श्यामचीं पत्रें - 5

  • 7.9k
  • 2.1k

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. दत्तु नांवाचा एक लहान मुलगा संघ सोडून तुझ्या सेवा दलांत आला हें वाचून आनंद झाला. जातीय संघटनांनी हिंदुस्थानचा नाश चालविला आहे. भारतीय मनाला ही कीड लागत आहे. लाठी फिरवून कवाईत करून संघातील मुलांचीं शरीरें दणकट होतील, परंतु शरीरांतील मनें विषारी होत आहेत. आपल्या संघटनेंतील मुलांच्या कानांवर नवीन विचार ते जाऊं देत नाहींत. बौध्दिक गुलामगिरी निर्मिली जात आहे ! दुनियेंतील सर्व विचारांचा व प्रयोगांचा अभ्यास करून जर कोणी एखादा मार्ग पत्कारला तर ती गोष्ट निराळी, परंतु या जातीय संघटना मुलांची बुध्दिच मारीत आहेत. त्यांच्या आत्म्याचा वध करीत आहेत.