Pahile prem - 2 in Marathi Comedy stories by Swapnil Tikhe books and stories PDF | पहिले प्रेम – अनंत, एकतर्फी, निरागस... (भाग २)

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

पहिले प्रेम – अनंत, एकतर्फी, निरागस... (भाग २)

मी अख्ख्या दिवसाचा जमाहिशेब केला तेव्हा बापाची बोलणी, चुकलेले नमस्कार अन मनाची झालेली ओढाताण या पलीकडे हाती काही लागले नव्हते. एकंदरच हे प्रेम किती महाग असते याची पुरती कल्पना आपल्याला पहिल्या दिवशीच आली. त्यामुळे शक्य तर यातून सुटका करून घेणेच फायद्याचे आहे हे आपला मेंदू आपल्याला न चुकता सांगत होता पण मन मात्र भलतीकडेच धावत होते अन खरे सांगतो त्याला आवरण माझ्या बापालापण जमलं नाही. पुढली तीन वर्षे त्याने सगळे उपाय केले, मला बदडून काढले, खुराक कमी केला, घरातली कामे माझ्या मागे लावली, मित्रांना माझ्या विरुद्ध फितवले अगदी सगळे मार्ग अवलंबून पहिले. तसा मी अभ्यासात फारसा हुशार नव्हतो, म्हणून बापाने मला प्रेमाची शपथ घातली आणि फर्स्ट क्लास ची अट ठेवली. कधी नव्हे ते त्या वर्षी डोक्याचा भुगा होई पर्यंत अभ्यास केला अन फर्स्ट क्लास मिळवला. तेव्हापासून गल्लीत सगळ्यांना समजला, आपण प्रेमाच्या शपथीवर कायपण करतो, आणि लोकांनी याचाच नको तेवढा गैरफायदा घेतला. समोरच्या काकूंनी त्यांचा पोटमाळा माझ्या कडून साफ करून घेतला, मित्रांचा गृहपाठ मीच करायचा असा जणू काही नियमच बनला. एक वेळ तर अशी आली होती की जवळ जवळ आख्ख्या गल्लीतल्या सगळ्या पोरांचा गृहपाठ आपणच करत असू. हे सगळे केवळ आपल्या प्रेमाला कुणाचे शाप लागू नयेत म्हणून आपण केलं. खरे सांगतो त्या काळात आपल्या हातून जाम समाज सेवा घडत गेली, जी काम कोणीच करायला तयार होत नसे अशी काम मला शपथ घालून बिनधास्त पणे पूर्ण केली जात होती. आपल्यालाही त्याची काय फिकीर नव्हती. आपण फक्त तीन वर्षे संपायची वाट पाहत होतो.

आपणही आपला प्रेम टिकवा म्हणून जबरदस्त फील्डिंग लावली होती, समोरच्या काकूंनी मला कानमंत्र दिला होता. रोज न चुकता आपण मारुतीच्या मंदिरात जायचोच, पण आता काकूंनी सांगितल्या प्रमाणे तेथून बाहेर पडल्याबरोबर तडक कृष्णाच्या मंदिरातही पोचत होतो.

आपल्या प्रेमाचा बुखार मात्र काय उतरत नव्हता. श्रीकृष्ण आणि मारुती दोन्ही देव आपल्याला दोन्ही हातानी आशीर्वाद देत असावेत. एकीकडे आपली तब्येत जाम सुधारत चालली होती आणि दुसरीकडे दिवसागणिक केस बिघडत चालली होती. तिची नुसती झलक जरी दिसली तरी आपला मन तासभर तरी सैरभैर व्हायचा. आपला प्रेम एक छटाक सुद्धा कमी झाला नव्हता. अर्थात आपली परिस्थिती आपल्या जिगरी दोस्ताला सांगायचे आपण ठरवले. अगदी मागच्या वेळी त्याचा फार काय उपयोग झाला नाही हे माहित असून सुद्धा. त्याने मागच्या वेळी प्रमाणे या वेळी ही चार पाच टाळकी जमवली.

“पण तू हे सगळे करतो आहेस हे तिला माहिती आहे काय?”

“तिचे नाव तरी काय?”

“आम्हाला फोटो तरी दाखव?”

“हे असे किती दिवस चालायचे?”

“ती नाही म्हणली तर?”

“एवढं प्रेमात पडायला तिच्यात इतके खास तरी काय आहे?”

“तू बोलत असशील तर आपण डायरेक्ट भिडू, आता उचलून आणतो तिला.”

मी त्या घोळक्याच्या मधोमध उभा होतो, आणि मला बघताच त्या चार पाच टाळक्यांनी एका मागून एक प्रश्न माझ्यावर फेकायला सुरुवात केली. मा‍झ्या मनाला आणि मेंदूला कधीच एवढ्या ताणाची सवय नव्हती, दोघेही चक्रावून गेले. त्यांचे प्रश्न मा‍झ्या मेंदूवर ठण!!! ठण!!! असा आघात करू लागले, आणि थोड्याच वेळात अख्खे जग मा‍झ्या नजरेसमोर फिरू लागले. पुढे काय झाले ते आठवत नाही, जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी घरच्या खाटेवर होतो. ‘हाच गणपत चक्कर येऊन पडला.’ अशी कुजबुज मात्र पुढील आठवडाभर गल्लीत ऐकायला मिळत होती.

बापाने मात्र मला समोर उभा करून नक्की काय झाले ते विचारले. मी देखील सगळे खरे काय ते सांगून टाकले. आणि त्याने कपाळावर हात मारला.

“तू आणि तुझे ते प्रेम, दोघंही घाला गोंधळ.” – असे बोलून तो रागाने तेथून निघून गेला.

बापाच्या अटींमुळे मात्र आपले हात बांधले गेले होते, आपण शब्दाला पक्का असल्यामुळे कोणाशीच आपल्या प्रेमाविषयी काहीच बोललो नाही. अख्ख्या गल्लीला फक्त एवढा माहित होता की गणपत प्रेमात आहे आणि आपल्या प्रेमासाठी तो काय पण करतो.

बापाशी बोलल्यावर मात्र आपण त्या प्रश्नांवर विचार करू लागलो.

एक गोष्ट मात्र पक्की होती ती म्हणजे आपला प्रेम खरा होता. आता तीन वर्षे पूर्ण व्हायला थोडेच दिवस उरले होते, आपल्या मित्रांनी तिन्ही व्हॅलेंटाईन डे वेग वेगळ्या पोरींसोबत साजरे केले होते, मैत्रिणी किती बदलल्या या बद्दल ना बोलणंच चांगले. फक्त आपणच एकनिष्ठ होतो आपल्या प्रेमाशी. आपल्याला आपल्या प्रेयसी कडून काहीच नको होते. फक्त तिची साथ हवी होती, ती आली की आयुष्य रंगीत होईल अशी आपली पक्की खात्री होती. तिला मिळवण्यासाठी आपण खूप कष्ट घेतले होते, तिला टिकवण्यासाठी आपण काय पण करू ही मनाची तयारी होती. ती आल्यावर मात्र तिला जीवापाड जपायचे हे तर आपण खूप आधीच ठरवून टाकले होते. एकंदरीत आपले सगळे आयुष्य आता तिच्या भोवतीच फिरू लागले होते.

शेवटचे दिवस मात्र आपल्याला खूप जड गेले, तीन चार वेळेला तर आपण स्वत: बापाला बोललो, आता इतके दिवस टिकली ना मग आणखी दहा-पंधरा दिवसासाठी कशाला वाट बघतोस? पण तो काय ऐकला नाही, त्याचे एकच उत्तर.

“अठरावा वाढदिवस साजरा कर, दुसर्‍या दिवशी सकाळी आपण बोलू.”

मी रोज उठून न चुकता कॅलेंडर बदलत असे, उरलेले दिवस मोजत असे. घरातले सगळे आपल्याला रोज एकच प्रश्न विचारत असत.

“काय गणू? किती दिवस उरले?”

आपणही त्यांना उत्साहाने उत्तरे देत असू, दिवस आपल्या मित्रांच्या सोबत पार पडत असू पण रात्र मात्र जाम छळत असे, झोप लागायची नाही आणि आठवण थांबायची नाही अशी आपली परिस्थिती होऊन जात असे.

एका रात्री आपण बिछान्यातून उठून बाहेर घरात भटकू लागलो तर आईने तिच्या बरोबर तांदूळ निवडायला बसवला. चांगले डबाभर तांदूळ निवडून घेतले, सोबत समजुतीच्या गोष्टी सांगणे तर सुरूच होते. घरात काय त्रास आहेत, बापाला आपण कशी मदत करू शकतो, कसे वागले पाहिजे, बोलले पाहिजे, काय शिकले पाहिजे या सगळ्या प्रश्नांची तिची उत्तरे तिनी मला ऐकवली आणि माझ्याकडून पाठही करून घेतली.

त्या रात्री पासून बिछान्यातून बाहेर पडायची आपल्याला भीतीच वाटू लागली.

कसे बसे उरलेले दिवस आपण रेटले, या वर्षी पहिल्यांदाच आपला वाढदिवस कधी संपतोय असे आपल्याला वाटत होते, नाहीतर आज पर्यंत हा दिवस कधी संपूच नये असे वाटत असे. तर कसा बसा आपला वाढदिवसही आपण संपवला, रात्री लवकरच झोपलो आणि सकाळी बाप उठायच्या आधी त्याच्या खाटेसमोर उभे होतो. आता हा कधी उठतोय याचीच वाट बघत होतो

उठल्यावर मला समोर बघताच तो चिडला, थोड्या वेळाने असे म्हणून मला त्याने तेथून हाकलले.

मी मात्र आता त्याचा पिच्छा काही सोडला नाही, जवळ जवळ पुढचे दोन तास तो जिथे जाईल तिथे दोन फुटावर मीही उभा असायचा. मा‍झ्या प्रेयसीचा फोटो हृदयाशी धरून मी तिथे उभा होतो. हा फोटो मी कालच मिळवला होता, इतके दिवस बापाच्या अटींमुळे मी तिचा फोटो घरात ठेवला नव्हता पण आता कसलीच अडचण नव्हती.

काहीशा नाराजीनेच त्याने मा‍झ्या हातातून तो फोटो खेचला. बापाने फोटो खेचताना देखील तो चुरगळू नये याची आपण काळजी घेतली होती, हे बापाच्या नजरेतून चुकले नाही आणि तो जास्तच भडकला आणि मा‍झ्या कानाखाली लगावली. मी गालावर हात धरून त्याच्या समोर उभा असताना त्याने आईला चहा आणायला सांगीतले, सवयी प्रमाणे पुढच्याच क्षणी आई चहा घेऊन समोर उभी होती, बापाने पहिला घोट घेतला आणि फोटो उलगडून पहिला.

फोटो बघताच मात्र त्याच्या चेहर्‍यावरचा राग पळून गेला, आणि तो हसू लागला. तो इतके हसला की चहा कपातून सांडू लागला, त्यामुळे त्याने कप जमिनीवर ठेवला आणि पोट भरून हसू लागला. आईनेही त्याच्या हातून फोटो काढून घेतला आणि बघितला. आता ती देखील हसू लागली. दोघेही इतके जोरात हसत होते की घरातले बाकीचे लोक सुद्धा जमा झाले, सगळ्यांनी तो फोटो पहिला आणि हसू लागले. मला मात्र आता जम लाज वाटू लागली होती. बघता बघता आख्ख्या गल्लीत तो फोटो फिरला आणि माझे प्रेम हे चेष्टेचा विषय ठरू लागले.

आपल्याला आता जम राग आला होता.

“तू म्हणलास तसा मी तीन वर्षे थांबलो. आता मला माझे प्रेम मिळणार आहे की नाही?” – पहिल्यांदाच मी बापासमोर उभा राहून मोठ्या आवाजात बोलत होतो. इतक्या मोठ्या आवाजात त्याच्यासमोर कोणी बोलेल अशी कल्पनाही त्याने केली नव्हती.

“अन् नाही मिळाले तर?” – त्याने त्याच्या मिशीवर हात फिरवत विचारले.

“बापु, तीन वर्षे आपण सगळ्या अटी पाळल्या. तुझ्याच काय सगळ्या गल्लीच्या पाळल्या. त्यामुळे अख्ख्या गल्लीला समजले आहे आपण प्रेमासाठी काय करू शकतो ते.

आता निर्णय तुझा आहे, नाहीतर मला माझा रस्ता शोधावा लागेल.” – मी

माझे मन मला एक घाव दोन तुकडे करायला सांगत होते. पण मी केवळ प्रेमासाठी सबुरीने घेत होतो.

माझा तो आवेश पाहून बाप मात्र अजूनच चेकाळला आणि परत हसू लागला.

“मिळेल, मिळेल.” – असे तो हसत हसतच सांगू लागला.

तुम्हाला सांगतो त्याच्या दुसर्‍याच दिवशी माझी प्रेयसी मा‍झ्या घरी आली होती. माझे प्रेम यशस्वी झाले होते. माझी तपश्चर्या फळाला आली होती. आता आपली लाइफ सेट होती, तालीम आणि प्रेयसी दोन्ही आपल्या सोबत होती.

पुढे तीन वर्षाने मा‍झ्या बापाने मोठ्या धूम धडाक्यात माझे लग्न त्याच्या आवडीच्या पोरीशी लावून दिले होते. आपणही फार आढेवेढे घेतले नाहीत. त्याने माझे प्रेम मला दिले होते त्या बदल्यात इतके परत करणे तर मला सहज शक्य होते. मा‍झ्या बायकोलाही मी मा‍झ्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगीतले होते. तिने ही इतरांप्रमाणेच हसतच तिला ही सवत मान्य आहे असे सांगीतले होते.

अजूनही अधून मधून लोक प्रेमाची शपथ घालून छोटी मोठी कामे करून घेत असतात. लोक आपल्या प्रेमाची चेष्टाही करतात अधून मधून पण आपण आजही ते खपवून घेतो कारण बापाने शपथच घातली आहे तशी.

पण माझी पहिली व्हॅलेंटाईन म्हणजेच माझी बुलेट आजही मा‍झ्या सोबत आहे. मा‍झ्या दारात उभी आहे, यातच सगळे काही येऊन जाते. तुम्हाला सांगतो पहिल्या व्हॅलेंटाईन पासून आजपर्यंत आपल्या प्रेमात अजिबात फरक पडलेला नाही, माझे प्रेम मी मा‍झ्या प्रेयसीला कधीच सांगू शकत नाही, तिला कदाचित ते समजणारही नाही,

आपण करतो तितकेच प्रेम तिने मला परत करावे अशी आपली अजूनही अपेक्षा नाही. कदाचित ती ही माझ्यावर तितकेच प्रेम करत असेल पण तसे व्यक्त करू शकत नसेल ही भावना मनाला सुखावून जाते.

त्यातही मला आज पर्यंत तिने कधी दगा दिला नाही, कसलीच तक्रार नाही. तिच्या पाठीवर बसूनच मी निर्धास्त पणे माझे परिवार घेऊन फिरत असतो. या सगळ्या गोष्टींची जमा बेरीज करता आमचे प्रेमच जिंकते ही गोष्ट मला परत जाणवते. आहेच माझे पहिले प्रेम – अनंत, एकतर्फी, आणि निरागस.

समाप्त