एकनाथी भागवत -१४ श्रीकृष्ण उद्धव सवांद श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो देव निर्गुण । म्हणों पाहें तंव न देखें गुण । गुणेंवीण निर्गुणपण । सर्वथा जाण घडेना ॥१॥ सर्वथा न घडे निर्गुणपण । तरी घडों नेदिशी सगुणपण । नातळशी गुणागुण । अगुणाचा पूर्ण गुरुराया ॥२॥ अगुणाच्या विपरीत तूं गुणी । करिसी त्रिगुणगुणां झाडणी । पंचभूतांपासूनी । सोडविता जनीं जनार्दनू ॥३॥ ज्याचेनि जनांसी अर्दन । ज्याचेनि लिंगदेहा मर्दन । जो जीवासी जीवें मारी पूर्ण । तो कृपाळु जनार्दन घडे केवीं ॥४॥ जनार्दनाचें कृपाळूपण । सर्वथा नेणती जन । नेणावया हेंचि कारण । जे देहाभिमान न सांडिती ॥५॥