बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 2

  • 7.1k
  • 3.2k

पहाटे लवकर स्टेशन येणार असल्याने न चुकता मोबाईल मध्ये गजर लावला .. रात्री गाढ झोप लागल्याने सकाळी उठल्यावर फ्रेश वाटलं..गाडी अगदी वेळेवर "होन्नावर"ला पोहचली म्हणून बरं ,नाहीतर आमचं पूर्ण दिवसाचं वेळापत्रक कोलमडलं असतं..प्लॅटफॉर्मवर अजून अंधार होता... स्टेशनच्या मुख्य इमारतीत तेवढे दिवे दिसत होते.. सारी सृष्टी अजून धुक्याची दुलई पांघरून सकाळच्या झोपेत गुडूप होती..आमची बस अगोदरच येऊन उभी होती.. इथून आम्हाला अंदाजे 60 कि. मी. प्रवास करायचा होता..जोग फॉलच्या थोड आधी "ट्रिनिटी होम स्टे " मध्ये आमची फ्रेश होण्याची सोय केली होती..सुरवातीला थोडा वेळ बाहेर काहीच दिसत नव्हतं.. बसची काच सरकवून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला,पण थंड हवेच्या झुळकेने सर्वांगावर शहारे आणले..