असं अत्यंत कोरडं नशीब. सध्या अठ्ठाविसावं वर्ष सुरूय. एक तरी स्त्री पाहिजे आता. स्थिरतेच्या मागं लागून आयुष्याची काळी धार बोथट होत आलीय. तेव्हाचं व्यक्तिमत्व फसवं होतं की आत्ताचं? तेव्हा निदान कसली तरी तीव्रता तरी होती. आता उरलाय फक्त सुस्त आळस. रात्र थंडपणं पडलीय अजगरासाराखी. तेव्हा रात्री अस्वस्थ, जागृत.
शेखर पुन्हा याच शहरात आलेला आहे अशी बातमी यल्लप्पाला कळली. त्यानं पिस्तुल तपासून पाहिलं.
“बहुतेक शहरांमधे मोठ्या रस्त्याला नाव देतातः “महात्मा गांधी रोड” त्यामुळं एम्जी रोडवर सगळी फाइव्हा स्टार हॉटेल्स, दारूचे बार्स, कॅबरे, उच्चभ्रू जुगारी अड्डे, महागडी दुकानं वगैरे सापडतात.”
“मग काय त्यात? योग्यच आहे ते.”
याच शहरात रात्री-बेरात्री भटकणं असायचं. काही मित्र. सगळ्या थरातल्या लोकांबरोबर मैत्री, आणि काही कट्टर शत्रूदेखील. का आपण आपलं आयुष्य असं गुंतागुंतीचं करून ठेवलं? त्यात फक्त आपलाच हातभार होता का? आपण या देशात, या काळात, अशा कुटुंबातच जन्माला का आलो ? जन्मणं एक चुकलंच. जन्मायलाच नको होतं. परवाचं ते विचित्र स्वप्न. निदान जन्मलो ते यल्लप्पासारखी जाड कातडी घेऊन फूटपाथवर जन्मायचं होतं. अजूनही तो याच शहरात असेल का? माझी वाट पाहत? रिव्हॉल्वर मिळवलं असेल त्यानं? त्या दिवशीचा सूर्य - मध्यरात्री सुद्धा खांद्यात जाणवतोय. पाठीच्या पखालीत, हाडांच्या आत, किंचिंत दुखरा. एक चकाकतं पातं, तीन माणसं आणि सूर्य. फारच जहरी मिश्रण होतं ते. नंतर वडिलांनी सगळं निस्तरलं, पैसा ओतून. पण यल्लप्पा हकनाक आत गेला दोन वर्ष. पांढरपेशांना फिल्मी दोस्ती, वफादारी करता येत नाही. त्यांचा ढोंगीपणा सुसंस्कृत असतो. दोस्ती म्हणजे फारच भडक. ती फक्त रंग थापलेल्या प्राण आणि अमिताभची बघायची किंवा यल्लप्पा आणि किसनची. सात वर्षांनंतर अजून यल्लप्पा इथं असेल?
“ती गव्हर्नराची गाडी.”
“च्यायला, यांना राइट ऑफ वे, एस्कॉर्टस् इतकं कशाला पाहिजे? आणि इकडे कुठं गेला होता?”
“इकडे साधू आहे म्हणे कुणीतरी... मोठा बंगला आहे त्याचा. एअर कंडिशण्ड. तिथं गेला असेल पाया पडायला.”
“मादरचोद साले! हे साधू म्हणजे लोकांच्या रक्तावर पोसलेत रे आजकाल!”
“अं! त्यात काय नवीन? हिंदू संस्कृतीच मुळी गुलामगिरीवर आधारलेलीय. रोमन संस्कृतीसारखीच. अर्थात मानवाच्या अगदी प्रथमावस्थेतल्या संस्कृत्या तशा असणारच म्हणा!”
मी मोकळा आहे असं तेव्हा मी म्हणून शकत होतो. आता मी आयुष्याला बांधून घेतलंय. जांभळे डाग पडलेल्या आकाशासारखं. आयला, झोप लागायला पायजेलेय; पण विचार थांबत नाहीयैत. असंबद्ध होत चाललेत. टरबूज चिरून दाबून आतली लाल फाक दाखवावी तसे तिनं पाय फाकवले. सोनेरी झाटांची राजकन्या. आतला गर बरा होता; पण बाहेर अळ्या फार. कात्रीला थोडी भोकं पडलीयत; पण नेलकटर ठीक आहे.
है ऽऽ! हाः हूः हो ऽऽ!...
हे जरा ताळ्यावर आणण्यासाठी. पण आकाशाच्या तळापासून बुडबुडे वर येतात आणि पृष्ठभागावर साय जमते. तसं नाही. कुणीतरी आकाशाचं बूच फाट्कन उघडतं, आणि आकाश फसफसत रहातं...छ्याः! अजूनही विचार थांबून झोप येत नाही. ती तापलेली दुपार. तिथंपासूनच ती डोकेदुखी सुरू होते. या शहरातली बदली टाळायचा किती प्रयत्न केला. त्या खेड्यात भूतकाळ कसा टाकलेल्या कातीसारखा दूर होता. यल्लप्पा याच शहरात असण्याची शक्यता. म्हणजे भीतीचा एक अंश डोक्यावर छत्र-चामरांसारखी सावली सतत टाकणारच. गोळ्या पुन्हा सुरूच केल्या पायजेलायत. आता आज रात्री झोपेचा प्रश्नच नाही. उद्या गोळ्या आणल्याच पायजेलायत. प्रिस्क्रिप्शन आहेच जुनं पण मेडिकल स्टोअरवालेही पहिल्यांदा गोळ्याचं नाव पाहतात, मग डॉक्टरचं लेटरहेड. त्यावर त्या साल्यानं ठळक अक्षरात “सायकिअॅट्रिस्ट” छापलेलं. मग आपल्या चेहर्याकडे. त्यामुळं गोळ्या विकत घेणं म्हणजे सुद्धा जरा किटकिटच.
झोपडीत पेटी उघडून तो पिस्तुलाकडे पाहत होता. साली दोस्ती म्हणजे अजब चीज असते. बायकोपेक्षा दोस्त भारी वाटतो. छिनाल साली किसनला लागू होती; पण त्याची चूक नव्हती. कोवळा पोर तो! हिनंच त्याला नासवला. तिला करून घेतलं तेच चुकलं साला. पाठ फिरली की लोक खंजीर मारायला तयार असतात. तिनं एक पोरगा दिला होता आपल्याला. सेम आपला मुखडा. केवढे अरमान त्याच्यात अडकलेले. पण शेवटी काय झालं त्याचं? कुठे असेल तो आज? त्यानं पेटी बंद केली आणि पुन्हा कडवट घाण वासाची दारू प्यायला सुरूवात केली.
“सगळंच इतकं खलास झालंय! परवा माझा वकील मित्र सांगत होता, एका मारामारीच्या केसबद्दल. दोन्ही श्रीमंत पार्ट्यांकडून पैसे घेऊन एका झोपडपट्टीतल्या माणसाला अडकवलं पोलिसांनी, त्याच्यावर आधीच्या काही केसेस होत्या, त्याचा फायदा घेऊन. आणि आपली ज्युडिशियरी सिस्टिम, जेल्स, तिथली अंदाधुंदी, म्हणजे प्रचंड किळसवाणा-हळूहळू सडणार्या प्रेतासारखा प्रकार झालाय एक. “ब्लॅक ह्यूमर” नावाची एका निग्रोनं लिहिलेली गोष्ट आठवते? कोण लेखक होता रे तो? तसा काळा विनोद आहे हे सगळं म्हणजे. आपल्यासारख्या गिधाडांना चहाबरोबर चघळण्यासाठी. काय रे? बोलत का नाहीस? इतका गंभीर का झालास एकाएकी?”
“काही विशेष नाही. सहज. चल. दोन वाजत आलेत. चहाची सुट्टी संपली.”
दिवसभर काही नाही. सहज जातो दिवस. पण मग संध्याकाळ होते. दुपारचं लखलखतं पातं रात्रीत झाकलं जातं. काजव्यांच्या मोहळासारखं शहर पेटतं. एक प्रचंड जाभळं फूल आकाशाकडे झेपावतं. ते फूल म्हणजे रात्र. कुठं वाचलंय हे? सार्त्र? बहुतेक. च्यायला, अत्यंत बुळचट आयुष्य जगणारे आपण, आणि सार्त्र वाचणार! काय विनोद! ब्लॅक ह्यूमर! त्या काळी ठीक होतं. रात्ररात्र हातभट्टीचे अड्डे, जुगार, वेश्यांचं जग, बेदरकार जीवन. पैशांची फिकीर नाही. घरात सगळ्यांशी भांडण. वडील अधून-मधून येऊन रहायचे. त्यांनाही कधी दाद दिली नाही. मग परीक्षेआधी पंधराएक दिवस खच्चून अभ्यास, आणि पन्नास मार्कांचा पेपर लिहून पैकी चाळीस मिळवून पास व्हायचं. ग्रेट! काय दिवस होते. आज दारू पीत असतील ते ऑफिसातले चारजण. आपल्यालाही बोलावलं होतं. पार्टीला; पण तो रस्ता आपल्याला कायमचा बंद. डीटीज् डिलीरियम ट्रेमेन्स. नकोच ती अस्वस्थता. त्यापेक्षा गोळ्या आज खरीदल्यात, त्या घेऊन शांत झोपावं हेच बरं. एक हिरव्या स्ट्रिपमधली आणि दोन सोनेरी स्ट्रिपमधल्या.
थोडक्यात काय, तर आता स्थिर जीवन. नोकरी पर्मनंट आहे, बहिणीचं – एकदाचं - लग्न झालंय, आपलंही होईल. आईबाप केव्हाचेच मागे लागलेत. आणि मग या घाणेरड्या काळात, भंगार जगात आपण आपला विनाशाच्या प्रक्रियेतला वाटा उचलायचा, म्हणजे एकदोन पोरं या जगात आणून सोडायची. बायकोच्या नादानं त्यांना तरुण होईपर्यंत सावलीत वाढवायचं. म्हणजे ती घराबाहेर पडली की आपल्याला शिव्या देत विद्रोहाकडे आकर्षित होऊन एका टळटळीत दुपारच्या लखलखत्या पात्यापर्यंत येऊन पोचतील आणि ती काळी धार आधीच्या आयुष्यातल्या भंपक संस्कारांमुळं सहन न होऊन आपल्याकडे आश्रयासाठी पराभूत परत येतील. मग ती देखील दिवाभीतासारखं “सिक्युअर लाइफ” जगायला लागतील. तसलीच एक पोरगी गळ्यात बांधायची, की तिची नैतिक पातळी एकदम उंचावेल आणि ती तिच्या मुलांना सावलीत वाढवायला सुरुवात करील. पण आपली बहीण ग्रेटच हं च्यायला! अजूनही माहेरी आली की त्या रिक्षावाल्याला रोज दुपारी भेटते म्हणतात. एक जांभळं फूल आकाशानं झाकून ठेवलं. आत्ताच पाणी पिऊन घ्यावं. गुंगीसुद्धा जाणवत्येय, “इंटरफिअरन्स फ्रिंजेस.” कुजबुज मनात खोल बुडत्येय विचारांची. डोकं हलकं. एक जांभळं डोकं आकाशाकडे झेपावलं. ती एक कवटी होती. एक जांभळी कवटी आकाशाकडे झेपावली. ती एक गोळी होती. एक जांभळी गोळी...आत्ताच उठून पाणी... एक जांभळी गोळी... एक जांभई... गडद. गडद. एक जांभई...ते एक आकाश होतं...
यल्लप्पा शांतपणं वाट पाहत शेखरच्या ऑफिससमोरच्या फूटपाथवर उभा होता. शेवटी दहा वाजले. कोपर्यावर बसमधून उतरून एक चष्मेवाला ऑफिसकडे यायला लागला. चेहरा नीट पाहिल्यावर कळलं, हाच शेखर. यल्लप्पा दचकला. हा शेखर? किंचित कुबड. गालफडं बरीच खोल गेलेली. खाली मान घालून पाय ओढत चालणारा. सात वर्षात इतका बदलला? छे! त्या झगमगणार्या दुपारी त्या मारवाडी बच्च्यावर चाकूनं वार करणारा तो शेखर वेगळा, आणि हा वेगळा. मारवाडी दोन महिने हॉस्पिटलात होता; पण वाचला. मारवाड्यानं शेखरलाच सजा व्हाची म्हणून किती प्रयत्न केले. पण साल्या इन्स्पेक्टर धायगुड्याचा आपल्यावर दात होता अन शेखरच्या बापानं काहीतरी चक्रं फिरवली. खटाक. यल्लप्पा दोन वर्षांसाठी आत. मारवाड्याकडून पैसा घेतला धायगुड्यानं, केस त्याच्या अंगावर यायला लागली तेव्हा मिटवायला. जेल तसं काही नवीन नव्हतं; पण पोराची काळजी होती. पोराची आई आपणच घराबाहेर काढलेली. तिनं किसन्याला नासवलं. तेव्हापासून इस्माईलभाईला पोराची जबाबदारी दोन वर्ष दिलेली. पण एक दिवस तो सांगत आला. पोरगा गायब ! दोन दिवसापासून पळून गेला. पोलिसात कंप्लेट दिलीय म्हणाला. पोलिसात? तशाही स्थितीत हसू नाही आवरलं. यल्लप्पाला शेखरबरोबरचे बेबंद दिवस आठवले. दारू पिऊन शेखर आयुष्याबद्दल काय काय बोलत बसायचा! च्यायला, फार नाजुक दिलाचा होता तो. त्याच्या बापानं आपल्याला दोन वर्षं आत केलं. शेखरनंसुद्धा एवढी दोस्ती बरबाद केली. कोर्टात काहीच बोलेना पठ्ठया! खरं तर चाकू त्यानंच मारलेला. पण आपण दोन वर्ष उगीचच आत गेलो. त्याची सजा शेखरनं आयुष्यभर स्वतःवर ओढावून घेतली की काय?... शेखर घाम पुसत निर्जीवपणं ऑफिसात शिरला.
नाही... ज्याच्यासाठी पिस्तुल मिळवलं तो हा शेखर नाहीच. आपला पोरगा हरवला, पण ते आपल्या जिंदगीतच लिहिलंल. धायगुडे जिंदगीतच लिहिलेला. आपण जिंदगी जशी समोर आली तशी जगणार. उगीचच डोक्याला त्रास कुणी सांगितला? यल्लप्पानं पिंक टाकली. ते पेटीतलं सायलेन्सरवालं भारी पिस्तुल त्याच्या डोळ्यासमोर तरळलं. केवढ्या कष्टानं त्यानं ते मिळवलं होतं, शेखर शहरात आल्याचं कळल्यावर. पण ते आता तो बाहेर काढणार नव्हता.
“दोनदोन-चारचार ओळींचे लहानलहान प्रसंग. पहिल्यांदा काहीच अर्थ लागत नाही. मग हळूहळू धागे जुळत जातात अन् शेवटी एक पूर्ण पँटर्न तयार होतो. इंटरफिअरन्स फ्रिजेस असतात नं? तसा. काळे-पांढरे पट्टे. तू वाचायलाच पाहिजेस. उद्या आणतो मी.”
“म्हणजे एशरच्या एचिंग्जसारख्ं. तू ते गोखलेकडून मी आणलेलं पुस्तकं पाहिलंस नं? त्यातले एशरचे एचिंग्ज आठवतायत?”
“हां हां ! करेक्ट ! चौकोनामधून व्हेग आकार... त्यातून बेडूक... बेडकांच्या डिझाइनच्या मधल्या मोकळ्या जागांचे पुन्हा वेगळे आकार... त्यातून मासे... त्यांच्यातल्या मोकळ्या जागांचे पक्षी... मग फुलपाखरं... तेच नं?”
“राइट! आणि सेल्फ रेफरन्स. एक माणूस गॅलरीतले पेंटिंग पाहतोय. त्या पेंटिग्जपैकी शहराचं एक पेंटिंग, त्या शहरातली एक आर्ट गॅलरी आणि त्याच गॅलरीत तोच माणूस तेच शहराचं पेंटिंग पाहतोय. काय भन्नाट होतं रे ते!”
“हेन्री मिलरचंही काय विश्व आहे रे ते! पॅरिसमधल्या रात्री, वेश्या पेंटर्स, मिस्ट्रेसेस... भन्नाट!”
“च्यायला! बर्याच वर्षात काही “आउटिंग” केलं नाही रे.”
“मी तर तुला नेहमी म्हणत असतो. आज येतोस? माझी एका ठिकाणी चांगली ओळख आहे.”
“अं ऽऽऽ... नकोच च्यायला!”
“धत् तुझी!”
“अं ऽऽ... बरं, चल जाऊच या च्यायला आज.”
यल्लप्पा दोरखंड घेऊन सिगरेट पेटवत होता. शेजारची माडी चढणार्या दोघांना पाहून तो दचकला. चष्मेवाला शेखर आणि बरोबर कुणीतरी. सकाळी वितळलेला त्याचा द्वेष फणा काढून उभा राहिला. साले हे समजतात कोण गांडू लोक स्वतःला ? पूर्ण हिंमत तर नाही जे होईल ते मर्दपणे छातीवर घ्यायची; अन् आम्हाला वाटेल तसे तुडवायला तयार पुन्हा! शाः! वळवळणारा किडाच तो शेवटी. त्यानं ठरवलं: आज रात्री ठेचायचा साल्याला. मग त्यानं काळजीपूर्वक विचार केला. पिस्तूल आणण्यात पॉइंट नाही. पंछी निसटायचा. चाकू आहेच जवळ. इथं त्यांना रिक्षा मिळायची नाही. त्या दोन बिल्डींग पाठीला पाठ लावून उभ्या. त्यांच्या मधे तो कचरा साठलेला बारका बोळ. तिथनं समोरच्या रिक्षा-स्टँडला जाणार ते. त्या अंधार्या बोळात गाठावं.
गुत्त्यात जाऊन यल्लप्पा आणखी एक ग्लास ढोसून तिथंच बसला. वीसेक मिनिटांत शेखर एकटाच खाली उतरला. म्हणजे दोघेजण एकीलाच...
शेखर सिगरेटच्या दुकानाकडे वळला.
यल्लप्पा गुत्त्यातून उठला. दोन्ही बिल्डिंगच्या मागच्या बाजूनं फेकलेल्या कचर्याच्या बोळात जाऊन श्वास रोखून थांबला. बरोबर मध्यावर आला की तोंड दाबून छातीत... ओरडायला देता कामा नये.
बोळातून प्रकाश एका तिरप्या त्रिकोणानं आत येऊन थांबत होता. पावलं बोळात वाजली. प्रकाशाच्या त्रिकोणात शेखरचा चष्मा चमकला, आणि मग नंतरच्या अंधरात सिगरेटचा एक लाल ठिपका यल्लप्पाच्या दिशेनं यायला लागला.