सकाळचा शांत उजेड घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात पसरत होता. दरवाज्याच्या फटीतून येणारा सूर्यप्रकाश जणू हलकासा स्पर्श करून म्हणत होता, “उठा… आजचा दिवस नवीन आहे.” सौरभ उठून किचनकडे चालला. गॅसवर चहा उकळत होता. अनाया नेहमीप्रमाणे मुलाची शाळेची पाटी, डबा, बाटली तयार करत होती. हे दृश्य रोजचंच होतं. पण या रोजच्या दृश्यात एक गोष्ट मात्र कायम सारखीच राहिली होती दोघांमधली शांतता. ही शांतता बाहेरून पाहताना सुखद वाटली असती, पण आतून ती शांतता नव्हे, तर दुरावा होता. मुलगा उठला. अनाया त्याला जवळ घेऊन हळूच म्हणाली, “चल रे झोपाळू, आज उशीर झाला आहे.” त्या क्षणी सौरभने तिच्याकडे पाहिलं. तीच ती स्त्री जिच्यासोबत तो पंधरा वर्षांपासून