श्यामचीं पत्रें - 1

(23)
  • 12.5k
  • 6
  • 5.3k

तूं मागें पुण्याच्या त्या सभेच्या वेळेस अकस्मात् मला भेटलास. सभा संपली होती. कांही तरुण विद्यार्थी माझ्याभोंवती जमले होते. त्यांतील बरेचजण केवळ स्वाक्षरीसाठीं उत्सुक होते. स्वाक्षरी घेऊन ते गेले. परंतु तूं घुटमळत उभा होतास. तुझ्या डोळयांत एक प्रकारची उत्कटता होती, उत्सुकता होती. मी तुझ्याकडे पहात होतों. तूं माझ्याकडे पहात होतास. जणूं डोळयांआड लपलेलें परस्परांचे रुप आपण पाहूं इच्छित होतों. तुझी-माझी पूर्वीची ओळख ना देख. परंतु त्या एका क्षणी तुझी-माझी ओळख झाली. कायमची ओळख ! आणि मी तुला प्रश्न केला. 'तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघांत आहांत का? ' तूं खाली मान घातलीस. तूं कांही बोलेनास. तुझे डोळे कसे तरी दिसले. आणि थोडया वेळानें पुन्हां तूं वर बघितलेंस. त्या बघण्यांत किती तरी भाव होते !