किळस
माणूस जन्माला येतो, पण जगणं विसरतो
स्वत:च्या हव्यासापोटी, शरीर कुरतडतो....
एक एक लचका तोडत, आनंद लुटतो
कोण कुठला तो बांडगुळ, येऊन बसतो
आणि शरीराची चाळणी करून ठेवतो...
अंगाला हात लावला की संताप होतो...
असं वाटतं अंगावर किडे वळवळत आहेत
त्या स्पर्शाने शिरशिरी येऊन किळस वाटते....
सगळं अंग घासून घासून काढावं वाटतं
अगदी चामडी सोलून निघेपर्यंत, रक्त सांडेपर्यंत...
रात्र किरकिर करणारी, भयाण शांतता
हातात कोयती घेऊन, उभी होती ठाम....
आला समोर की सपासप वार करून
आज कोथळाच बाहेर काढायचा होता....
दार ठोठावलं गेलं, कुंडी काढली मी
समोर तो उभा, नशेत आणि छद्मी हास्य....
घेतली कोयती आणि वार करत गेली....
माझ्या पायाजवळच मरून पडला होता....
नेले मी त्याला सरपटत अंधाराचा आधार घेत
नेऊन ठेवले त्याला तिथेच कचरा कुंडी जवळ....
पहाटे जाऊन पाहिलं, ही.. गर्दी जमलेली
कुत्र्यांची आणि कावळ्यांची मेजवानी होती....
सगळे त्याचे मनमुराद लचके तोडत होते
माशा त्याच्या अंगावर घोंघावत होत्या....
कचऱ्या बरोबर शरीराची दुर्गंधी सुटली होती
मला बघून आत पोटात भडभडून आलं....
आत पोटातली मळमळ ती थांबत नव्हती
तिथेच रस्त्यात मी भडाभडा उलटी केली....
तो मेला तरी अंगाला काहीतरी डसत होतं...
आता मला माझीच किळस वाटत होती.....
©®प्रणाली कदम
कल्याण