Ti Chan Aatmbhan - 9 in Marathi Moral Stories by Anuja books and stories PDF | ती चं आत्मभान... 9

The Author
Featured Books
Categories
Share

ती चं आत्मभान... 9

९. अजूनही लढा चालू आहे..

अनुजा कुलकर्णी.

गिरीजाच लग्न तिच्या पसंतीच्या मुलाशी झाल आणि गिरीजा नवीन घरात सुखाने संसार करायला लागली. तिच आयुष्य एकदम मस्त चालू होत. तिच्या घरातले सगळे लोकं म्हणजे तिचा नवरा- निकेतन, तिचे सासू सासरे सगळेच एकदम मस्त होते. पाहता पाहता लग्नाला दोन वर्ष होऊन गेली आणि बाळाची चाहूल लागली. बाळाची चाहुल लागल्यावर गिरीजा तर इतकी खुश झाली. आता त्यांचा परिवार पूर्ण होणार होता. त्यांच्या घरातले सुद्धा सगळे खुश होते. गिरीजाला तर काय करू काय नको अस होत होत. तिच आयुष्य आता खऱ्या अर्थानी बदलणार होत. आणि लवकरच गिरीजा आईपण अनुभवणार होती. स्त्रीच्या आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण गिरीजा अनुभवत होती.

"चला बाई साहेब.. आता काही महिन्यातच गडबड चालू होणार. मग निवांतपणा नाही मिळणार. मी पण बाळाच्या येण्याची आतुरतेनी वाट पाहतो आहे." निकेतन गिरीजाचा हात हातात घेत लाडीकपणे बोलला.

"हो हो बाळाचे बाबा.. आता तुम्ही पण तयारीला लागा. बाळ आल की तुम्ही सुद्धा बिझी होणार." गोड हसत गिरीजा उत्तरली,"काही महिन्यातच तुला पण वेळ मिळणार नाही कश्यालाच. आणि महत्वाच निकेतन, तू बाळासाठी आत्ता पासून वेगळे पैसे साठवायला लाग. आपल्या बाळाला पैश्याची उणीव कधी भासता कामा नये. मी पण माझ्या पगारातून थोडे पैसे बाळासाठी वेगळे ठेवणार आहे. आपण बाळाला सगळ देऊ आणि उत्तम माणूस बनवू!" गिरीजाचा उत्साह तिच्या बोलण्यातून जाणवत होता. आई होण्याचा आनंद गिरीजा लपवू शकत नव्हती.

"हो हो गिरीजा.. बाळाला काही कमी पडू द्यायचं नाही. पण अजून बाळाला यायला वेळ आहे. आपण मस्त नियोजन करू. पण थोडा श्वास तर घे. आणि तू तर आत्तापासूनच तू किती खुश झालीयेस गिरीजा! मस्त आनंदी राहा..मग आपल बाळ सुद्धा आनंदीच असेल. आणि आय लव यु!!"

"पहिलं बाळ आहे निक.. मी पहिल्यांदा आईपण अनुभवणार आहे. मग खुश तर होणारच ना? लव यु टू निक.. आणि थँक्यू..."

"हो हो! सगळी हौस पूर्ण करून घे, पण थँक्यू का? मी तुला थँक्यू... तू इतकी मोठी गिफ्ट देतीयेस मला. आता आराम कर, उगाच जास्त ताण घेऊ नकोस! भरपूर खायचं आता. बाळ एकदम गुटगुटीत झाल पाहिजे. तुला काय हव नको ते सांग मी आणून देईन!! तब्येतीची हेळसांड केलेली अजिबात चालणार नाही. कळल?" निकेतन डोळे वटारून बोलला

"हो हो.. किती सूचना. आणि ओरडू नकोस मला निक. बाळ सुद्धा घाबरेल मग पोटात. मी घेते नीट काळजी! माझी आणि आता बाळाची सुद्धा! तू नको काळजी करूस! बर मी पडते आता.." इतक बोलून गिरीजा गादीवर पडली. आणि तिचा डोळा लागला. निकेतन सुद्धा खोलीच्या बाहेर पडला.

दिवस बघता बघता पुढे जात होते. गिरीजाला तिसरा महिना चालू झाला. रुटीन चेक-अप् साठी सगळेच दवाखान्यात जायला निघाले. खर तर सगळ्यांनी जायची गरजच नव्हती पण तरी सासू सासरे सुद्धा त्यांच्या बरोबर आले. ह्यावेळी गिरीजाच्या सासूनी दवाखाना बदलायला लावला. तो दवाखाना इतका काही खास नव्हता. गिरिजाला आश्चर्य वाटल पण ती काही बोलली नाही. दवाखान्यात शिरताच सासू बोलायला लागली,

"गिरीजा.. आज मुलगा आहे हे कळू दे. मग तुझे खूप लाड करू आम्ही! तुला जे हव नको ते सगळ!" गिरीजाची सासू बोलली. सासुच हे अस बोलणं गिरीजाला खटकल.

"आई, तुम्हाला नातू हवा आहे? मुलगा किंवा मुलगी.. काही फरक पडत नाही आम्हाला! मी आणि निकेतन बाळाला एक उत्तम माणूस बनवणार आहोत. तसही, गर्भलिंग चाचणीला आता मान्यता नाही. मग मुलगा कि मुलगी कळणार नाही. तरीही तुमचा का अट्टाहास की मुलगाच हवा? जे असेल ते मान्य करावच लागेल तुम्हाला." थोडी उखडून गिरीजा बोलली.

"काय? मुलगा किंवा मुलगी काही फरक नाही? असे विचार आमच्याकडे चालणार नाहीत. तुला तुझे विचार बदलायला लागतील गिरीजा. आम्हाला हे अजिबात चालणार नाही. हो की नाही हो?" नवऱ्याकडे पाहत सासू बोलली आणि सासूच्या बोलण्याला संमती दाखवत गिरीजाच्या सासऱ्यांनी सुद्धा मान डोलावली. "आम्हाला पहिलं बाळ हा मुलगाच हवा. आमचे एक ज्योतिषी आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं आहे, पहिलं बाळ मुलगा झाला निकेतानला तर घराची भरभराट होत राहील. मुलगी झाली तर आम्हाला चालेल पण दुसरी मुलगी झाली तर चालेल. पहिल्यांदी मुलगी मग दुसरा चान्स घेतला तर मुलगीच झाली तर? आम्हाला चालणार नाही. वंशाचा दिवा तर हवाच. मुली काय शेवटी परक्याच धन... वंश पुढे चालवायला पहिला मुलगाच हवा. बाकी मला काही माहिती नाही." गिरीजा ची सासू बोलत होती. सासूचे ते शब्द ऐकून गिरीजा अस्वस्थ झाली. टेस्ट झाली. निकिताची सोनोग्राफी झाली. बाळ सुधृड आहे हे डॉक्टरांनी सांगितलं. गिरीजा आणि निकेतन खुश झाले पण लिंग चाचणीची परवानगीही नसतांना गिरीजाच्या बाळाची लिंग चाचणी झाली. गिरीजाच्या पोटात एक मुलगी वाढत होती. ते ऐकताच तिच्या सासू सासऱ्यांचा राग अनावर झाला. आणि नंतर गिरीजा ला अजून टेस्ट करायच्या अस सांगून अजून एका ठिकाणी नेल. आणि तिच्या नकळत नको तेच झाल. काही वेळानी गिरिजाला काहीतरी चुकीचं झाल्याची जाणीव झाली आणि तिच्या ध्यानात सगळा प्रकार आला. आणि गिरीजा पुरती कोलमडून गेली. झालेल्या प्रकारा नंतर मात्र तिने त्या घरात न राहायचा निर्णय घेतला. आणि ती आईच्या घरी निघून आली. तिच्या मनाविरुद्ध तिच्या पोटातली मुलगी मारून टाकली होत. हा धक्का गिरिजाला सहन झाला नाही.

काही दिवस गेले. गिरीजा तिच्या दुखाःतून बाहेर पडू शकत न्हवती. इतका मोठा आघात पचवून पुढे जाण ही गोष्ट साधी नव्हती. गिरीजा खूप दिवस रडत राहिली. तिने नोकरी सोडली आणि ती तिच्या खोली मध्ये एकटी राहायला लागली. तिच्या आई बाबांना तिची काळजी वाटायला लागली पण काय उपाय करायचा हे सुद्धा त्यांना कळत नव्हत. गिरीजा घरातून निघून गेल ह्याच दु:ख तिच्या सासू सासऱ्यांना अजिबातच नव्हत. गिरीजा नाही तर दुसरी कोणती मुलगी त्यांना वंशाचा दिवा देईल ह्याची दोघांना खात्री होती. निकेतनला झालेल्या प्रकारामुळे वाईट वाटल होत पण आई वडिलांच्या विरुद्ध जाऊन बोलायची हिम्मत त्याच्याकडे नव्हती. तरी आई वडिलांच्या नकळत निकेतन गिरीजाला फोन लावायचा प्रयत्न करत होता पण गिरीजा मात्र त्याचा फोन घेत न्हवती. ह्या घटनेला २ महिने होऊन गेले. बराच विचार केल्यावर गिरीजानी काही निर्णय घेतले होते.

"आता खूप झाल रडणं..खूप रडले, खूप सहन केल. परिस्थिती समोर मान खाली घालून जगले! कोणाला घाबरून? आता खरच बास.." गिरजा स्वतःशीच बोलत होती," मी रडले म्हणून माझे प्रश्न थोडी सुटणार आहेत? मला झालेला त्रास कमी होणार आहे?" गिरीजा स्वतःशीच बोलत होती पण तिचा राग इतका वाढला होता की तिचा आवाज चढला हे सुद्धा तिला जाणवलं नाही. गिरीजा तिच्या रूम च दार लावायला विसरली होती त्यामुळे तिचा आवाज बाहेरच्या खोली पर्यंत गेला. तिची आई बाहेर सोफ्यावर पेपर वाचत बसली होती पण गिरजाचा मोठा आवाज ऐकून तिच्या खोलीत गेली. आणि बोलायला लागली,

"काय झाल गिरीजा? एकदम इतकी का चिडून बोलतीयेस?"

"काय ग आई.. सारखी कटकट का करतेस? मी काहीतरी विचारात असते आणि बरोबर तू येतेस आणि तुझ काही ना काही चालू करतेस. जरा स्पेस दे की..आता मी काय लहान राहिली नाहीये..इतकी ढवळाढवळ नका करू माझ्या आयुष्यात.." गिरीजाला वैतागून बोलली. तिच्या आईला तिची चिडचिड जाणवली. हे सुद्धा जाणवलं की गिरीजा अस्वस्थ आहे. तिने गिरीजाच्या डोक्यावरून हात फिरवला. नंतर बोलायला लागली,

"काय होतंय गिरीजा?"

"सॉरी ग आई! आणि काही होत नाहीये.. विचार करत होते. आयुष्यात खूप निर्णय चुकले माझे. आता वेळ आलीये सगळ्या चुका सुधारायची."

"तू काय चूक केलीस गिरीजा?" गिरीजाची आई बोलली. तिला जाणवलं गिरीजा कश्यामुळे अस्वस्थ झाली होती,"स्वतःला दोष अजिबात देऊ नकोस. तुझी काहीच चूक नव्हती. तू फसवली गेलीस."

"नाही ग आई. चूक माझीच होती." बोलता बोलता गिरीजाच्या डोळ्यात एकदम पाणीच आल,"मी डोळे उघडे ठेऊन जगले नाही. आंधळेपणाने विश्वास ठेवला. तरी मला वाटत होत काहीतरी चुकीचं होणारे.. पण..."

"गिरीजा, आता सोडून दे तो विचार. कशाला हवा आता तो विचार? जे झाल ते झाल ते आता बदलता तर येणार नाही. तू जितका विचार करशील त्यानी तुलाच जास्तीत जास्त त्रास होणारे. बाकी कोणाला काहीही फरक देखील पडणार नाही."

"आई, सोडून देऊ म्हणतेस? इतक सोप्पं असत गोष्टी सोडून देण? माझा विश्वासघात झाला. मी आतून दुखावले गेले..पण माझ्या मनाचा कोणीच कधीच विचारही केला नाही ग.. आणि अश्या लोकांना मी सोडून देऊ? का करू अस? आज मी उद्या अजून कोणी..हे सत्र संपणारच नाही. मुलगा हा असा अट्टाहास अजूनही लोकं का करतात? मुली इतक्या पुढे गेल्यात तरी? आता काहीतरी केल पाहिजे."

"हो हो.. सगळ बरोबर! पण आपण काय करू शकतो? नुसत्या घोषणा होतात आणि पुढे त्याच काही होत नाही. गिरीजा..मला तुझी काळजी वाटते ग. तू आधी तापट डोक्याची आहेस. चिडून सासर सोडून माहेरी आलीस. तुझा तुझ्या रागावर ताबा नाहीये. आणि आपल्याला ह्याच समाजात राहायच आहे हे विसरू नकोस. तू लवकरात लवकर तुझ्या घरी राहायला जा."

"आई आई..." गिरीजानी तिच्या आईला थांबवलं, "समाज बिमाज सगळ ठीक ग आई..आणि माझ ओझ झालय का आता तुम्हाला?" गिरीजा एकदमच बोलायची थांबली,"आई, आपण नंतर बोलायचं का? मला जरा थोडी माहिती पहायची आहे. आणि यु नो, आय नीड माय प्रायव्हसी."

"ठीके गिरीजा.. पण शांत हो. आणि तुझ ओझ नाही ग. तुझी काळजी वाटते. तू आणि निकेतन एकत्र रहाव इतकच वाटत. निकेतन सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो. आणि आम्ही दोघ तुझ्याबरोबर नेहमीच असू.."

"माहितीये मला. आणि प्रेम करतो पण निकेतन माझ्याबरोबर असेल तर...नाहीतर मात्र नाही! आणि मला माहितीये बाबा कसे आहेत. जे मला कधी एकट पडू देणार नाहीत! आता प्लीज मला माझ काम करुदे. आणि जातांना दार ओढून घे."

"मी तर तुझी प्रत्येक गोष्ट ऐकते गिरीजा.. माझी एकुलती एक लाडाची मुलगी आहेस. तू बस एकटी काम करत. मी लाऊन घेते दार." इतक बोलून गिरीजाची आई खोलीबाहेर जायला निघाली. तितक्यात गिरीजानी आईला थांबवलं,

"एक मिनिट थांब आई. काहीतरी सांगायचं आहे."

"सांग की.."

"आय लव यु आई... तुम्ही दोघ माझ्या बरोबर असाल ना नेहमी? मी कोणतेही निर्णय घेतले तरी?"

"आय लव यु टू गिरीजा. आणि.." इतक बोलून गिरीजाची आई बोलायची थांबली. आईकडून काही उत्तर मिळाल नाही म्हणून गिरीजाला वाईट वाटल पण तिने परत आईला तेच विचारलं,

"तू माझ्या बरोबर असशील ना आई नेहमीच?" गिरीजाच बोलण ऐकल आणि मग मात्र आईला तिचे अश्रू थांबवता आले नाहीत,"हो हो.. मी आणि हे नेहमीच तुझ्या बरोबर असेन. कोणीही तुझ्या बरोबर नसेल तरी खात्री ठेव आम्ही तुझ्या बरोबर नेहमीच असू गिरीजा. तुझ्या डोक्यात काय चालूये नाही कळत मला. असो.." आईच हे बोलणं ऐकून गिरीजा धावत आई जवळ आली आणि तिने आईला घट्ट मिठी मारली.

"चल, तू कर तुला हव ते काम.. मी नाही करत तुला डिस्टर्ब. मी पण आवरते माझी कामं." हे बोलून गिरीजाची आई खोली बाहेर पडली.

गिरीजानी दार आतून लाऊन घेतलं आणि तिच काम करायला लागली. तिच्या मनात विचारांची घालमेल चालू होती. पण ह्यावेळी तिने काही निर्णय खंबीरपणे घेतले होते. आता तिच्या लेखी चुकीला माफी नव्हती. तिच आयुष्य अस कोणीही उठून खराब केलेलं गिरीजा चालवून घेणार न्हवती. तिच बाळ कोणीही उठून पोटात मारून टाकणार ही गोष्ट गिरीजाला मान्य न्हवती. तिने इंटरनेटवर सगळी माहिती पहिली. आणि काही निर्णय घेतले. आणि कॉम्प्युटर बंद करून डोळे मिटून बसली. ती मनोमन काही विचार करत होती. ह्यावेळी गिरीजा खूप खंबीर बनली होती. तिला निकेतनची आठवण येत होती. तिने निकेतनला फोन केला. निकेतननी फोन उचलला आणि तो बोलायला लागला,

"गिरीजा.. फायनली! नाही राहता येत ग तुझ्याशिवाय! मी तुझ्याशी कितीवेळा बोलायचा प्रयत्न केला पण तू नाही घेतलास माझा फोन, माझ्या मेसेजेस ना पण उत्तर नाही दिलस! तू घरी ये की ग! आणि आय अॅम सॉरी. मला जाणीव झालीये मी चुकीच वागलो. मी आई बाबांना विरोध करायला हवा होता पण माझी हिम्मत झाली नाही. मी नाही बोलू शकलो एकही वाक्य त्यांच्या विरोधात."

"आय मिस्ड यु टू निकेतन. ऐक, मला तुझ्याशी बोलायचं होत पण मला खूप त्रास झाला. मला कोणाशीच बोलायची इच्छा होत न्हवती. जे झाल तर माझ्यासाठी अनपेक्षित होत. एका आईला तिचं बाळ मुलगी आहे म्हणून पोटात मारून टाकलं ही गोष्ट सहन होईल का रे? एक सांग, तू माझी साथ आत्ता देशील? नसशील तर मी तुला फक्त सॉरी म्हणायला फोन केला आहे. म्हणजे जर तू माझी साथ देणार नसशील तर आपले संबंध संपतील."

"मला कल्पना आहे तू काय सहन केलयस. आणि आपले संबंध संपतील असा विचारही नको करूस गिरीजा! तू मला हवी आहेस माझ्या आयुष्यात. आणि हो हो..आता मी तुझ्या बरोबर नेहमी असेन. मी झालेली चूक पुन्हा होऊन देणार नाही. माझ मन सुद्धा किती दिवस खात होत. आई बाबा अस काही करतील अस मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. खरच मला कल्पना नव्हती ग..खूप सॉरी! मला माहितीये, तू किती दुखावली गेली असशील पण माझ्यात नव्हती हिम्मत आई बाबांच्या विरोधात बोलायची. माझ्या मनाची सुद्धा किती घालमेल झाली. मला सुद्धा खूप त्रास झाला. मी ऐकून घेतलं पण आता नाही.. मला माझ आयुष्य तुझ्याबरोबर जगायचं आहे आणि तू मला माझ्या आयुष्यात हवी आहेस परत. मी त्यासाठी आई बाबांच्या विरोधात जाऊ शकतो. जे चूक आहे ते चूकच आहे. ते माझ्या आई वडिलांनी केल म्हणून मी काहीच करणार नाही अस नाही. मी त्यांच्या विरोधात जाऊन आवाज उठवू शकतो."

"नक्की का निक? परत घाबरलास तर मात्र.."

"नाही नाही ह्यावेळी खात्री ठेव.."

"ग्रेट मग..तू आज घरी येऊ शकशील? मी काही निर्णय घेतले आहेत. जे मी तुला आत्ता सांगू शकत नाही. घरी आल्यावर सांगेन."

"ठीक. मी येतो जरा वेळात."

"आणि हो, प्लीज मन खंबीर करून ये! मी काही निर्णयांची पूर्तता करणार आहे आता. खूप रडले, खूप सहन केल. आता नाही. आता सहन केल तर मी ह्यापुढे कशालाही विरोध करू शकणार नाही."

"मला आता भीती वाटतीये गिरीजा. तू नक्की काय करणार आहेस?"

"तू घरी ये मग सांगते! फक्त जर तू खरच माझी साथ देणार असशील, तुला खरच वाटत असेल माझ्याबरोबर तुझे आई बाबा जे वागले ते चुकीचं होत आणि मला न्याय मिळाला पाहिजे तरच तू ये नाहीतर मी माझे निर्णय एकटीने घ्यायला समर्थ आहे. तुला बळजुबरी नाही. पण मी माझे निर्णय घेतले आहेत आता. कोणालाही माझ्या मनाविरुद्ध काही वागायचा अधिकार मी दिलेला नाही."

"सगळ मान्य आहे मला. चल मी आवरून येतो तडक तुझ्याकडे." इतक बोलून निकेतन आवरायला लागला आणि आवरून गिरीजा कडे आला.

"सांग, काय करणारेस आता?"

"शांतपणे ऐक."

"हो हो.. तू सांग तर.."

"आता मी सरळ पोलीस स्टेशन गाठणार! माझ्याबरोबर जे झाल तो गुन्हा नोंदवणार. तो दवाखाना जिथे गर्भलिंग चाचणी होते आणि माझ्यासारख्या कित्येक मुलींचे गर्भ पोटात मारले जातात त्याच्या विरुद्ध सुद्धा कम्प्लेंट करणार आणि मी आता कोणालाही सोडणार नाही! अगदी तुमचे कोण ज्योतिषी आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा नोंदवणार. ज्यांनी ज्यांनी माझ्याकडून माझा आनंद हिरावून घेतला त्यातल्या कोणालाही नाही सोडणार मी. जे माझ्या बाबतीत झाल ते दुसऱ्या कोणत्याही मुलीबरोबर होऊ देणार नाही. आत्ता एक दवाखाना मिळाला. असे सगळेच अवैधरीत्या होणारे गर्भपात बंद होण्यासाठी मी प्रयत्न करणार. फेसबुक वर पेज चालू करणार. ज्या मुलींनी हे दुःख अनुभवलं पण ज्यांची काही बोलायची हिम्मत झाली नाही त्यांच्यासाठी थोडी फुंकर आणि ह्यापुढे अशा घटना होऊ नये ह्यासाठी प्रयत्न. आता खूप झाल. प्रत्येक मुलीनी पुढे येऊन बोलण्याची गरज आहे. मुलगी म्हणजे काय खेळणं वाटत का सगळ्यांना? मी दाखवून देईन, गरज पडल्यावर साधी स्त्री दुर्गेच रूप घेऊन आवाज उठवू शकते. आता गप्प नाही बसून राहणार. आणि महत्वाच, अबला नाही मी. माझा लढा मी देऊ शकते. तू सांग, देशील आताही माझी साथ?"

निकेतन विचारात पडला. पण ह्यावेळी निकेतन सुद्धा आवाज उठवणार होता. आणि आई वडिलांच्या विरोधात जायला सुद्धा तो तयार होता.

"हो..गिरीजा! मागच्यावेळी मी तुझी साथ देऊ शकलो नाही. मी काहीच बोलू शकलो नाही पण आता नाही. मी तुझ्या बरोबर आहे. मी जाईन आई बाबांचा विरोधात. आणि स्त्री ला जन्माला येण्याआधीच मारून कसली समानता दाखवतोय आपण? नुसत बोलून काय होणारे? जोपर्यंत जे खरच आचरणात येत नाही तोपर्यंत काही खर नाही. आणि नुसते कायदे कागदावर नको. सत्यात आल पाहिजे. मुलगी नको ही वृत्ती बदलायला पाहिजे. बायको म्हणून, आई म्हणून, सून म्हणून मुलगी पाहिजे सगळ्यांना पण मुलगी नको? आई बाबा जे वागले त्यानी मी सुद्धा दुखावलो गेलो. मुलगा किंवा मुलगी. देवाकडून किती मोठी गिफ्ट होती मला. मुलगी सुद्धा माझीच होती हे कसे विसरले दोघ? ह्या जगात येण्या आधी माझ्या मुलीला मारून टाकल त्यांनी. मला आता काहीतरीचं वाटत त्यांना आई वडील म्हणायला. दोघांना सगळा प्रकार झाल्या नंतर सुद्धा काही वाटल नाही. ते एकदम नॉर्मल वागत होते. ह्याच मला जास्त वाईट वाटल. जर मला आधी कल्पना असती तर मी ते होऊनच दिल नसत. नक्की..पण जे झाल ते बदलू शकत नाही..पण आवाज मात्र मी सुद्धा उठवणार! चुकीला माफी नाहीच..अश्या चुकीला तर कधीच नाही. हा लढा फक्त तुझा नसेल..मी सुद्धा तुझ्या बरोबर असेन नेहमीच! आता आपण एकत्र आवाज उठवू." निकेतननी गिरीजाचा हात हातात घेतला आणि तिला विश्वास दिला.

गिरीजा निकेतनच बोलण ऐकत होती तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आल. तिने डोळे पुसले आणि बोलली,

"निक.. तू तुझ्या आई बाबांविरुद्ध जाऊन माझी साथ देतोयस मला खरच तुझा अभिमान आहे. आता हा लढा आपल्या दोघांचा. आता मुली वाचतील ह्यासाठी आपण दोघ प्रयत्न करू. लढत राहू." आणि समाधानानी निकेतन कडे पाहिलं. आणि त्यांनतर ते दोघ सरळ पोलीस स्टेशनला जायला निघाले अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला..

अनुजा कुलकर्णी.