वकिली हिसका अमरावतीला १९६० च्या दशकात घडलेली गोष्ट आहे. मिलिंद आणि त्याचा मित्र सिनेमा बघायला गेले होते. शो संपल्यावर रात्री साडेनऊला घरी परतत असतांना इरविन हॉस्पिटल च्या चौकात त्यांना एका पोलिसाने थांबवले. मिलिंदने सायकल थांबवली. दोघेही खाली उतरले. “कुठे निघालात एवढ्या रात्री?” – पोलीस. “घरी जातो आहे.” – मिलिंद. “कुठे गेला होता?” – पोलिस “सिनेमाला.” – मिलिंद. “सायकलला लाइट का नाहीये” – पोलिस. मिलिंद जवळ उत्तर नव्हतं. त्याकाळी सायकल ला एक कंदीला सारखा दिवा असणं हा नियम होता. सायकलला लाइट बसवण्याची हॅंडल च्या खाली खास व्यवस्था असायची. “डबल सीट चालला आहात. कोण आहे हा?” – पोलिस. “मित्र आहे.” – मिलिंद.