ती एक शापिता! (३) सकाळी आलेले वर्तमानपत्र सुबोधने उचलले. वर्तमानपत्रात तोच भ्रष्टाचाराचा विषय होता. जिल्हा परिषदेचे भ्रष्टाचार प्रकरण भलतेच गाजत होते. अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले होते आणि एक कारकून पुरता अडकला होता. त्याला हथकड्या पडल्या होत्या. ती बातमी वाचून सुबोध अस्वस्थ झाला. त्याच्या ह्रदयाची धडधड वाढली. त्याला वाटले, 'उद्या माझ्या कार्यालयातील भ्रष्टाचाराचा घोटाळा उघडकीस आला आणि साहेबांनी सारा दोष माझ्या माथी मारला तर? माझे आयुष्य खऱ्या अर्थाने आता सुरू होत असताना नसते लचांड मागे लागले तर? तसे मी साहेबांकडे हिस्सा मागतही नाही. साहेबच जुलमाने देतात. मी हिस्सा नाकारला तरी का साहेब हात आखडता घेणार आहेत? ते मारायचा तेवढा डल्ला मारणारच.