Divakaranchya Natyachata - 2 in Marathi Short Stories by Shankar Kashinath Garge (Divakar) books and stories PDF | दिवाकरांच्या नाट्यछटा - 2

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

दिवाकरांच्या नाट्यछटा - 2

साहित्यिक:दिवाकर

11 - कार्ट्या ! (नाट्यछटा)

12 - किती रमणीय देखावा हा ! (नाट्यछटा)

13 - अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? (नाट्यछटा)

14 - बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! (नाट्यछटा)

15 - सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? (नाट्यछटा)

16 - देवा ! (नाट्यछटा)

17 - मुंबईत मजा गमतीची । (नाट्यछटा)

18 - म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! (नाट्यछटा)

19 - जातिभेद नाही कोठें ? (नाट्यछटा)

20 - कोकिलाबाई गोडबोले (नाट्यछटा)

***

११. कार्ट्या ! (नाट्यछटा)

.... थांब ! अशानें थोडाच तूं ताळ्यावर येणार आहेस ! नुसत्या छडीनें नाहीं भागायचें - चांगला या चाबकानेंच तुला सडकला पाहिजे ! - चूप ! खबरदार ओरडशील तर ! आणलीस तापवलेली पळी ? ठीक. आण ती इकडे ! धर याला नीट, - अस्सा ! चांगला चरचरुन डाग बसला तोंडाला ! - रडूं दे, रडूं दे लागेल तितका ! काय ग, या त्रिंब्याला अक्कल तरी केव्हां येणार ? आतां का हा लहान आहे ? चांगला सहा वर्षाचा घोडा झाला आहे ! पण अजून कसें तें व्यवहारज्ञान नाहीं ! - नाहीं पण मी म्हणतों, कांहीं जरुर पडली होती मध्यें बोलण्याची याला ? मी इकडे गणपतरावांना सांगतों आहे कीं, तुमची दहा रुपयांची नोट पडलेली इथें कांहीं कोणाला सांपडली नाहीं म्हणून ! पण इतक्यांत आमचे हे दिवटे चिरंजीव आले ना ! आल्याबरोबर यानें त्या गृहस्थाला सांगितलें कीं, - तरी मी इकडे चांगला डोळ्यांनी दाबतों आहें ! - पण या गाढवाचें लक्ष असेल तर ! - म्हणे ' तुमच्या खिशांतून काल कागद पडला होता, तो किनई मी बाबांच्याजवळ नेऊन दिला ' - चूप बैस ! खोटें बोलतोस आणखी ? असें नाहीं तूं त्यांना म्हणालास ? - अग यानें सांगितल्याबरोबर, माझ्या जीवाची कोण इकडे त्रेधा ! मग कांहीं तरी आठवल्यासारखे केलें, मुद्दाम कागदपत्रांची दहापांच पुडकीं उलथी पालथी केलीं, अन् खिशांत असलेली नोट हळूच कशी तरी त्या गणपतरावांना काढून दिली ! - असा संताप आला होता त्या वेळेला या कार्ट्याचा ! - पण त्यांच्या देखत ' नेहमीं अशींच मला शहाणपणानें आठवण करीत जा बरें बाळ ! ' असें म्हणून ते जाईपर्यंत या त्रिंब्याची मला वरचेवर पाठ थोपटावी लागली ! कशी लक्ष्मी चांगली घरांत चालून आली होती ! - पण या कार्ट्यापायीं; - अरे कार्ट्या ! अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं ! - तें कांही नाहीं ! या पोरट्यांना उठतां बसतां नेहमीं सडकलेंच पाहिजे ! त्याशिवाय नाहीं यांना जगांतलें ज्ञान यायचें ! - स्वयंपाक झाला आहे म्हणतेस ? चला तर घ्या आटपून. चंडिकेश्वराच्या देवळांत लवकर मला गेलेंच पाहिजे ! आजपासून तिथें प्रख्यात काशीकरशास्त्री श्रीमदभगवद्गीतेवर पुराण सांगायला सुरुवात करणार आहेत ! चला तर लवकर ! - ' त्रिंब्या, थांबलें कीं नाही तुझें अजून रडणें ? का पाहिजे आहेत तडाखे आणखी ? '....

***

१२. किती रमणीय देखावा हा ! (नाट्यछटा)

.... देवि ! तुझी बाग किती सुंदर आहे ही ! राघू - मैना, कोकिळा - बदकें - कबुतरें - सगळीं निजलीं आहेत ! दिवसां बदकांमध्ये मिसळून त्यांच्याबरोबरच आनंदानें उडया मारणारें तें लहानसें सरोवर - अहाहा ! - कांहीं कमळांची काव्यें आतांच पुरीं झालीं आहेत, व कांहीं दिवसभर हदयांत सांठविलेल्या सूर्यतेजानें अगदीं रसरसून जाऊन आपली काव्यें लिहिण्यामध्यें काय पण गढून गेलीं आहेत ! - पाहिलेंस ना ? तेंच सरोवर चंद्रबिंबाशीं आतां कसे तन्मय होऊन गेलें आहे ! खरेंच, किती तरी तुझें ऐश्वर्य हें ! अहाहा ! मुग्धावस्थेंतून नुकतीच बाहेर पडून, आपल्या प्रियकराच्या गालावर गाल ठेवून, ती कलिका आपल्या पतीकरितां - त्या गुलाबाकरितां - आपलें प्रेमळ हदय हळूहळू उमलायला लागली हें पाहून त्या गुलाबाच्या नेत्रांतून - बध - कसे - दोनच - दोनच प्रेमाश्रु बाहेर पडले आहेत ते ! तसेंच इकडे पाहिलेंस ना ? या जोडर्‍याच्याखालींच किती तरी मोगर्‍याचीं फुलें उमललीं आहेत ! झालेंच तर, त्या प्रेमळ पतिपत्नीला चंद्रकिरणांचा फारसा ताप लागूं नये, म्हणून वर दोन गुलछबूची फुलेंही उगवलीं आहेत ! वा ! तुझ्या या बागेमध्यें किती तरी चित्रविचित्र आणि सुंदर फुलझाडें आहेत हीं ! कांहीं सुवासिक आहेत, कांहीं सुंदर आहेत, आणि कांहीं तर दोनही गुणांनी नटलेली आहेत ! पण सगळी फुलझाडें परस्परांना व शेजारच्या लतावृक्षांना कशा प्रेमाच्या गुजगोष्टी सांगत आहेत ! भगवति, तुझ्या या वनसृष्टीचा प्रेमळ आत्मा, आकाशांत प्रकाशणार्‍या या स्वर्गीय आत्म्याशीं एकरुप होऊन गेल्यामुळें - अहाहा ! काय चोहोंकडे प्रेमाचा उज्ज्वल - शांत ! असा. हा प्रकाश पडला आहे ! - अरे ! पण हें काय ? - हें काय ? किती उंच प्रचंड असा हा प्रेतांचा पर्वत तरी ! अबब ! किती माणसें या पर्वतावर चढावयाला लागलीं आहेत हीं ! - काय ? ' तूं चढूं नकोस ! मी चढणार ! ' हा ! काय भयंकर कत्तल चालली आहे ही ! कडकडणार्‍या रक्तामध्यें - ते पहा - किती तरी आत्मे तडातड उडत आहेत ! नका ओरडूं ! अरे असे रडूं नका ! - अरे बापरे ! - रक्ताचा काय महासागर उसळला आहे हा ! - अरे ! अंधार पडायला लागला वाटतें ? छे ! अगदीं पाहवत नाहीं कीं ! तापलेल्या लाल गोळ्याप्रमाणे हा सूर्यच दिसत आहे का ? - कोण ? कोण आहेस तूं ? - हावरेपणा ? - किती लांबलचक मुंडक्यांची माळ तरी ही ! - अरे नको ! माझ्या नरडयावर पाय देऊं नकोस ! मेलों ! मेलों !! - हुश ! काय भयंकर स्वप्न तरी ? - अरे ! चांगलेंच फटफटलें आहे कीं !.…

***

१३. अशा शुभदिनी रडून कसें चालेल ? (नाट्यछटा)

... एकूण तें सगळें खोटेंच तर ? माझ्या या कपाळावरचें कुंकूं हळूच आपल्या प्रेमळ - हो ! कसचें प्रेमळ ! - बोटानें - हेंच नव्हे का तें ? - यानेंच पुसून टाकून आपण कोणीकडे बरें गेलां होतां ? स्वर्गाला ? - नाथ ! या हदयांतून - सदैव प्रेमाची गाणीं म्हणणार्‍या माझ्या या अंतःकरणांतून - बाहेर पडायला आपण मला कधीं बरें विचारले होतें ? आणी मी कधीं जा म्हणून सांगितलें ? - पण जाऊं द्या आतां ! तें सगळें स्वप्नच होतें । कारण, या स्वच्छ व झुळझुळ वाहणार्‍या प्रवाहामध्यें माझ्या कपाळावरचा कुंकुमतिलक कसा नक्षत्रासारखा आनंदानें चमकत आहे ! प्रेमानें नाचत आहे ! प्राणनाथ ! या हिरव्यागार गालिचावर आपणाला बसवून - मी नाहीं जा ! या मांडीवर बसून अश्शी मी या गळ्याला निरंतर मिठी मारुन बसणार ! अगबाई ! पाऊस पडत आहे ! आहाहा ! नाथ ! कसें सुंदर इंद्रधनुष्य उगवलें आहे इकडे ! काय म्हटलेंत ? हें स्वर्गाचें महाद्वार उघडलें आहे ? खरेंच ! या सायंकाळच्या वेळेला आपल्या नुकत्याच उमलेल्या गुलाबासारखी, लोंकर आहे त्यांच्या अंगावरची ! - या मेंढ्याना घेऊन हा मेघ - हा वृद्ध मेंढपाळ - नेत्रांतून आनंदाश्रु गाळीत कसा त्या स्वर्गद्वाराकडे हळूहळू चालला आहे पण ! - असें काय गडे ! कोठें जायचे आहे आपणांला ? - हंसतां काय ? - बोला गडे ! - मी आपणांला आतां क्षणभरसुद्धां कोठें जाऊं द्यायची नाहीं ! - थांबा ! कोठें जायचें आहे तें मला नाहीं का सांगत ? नाथ ! मी येऊं का - येऊं का आपल्याबरोबर ? खरेंच सांगतें, आपण जर मला टाकून गेलां, तर तडफडून मरेन हो ! आपल्याशिवाय मला आतां कोण बरं प्रेमाने जवळ घेणार आहे ? - दोनच महिने झाले, माझी आई किं नाहीं मला टाकून गेली आहे ! - नाहीं ! नाही !! माझ्या या घट्ट मिठींतून मी आपणाला मुळींच जाऊं देणार नाहीं ! प्राणनाथ ! माझे हात तुटले तरी - हाय ! हाय !! येथें कोण आहे ! - काय ? मला कायमचे टाकून गेले ? आतां त्यांना मी मिठी मारली होती ना ? मग या घट्ट मिठींत काय आहे । तडफडणारें ! - न मरणारें ! - हें माझेंच हदय आहे ! - काय ? बाहेर बेंडबाजा वाजत आहे ! समजलें ! बाबा आतां नव्या आईला आणायला चालले आहेत ! - इतकी कशी गाढ झोंप मला लागली पण ? - किती गोड स्वप्न ! पण तें स्वप्नच ! आई ! - आई !! - तडफडूं नकोस ! हदया ! तडफडूं नकोस !! बाबा, हंसायला लाग ! कारण - अशा शुमदिनी रडून कसें बरें चालेल ?....

***

१४. बाळ ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें ! (नाट्यछटा)

.... बाळ वेणुबाई ! असें काय बरें वेड्यासारखें करावें ? हें बघ, हा नारळ किं नाहीं, फोडण्याकरितां देव्हार्‍यांत ठेवलेला नाहीं ! याला रोज सकाळी गंध, अक्षता, फुलें वाहून याची पूजा करायची ! - पूजा कशाला करायची ? वेडी पोर ! ऐक, मी काय सांगतो तें. एके दिवशी रात्रीं काय झालें, - आपल्या बागेंत बंगल्याशेजारी नारळाचें झाड आहे तें ? - त्या झाडाखाली, श्रीरामचंद्र, लक्ष्मण - सीतामाईबरोबर गोष्टी सांगत बसलेले तुझ्या पणजोबांना स्वप्नांत दिसले ? सकाळीं ते जे उठून पाहतात, तों आपला एक नारळ त्या झाडाखालीं पडलेला ! झालें ! देवाचा प्रसाद म्हणून पणजोबांनीं तो घरीं आणला, त्याची सालपटें काढलीं, मग देव्हार्‍यांत ठेवून त्याची पूजा केली ! रोज या नारळाची पूजा करावयाची असा त्यांनीं आपला नेम चालविला. पुढें देवाच्या दयेनें त्यांना पुष्कळ पैसा मिळाल्यावर, त्यांनीं याला चांगला सोन्यानें मढविला ! बघ, कशी खर्‍या नारळाच्या शेंडीसारखी जरीची शेंडी आहे ती ! झालेंच तर ही मखमलीची पिशवी, त्याला बसायला रेशमी कापडाची मऊ मऊ गादी - पाहिलीस ना कशी छानदार आहे ती ? - काय ? काय म्हटलेंस ? या नारळांत - या जरीनें, सोन्यानें मढविलेल्या नारळांत - गोड गोड पाणी ! - चांगलें खोबरें असेल ? हः हः वेडी रे वेडी ! बेटा वेणुबाई ! या नारळांत आतां कोठून खोबरें व पाणी असायला ? पणजोबांना ज्या वेळेस तो झाडाखाली सांपडला त्या वेळेस त्याच्यांत खोबरें आणि पाणी असेल ! त्या गोष्टीला जवळजवळ आतां दोनशें वर्षे व्हायला आलीं ! आतां या नारळांतलें पाणीही नाहींसें झालें आहे, व खोबरेंही नाहींसें झालें आहे ! - मग यांत आहे काय ? बेटा, कवटी सोन्याची, शेंडी जरीची, पण आंत किं नाहीं, सडलेली, कुचकी, अशी निवळ घाण आहे ! आतां कांहीं तो खाण्याच्या उपयोगाचा नाहीं ! समजलें आतां ? तो देण्याबद्दल आतां पुनः नाहींना कधीं हट्ट धरायची ?....

***

१५. सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? (नाट्यछटा)

... उगीच कशाला खोटें सांगूं ! डॉक्टरसाहेब, माझी सगळी दौलत जर म्हणाल, तर दोन हजार रुपये. ते मीं कधींच बायकोच्या नांवानें बँकेत करुन ठेवले आहेत. घर नाहीं, शेत नाहीं, कांहीसुद्धां नाहीं बरें आपण विचाराल, कीं हे दोन हजार रुपये तरी कोठून आले ? तर, माझ्या वडिलांनी मरायच्या आधीं, जे काय घरामध्यें डागडागिने होते ते सगळे मोडून टाकले. अन् त्यांचे जे हे रुपये आले, ते त्यांनी आईच्या नांवानें बँकेत ठेवून दिले. झालें ! वडील वारले तेव्हां मी अगदीच लहान होतों. आई नुकतीच वारली ! आणि मीही पण लवकरच - हं ! डॉक्टरसाहेब ! माझ्या डोळ्यांवर दुर्दैवानें रचीत आणलेली ही काळोखाची भिंत, चारपांचशें रुपये खर्च केल्याशिवाय, कांहीं आतां उतरतां यायची नाहीं ना ? अहो ! महिना बारा - पंधरा रुपये मिळविणारा मी माणूस - हा ! वर्षभर तर जवळजवळ मी घरींच बसून आहें कीं ! आतां मी आणूं कोठले इतके रुपये ! - काय निघालां ? हे घ्या. ही तुमची डोळे तपासायची पांच रुपये फी. - कांही नाही ! अशक्तपणामुळें माझा हात इतका कांपत आहे ! - घेतलीत ? आपले माझ्यावर फार उपकार झालें ! डॉक्टरसाहेब ! या बरें !....

... माझ्या या त्रासानें नासलेल्या मस्तकांतील किडयांचें गुणगुणणें आतां थांबणार तरी केव्हां ? - ' तूं आपले डोळे लवकर बरे कर, नाहीं तर जन्मभर ही काळतोंडी मध्यानरात्र - बाबा रे ! - एकसुद्धां, अगदीं लहानसा तारासुद्धां आतां चमकलेला दिसायचा नाहीं ! - जिवाचें रक्त शोषीत सारखी तुझ्या डोळ्यांत बसेल ! आयुष्यभर रडत बसावें लागेल ! डोळे मुठींत धरुन, तुला रडत बसावें रे लागेल ! ' - काय ? माझ्या - नाहीं, माझ्या लाडकीच्या दोन हजारांतले चारशें रुपये खर्च करुं ? आणि डोळे बरे झालेच नाहींत तर ? मग कसें ! - थांबलें कीं नाही अजुन तुमचें गुणगुणणें ? का अशी ताडकन् थप्पड - अरे ! हें काय ! माझ्या हाताच्या फटकार्‍यानें हा ग्लासच फुटला वाटतें ? हाताला किती बारीक बारीक तुकडे लागत आहेस हे ! - हं : काय पहा ! हाताच्या एका फटकार्‍यासरशीं हें काचेचें भांडें फुटलें ! - पण, अहोरात्र मनः संतापाचें कडकडून दांत चावणें, व जोरानें वळलेल्या मुठीचे धडाधड प्रहार होणें चाललेलें असतें, तरी हा जीव कांही केल्या फुटतच नाहीं ! आंधळ्या ! तूं आतां जगून तरी काय करणार ? अरे ! आपल्या मेलेल्या जिवंतपणानें तिला आतां नको रे छळीत बसूं ! - सखे ! - अरे नको नको, निजूं दे तिला. चांगली गाढ झोंप लागली आहे - ही काय वाटी सांपडली वाटतें ! फार छान झालें ! या काचांचे बारीक तुकडे करुन, देतों या नरडयांत ती पूड ओतून; म्हणजे चांगली आंतडी तुटून जिवाची कायमची सुटका तरी होईल ! पण थांबा, मी जर असा जीव दिला, तर माझ्यामागें हिचे किती बरें हाल होतील ! हिला किती यातना सोसाव्या लागतील ! - सखें, माझ्यामागें तुला कोण बरें प्रेमाने वागवील ? - नको ते मरणाचे भयंकर विचार ! - हो, हा हाताला काचेचा चुरा फेंकूनच द्यावा; पण - जिवंत राहून हिला जन्मभर रडविण्यापेक्षां, एकदांचें मरुन जाऊन थोडेच दिवस रडविणें बरे नव्हे का ? - अरे नको थांबूं आतां ! आटप लवकर ! जिवा ! अशी घाई कां ? बाबा रे, आत्महत्या करुन आपल्या बायकोला जर दुःखांत लोटलें, तर जग मला काय बरें म्हणेल ? दुष्ट नाहीं का म्हणणार ? - काय ? तुझ्या तडफडण्यापुढें जनावापवादाला मान देऊं नको ? - जा ! - अशा धडक्या घेऊं नकोस ! सोडतों तुला ! - सगळा चुरा पोटांत गेला ! - आतां मी कायमचा सुटणार ! - हाय ! सखे ! मी तुला आतां टाकून - हां चूप रहा ! निजूं दे तिला ! - देवा ! या जगांतल्या प्रत्येक वस्तूला आपल्या पापी नजरेनें भ्रष्ट केल्यामुळें, आंधळा झालेला हा दुरात्मा आतां नरकांत - आलों ! थांबा - ....

***

१६. देवा ! (नाट्यछटा)

.... अरे ! जिन्यांत तर अगदीं अंधार आहे ! अजून आठही वाजले नाहींत, तोंच जिकडे तिकडे अगदीं सामसूम ! ही कोठें बाहेर तर नाहीं गेली ? - छेः ! दाराच्या फटींतून दिव्याचा अंधुक अंधुक उजेड तर दिसत आहे. आणि अशा रात्रीच्या वेळेला ती कशाला उगीच बाहेर - पण हें काय ? कोणाच्या बरें फुटक्या हदयांतून हा रडका हुंदका बाहेर पडला ! - माझें हदय कसें धडधडायला - चला, हळूच वर जाऊन दाराच्या फटींतून, आपल्या फाटत चाललेल्या संसाराचें चित्र पाहूं ! - जिवा, असा मधेंच खचून जाऊं नकोस ! आधीं वर चल ! - पहा ! आपला हा संसार नीट डोळे उघडून पहा ! - दारिद्यानें संतापून जाऊन अगदीं त्रासानें अंगावर फेंकलेलें तें फाटकेंतुटकें लुगडें नेसून माझी बायको कशी हुंदके देऊन रडत आहे ती ! तो पहा ! ढणढण जळणार्‍या त्या घासलेटच्या डबड्याशेजारी, आगपिणीनें खाजवून - बाळ ! नको रे आपल्या चिमुकल्या जिवाला असा नखांनीं ओरबडूंस ! - रक्तानें न्हालेल्या, व मधून मधून आपल्या आईकडे, व दोन - तीन वर्षानीं वडील अशा आंधळ्या बहिणीकडे, केविलवाण्या मुद्रेंनें रडत रडत पाहणार्‍या, माझ्या त्या दोन वर्षाच्या लेंकराकडे पाहिलेंस का ? - काय म्हटलेंस ? माझी गोदी कशानें अशी आंधळी झाली ? दोन अडीच वर्षे झाली, देवीच्या तडाख्यांतून अगदी मरतां मरतां वांचली ! पण बिचारी जिवाऐवजी डोळेच घालवून बसली आहे ! - एकंदरींत, माझें आयुष्य या गरीब बिचार्‍या आत्म्यांचे हाल हाल करण्यांतच चाललें आहे कीं नाहीं ! - ऐकलेंस ? तिघेंही माझ्या या अस्तित्वाच्या लोखंडी चरकांत सांपडून, कशीं रडक्या स्वरानें मोठमोठ्यानें कण्हत आहेत तीं ! - हा ! - आगपिणीनें कुरतडला जाणारा, अहोरात्र अंधारांत तळमळणारा, व माझ्या हदयाचें हें भिकार डबडें मिळाल्यामुळें हा ढणढण जळणारा ! - अरेरे ! असे हे तीन आत्मे देवाला काय बरें म्हणत असतील ? - जिवा ! तुला नाहीं का रे ऐकूं येत ? - अरे ! ते म्हणत आहेत कीं, ' देवा, हा नरक लोक निर्माण झाला ! म्हणूनच आम्ही असे तडफडत आहों बरें ! ' - खरेंच ! माझी बायको लग्नापूर्वी आपल्या श्रीमंत पित्याच्या घरीं, कशी सुखांत आणि आनंदांत होती नाहीं ? पण शेवटी, स्वर्गात हंसणार्‍या व येथें रडविणार्‍या मंगळानें - या आनंदानें चिरकाल हंसूं इच्छिणार्‍या मुक्या प्राण्याचा, आपल्या पापकर्मात चिलबिळणार्‍या या दुरात्म्याशी विवाह - मंगल विवाह ! - लावून दिला ! परमेश्वरा ! तुझी स्वर्गात आनंदानें प्रकाशणारी नक्षत्रें, आह्मां माणसांच्या दृष्टीला, आमच्या मेंदूलाच, रडकी कशीं रे दिसतात ! - बाळांनो ! आपला बाप जन्माला कां आला, म्हणून देवाला विचारीत असेच निरंतर रडत बसा ! - पण मी म्हणतों, या मुलांचें तरी आयुष्य असें दुःखांत कां बरें जावें ? बरोबर ! - कां नाही या मुलांनी तडफडावें ! - अरे ! निष्प्रेमाच्या अत्यंत विषारी जागेमध्ये दारिद्यरसानें अधिकाधिक फोंफावणार्‍या कामवासनेला गोड फळें येतील, का ' कडू जहर ? - नासकीं अशीं फळें येतील ? हां, बरोबर विचारलेंस. मला जर येवढें कळत होतें तर मीं या गरीब बिचारीशीं विवाह करुन तिला अशी दुःखसागरांत कां लोटली ? - पण जिवा ! या घरांत निर्माण झालेल्या दुःखाला मीच कारण आहें असें मी कधी बरें म्हणत नाहीं ? - आतां मी विवाहच कां केला, तर बाबा रे, मीच तुला उलट असें विचारतों कीं, पापकर्मात गटांगळ्या खाणार्‍या प्राण्याला कधीं एकटें मरावेंसें वाटेल का ? - जितके आपल्या मिठींत सांपडतील, तितक्यांना घेऊन तो रसातळाला जाणार ! मग मीच एकटा या जगांत कसा बरें तडफडूं ! देवा ! मीच मंगळ जर जन्माला आलों नसतों - ! !....

***

१७. मुंबईत मजा गमतीची । (नाट्यछटा)

.... अहो तें सगळें खरें ! पण माझ्या मागची ही व्याद टळेल, तेव्हं तुमची मुंबई, आणखी तिची मजा ना ? तुमची शपथ, मला अगदीं त्रास आला आहे ! वर्ष होत आलें, पण माझी बायको बाळंतरोगानें आपली अधिकाधिक कुजतेच आहे ! अहो, मी म्हणतों, एकदां बरें तरी व्हावें, किंवा कायमचें मरुन तरी जावें ! प्लेगचीं माणसें नाहीं, कशी चोवीस अगर छत्तीस तासांत निकाल ! - रागावूं नको तर काय करुं ? सगळें जग लोटलें आहे मौज पाह्यला ! फार लांब कशाला ? माझ्या शेजारचाच तो गणू शिंपी. घरांत बायको एक दिवसाची बाळंतीण, गावांत तर प्लेगचा कहर, असें असून घरांतली दोन मोठीं भांडी घेतली, तीं माझ्याकडे आणून ठेवलीं, पंधरा रुपये घेतले, आणि लागलीच पठ्ठ्या मुंबईस चालता झाला ! - कां ? आहे कीं नाहीं ? नाहींतर आम्ही, बसलों आहोंत कीं नाहीं असे रडत ! - नाहीं ? नाहीं, आपणच सांगा की, अशी मौज, अशी लाइट, कधीं या जन्मांत तरी फिरुन आपल्याला पाह्यला सांपडेल का ? - अहो बाबूराव, मी चांगले ठरविलें होतें कीं, बेळगांवास जावें, चंद्राजीला घ्यावी, आणि तसेच मुंबईस परस्पर चालते व्हावें ! पण म्हण आहे ना, कीं माणूस योजितो एक, आणि देव घडवून आणतो दुसरेंच ! चांगला बेळगांवास जायला निघालों, तोंच आमच्या बाईसाहेबांची प्रकृति एकाएकी बिघडली, आणि काय ? घटकेंत जीव जातो, घटकेंत येतो, असें आतांशा चार दिवस सारखें चाललें आहें ! शपथ ! मी तर अगदी रडकुंडीस आलों आहें बुवा !...

***

१८. म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! (नाट्यछटा)

.... देवा ! माझीं पिलें भुकेनें कशीं व्याकूळ रे झालीं आहेत ! तीन वाजून गेले, पण अजून यांच्या पोटांत, घासभर कीं रे अन्न केलें नाहीं ! बाळांनो ! उगी, नका रडूं ! मी पुनः खालीं जातें - अगदी हलूं नका. या गलथ्यांतच अमळ एकमेकांशी खेळत बसा ! - स्वयंपाकघरांत जातें, आणि कांहीं उष्टें अन्न पडलें असेल, तें माझ्या बाळांकरितां घेऊन लवकर येतें ! जाऊं ? - आज घरांत येवढें काय आहे ? काय सांगूं तुम्हांला ! मुलांनो, आज किं नाहीं माझा वाढदिवस - माझ्या पूर्वजन्मीच्या मनुष्यदेहाचें वर्षश्राद्ध आहे ! खरें म्हटलें, तर हें माझेंच घर - हीं माझींच मुलें, - पण या घरांतल्या मुलांना काय ठाऊक कीं, मी त्यांचीच आई आहें म्हणून ! त्यांना वाटतें - त्यांनाच काय ? - सर्व जगाला वाटतें की, आपले सगळे पूर्वज स्वर्गाला जातात म्हणून ! पण किती तरी ठिकाणी, मनुष्यदेहाचें जीर्ण वस्त्र फेंकून देऊन पशुपक्ष्यांचें कातडें अंगावर घेऊन आम्ही ! - आम्ही आपल्या मुलांलेंकरांभोंवती प्रेमानें वावरतों, त्यांची सेवा करतों - आणि उलट त्यांच्या लाथाबुक्क्यांचे - चाबकांचे - तडाखे सोशीत धाय मोकलून रडत कीं रे असतों ! पण बाळांनो, जगाला निव्वळ देह - कातडें - माती ! - प्रिय आहे ! आत्म्यावर जगाचें खरें प्रेमच नाहीं ! जोंपर्यत मी मनुष्यदेहानें नटलें होते, तोंपर्यंत ही घरांतली माझींच मुलेंलेंकरे कशीं मजवर प्रेम करीत होतीं ! पण मी मांजर होऊन घरांत फिरुं लागल्यापासून, मला कोणी जवळसुद्धां उभें राहू देत नाहीं ! देवा ! आज माझाच वाढदिवस, आणि मलाच का रे अन्न - पानांतलें घासभर उष्टें अन्नसुद्धां मिळूं नये ! पण या घरांतल्या मुलांना तरी काय ठाऊक कीं, मी त्याचीच आई आहें ? तसें असतें तर मघाशीं मी नुसती स्वयंपाकघरांत डोकावलें मात्र, तोंच ' रांडे ! नीघ ! ' असें म्हणून माझ्या वेणूनें - प्रत्यक्ष माझ्या लेंकीनें ! - ताडकन् माझ्या डोक्यांत लाटणें फेंकून कशाला बरें मारलें असतें ! - बाळांनो ! नका रडूं ! मी आतां खाली जाऊन येतें !.....

***

१९. जातिभेद नाही कोठें ? (नाट्यछटा)

.... ही अशी लटपट नको आहे ! म्हणे पुष्कळांचें मत आहे कीं, ईश्वरानें जातिभेद निर्माण केला नाहीं म्हणून ! असेल ! एका पुष्कळांचें जसें हें मत आहे, तसेंच जगांतल्या दुसर्‍या पुष्कळांचेंही मत आहे कीं, ईश्वरानेंच जातिभेद निर्माण केला आहे ! - मी असें विचारतों कीं, आपल्या मानवसृष्टीखेरीज इतर जीवसृष्टींत परमेश्वरानें जातिभेद निर्माण केला आहे कीं नाहीं ? - फार कशाला ? या वनांतलीच मौज पहा कीं, अहो, कांहीं झाडांना नुसतीं सुवासिक फुलेंच आहेत, तर कांहीं दिखाऊ - पण अत्यंत सुंदर - अशाच फुलांनीं नटलेलीं आहेत ! पहा, तो आम्रवृक्ष पहा ! त्याला सुवासिक मोहरकी आहे व गोड फळेंही येतील ! बिचार्‍या सुरुच्या झाडांना तर फुलेंही नाहींत आणखी फळेंही नाहींत ! पण त्यांची, वायूच्या लहरीमध्यें डुलत डुलत स्वर्गाला जाऊन भिडण्याची धडपड अव्याहत चालू असते कीं नाही ? तसेंच पक्ष्यांचे ! कोणी गाणारे आहेत, कोणी सुंदर आहेत, तर कांही - पहा ती घार ! ओहोहो ! आकाशांत उंच भरार्‍या मारीत चालली आहे ! - हो, मग, मी तरी तेंच म्हणतों कीं, पशूंमध्येंही हाच प्रकार आहे ! अहो इतकेच नाहीं, पण गुलाबाच्या झाडामध्येंसुद्धां किती तरी जाती आहेत ! मला सांगा, सगळ्या जगांत पोपट तरी एकाच जातीचे आहेत का ? मुळींच नाहीं. अहो, प्रत्यक्ष माणसाला कोठें नको आहे जातिभेद ? हो, आपल्यालाच मी असें विचारतों कीं, तुम्ही आपल्या बागेंत नुसती गुलाबाचींच झाडें कां नाही लावीत ? पाहिजे कशाला जाई - जुई - मालती - मोगरा ! - तें कांही नाहीं ! माणसाचा स्वभावच हा कीं, आपल्या वर्तनांतील दोषांचा डेरा कोणाच्या तरी माथी तो आदळीत असतो ! - वा ! काय कोकिळा मधुर गात आहे ! का हो त्रिंबकराव, आपल्याभोंवती मधून मधून जें एवढें गवत पसरलें आहे, त्यामध्यें रडून रडून वाळलेली एक तरी गवताची पात तुम्हांला दिसत आहे का ? तीं नारळाचीं झाडें आमच्यापेक्षां कां उंच आहेत, आणि आम्हांला तूं इतकें उंच कां करीत नाहींस ? - अशी यांची ईश्वराजवळ चालू असलेली ओरड तुम्हांला कोठें ऐकूं येत आहे का ? कोकिळा गात आहे म्हणून इतर पक्षी गायचे थोडेच थांबले आहेत ! आपल्या बंधूजवळ जितका मोहोर आहे तितका आपल्याजवळ नाहीं, म्हणून हा आम्रवृक्ष मत्सरानें सुकून गेला आहे का ? सांगा, अगदी लहानशा गवाताच्या पातीला जितका आपल्यांतील ईश्वरी तेजाविषयीं अभिमान वाटतो, तितकाच, उंच हात पसरुन आपल्या लहान भावंडांना वारा घालणार्‍या त्या नारळाच्या झाडालाही वाटतो ! जगाचें सौंदर्य वाढविण्याची परमेश्वरानें आपल्यावर सोंपविलेली कामगिरी, जितक्या उत्साहानें व कळकळीनें तें गुलाबाचें फूल बजावीत आहे, तितक्याच उत्साहानें व कळकळीनें हें झेंडूचें फूलही नाहीं का बजावीत? - हें पहा ! या आनंदानें स्मित करणार्‍या व शांत वनांत दुःखाचा एक तरी सुस्कारा ऐकूं येत आहे का ? - नाहीं तर आपल्या शहराकडे नजर फेंका ! जिकडे तिकडे मीपणाची आग भडकून त्यांत तडफडून - भाजून - निघणार्‍या तूंपणाच्या हदयांतून अव्याहत बाहेर पडणार्‍या धुराचें - त्रिंबकराव ! - कसें हें आच्छादन पसरलें आहे ! - काय म्हटलेंत ? हा सगळा धूर जातिभेदानें घुमसणार्‍या तंट्यांतून बाहेर पडत आहे ? - नाहीं ! तसें नाहीं ! अहो ! ईश्वराला जाणूनबुजून पायांखाली तुडवून सर्व जगाचा मी एकटा मालक असावा, या इच्छेनें अनावर होऊन, एकमेकांवर टाळकीं फोडून घेणार्‍यांच्या मेंदूतून या वाफा निघत आहेत - वाफा ! ' मी ! मी ! ' अशी रणगर्जना जिकडे तिकडे ऐकूं येत आहे !....

***

२०. कोकिलाबाई गोडबोले (नाट्यछटा)

.... मेले हात धुऊन पाठीस लागले आहेत जसे ! काडीइतकें सुद्धां कार्ट्यापासून सुख नाहीं ! - कस्सें, करुं तरी कसें आतां ! जेवा मुकाट्यानें ! नाहीं तर चांगली फुंकणी घालीन पाठीत एकेकाच्या ! - काय, काय म्हटलेंस गण्या ? - मेल्या ! मी मोठमोठ्यांनें ओरडते का ? - ऊं ! - चूप ! ओक्साबोक्शी रडतो आहे मेला ! जीव गेला ? का घालूं आणखी पाठींत ? - काग वेणे ? गप कां बसलीस ? - भाकरीवर तूप हवें ? - मेलें माझें तोंड नाही धड आतां ! बापानें ठेवलें आहे तूप तुझ्या टवळे ! तूप पाहिजे नाहीं ? हें घे ! - गप्प ! नाहीं तर आणखी रपके घालीन चांगले ! - मिटलें का नाही तोंड ? का अस्सा आणखी ! - हात तुला घातले चुलींत नेऊन अवदसे ! - कोण आहे ? कोण हांका मारते आहे बाहेर ? - आहेत हो, आहेत ! आलें, आलें ! - या पोरट्यांच्या गागण्यानें अमळ ऐकूं येईल तर ना ? लग्न होऊन घरांत आल्यापासून सारखी पाहत आहें, रात्रंदिवस मेला जंजाळ पाठीमागे ! - सांडलेंस पाणी ? - बाई ! बाई ! भंडावून सोडलें आहे या पोरट्यांनी - ! पहा, आहे ? नीट मुकाट्यानें जेवायचें, त्या मिटक्या रे कशाला वाजवायच्या ? - थांब !! हा झारा तापवून चांगला चरचरुन डाग देतें तोंडाला ! - दळिद्री कारटी ! खाऊन पिऊन मेली झालीं आहेत पहा कशीं ! मरुं घातली आहेत जशीं ! - आलांत ? आज लवकर येणें केलें ? स्वारीचें भटकणें लवकरच संपलें म्हणायचें ! रोज उठून तीं मेलीं मंडळें का फंडळे ! कर्माची करा आपल्या मंडळें ! - उद्यां जा तर खरे, कीं ही सगळी कारटी आणून तिथें उभी करते अन् पहाते तमाशा ! - आलें हो, आलें ! - केव्हांच्या त्या मुरलीबाई हांका मारीत आहेत, तेव्हां अमळ - ऐकलें का ?

- असें घुम्यासारखें बसायचें नाहीं !

संभाळा या कारट्यांना, नाहीं तर मेली आग लावून देतील घरादाराला ! - आलें बाई !!....

***