मुलांसाठी फुले - १

  • 12.5k
  • 2
  • 7.2k

फार जुनी गोष्ट आहे. त्या वेळेस आपल्या देशात एक राजा होता. उदार म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती. तो राजा कोणाला कधीही नाही म्हणत नसे. कोणाचीही इच्छा अपूर्ण ठेवीत नसे. त्याच्या तोंडातून नकार कधीच बाहेर पडला नाही. एके दिवशी राजा एकटाच गच्चीत बसला होता. आकाशात तारे चमकत होते. बागेतील रातराणीच्या वेलीचा वास येत होता. वारा हळूहळू वाहत होता. राजा विचार करीत होता. तो मनाशी म्हणाला, मी उदार म्हणून प्रसिद्ध आहे परंतु वास्तविक माझे असे मी काय देतो? प्रजेपासून मला पैसा मिळतो. त्या पैशांतूनच मी देणग्या देतो व उदार म्हणून मिरवतो. माझ्या स्वतःच्या मालकीचे मी काय दिले आहे? राजाच्या मालकीचे काय आहे? हे राजवाडे प्रजेच्या पैशातूनच बांधले. हे जडजवाहीर प्रजेच्या करातूनच विकत घेतले. ह्या माझ्या देहाशिवाय माझे असे काहीच नाही. माझी सारी मालमत्ता म्हणजे हा साडेतीन हातांचा देह. हा देह जर कुणी मागितला व मी दिला, तर मात्र मी खरा उदार ठरेन, खरा सत्वशील ठरेन.