असं अत्यंत कोरडं नशीब. सध्या अठ्ठाविसावं वर्ष सुरूय. एक तरी स्त्री पाहिजे आता. स्थिरतेच्या मागं लागून आयुष्याची काळी धार बोथट होत आलीय. तेव्हाचं व्यक्तिमत्व फसवं होतं की आत्ताचं? तेव्हा निदान कसली तरी तीव्रता तरी होती. आता उरलाय फक्त सुस्त आळस. रात्र थंडपणं पडलीय अजगरासाराखी. तेव्हा रात्री अस्वस्थ, जागृत. शेखर पुन्हा याच शहरात आलेला आहे अशी बातमी यल्लप्पाला कळली. त्यानं पिस्तुल तपासून पाहिलं. “बहुतेक शहरांमधे मोठ्या रस्त्याला नाव देतातः “महात्मा गांधी रोड” त्यामुळं एम्जी रोडवर सगळी फाइव्हा स्टार हॉटेल्स, दारूचे बार्स, कॅबरे, उच्चभ्रू जुगारी अड्डे, महागडी दुकानं वगैरे सापडतात.” “मग काय त्यात? योग्यच आहे ते.” याच शहरात रात्री-बेरात्री भटकणं असायचं.