अर्धवट - भाग 5

" अरे.. सगळा सत्यानाश केला तिने.. वाट लावली.. घाण केली .. अरे तिला मी फक्त समजावं म्हणलं होतं.. तू काय बोललास तिला माहित नाही. पण बघ काय करुन ठेवलंय तिने... "फोनवर रितेश ओरडत होता. मी फक्त शांतपणे ऐकत होतो. त्याचं तोंड चालू होतं. नाही नाही ते बरळत तो पूर्वाला बोल लावत होता. त्याचं कारण होतं मी तिला सांगितलेली युक्ती.झालं असं होतं.संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पूर्वा शांतपणे रूमवर गेली. तिने आवरलं आणि मी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी सात वाजता ती अनंत सरांच्या घरी गेली. सर आणि काकू घरी होत्या. रितेश ही योगायोगाने घरीच होता. रूम सोडून गेली असली तरी तिने त्यांच्याकडे जाने येणे ठेवले होते.