खाजगी डॉक्टर गाठला तर तो गपाचुपीत गर्भपात करून ईमलीला मोकळी करील आणि सुऱ्या ईमलीचा बेत धुळीला मिळेल, त्यापेक्षा सिव्हील हॉस्पीटलला अॅडमिट व्हायचं... आपल्याला सुऱ्यापासुन दिवस गेलेयत्, तो आपल्याशी लग्न करायला तयार आहे, मात्र आईबाबाचा याला विरोध आहे. ते जातपंचायतीला घाबरून आपल्याला जीवे मारतील. तेव्हा सरळ पोलिस केस करा नी सुऱ्याशी माझे लग्न लावून द्यायला आईबापाला भाग पाडा... असे सिव्हील हॉस्पीटल मधल्या डॉक्टरांना सांगायचे पण या प्रकाराची मिटवा मिटवी करू द्यायची नाही असे त्याने ईमलीला बजावले. कल्लाप्पा नाना भाव्यांची टॅक्सी घेऊनच बिऱ्हाडी आला. ईमली, तिची आई टॅक्सीत बसल्या. “आपून सिविल हॉस्पिटलमदी जाऊया” असं ईमलीने आईला अगोदरच पटवून सांगितलेलं.