लॉकडाउन - बेरोजगार -भाग ९

  • 9.6k
  • 3.4k

रात्रीचा एक वाजला होता. सायंकाळपासून रिमझिम बरसणारा पाऊस आता मुसळधार कोसळू लागला होता. अधून – मधून विजा देखील चमकत होत्या. विजांमुळे होणार्‍या लख्ख प्रकाशामुळे दोन सेकंद का होईना सभोवतालची सृष्टी दिसत होती. बाहेरील सुकलेली झाडे एखाद्या पिशाच्चासारखी दिसत होती आणि विजेचा प्रकाश जाताच लुप्त होत होती. वार्‍यामुळे पानांची प्रचंड सळसळ होत होती. प्रत्येक पानाचा आवाज हा त्याचे अस्तित्व जपण्यासाठी धडपडत होता. अस्तित्व म्हणजे तरी नक्की काय असत? आपले असणे. या असण्याने कुणाला फरक पडत असला तर ठीक. नाहीतर काही नाही. मधूनच मांजराचे डोळे चमकत होते. अचानक ढगांचा मोठा गडगडाट होत होता. मधून मधून येणारे बेडकांचे आवाज देखील बंद झाले होते.