीमान लगेच बदलू शकत नव्हतो. ते धोक्याचं होतं. नंतर मी स्टॉक मार्केट मधून फायदा झाल्याचं सांगू शकत होतो. पण त्यासाठी किमान एक वर्ष तरी थांबावं लागणार होतं.

मी आता दुपारचं जेवण घ्यायचा विचार करत होतो तेवढ्यात माझ्या खोलीचं दार जोरात ढकलून राहूल आत आला. त्याचा चेहराच सांगत होता की काहीतरी घडलंय. माझं काळीज धडधडायला लागलं.

“ मला वाटतं आपल्याला काहीतरी धागा मिळालाय.” तो म्हणाला. “ माझ्या बरोबर हेडक्वार्टरला चल. वाटेत तुला सांगतो. “ आम्ही लिफ्टकडे जात असताना तो म्हणाला.” नशीब कसं असतं बघ. मी शनिवारी रात्री नेहमीचे रिपोर्ट्स चाळत होतो. आणि त्यात मला असं काही मिळालं जे आपल्या उपयोगाचं ठरेल. टॉप-इन-टाउनच्या पार्किंग एरियात

एक माणूस बेशुद्धावस्थेत सापडल्याचा रिपोर्ट होता तो. तुला माहिताय ती जागा ?”

हे ऐकून माझ्या घशाला कोरड पडली. मला बोलताच येईना. मी मानेनंच हो म्हटलं.

“ या माणसाच्या डोक्यावर भीषण वार केला गेला होता. बारमननं पोलिसांना बोलवलं. त्यानं पोलिसाला सांगितलं की हा माणूस एका मुलीच्या मागोमाग पार्किंग एरियामध्ये गेला होता. त्याच्या कल्पनेनुसार ती मुलगी प्रिया फर्नांडिस होती.

“ त्याला का वाटलं तस ?” मी उगाच काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.

“ पणजीमध्ये ती पोरगी जाम फेमस आहे. पेपरमधून तिचे फोटो सतत येत असतात. त्याला खात्री आहे ती पोरगी प्रियाच होती याची. त्याला आता हेडक्वार्टर ला बोलावलय. माझ्याजवळ तिचे काही फोटो आहेत. मला वाटत तो तिला ओळखेल म्हणून.”

“ त्या दुसऱ्या माणसाला खूप लागलंय का ?”

“ त्याच्या डोक्यावर एक मोठं टेंगुळ उठलंय. पण बाकी काही जास्त नाही लागलं. कोणी मारलं असेल त्याला ? जर ती मुलगी प्रिया असेल, तर ती तिथं काय करत होती? “

“ कदाचित ती नसेल.”

“ ते कळेलच आता आपल्याला.”

दहा मिनिटांत आम्ही हेडक्वार्टरला होतो. तिथं टॉप-इन-टाउनचा बारमन होता. प्रियाला त्याच्याशी बोलताना मी पाहिलं असल्यानं मी लगेच त्याला ओळखलं.

राहूल नं प्रियाचे काही फोटो त्याला दाखवले.

“ हीच होती ती.शंभर टक्के हीच.” बारमन म्हणाला.

“ किती वाजता ती तिथं आली होती ?” राहूल नं माझ्याकडं पाहात त्याला विचारलं.

“ नऊ नंतर थोड्या वेळानं. असं वाटत होतं की कुणाच्या तरी शोधात ती तिथं आली होती. नंतर तिनं दुसरा एखादा बार जवळपास आहे का असं विचारलं. मी नाही म्हणून सांगितलं. ती तिथून बाहेर पडत असताना तिथं एक दारुड्या माणूस होता. पार झिंगलेला होता तो ! ती त्याच्याजवळून जात असताना त्यानं तिचा हात धरला. तिनं त्याला ढकललं आणि ती बाहेर निघून गेली.तो पण तिच्या मागोमाग गेला. “

“ पुढं काय झालं ?”

“ दहा मिनिटांनी काही लोक आत आले आणि कार पार्किंगमध्ये एक माणूस पडल्याचं सांगितलं. मी बाहेर जाऊन पाहिलं तर तो दारुड्या तिथं पडलेला दिसला. खूप रक्तबंबाळ झाला होता तो! म्हणून मी पोलिसांना बोलावलं.”

“ तो दिसण्यापूर्वी गाड्या वैगेरे तिथून गेल्या होत्या का?”

“ मुलगी बाहेर पडल्यावर पाच मिनिटांनी दोन कार सुरु झाल्याचा व तिथून निघून गेल्याचा आवाज मी ऐकला. त्यातली एक जास्त ताकदीची स्पोर्ट्स कार होती. तिच्या आवाजावरून मी सांगतो.”

“ आणि दुसरी ?”

“ एक साधारण कार.”

“ म्हणजे ती इथं कुणाला कुणाला तरी भेटायला आली होती आणि नंतर ती तिथून बाहेर पडली ?”

“ बरोबर.”

“ त्या मुलीचा पोशाख कसा होता ?”

बारमननं त्या रात्री प्रियानं घातलेल्या पोशाखाचं विस्तृत वर्णन केलं आणि तिथल्या एका पोलिसानं ते लिहून घेतलं.

बारमन निघून गेल्यावर राहूल म्हणाला,” मला वाटतं आपण त्या दारुड्याची हॉस्पिटलमध्ये जाऊन गाठ घ्यावी.”

तो दारुड्या आम्हाला डोक्याला पट्टी बांधलेल्या अवस्थेत बिछान्यात पडलेला आढळला. त्याच्या त्या रात्री केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप झाल्याचं दिसत होतं. त्यानं त्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री खूप दारू ढोसल्याचं मान्य केलं.

“ मी तिला पाहिलं,” तो म्हणाला,” आणि विचार केला की ती नक्कीच कॉलगर्ल असणार. कुणीही चांगली मुलगी अशा ठिकाणी फिरकत नाही. तिनं मला झटकलं, पण ही देखील तिची बोलावण्याची पद्धत असावी असं मला वाटलं. म्हणून मी तिच्या मागून कार पार्किंगकडं गेलो. आता वाटतं माझी ओळखण्यात चूक झाली. मी तिच्या भोवती फिरत होतो, तेवढ्यात अचानक अंधारातून एक माणूस बाहेर आला आणि त्यानं माझ्या डोक्यावर प्रहार केला. बस्स ! मला माहित आहे ते इतकंच.”

“ तो दिसायला कसा होता ?” राहूल नं त्याला विचारलं.

मी नेमका त्यावेळी बिछान्याच्या दुसऱ्या बाजूला होतो आणि माझ्या हृदयाची धडधड त्या दारुड्याला ऐकू जाईल की काय अशी भीती मला त्यावेळी वाटत होती.

“ तो एक उंच माणूस होता. मी त्याला ओळखू शकणार नाही. मी त्याचा चेहरा पहिलाच नव्हता. त्यावेळी खूप अंधार होता आणि तो खूप चपळ होता. मला काही करायची संधीच मिळाली नाही. “

ऑफिसकडं आम्ही परतत असताना राहूल म्हणाला, “ ती टॉप-इन-टाउन कडे कशाला गेली असेल ? तिचं तिच्या मैत्रिणीबरोबर मुव्हीला जायचं ठरलेलं असताना ? बरोबर नऊ वाजता त्या भेटणार होत्या. पण बरोबर नऊ नंतर ती टॉप इन टाउन कडे आली. कशामुळं तिनं हा बेत बदलला असेल ?”

“ कदाचित तिला फोन आला असेल.”

“ हां. असं असू शकेल. तिचं तिथून अपहरण झालं असेल ? मी फर्नांडिसच्या घरी जाऊन येतो. कदाचित तिथं काही माहिती मिळू शकेल तिथल्या नोकरांकडून.”



त्या दिवशी संध्याकाळचे पाच वाजण्यापूर्वीच राहूल नं त्याला हवी असलेली माहिती मिळवली. तो माझ्या ऑफिसमध्ये आला. आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे टेबलच्या कोपऱ्यावर बसला.

“ साधारणपणे पावणे नऊ वाजता प्रिया मुव्हीला जाण्यासाठी बाहेर पडत असताना तिला एक कॉल आला होता.” त्यानं मला सांगितलं.” तो कॉल तिचा मित्र विल्यम्सचा होता. मी विल्यम्सला भेटलो. तो मेडिकलचा स्टुडन्ट आहे. प्रिया आणि तो अधून मधून फिरायला जात असतात. त्याच्यावर संशय घेण्यासारखं आम्हांला काही मिळालं नाही. आता काहीतरी घडायची वाट बघण्याशिवाय आपल्या हातात काही नाही असं दिसतंय.”

“ मी काय करू ? थांबू की घरी जाऊ ? “ मी विचारलं.

राहूल नं मानेनंच जायला परवानगी दिली. “ तशी काही गरज वाटली तर मी सरळ घरीच येतो तुझ्या.” राहूल म्हणाला.

“ मला आज थोडं बाहेर जायचंय.” मी म्हणालो. “ कदाचित घरी यायला वेळ लागेल.”

“ ठीकाय. जा तू. गरज वाटली तर मी तुला निरोप पाठवेन.तू कुठं भेटणार ? “

या प्रश्नासाठी मी तयार होतो. “ कॅसिनो बार मध्ये. मी तिथून एक वाजता निघेन.तू मला दोन नंतर घरी भेटू शकतोस.”

तो गेल्यावर मी वीणाला फोन केला.

“ मला घरी यायला उशीर होईल. या बद्दल मी तुला आधीच बोललो होतो. राहूल ला सांगितलय की मी दोन नंतर घरी असें म्हणून.”

त्यानंतर ऑफिसमधून मी सरळ बीच केबिनकडं गाडी वळवली.


प्रकरण ७ वे


रात्री ठीक साडे बारा वाजता मी केबिन सोडली. व बसस्टॅन्डकडे निघालो. गाडी पार्क करून एन्क्वायरी विंडोकडे विमानतळावरून बस स्टॅन्ड कडे येणाऱ्या बसची चौकशी केली. रात्री मुंबईहून सुटणारं विमान गोव्याला एक तासात पोहोचतं आणि तिथून बस इथं एक दिढ तासात पोहोचणार होती.

नंतर मी स्वतःला एका टेलिफोन बूथमध्ये बंद केलं आणि पोलीस हेडक्वार्टरला फोन लावला. तिथल्या पोलिसानं सांगितलं की फर्नाडिस केस मध्ये काही प्रगती नव्हती आणि राहूल नुकताच घरी गेला होता. आता फर्नांडिसला फोन करायची वेळ आली होती.

प्रियाला तिच्या वडिलांना देण्यासाठी जे पत्र दिलं होतं, त्यात त्याला मध्यरात्रीनंतर फोनची वाट पाहायला सांगितलं होतं. त्यावेळीच त्याला पैसे कसे द्यायचे याची सूचना मिळणार होती.

त्या प्रमाणे खरंच तो थांबला होता. त्यानं स्वतः माझा कॉल रिसिव्ह केला.

“ तुम्हांला माहिताय कोण बोलतोय ते “ मी माझा आवाज बदलत म्हणालो,”पैसे मिळाले ?”

“ होय.”

“ ठीकय. आता लक्ष देऊन ऐका.” मी म्हणालो.” बरोबर दोन वाजता तुम्ही घरातून बाहेर पडा. तुमच्यावर आमची पाळत असेल. येताना रोल्स रॉईस मधूनच या. आणि किनाऱ्याच्या रोडवर गाडी चालवा. वाटेत कुठंही तुम्हांला टॉर्चचा लाईट दिसेल. तिथं थांबू नका. तो लाईट ओलांडून गेल्यावर गाडीच्या खिडकीतून पैशांची बॅग टाका. व सरळ पुढे पणजी सेंट्रल पार्किंगच्या दिशेने जा. तुम्ही कोणतीही चलाखी केली नाहीत, तर तुमची मुलगी तिथं तुम्हाला दिसेल. समजलं ?”

“ समजलं ?”

“ ठीकाय तर मग. कोणतीही चलाखी नको. एकटे या. मुलगीची काळजी करू नका. ती व्यवथित आहे. पण हुशारी दाखवलीत, तर ती तशी राहणार नाही.”

“ समजलं.”

मला फार सावध राहणार होतं. कारण या सगळ्या संभाषणात तो कुठंही विचलित झाल्यासारखा वाटला नाही. उलट अतिशय शांत वाटला तो.

मी फोन ठेवला आणि पार्किंगमध्ये माझ्या कारमध्ये जाऊन सिगारेट पेटवली. मी अतिशय नर्व्हस झालो होतो. जर माझ्या डोक्यात त्या दोन कॅसेटचा विचार नसता, ज्या - या प्रकरणात काही बरं वाईट घडलं, तर मला वाचवणार होत्या-तर मी हे सगळं केलंच नसतं. शिवाय सगळं काही मनाप्रमाणं घडलं तर माझ्या हातात पंचवीस लाख पडणार होते. हा विचार मनात येताच माझा नर्व्हसनेस नाहीसा झाला.

मी स्वतःला सारखी खात्री करून देत होतो की, काहीही वाईट घडणार नाहीय. त्याशिवाय रियानं आपल्या नवऱ्याच्या प्रतिक्रियांबद्दल देखील जसं सांगितलं होतं तसंच घडलं होतं. आता असं वाटत होतं, की प्रिया परत आल्यावर फर्नांडिस पोलिसांना फोन करण्याची शक्यता पण कमी होती.

प्रिया परत आल्यावर अर्थातच पोलीस तिची चौकशी करणार होते आणि याबद्दल मी प्रियाला आधीच सावध केलं होतं. पण फर्नांडिस सारखा श्रीमंत बाप तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना ते जास्त खोलात जाऊन चौकशी करण्याची शक्यताच नव्हती.

मी बस स्टॅन्डकड पाहिलं.
















VIENAYAK007


creative mind


ph.no.9076640007