प्रकरण १३ न्यायाधीश सक्षमा बहुव्रीही यानी नावाप्रमाणेच एक सक्षम वकील म्हणून प्रक्टिस सुरु केली होती. आणि वीस वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्यांची महिला न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. कोर्टात खटला चालू झाला. अॅडव्होकेट खांडेकर आपलं प्रास्ताविक करायला उभे राहिले. “या प्रकरणात मी वस्तुस्थितीदर्शक आणि संक्षिप्त अशी भूमिका घेणार आहे. बचाव पक्षाच्या वकिलांप्रमाणे कुठलीही नाट्यमयता आम्ही त्यात आणणार नाही. आमचं सादरीकरण हे गणितानुसार खात्री देणार आणि त्यातून नि:संदिग्धपणे अनुमान काढता येईल, अर्थ काढता येईल असं असणार आहे.” खांडेकर पुढे बोलू लागले.....“यावर्षीच्या सात ऑक्टोबरला चांडक चा मृत्यू झाला. वैद्यकीय पुराव्याच्या आधारे आम्ही दाखवून देऊ की रिव्हॉल्व्हर चांडकच्या अंगाला हृदयाच्या थोडंसं खाली, डाव्या बाजूला रोखलं गेलं होतं.