एक दिवस मनू उठली सकाळी !अजून तिला खूप झोप येत होती!पण तरी ती उठली कारण तिला बाबाने दाखवलं खिडकीतून गार गार धुकं!
मनू असं काही पहिल्यांदाच पाहत होती! "आई ए आई बाहेर बघ ढग आलेत खाली!'"
आई हसून म्हणाली "अग मनू ते ढग नाहीत काही! ते तर धुकं आहे."
"मला ते खायचं आहे!गार असेल न ते आईस्क्रीम सारखं!"
बाबा म्हणाला की "ते काही बर्फ नसते पिल्या! धुकं म्हणजे हवेतील बाष्पाचे घनरूप !पाण्यातून निघणारी वाफ आपण नेहमीच बघत असतो.थंडीच्या दिवसांत जेव्हा तापमान कमी होते तेव्हा मात्र हवेतील या वाफेचे लहान लहान पाण्याचे थेंब बनतात. थेंब म्हणायचे, पण असतात अगदी सूक्ष्मकणच. हे सूक्ष्मकण म्हणजेच धुके. "मस्त आई बाबा!
मला जायचं आहे फिरायला धुक्यात!"
मग आईबाबा आणि मनू पटकन बाहेर पडले!रोज कुरकुर करत उठणारी मनू दात घासून दूध पिऊन तयार झाली आणि धुकं लपेटून घ्यायला काय मजा येईल याचा विचार करतच बाहेर पडली सुद्धा!
दाट धुक्यात फिरताना मनूला समोरच्या गोष्टी दिसत नव्हत्या पण रस्ता रोजचा असल्याने ती अंदाजाने ओळखत होती सगळं!
"आई धुकं अंगावर येतं आहे भारी!"
मी ते खाते असं म्हणून बाई तोंड उघडून चालायला लागल्या!
"बाबा माझा स्वेटर ओला झालाय"
"अग धुक्यात बाष्प असतं ना त्यामुळे!"
मनूला भारी मजा वाटत होती!
"अग अरुण दादाची शेती आहे ना तो सांगत होता की धुकं पडलं की गहू ज्यांनी पेरले आहेत असे शेतकरी खुश होतात कारण त्या धुक्यामुळे ओलसरपणा राहून पीक छान येतं"
"पण बाबा मागच्या आठवड्यात तू पहाटे जाणार होतास विमानाने तर तुला उशिरापर्यंत थांबायला लागलं होतं न धुक्यामुळे असं तू काहीतरी सांगत होतास कुणाला तरी!"
"हो ग मान्य पिलू! असं होतं!रस्त्यावर आकाशात गाडी किंवा विमान चालवताना समोर काही दिसत नाही आणि अपघात होतात!"
"बापरे हे धुकं भयंकर असतं का?"
"हो म्हणजे काळजी घेतलेली चांगली ना ग!"
सोसायटीच्या चार चकरा दाट धुक्यात मारून मनूला मजा आली!घरी आल्यावर गरम दूध पीत मनूने पाहिलं तर धुकं आता कमी होत होतं!
"बाय बाय धुकं!उद्या परत ये खूप दिवस ये थंडी घेऊन ये पण काळजी घे रे उगीच तुझ्यामुळे गाड्यांची टक्कर व्हायला नको!😊" मनू हसून म्हणाली
आर्या जोशी