Sharda Music - Issue - 1 in Marathi Drama by Govind Ballal Deval books and stories PDF | संगीत शारदा - अंक - 1

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

संगीत शारदा - अंक - 1

संगीत शारदा

गोविंद बल्लाळ देवल

अंक पहिला

पद्य - ( राग --- हमीर : चौताल )

शंकरपद वंदिं आधीं ॥ मग नत बलवंतपदीं ॥ आस्ताई ॥ वाग्देवीकंठमणी ॥ प्रतिधाते ज्ञानतरणि ॥ रसगंगा यद्वाणी ॥ नमितों ते सुकवि ह्रदीं ॥१॥

पद्य --- ( राग --- बहार : त्रिताल )

सौख्य पूर्ण देवो तुम्हां श्रीगिरिजेचा कांत तो ॥धृ०॥ केश धवल हे विधुकांतीनें ॥ किंवा कांते भस्मलेपनें ॥ नसे ग्रस्त मी वार्धंक्यानें ॥ असें हंसत जो सांगतो ॥१॥

( नांदीनंतर पारिपार्श्वक जातात )

सूत्र० : वाहवा ! सुंदर चित्रविचित्र पुष्पांनीं शोभणार्‍या कुसुमवाटिकेप्रमाणें ही प्रसन्नमुख सभा पाहून आनंद होतो; परंतु आतां कोणत्या नाटकानं हिचं रंजन करावं, हेंच सुचत नाही. कारण. ----

साकी

अभिरुचि कोणा शृंगाराची कोणा वीर रसाची ॥ हास्य रुचे कोणास करूणही रुचि न एक सकळांची ॥ एका आवडतें ॥ तेंचि दुजाला नावडतें ॥१॥

( विचार करून ) या प्रसंगीं माझ्या चतुर भार्येचा अभिप्राय घ्यावा हें बरं. ( पडद्याकडे पाहून ) अरे वा ! स्मरण करण्याबरोबर पुढें उभी ! हें एक सुचिन्हच म्हणायचं. प्रिये, कांहीं महत्त्वाच्या कामांत मला तुझा अभिप्राय पाहिजे.

नटी : ( बाहेर येऊन ) ही सभा आणि हा थाट पाहून बहुतेक लक्षांत आलंच आहे; पण एकदां मुखांतून ऐकलं म्हणजे बरं. अशा कोणत्या महत्त्वाच्या कामांत माझा अभिप्राय पाहिजे ?

सूत्र० ----

साकी

परिचित जो या रसिकजनां त्या कवि गोविंदें रचिलें ॥ शारदाख्य नवनाटक गानीं. विविधगुणीं जें खचिलें ॥ प्रयोगरूपें तें । रुचेल यांना का कांते ? ॥१॥

नटी : ( त्रासानें ) तरी मीं म्हटलंच ! मेलं घ्यानी, मनीं, स्वप्नीं सदां सर्वदां नाटक ! नाटक ! मी म्हणतें ----

पद्य --- ( राग --- झिंझोटी : त्रिताल )

अजुनि खुळा हा नाद पुरेसा कैसा होइना ॥धु०॥ नाटक झालें जन्माचें मनिं कां हो येइना ॥१॥ व्यसनें जडलीं नवीं नवीं कुणि तिकडे पाहिना ॥२॥ नांव बुडविलें वडिलांचें कीर्ति जर्गी माइना ॥३॥

सूत्र० : प्रिये, तूं म्हणतेस तशी आमची स्थिति झाली आहे खरी, परंतु तिचं कारण नाटक नव्हे !

नटी : तर मग कोणतं ?

सूत्र० : दुसरं कोणतं असणार ?

साकी

सदूर---दर्शित्यानें केवळ ही स्थिति आम्हां आली ॥ दोष तयाचा व्यथे ठेविसी नाटयकलेच्या भालीं ॥ कारण दुष्काळा । मानिल कोण कोकिलेला ॥१॥

वेडी रे वेडी ! म्हणतात तें बरोबर. कीं स्त्रियांचं शहाणपण चुलीपुरतंच. हे कार्यकारणांचे गहन संबंध तुम्हांला कसे कळावेत !

नटी : काळत नाहींत तेंच बरं. कार्यन्‍ कारण समजणारे शहाणेसुरते पुरुष काय दिग्विजय लावताहेत, तें दिसतंच आहे. परवां त्या थेरडया सुदास सावकारानं इतके पैसे ओतून, त्या दहा वर्षांच्या पोरीशीं लग्न केलंन, तें कार्यकारणांचा संबंध पाहूनच केले असेल नाहीं ? मोठ्ठा मोठ्ठा वाईट काळ आला आम्हां बायकांना !

पद्य ( राग --- पिलृ : त्रिताल )

काय पुरुष चळले बाई ॥ ताळ मुळीं उरला नाहीं ॥ धर्म---नीति ---शास्त्रें पायी ॥ तुडविती कसे हो ॥धृ०॥ साठ अधिक वर्षें भरलीं ॥ नातवास पोरें झालीं ॥ तरिहि नव्या स्त्रीची मेली ॥ हौस कशि असे हो ॥१॥ घोडथेरडयांना ऐशा ॥ देति बाप पोरी कैशा ॥ कांहिं दुजी त्यांच्या नाशा ॥ युक्ति कां नसे हो ॥२॥ शास्त्रकुशल मोठे मोठे ॥ धर्म---गुरुहि गेले कोठें ?॥ काय कर्म असलें खोटें ॥ त्यांस नव दिसे हो ॥३॥

सूत्र० : प्रिये, ब्राह्मणवर्णावरलं हें लांच्छन काढून टाकण्याचा श्रीमत जगद‍गुरूंचा तर संकल्प झालाच आहे; आणि त्याप्रमाणें त्यांनीं लोकांना उपदेश करण्याकरितां कांहीं शिष्यांचीहि योजना केली आहे; परंतु सर्व लोकधुरंधरांनींहि एकबुद्धीनं या कामीं पुढें सारसाबळं पाहिजे. तशांतहि तुझ्यासारख्या स्त्रियांचं साह्य मिळेल. तर उत्तमच.

नटी : मी तयार आहें. मला जर एखादा म्हातारा नवरदेव भेटेल, तर मी त्याचे चांगले कान उघडीन, ( पडयांत मुलें ) अहो भुजंगनाथ आजोबा ! संन्यास घ्या संन्यास !

भुजंग० :अरे जा ! मला संन्यास द्यायला ब्रह्यदेव आला पाहिजे , ब्रहादेव !

सूत्न० : ( पडद्याकडे पाहून ) बाहवा ! तूं म्हणायला आणि हा भुजंगनाथ यायला एक गांठ पडली.

नटी : कोण हा ?

सूत्र० : तुला एक म्हातारा नवरदेव पाहिजे होता ना ? तोच हा !

दिंडी

जरठ इतुका तरि डौल कसा आहे ? ॥ नटुनि सजुनी तरुणांत येउं पाहे ॥ वृद्ध म्हणतां हा पहा चिडे कैसा ॥ बाल---चेष्टांनी कृष्णकपिच जैसा ॥१॥

तर चल; आपण बाजूला होऊन त्याची थोडी मौज पाहूं. ( जातात )

भुजंग० : ( बाहेर येत ) समजलों. माझा पुतण्या भैरवनाथ, त्यानं ही माकडसेना चिथावून माझ्या अंगावर सोडली आहे. त्याच्या मनांत अशानं मला वेड लागेल, म्हणजे सरकार मला कोडून ठेवतील आणि मी निपुत्रिक म्हणून माझ्या संपत्तीचा वारस याला करतील; पण म्हणावं, माझ्या संपत्तीपैकीं एक कपर्दिकसुद्धां । तुझ्या हातीं लागायची नाहीं. आणि एवढयाठींच तर मी लग्न करणार ! ( पोरें भुजंगनाथ म्हातारा म्हणून ओरडतात. कोणी संन्यास घ्या, दंड घ्या, भगवीं वस्त्रें घ्या, म्हणतात ) कोण, कोण मला म्हातारा म्हणतो तो ? आणि मला संन्यास कोण देणार तो येऊं दे असा पुढें !

भद्रेश्वर : ( बाहेर येतयेत ) भुजंगनाथ ! काय, आहे काय प्रकरण हें ?

भुंजग : ( ओळखून ) आहा ! भद्रेश्वर दीक्षित, अगदीं वेळेवर आलांत. खरा न्याय करा आतां.

भद्रे० : न्याय ? न्याय कसला ?

भुजंग० : सांगतों. ऐका.

पद्य --- ( ‘ जय जय जगज्जननि देवी ’ या चालीवर ) पोरांसह थोर किती । उद्धटहे दुष्टमती ॥ जरठ जरठ मज म्हणती । द्दष्टिनें उणें ॥ध्रु०॥ संन्यासहि सुचवीती । भगवे व्हा कोणि म्हणति ॥ मुंडा शिर, दंड हातिं । कोणि घ्या म्हणे ॥१॥

तेव्हां आतां खरं सांगा, तुम्हांला यज्ञोपवीताची शपथ आहे, मी तसा म्हातारा दिसतों का ?

भद्रे० : ( आपल्याशीं ) ‘ तसा म्हातारा ’ म्हणजें कसा ?

भुजंग० : का दीक्षित. बोलत कां नाहीं ? सांगा, मी म्हातारा दिसतों का ?

भद्रे० : तुम्ही ! आणि म्हातारे ! तुम्हांला म्हातारा म्हणेल कोण ? तसं म्हणतील ते बेटे जन्मांध समजले पाहिजेत. अहो ! ही पेलेदार छाती. हे गोटीदार पुष्ट दंड, पीळदार शरीर, हें चर्येंवरचं तेज, पाणीदार टप्पोरे डोळे, ही शक्ति, हा मनाचा उत्साह, ही बोलण्याचालण्याची झोंकदार ऐट, इतकीं तारुण्याचीं लक्षणें स्पष्ट स्पष्ट दिसत असून तुम्हांला म्हातारा म्हणणं म्हणजे काय ? जाऊं द्या ! “ हाथी चाले अपने चालसे, कुतर भुकत वांकून भुकवा देव ” तुमच्या मनांत नाहीं. नाहीं तर अजून तुमचं लग्नाचं वय आहे,

भुजंग० : ( आनंदानें ) हेंच ! काल आमच्या घरीं एक ज्योतिषी आले होते त्यांनीं मला हेंच सांगितलं.

भद्रे० : ( आपल्याशीं ) शाबास ! आमच्या ज्योतिषीबुवांनी आम्हीं सांगून ठेवल्याप्रमाणें बीजारोपण तर छान केलंसं दिसतं.

भुजंग० : ऐकलं का दीक्षित, ते म्हणाले, कीं यंदां तुम्हांला भार्यायोग असून, पुढच्याच वर्षी सुंदर पुत्रयोग आहे.

भद्रे० : अहो ! भोळसरसे पाहून त्या ज्यांतिषीबवांनीं तुमच्यावर जाळं पसरलं वाटतं !

भुजंग० : छे --- हो ! जाळं कसलं ! अगदीं लहानपणापासून तों काल सकाळपर्यंतच्या सर्व ठोकळ ठोकळ गोष्टी त्यांनीं तंतोतंत पठवून दिल्या.

भद्रे० : ( स्वगत ) न द्यायला काय झालं ! मीं त्याच्याजवळ टिप्पणच तसं करून दिलं होतं. ( उघड ) आणि तुम्हांला त्या सर्व पटल्या म्हणतां ?

भुजंग० : नुसत्या पठल्या नाहींत, माझी पुरी खात्री झाली,

भद्रे० : मग --- मग --- आमचं बोलणंच खुंटलं. पण ---

भुजंग० : अ हं ! ‘ पण ’ नको ती ! माझ्याकरितां कंबर बांधून एक सुरेख मुलगी शोधून काढा. पण कशी ! हां ! म्हणजे पुढच्या मुहूतीवर देऊ उडवून.

भद्रे० : म्हणजे ? आपण खरोखरीच नवीन कुटुंब करणार कीं काय ?

भुजंग० : मग तुम्हांला इतका वेळ सांगतों तें काय ? ज्योतिषीबुवांच्या म्हणण्याप्रमाणें, हा यंदांचा भार्यायोग साधलाच पाहिजे.

भद्रे० : साधलाच पाहिजे. ( आपल्याशीं ) तुझा भार्यायोग आणि माझा द्रव्ययोग.

भुजंग० : हं, मग बांधतां ना कंबर ? विचार कसला करतां ?

भद्रे० : विचार नाहीं. आमचा धंदाच पडला मध्यस्थीचा, तेव्हां कंबर बांधतो; पण ---

भुजंग० : पुन्हा आणकी ‘ पण ’ ! येऊन जाऊन माझ्यासारख्याकडून तुमची योग्य संभावना व्हावयाची नाहीं, हीच तुम्हींला भीति ना ? हें पाहा, परवां त्या सुदाम सावकराकडून तुम्हांला पोंचलं असेल त्यापेक्षां हजार---पांचशें जास्ती, म्हणजे झालं कीं नाहीं ?

भद्रे० : नाहीं, ती शंका नाहीं मला. तें होईल कसं तरी, तुम्ही त्यापेक्षां हजार---पांचशें जास्त द्याल, मी आणखी हजार दोन हजार जास्त मागून घेईन; परंतु खरं सांगूं ? आतां तुम्ही या नवीन कुटुंबाच्या भानगडींत पडूं नका. असं सांगणं म्हणजे मींच आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं आहे; पण चार---पांच हजार टिकल्यांकडे पाहून, आपला खरा अभिप्राय चोरून, ठेवणारा मध्यस्थ मी नव्हें म्हणून सांगतों, हा नाद सोडून द्या. फार फार हाल होतील.

भुजंग० : किती होतील तितके सोशीन; पण हे सध्याचे हाल सोसवत नाहींत ! काय सांगूं तुम्हांला ! ते ऐकाल तर तुम्हीसुद्धां टिपं गाळाल टिपं !

भद्रे० : असे टिपं गाळण्यासारखे हाल म्हणजे कोणते ?

भुजंग : आज चार वर्षांखालीं माझं कुटुंब गेलं, हें तुम्हांला माहीत असेलच ?

भद्रे० : हो, आहे; पण हें काय भुजंगनाथ, तुमचे डोळे अगदीं भरून आले.

भुजंग० : ( दुःखानें ) कां नाहीं यायचे ! अहो, लाखांत बायको होती हो लाखांत ! मला किती जपत असे म्हणून सांगूं ? ( रडूं लागतो )

भद्रे० : ( डोळ्यांस पदर लावून ) असो; ईश्वराची मजीं ! ” आलिया भोगासी असावें. ” दुसरा मार्ग नाहीं.

भुजंग० : तें खरं, पण ---

कटाव

निवर्तली ती, तेव्हांपासुनि, जग हें सारें शून भासतें, गृह स्मशानापरि मज दिसतें, दिवसाढवळ्या खाया येतें असें वाटतें । त्यांत समंधापरि वावरतां. उदासीनता, जाळी चित्ता, जावें कोठें दूर दिगंतां, परि गृहममता, पाश बिकट हा ! कसा तुटावा; प्रियप्रण यत्नें राखावा, म्हणोनि करणें धांधाधांवी, कधिं न विसांवा जिवास ठावा, देवा ! आतां पुरे हाल हे, असे म्हणत मीं नित्य रडावें ॥

बरं, इतकी दगदग सोसूण रात्रीं तरी कांहीं सौख्य़ ? तेंहि नाहीं. मींच रात्रिं शय्या पसरावी, कष्ठविलेली देहयष्टि ही हळूच तिजवर लोटुन द्यावी, जरा कुठें ही द्दष्टि मिटावी, तों गतभार्या पुढें दिसवी, नवी बायको करूनि घ्यावी, असें सांगुनि अद्दश्य व्हावी, या योगानें चैन पडेना. झोंप न नयना, मनांत नाना येति कल्पना परी गिळुनि त्या तसाचि सारी रात्र कंठितों, ---

बरं, तुम्ही म्हणाल कीं, इतके हाल होतात तर प्राणत्याग कां करीत नाहीं ? केला असता; तो सुदां केला असता: पण त्यांत आत्महत्वेचा दोष लगणार !

भद्रे० : हो ! आणि ब्राह्नणाची आत्महत्या !

भुजंग० : शिवाय ----

निपुत्रिकाला नरकवास शास्त्रांत ठरविला, त्याची वाटे भीति मनाला, उपाय याला एकचि उरला, लग्न करावें हाच हाच तो, म्हणोनि म्हणोनि म्हणतों. पायां पडतों, द्रव्यहि देतों लागे तितुकें ---

परंतु मला या त्रासांतून वांचवा ! ( त्याचे पाय धरतो )

भद्रे’ : उठा उठा, भुजंगनाथ, उठा ! हें काय हें बायकांसारखं ! तुमचं कुटुंब वारून आज चार वर्षें झाली. जवळ द्रव्यसंचयहि चांगला आहे, लग्नाची इच्छा आहे, मग आजपर्यंत स्वस्थ कसे बसलांत ? यापूर्वींच एखादी मुलगी पाहून ----

भुजंग० : समजलों; पण स्वस्थ कुठें बसलों होतों ? पुष्कळ मध्यस्थ केले; पण सगळे मूर्ख ! म्हणून आतां तुमच्या भजनीं लागलों आहे, हं ! सांगा, पाहतां ना मुलगी ?

भद्रे० : पाहतों --- पण ---

भुजंग० : ‘ पण ’ कशाला हा मध्यें शंभरदां ! आतां कुठें आडतें आहे तें स्पष्ट सांगानात ?

भद्रे० : माझं काय, स्पष्ट सांगतों, द्र्व्यांत !

भुजंग० : अहो, पण लागेल तितकं द्रव्य देतों असं मीं मधाशींच तुम्हांला सांगितलं.

भद्रे० : आणि तें मीं ऐकलं. तशीच दुसरी गोष्ट. या संगमपूरच्या आसपास कांहीं तुम्हांला मुलगी मिळायची नाहीं. कारण खोटेच का होईना, पण तुम्हीं हे दांत बांधून घेतले आहेत, त्यामुळें म्हाणा किंवा दुसर्‍या कांहीं कारणानं म्हणा, तुमच्या म्हातारपणासंबंधानं बोभाटा, फार झालेला आहे, यासाठीं दूर एखाद्या ठिकाणीं जावं लागेल. समजा, शंभर कोसांवर जावं लागेल. कबूल ?

भुजंग० : अहो, कबूल म्हणून काय विचारतां ! प्रयाग, काशीपलीकडे सुद्धां जायला आम्ही तयार आहों.

भद्रे० : बरं, तुम्हांला बायको कशी मिळाली पाहिजे ? म्हणजे रूपानं, वयानं ---

भुजंग० : ( उत्सुकतेनें ) खरं सांगूं ? अगदीं माझ्या मनाप्रमाणं पाहून देणार असाल तर सांगतों.

भद्रे० : अगदीं तुमच्या मनाप्रमाणं पाहून देतों. कशी पाहिजे ?

भुजंग० : अशी पाहिजे ---

पद्य --- ( ‘ मंदस्मित अरविंद ’ या चालीवर )

सुंदर खाशी सुबक ठेंगणी स्थूल न कृशहि न, वय चवदाची ॥ध्रु०॥ नयन मनोहर वनहरिणीचे, नाक सरळ जशि कळि चांफ्याची ॥१॥ भृकुटि वांकडया, केश सडक मृदु, दंतपंक्ति ती कुंदकळ्यांची ॥२॥ ओंठ पोंवळी, हनु चिंचोळी, लालि गुलाबी गालांवरची ॥३॥

भद्रे० : ( स्वगत ) अरे वा: ! हा तर रंगेल म्हातारा दिसतो. ( उघड ) म्हणजे जवळ जवळ रंभाच म्हणा ना ?

भुजंग० : नाहीं नाहीं, दीक्षित ? बायको करायची तर अशीच करायची त्या सुदाम सावकारावर ताण झाली पाहिजे. नाहीं तर काय उपयोग ?

भद्रे० : ठीक आहे, तशी पाहून देतों; पण त्या मानानं द्रव्य जास्त लागेल. समजलों ! समजलों ! त्याची तुमच्याकडून तयारी आहेच. म्हणतां ! दूरदेशीं जायलाहि कबूल आहांत. आतां इतकंच, कीं जायचं तें सरदारी थाटानं जावं म्हणजे झालं. भुगंग : तें कशाला ?

भद्रे० : कशाला म्हणजे ! सरदारी थाटानं गेलं म्हणजे कार्यभाग तितका जलद उरकेल, आणाखी बायकोहि मनाजोगी मिळेल.

भुजंग० : हो हो, खरं. तर मग तशा थाटानं जायचं.

भद्रे० : पण तशा थाटानं जायचं म्हणजे तशाच थाटाचा खर्च केला पाहिजे. बरोबर आश्रित, पुराणिक, कारकून, शिपाई. प्यादे असा लवाजमा पाहिजे. कां ? “ ओय ” कां करतां ?

भुजंग० : नाहीं, मी म्हणतों, यातायात तर इतकी पडूं नये, आणखी बायको तर सुंदर मिळावी अशी तोड काढा.

भद्रे० : कशाला हो पाहिजे तुम्हांला सुंदर बायको ? इतक्या म्हातारपणीं असली सुंदर बायको कशाला ?

भुजंग० : ( रागानें ) हां हां ! तुमचं अजून लग्नाचं वय आहे. असं मधाशीं तुम्हींच म्हटलंत; आणि आतां तुम्हीच मला म्हातारा म्हणतां ?

भद्रे० : अहो, मधाटलं म्हटलं तें थट्टेनं; पण आतां खरं तेंच म्हणजे म्हातारे दिसतां असंच म्हटलं पाहिजे. कारण आतां प्रत्यक्ष माझ्या धंद्याचा संबंध आला.

भुजंग० : नाही; तसा म्हातारा दिसत असेन थोडा: पण तो या लग्नाच्या काळजीनं; आतां काय त्याचं ? हें आपलं ठारलं, कीं लगेच लागतों तयारीला, आणि पंधरा दिवसांच्या आंत पाहा कसा बनतों राजबिंडा !

भद्रे० : ( हंसत ) ते कसे बनणार सांगा पाहूं ?

भुजंग० : ऐका ----

पद्य ---- ( भाषण किती मधुर )

पौष्टिक बलवीर्यजनक औषधें अनेक तीं ॥ पाक भस्म रस गुठिका सेविन मी वनस्तती ॥ध्रु०॥ करिन नित्य दुग्धपान मिष्ट मिष्ट भोजनें ॥ मंत्र तंत्र यंत्रादिक अन्य कितिक साधनें ॥ ही काया व्यायामें पुष्ट करिन निश्चितीं ॥१॥

भद्रे० : उत्तम ! उत्तमोत्तम !! सर्वोत्कृष्ट युक्ति ! मग काय हो !

भुजंग० : लग्नाचं ठरलं तर ?

भद्रे० : पैशांचं ठरलं ?

भुजंग० : अहो, तें ठरलंच आहे. चला, याच पावली घराकडे चला आणि रक्कम घेऊन लागा तयारीला.

भद्रे० : आतां येऊं ? ( विचार करून ) पण नको. स्नान करून, संगमनाथाची पूजा आटपून येतों.

भुजंग० : मग असंच करा ना ! आज एकादशी आहे; मी घरीं जाऊन छानदार निराहाराची तयारी करवितों. फराळालाच तिकडे या म्हणजे झालं.

भद्रे० : आहा ! म्हणजे पुढचे बेतबात करायला अवकाश यथास्थित सांपडेल.

भुजंग० : जातों तर. नमस्कार !

भद्रे० : छे छे ! आतां आपण श्रीमंत ! आणि मी श्रीमंतांचा आश्रितआतां आपण नाहीं असा नमस्कार करायचा. असा नमस्कार करायचा मीं, आणि आपण नुसती मान हलवायची. हें नीट घ्यानांत ठेवायचं बरं ! नमस्कार ! ( भुजंगनाथ मान हलवून हंसत जाऊं लागतो ) श्रीमंत ! हें काय ? किती मोठयानं हंसतां ? श्रीमंती हंसणं कसं बेताचं पाहिजे ( भुजंग० जातो ) हें एवढं कार्य आपल्या हातून तडीस गेलं म्हणजे जन्माची ददात मिटली. धंदा पण धंदा, यांत संशय नाहीं. आतां या धंद्यांत पाप आहे असें म्हणतात; पण आमच्या संगमनाथाच्या दर्शनाचा असा महिमा आहे कीं, पाप शिलकी राहतच नाहीं. रोजच्या रोज निकाल !

श्लोक

प्रात:काले शिवं द्दष्ट्‍वा, निशीपापं विनश्यति । आजन्मकृतं माध्यान्हे, सायान्हे सप्तजन्मनाम्‍ ॥

चला तर, स्नान करून दर्शन घेऊं. ( शंकर शंकर म्हणत जातो ) ( त्याच्या पाठोपाठ कोदंड ओरींतून प्रवेश करून )

साकी

नामें ब्राह्मण खरा असे हा चांडाळाहुनि पापी ॥ द्विजत्व ऐशा नीच नराला नकळे विधि कां ओपी ॥ ब्राह्मणवर्णाला । कीं हा द्दष्टमणी केला ? ॥१॥

हा अधमा भद्रेश्वरा ! तुझें नांव भद्रेश्वर, पण हीं तुझी कर्में किती अभद्र ! अरे, परमपवित्र, परममंगल आणि संसारी लोकांना पुरुषार्थाचा लाभ करून देणारा, असा हा विवाहसंस्कार ! आणि त्याची अशी विटंबना करून त्यावर उदरनिर्वाह करतोस ? यापेक्षां ---

पद्य --- ( राग --- अडाणा : त्रिताल )

जठरानल शमवाया नीचा ॥ कां न भक्षिसी गोमय ताजें ॥ध्रु०॥ धनलोभानें वद आजवरी ॥ किती नेणत्या मूक कुमारी ॥१॥ त्वां दिधल्या रे वृद्धवरकरीं ॥ खाटिकही तव कृतिला लाजे ॥२॥

हिरण्यगर्भ : मित्रा कोंदडा, ब्राह्मणत्व इतक्या नीच स्थितीला कसं पोंचलं याचंच मला फार आश्चर्य वाटतं !

कोदंड : तसाच तो भुजंगनाथ ! अरे भग्नदंता ! पंचमहाभृतांनीं आपापले अंश तुझ्या शरीरांतून बहुतेक आकर्षण करून घेतले, ज्ञानेंद्रियांनीं तुला सोडलं, तुझीं कर्मेंद्रियें शिर्थिल पडलीं, सर्व चिन्हांनीं युक्त असा जरेचा ध्वज तुझ्या शरीरावर चांगला फडकृं लागल; मृत्यूच्या जड पाशानं तुझी मानहि वांकली, तथापि तुझी कामवासना अद्यापि जागृतच आहे ! आणि ती कामवासना एखादी अल्पवयस्क सुंदर कुमारी विकत घेऊन, तिच्याशीं तूं पूर्ण करणार पण अरे विचारांधा ! हे कसं तुझ्या ध्यानांत येत नाहीं ?

पद्य --- ( किती गेले सुकोनी )

जो भेद विधीनें स्त्रीपुरुषीं केला ॥ देहींच मात्र तो संततिकार्याला ॥१॥ परि सुखद वस्तुची आवड उभयांला ॥ समसमान दिधली भेद न दाखविला ॥२॥ जशि व्हावी पुरुषा नव सुंदर बाला ॥ पति गुणी देखणा तरुण रुचे स्त्रीला ॥३॥ हें तत्त्व नेणुनि वरिसि कुमारीला । परि, पशो ! वरुनि तुज सौख्य काय तिजला ॥४॥

हिरण्यगर्भा, अशा प्रकारचे विषम विवाह म्हणजे अकालीं वैधव्य, दुराचार, गर्भपात, बालहत्या, निस्तेज बलहीन संतति इत्यादि महा अनर्थाचं मुख्य कारण होत.

हिरण्य० : परंतु या विघातक, धर्मशास्त्राविरुद्ध अशा रूढीचा अंगीकार मुख्यत : ब्राह्मणांनीं करून शुद्ध धर्मतत्वाला काळिमा लावावा हा केवढा चमत्कार !

कोदंड : मला अत्यंत खेद होतो, तो याचविषयीं. हरहर !

पद्य --- ( मधुरासे शाम गोकुलणो गये )

ये काल कसा विपरीत अहा ॥ निज धर्म लया द्विज नेति पहा ॥ध्रु०॥ तेजोबलधन विहित विवेकी विमसशील ते विप्र कुठें ? ॥ आकुंचितमति मलिन कुठें हे, कुमार्गगामी निंद्य महा ॥१॥

अशा ब्राह्मणांनीं अंधबुद्धीनं ज्या ज्या भयंकर रुढींचं दास्य स्वीकारलं त्यांत जरठ-कुमारीविवाहासारखी अति भयंकर रुढी म्हणजे तीच, धर्म, शास्त्र, नीति, व्यवहार, सौख्य इत्यादि कोणत्याहि द्दष्टीनं पाहिलं तरी, ही किती अनर्थकारक आहे पाहा !

पद्या --- ( निरभ्र शुभ्र नक्षत्र )

हा जरठकुमारीविवाह शास्त्रें अधमाधम मानिती ॥ नरकपात निश्चयें घडवितो, तर्कयुक्ति ठरविती ॥१॥ हा खरतर मत्सरविषा कालवी स्वजनप्रेमामृतीं ॥ कलहानल चेतवी कुटुंबीं, आणि तया अवनती ॥२॥ हा शिणत्या कामाग्निला देत नवयुवतींच्या आहुती ॥ याचमुळें बापुडया सहज त्या कुपथें संचारती ॥३॥ हा समाज--हित--घातकी शिकवितो लोकां पशुची कृति ॥ करी शिथिल तीं नीतिबंघनें हानि अशानें किती ॥४॥

बरं, शास्त्रापेक्षां बलवत्तर झालेल्या या रूढीचा उच्छेद राजानं, धर्मगुरुंनीं, किंवा ब्राह्मणांनीं एकमत होऊन करावा म्हणशील, तर तसंहि होण्याचा सांप्रतकाळीं संभव नाही. कारण ---

दिंडी

अन्यधर्मी भूपाल आर्यभूचा । आर्यधर्मा अनुकूल नसायाचा ॥ धर्मेगुरू ते निःसत्व दंडधारी । वर्णगुरू ते मनसोक्त कर्मकारी ॥

याप्रमाणं आमच्या ऐहिक व पारमार्थिक सौख्याचा आधार जो शुद्ध आर्यधर्म, त्याचं तेज, वर उकिरडा बाढलेल्या रत्नाच्या तेजाप्रमाणं, या अशा प्रकारच्या रूढीखालीं आच्छादित झाल्यामुळं सर्वत्र अंधार माजून यादवी सुरू झाली; परिस्थितीविषयीं दुर्लक्ष होऊं लागलं; सर्व दिशांनीं प्रगति कुंठित झाली; प्रतापशाली पूर्वजांच्या प्रौढींत स्वत:चं भान राहिलं नाहीं; ज्ञान तें अज्ञान व अज्ञान तेंच ज्ञान असं भासूं लागलं. आपआपल्यांत भेदभाव वाढव गेल्यामुळं हजारों वर्षांचं राज्यरूपी भव्य मंदिर ढांसळून एकछत्राचे शतशः तुकडे झाले, पूर्वी जगांतील सर्व राष्ट्रांना आपल्या असह्य बुद्धितेजानं दिपवून टाकणारे आम्ही आर्य ! तेच शेवटीं त्याच राष्ट्राचे दासानुदास झालों आणि या सर्वाला कारण आमचे आम्हीच !

हिरण्य० : मित्रा कोदंडा, गतगोष्टींचा खोद करून काय उपयोग ? आमच्या लोकांनीं पूर्वींच्या अनुभवानं तरी नेत्र उघडावेत म्हणून जगद्‍गुरुंच्या आज्ञेनं तीन वर्षें त्यांना साधार उपदेश करीत हिंडलास. झालं, तुझं कर्तव्य तूं केलंत; आतां ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार करून आनंदांत कालक्षेप करावास हें उत्तम.

कोदंड : ( स्वगत ) आमरण अविवाहित राहण्याचा माझा संकल्या याला कशाला कळवा इतक्यांत ! ( उघड ) मित्रा, माझाहि मनोदय असाच होंता; परंतु या नीच भद्रेश्वराचे आणि त्या निर्लज्ज भुजंगनाथाचे गुप्त बेत ऐकल्यापासून असं वाटतं, कीं आज तीन वर्ष जी निरपेक्ष लोकसेवा केली, तिची सांगता, तो त्यांचा बेत निष्फळ केल्याबांचून होणार नाहीं, म्हणून आतां मी त्या उद्योगाला लागणार.

हिरण्य० : परंतु अशानं तुझं स्वतःचं लग्न लांबणीवर पडेल याचा काय विचार केलास ?

कोदंड : हाच, कीं माझ्या उद्योगाचं फळ मिळाल्यावांचून लग्नच करायचं नाहीं.

हिरण्य० : वेडा आहेस ! अरे या काळांत आधीं स्वार्थ साधावा आणि नंतर फावल्यास लोकहिताच्या गोष्टी बोलाव्यात.

कोदंड : अरे, स्वार्थ तर लागलाच आहे पाठीस, कारण ---

पद्य --- ( रंगैया मनिगे बारानो )

स्वार्थी जी प्रीति मनुजाची सहज ती ॥धृ०॥ परि साधे जो स्वार्थ परार्थी, उत्तम तो गणिती ॥१॥ स्थार्थ परार्थाइतुका असतां, मध्यम त्या म्हणती ॥२॥ ज्यांत न जनहित त्या स्वार्थाला साधु अधम वदती ॥३॥

तेव्हां आपल्याला उत्तम स्वार्थ जरी साधतां आला नाहीं, तथापि मध्यम तरी साधावा,

हिरण्य० : मित्रा, काय भ्रम हा ! अरे, ज्यानं त्यानं आपलं हित पाहिलं म्हणजे अर्थात सर्वोचंच हित साधल्यासारखं झालं. म्हणून सांगतों, तूं हें डोक्यांतलं लोकहितांच वेड काढून टाक; तरच तुला सुख होईल.

कोदंड : हरहर ! माझा प्रिय मित्र हिरण्यगर्भ तो तूंच काय ? असली स्वार्थबुद्धि मला शिकविंतोस, म्हणून संशय येतो. अरे, वृद्धानं लहान कुमारीशीं लग्न करूं नये, वृद्धाला कोणीं द्रव्यलोभानं कन्या देऊं नये, व असा जरठ कुमारी--विवाह कुठं होत असल्यास लोकांनीं शक्य तितका प्रयत्न करून तो मोडावा, असा, मीं स्वत: या मुखानं लोकांना उपदेश केला, आणि आज स्वार्थाला गुंतून मींच त्याच्या विरुद्ध आचरण करूं ! काय सांगतोस हें ! अरे ---

साकी

वाणी तैशी करणी ज्याची श्रद्धा त्वावरि जडते ॥ क्रियाशून्य वाचाळावरची असलेलीही उडते ॥ लोकां सांगावें । तैसें स्वयें आचरावें ॥१॥

पद्य --- ( कांहे लागोरे )

जरि करिन सकल खलकार्य विफल ॥ मम जन्म विप्रकुलिं तरिच सफल ॥धृ०॥ जरि न घडे हें नलगे भार्या ॥ त्वदेह वाहिन हा जनकार्या ॥ स्मरुनि गुरुपदा शपथचि घेतों ॥ कधिं न ढळे कोदंड अचल ॥१॥

हिरण्य० : ( पाठ थोपठून ) द्याबास कोदंडा ! तुझ्यासारखे निग्रही, निश्चयी, निःस्पृह, सदाचारसंपन्न, स्वार्थंत्यागी, सुविद्य आणि सुविचारी असे पुरुष जेव्हां स्वदेशाच्या सेवेला सज्ज होतील, तेव्हांच त्याचा अभ्युदय होईल. या तुझ्या अलौकिक गुणांवर लुब्ध होऊनच मीं स्वतःचं सांसारिक दुःख विसरून तुझा सहवास केला. इतका वेळ बोललों, तें केवळ तुझं मन पाहण्याकरितां बोललों. बरं, या कार्मी मीं तुला कोणतं साह्य करूं तें सांग.

कोदंड : सांगेन, परंतु या प्रश्नानंच, मित्रा, मला किती धैर्य आलं म्हणून सांगूं ! असो; त्या दोघांचा श्रीमंती थाटानं कुठें दूर जाण्याचा बते झालेला तूं ऐकलासच. आतां त कोणत्या ठिणत्या ठिकाणीं जाणार हें त्यांच्याकडूनच कळलं पाहिजे. दुसरा मार्ग नाहीं, ( पडद्यांत शंकर ! शंकर ! असा शब्द ऐकून ) अरे ! हा शब्द कोणाचा बरं ? समजलों. हे ते भद्रेश्वर दीक्षिर ! ठीक आहे. तूं ओरीचं दार लावून स्नान करून ये, मी दीक्षितांची भेट घेतों. ( हिरण्यगर्भ जातो ) काय या दीक्षितांची झटपट ! इतक्यांत स्नान करून देवपूजेच्या तयारीनं देवालयांत चालले ! केवढी ही शिवनामाची गर्जना ! किती कडकडीत सोंवळं ! या सर्व थाटावरून एखाद्याला वाटेल, कीं हा महाशिवभक्त आहे; पण अरे ढोंग्या ----

पद --- ( तनु ईची सुंदरा )

जरि वरुनि धुवट सोंबळा, घालिसी गळां, माळा रुद्राक्षांच्या खळा ॥ तरि तूं आंत मलिन ओंवळा ॥ जरि वरुनि भक्तिचा निधी, अंतरीं कुधा, घेउनि सोगें लक्षावधी ॥ नट तो होईल का नृप कधीं ॥ जरि करिशी शिवपूजना, नामगर्जना, तरि मनिं भलत्या रे कल्पना ॥ दंर्भे ठकविसी भोळ्या जनां ॥१॥

असो, याच्यावरची तिरस्कारबुद्धि कांहीं काळ गिळून ठेवली पाहिजे,

( भद्रेश्वराजवळ जातो व नमस्कार करतो )

भद्रे० : हं ? कोण ? शंकर ! शंकर ! शंकर !

कोदंड : मी पांथस्थ आहे, भद्रेश्वर दीक्षित म्हणतात ते आपणच का ?

भद्रे० : हं; कां बंर ?

कोदंड : त्यांची भेट घ्यायची होती.

भद्रे० : त्यांची भेट कां ? तुमचं लग्न व्हायचं आहे वाटतं ?

कोदंड : आपण खरं ओळखलंत. माझं लग्न व्हायचं आहे.

भद्रे० : तर मग भद्रेश्वर दीक्षित म्हणतात ते आम्हीच, तुम्ही देशस्थ, चित‍पावन का कर्‍हाडे ?

कोदंड : मी चित‍पावन.

भद्रे० : चित‍पावन, मग मुली सत्राशेंबावन ! बरं, गोत्न कोणतं ?

कोदंड : माझं गोत्र अत्रि !

भद्रे० : अत्रि आणि सर्वोशीं मैत्री ! जुळलं, वय दिसतंच आहे तेवीसचोवीस ! किती सांगा पाहूं ?

कोदंड : चोवीस वर्षांचं आहे.

भद्रे० : बरं, वडील--मातुःश्री ?

कोदंड : दोघंहि मी लहान असतांनाच वारलीं.

भद्रे० : वारलीं ! अरे अरे ! पण एका अर्थी बेष झालं. पोरीला सासूसासर्‍यांची किटकिट नाहीं उरली. बरं, भाऊबहिणी ?

कोदंड : नाहीं कुणी.

भद्रे० : मग काय, नवरा राज आणि नवरी राणी ! आतां घरची स्थिति सांगा पाहूं.

भद्रे० : फार गरिबीची ? तर मग धरा वाट आपल्या घरची. अहो. तुमच्यासारख्या कफल्लकाच्या गळयांत झोळीच्या शेजारीं आपली मुलगी समजून उमजून कोण बांधील बरं ! माझा वेळ व्यर्थ खाल्लांत, व्यर्थ. बरं, कांहीं विद्या तरी ?

कोदंड : म्हणण्यासारखी नाहीं, पण एका पुराणिकबोवांच्या सहवासानं भागवत पाहिलं आहे.

भद्रे० : अहो, मीं सुद्धां भागवत पाहिलं आहे, पण पाहून काय उपयोग ? सांगतां येतं का ?

कोदंड : होय, सांगितलं आहे दोन--चार वेळ.

भद्रे० : असो, काळ्यापेक्षां पिठा दगड बरा, ( स्वगत ) आमच्या तात्परत्या श्रीमंतांच्या पदरीं एक तात्पुरते पुरणिक पाहिजेत, ते आयतेच चालून आले. ( उघड ) अहों, तुमची ही अशी दिंगबर ब्रह्मचर्याचई स्थिति, तेव्हां लग्नाचा हेतु बाजूला ठेवून एखाद्या श्रीमंताबरोबर यात्रेला याल का ? म्हणजे तुमचं काम सहज होऊन जाईल. बोला. आहे पसंत ? संधि आली आहे. लागलीच जुळवून देतों !

कोदंड : माझं कार्य होत असेल तर येतों.

भद्रे० : पण हें पाहा ! श्रीमंतांजवळ राहायचं फार कठीण ! कान असून ऐकायचं नाहीं, डोळे असून पाहायचं नाहीं, आपलं काम बरं कीं आपण बरे, आहे कबूल ?

कोदंड : हें मी काय सांगू. आपणच अनुभवानं पाहा म्हणजे झालं. पण कोणत्या यात्रेला जायचे हें समजलं तर बरं होइल.

भद्रे० : हेंच, हेंच ! तरूण मंडळींचं चुकतं तें हेंच ! पुन्हा एकवार सांगतों, जसं कान असून ऐकायचं नाहीं, डोळे असून पाहायचं नाहीं, तसंच तोंड असून बोलायचं नाहीं, आतां विसरूं नका बरं, आणि समजा, बोलण्याचा प्रसंग आलाच, तर धोरण पाहून श्रीमंतांना रुचेल तेंच बोलावं, खरं असो, खोटं असो, समजलांत ? या ओंरींतच उतरलां आहां ना ? आज सायंकाळीं केव्हां निघायचं तें कळवीन.

( समोरून कांहीं मुली येतात त्यांस ‘ शिवाल, वाट सोडा वाट ’ असें म्हणत जातो. )

कोदंड : अरे जंबुका ! कान असून ऐकायचं नाहीं, डोळे असून पाहायचं नाहीं आणि तोंड असून बोलायंच नाहीं का ? असो. मनांत आपल्याप्रमाणं इतकं तर जुळलं. पण या वेळेला इतक्या मुली देवळांत कां ? ( शरदा, वल्लरी, मंदाकिनी, त्रिवेणी अशा मुली येतात, शारदा बाजूस होते )

मदाकिनी : त्या गेल्याना ? आतां मोकळेपणानं बोलायला कांही भीति नाहीं, खरंच सांगा, इतका जख्खड म्हातारा नवरा मुलगा कधीं जन्मांत तरी पाहिला होता का ?

वल्लरी : भलतंच कांहीं तरी तुझं बोलणं. अग तो म्हणजे चांगला सुरेख, देखणा तरुण, सगळा सत्तर वर्षांचा नवरदेव ! त्याला का तूं म्हातारा म्हणतेस ?

कोदंड : ( स्वगत ) आमचे भुजंगनाथ कीं काय ?

त्रिवेणी : ही शारदा तर लग्नालाच आली होती म्हणा ! पण आम्ही यात्रेच्या निमित्तानं या क्षेत्रीं आलों म्हणून हे सुदाम सावकाराचे लगीनसोहाळे पाहायला मिळाले. काय मेला नवरदेव ! त्याचं लगीन झालं, पण बाई त्या पोरीचं पाप उभं राहिलं !

कोदंड : समजलों, त्या सुदामाच्या लग्नाची गोष्ट चालली आहे, ही तर ऐकलीच पाहिजे.

मंदा० : तुझे बाबा सांगत होते, ऐकलंस का शारदे, सांगत होते, कीं नवरामुलगा बिजवर आहे खरा, पण वयानं कांहीं मोठा नाहीं,

वल्लरी : शारदेचे बाबा ना ? अग ते सुदाम सावकाराचे आमच्या गांवांतले क्षेत्रामध्ये, त्यांना कसा मोठा दिसेल ? लहानच दिसायचा. तशांतून त्यांनीं शारदेला चौदा वर्षींची वाढविली आहे, तेव्हां त्यांच्या मनांतून बहुतकरून असाच एखादा पिकलेला तरूण नवरा --- पण मी कशाला बोलूं बाई ? ( तिघी रागानें कुजबुजतात )

कोदंड : काय ? या शारदेचं अद्यपि लग्न व्हायचं आहे ? आणि तिचा बाप बहुतकरून तिला म्हाता यालाच देणार, असा या मुलींच्या भाषणांतला अभिप्राय दिसतो.

जान्हवी : शारदे, मी म्हणतें हा सुदाम सावकार म्हातारा तो म्हातारा, पण रुपानं तरी बरा असायचा होता, मुंडावळ्या बांधून बसला होता, तेव्हां कसा दिसत होता पाहिलांत ना ? आहाहा ! द्दष्ट काढावी बाळाची ! तें कुंभकर्णी नाक, ओठांच्या वळकटीवर पडलेले नांगरांच्या फाळासारखे ते राक्षसी दोन दांत, डाव्या डोळ्यांत वाढलेला तो वडस. तें टाकी मारलेलं करपलेल्या आंबोळीसारखं तोंड. आणि वर्ण तर विचारूंच नकोस ! काजळाचीं पुटं दिलेला कोळसाच जसा कांहीं ! आणि चालत होता कसा पाहिलात का ? असा --- ( चालून दाखविते )

शारदा : जाऊं दे. त्या मेल्याची आठवणसुद्धां काढूं नकोस, मंगलाष्टकं झाल्यावर जोश्यानं अंतरपाट काढून घेतलान‍ तेव्हां होतीस का तूं ? होतीस का नर्मदे ? काय सांगूं तुम्हांला, नवर्‍यामुलीनं असं वर तोंड करून पाहिलंन‍ मात्र आणि झालं बाई !

पद्य --- ( जळोग यांचं स्नान )

बघुनि त्या भयंकर भूता फोडिली तिनें किंकाळी ॥ या ह्रदया चरका बसला, कळवळे मनहि त्या काळीं ॥ परि बाप तिचा तो कसला चांडाळ पूर्विचा वैरी ॥ तिळभरही द्रवला नाहीं उलट त्या बिचारिस मारी ॥ ती दीन भयाकुल मुद्रा रात्रंदिन दिसते बाई ॥ रडविलें तिनें मज कितिदां दचकतें भिउनि शयनींही ॥१॥

वल्लरी : देवा, नको रे हा मेला पोरींचा जन्म ! आपल्या पोटच्या पोरींवर त्या बापाचा हात उचलला तरी कसा म्हणतें मीं !

कोदंड : शिवशिव ! त्या प्रसंगीं मी असतों, तर बरं झालं असतं.

तुंगा० : शारदे, आम्हांला कांहीं भीति नाही; तूं मात्र संभाळ ग बाई ! तुझ्या बापाच्या मनांतून असंच कांहीं आहे म्हणून माझी आई परवां म्हणता होती !

शारदा : भलतंच कांहीं तरी ! माझे बाबा असे उलटया काळजाचे नाहींच; आणि कदाचित‍ त्यांच्या मनांत तसं आलं समज, तरी पण माझी आई आहे ना !

मंदा० : तें सगळं खरं, मण बाई या पैशाच्या पायीं --- अगबाई हे कोण ?

कोदंड : ( पुढें होऊन ) मुलींनो, तुम्ही कोणत्या गांवर्‍या ? भिऊं म्हणूनच विचारतों कीं, तुम्ही कोणत्या गांवच्या ?

( शारदेशिवाय सर्व मुली एकमेकींशीं कुजबुजतात, नमस्कार करतात, हिरण्यगर्भ स्नान करून येतो त्याच्याशीं कोदंड बोलत उभा राहतो )

शारदा : ( एका बाजूस उभी राहून ) इतका तरुण, सुंदर असून हा अजून ब्रह्यचारी ? मग काय म्हणायचं !

पद्य --- ( अमृतपानमो )

जन खुळावले । सकळ उलट चालले ॥ध्रु०॥ लग्न करिति जरठ जीर्ण । अविवाहित फिरति तरुण ॥१॥ सुख असेल त्यांस त्यांत । परि आमुचें मात्र मरण ॥२॥

मंदा० : ( पुढें होऊन ) महाराज, आम्ही सर्व गंगापूरच्या. आज परत जायचं, म्हणून देवदर्शंनासाठीं इकडे आलों.

कोदंड : या शारदेच्या बापाच्या मनांतून तिला वृद्ध वराला द्यावयाची आहे, असें हिनं म्हटलं तें खरं का ?

मंदा० : हो, असं म्हणतात, मीं सुद्धां ऐकलं होतं हें आणि हें ऐकल्यापासून शारदेला देखील चिंता लागल्यासारखी दिसते, आपण थोर सत्पुरुष आहांत, तेव्हां तिची दूर होईल असा कांहीं उपाय आपण तिला सांगावा. शारदे, जा, त्यांना नमस्कार कर.

( शारदा नमस्कार करते )

कोदंड : अनुरूपवरप्राप्तिरस्तु ! शारदे, तूं अगदीं भिऊं नकोस,

पद्य --- ( देव विघ्नेश तारी : दीपचंदी )

ईश चिंता निवारील सारी ॥ भाव निश्चल मनें ठेविं तूं त्यावरी ॥ध्रु०॥ संकटें शत जरी प्राप्त झालीं ॥ सर्व संहारुनी योग्य कालीं ॥ करिल कल्याण तो चंद्रमौली ॥ पूर्ण विश्वास या विप्रवचनीं घरीं ॥१॥

आतां मी जातों, पण तुम्हां सर्व मुलींना माझं एवढंच सांगणं आहे कीं ---

पद्य --- ( आवो आवो रंगेला : दादरा )

जागृत ठेवा, लग्नाची ही स्मृति सारी ॥ध्रु०॥ व्हालचि माता दुहितांच्या कधिं तरि संसारीं ॥ होउं न द्यावा तुम्ही त्यांचा विक्रय बाजारी ॥१॥

( जातो )

गाडीवान : ( येतयेत ) गाडया नदीपल्याड जाऊनशेनी लइ वाढूळ झाला, चलावं शारदाबाई ! आवं तिरविनीबाई. चला, चला वेगी.

त्रिवेणी : खरंच का गाडया नदीपलीकडे गेल्या ? का कांहीं तरीच सांगतो आहेस आपलं ?

गाडी० : आ मंजी ! ह्यो बघा दिस डुईवर आला अक्षी, चला बेगी.

वल्लरी : अगबाई खरंच ! चला तर, देवदर्शन घेऊन चालायला लागूं या, नाहीं तर त्यांच्याशीं गांठ आहे, बोलून बोलून पुरे करतील अगदीं. ( देवालयांतील गाभार्‍याचा देखावा. नंदादीप. कर्पूरदीप जळत आहेत. ब्राह्मण रुद्र वगैरे म्हणत आहेत. अभिषेक चालला आहे. शारदा नमस्कार करून हात जोडून देवास नवस करते. इतर मुली नमस्कार करून प्रदक्षिणा घालं लागतात )

शारदा : ( हात जोडून )

पद्या --- ( सारंग : दादरा )

जय कृष्णातटवासा ॥ निजजनभयविघ्वंसा ॥ करितें मी नवस असा ॥ध्रु०॥ भुलुनि मनीं द्र्व्याला ॥ मज द्यावें जरठाला ॥ कुमति अशी जनकाला ॥ नच झाली तरि तुजला ॥ लक्ष वाती वरसाला ॥ लाविन रे गिरिजेशा ॥१॥

( सर्व मुली मिळून संगमनाथाची प्रार्थना करतात )

पद्य --- ( वंदनै: सुरवृंदार्चितपद : त्रिताल )

शंभो शिवहर, करुणाकर, हे विश्वेशा, गौरीप्रिकर ॥ध्रु०॥ अज्ञानी बलहीन अम्ही ॥ शरणागत तव चरणां धरि शिरिं करुणायुत कर ॥१॥ मार्गी आम्हां सर्वपरी ॥ हे शशिमौली. तूं सांभाळी, जय कालीश्वर ॥२॥

***