श्यामचीं पत्रें - 3

  • 8.5k
  • 1
  • 2.8k

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद तुझें पत्र नाही म्हणून काळजी वाटतें. पुन्हां आजारी तर नाहींना पडलास? तुझ्या वैनीची प्रकृतीहि बरी नव्हती. ती अधिक नाहींना बिघडली? तुला घरांत अधिक काम पडत असेल. स्वयंपाक करावा लागत असेल. वडिलांना साडेआठ वाजतांच कामावर जायचें. तुला पुन्हां लौकर शाळेत जायचें. वसंता, तूंहि माझ्याप्रमाणें लौकर मातृहीन झालास. आई नसणें म्हणजें संसारांतील, या जगांतील एका महान् सुखाला आंचवणें होय ! असो, तू धैर्यानें सर्व कांही करीत असशील, अशी मी आशा राखतो. तुझ्या वैनीला लौकर आराम पडो, अशी मी देवाची प्रार्थना करतों. प्रार्थनेशिवाय दुसरे मी येथून काय करणार?