०१ : दूरच्या ग्रहांवरची वारी
एकदा एका ग्रहावरच्या वासीयांनी आपल्यासारखी जीवसृष्टी कुठे आहे का हे शोधण्याचा चंग बांधला. वर्षानुवर्ष केलेली मेहनत आता फळाला येणार होती. त्यांनी खूप अशा उडत्या तबकड्या बनवल्या होत्या, ज्या प्रचंड वेगाने प्रवास करू शकत होत्या. सगळ्या योजना अगदी पद्धतशीर राबवून त्यांनी अवकाशात भरारी घेतली. तसा हा त्यांचा काही पहिला प्रयत्न नव्हता. याआधी देखील त्यांनी खूप ग्रहांच्या वाऱ्या केल्या होत्या. नेपच्यून आणि युरेनस वर त्यांचे तर सतत येणे जाणे होते. जणूकाही त्यांचे ते सुट्ट्या घालवायचे ठिकाण आहे. खरेतरी त्यांनी युरेनस वर आपली एक प्रयोगशाळा स्थापन करायची होती. तशी त्यांनी तिथे तयारी सुद्धा केलेली होती पण एखाद्या परक्या ग्रहावर उघड्यावर प्रयोगशाळा बांधणे म्हणजे अवकाशातून येणाऱ्या संकटाला आयते निमंत्रण म्हणून त्यांनी अशी प्रयोगशाळा बांधायला अवकाशातून दिसणार नाही अशा छुप्या जागेच्या ते शोधात होते. त्यांचे उद्दिष्ट खरतर दुसऱ्या ग्रहावर प्रयोगशाळा आणि आपली वसाहत बनवणे.
५ - ५ तबकड्यांचा गट बनवून ते सगळ्या दिशांना उडाले. अतिशय प्रगत असे त्यांचे तंत्रज्ञान होते. त्याच्या तबकड्या अतिप्रचंड वेगाने अवकाशात उडत होत्या. यावेळी त्यांनी आपल्या मर्यादा सोडून उड्डाण करायचे ठरवले होते. प्लूटो ग्रहावर पहिल्यांदा त्यांनी पाय ठेवला. भले नेपच्यून आणि युरेनस वर त्यांनी बराच वेळ घालवला असला तरी वाटेत लागणाऱ्या प्लुटो वर ते आले नव्हते. मुळात प्लुटो ग्रह खूप छोटा असल्याने त्यांनी कधी त्याचा विचार नव्हता केला.
प्लूटो ग्रह हा बर्फ, दगड, मिथेन आणि नायट्रोजनने बनलेला आहे. त्या ग्रहावर उतरताना त्यांना खूप अडचणी आल्या. जेव्हा जेव्हा ते पृष्ठभागाजवळ यायचे, तबकडीच्या उष्णतेने बर्फ वितळत जायचा. शेवटी कसेबसे त्यांनी तिथे लँडिंग केले. प्लूटोचे वातावरण अत्यंत विरळ असून ते नायट्रोजन आणि मिथेन पासून बनलेले आहे हे त्यांना समजले. नायट्रोजनमुळे प्लूटो ग्रहावर अत्यंत थंडी होती. तापमान जवळजवळ -२२९ डिग्री सेल्सिअस होते. एवढ्या गारठ्यात त्यांना काम करणे अशक्यच होते आणि जर इथे प्रयोगशाळा स्थापन केली तर तिला उबदार ठेवण्यास खूप खटाटोप कराव्या लागल्या असत्या. त्यामुळे त्यांनी इथे एवढ्या थंडीत जीवसृष्टी नसणार आणि इथे प्रयोगशाळा बनवण्यात काहीही अर्थ नाही हे त्यांना कळले. तरीही तिथे त्यांनी बरेच प्रयोग केले. त्याचवेळी त्यांनी प्लुटोला असलेल्या ५ चंद्राचा शोध लावला.
त्यांनी आता मोर्चा वळवला प्लुटोच्या सगळ्यात मोठ्या चंद्राकडे ज्याचे नाव आहे कॅरॉन. प्लूटो वरून उड्डाण केल्यावर अती थंड वातावरणात त्यांचा चांगलाच कस लागला. कॅरॉन हा प्लुटोचा चंद्र जरी असला तरी तो आकारमानाचा विचार केला तर तो प्लुटोच्या अर्धा आहे. पृष्ठभाग गोठलेल्या पाण्याच्या बर्फापासून आणि खडकांपासून बनलेला आहे. इथेही त्यांना जीवसृष्टी नाही मिळाली आणि त्यांनी लवकरच तो चंद्र सोडला. आता ते उतरणार होते स्टीक्सवर. हा प्लुटोचा चंद्र गोलाकार नाही आणि तिथले वातावरण नाही च्या बरोबर होते. सततचा उल्कापात आणि नसलेले वातावरण यामुळे त्यांनी हा चंद्र लवकर सोडून दिला. आता त्यांनी मोर्चा वळवला तिसऱ्या चंद्रावर निक्सवर पण तिथेही पृष्ठभाग गोठलेल्या पाण्याच्या बर्फाने बनलेला असल्याने त्यांनी तिकडे जास्त वेळ नाही घालवला. तिथे त्यांना मोठे खड्डे दिसले जे त्या चंद्रावर होणाऱ्या उल्कापाताचे होते. तिन्ही चंद्रावर जीवसृष्टी नाही आढळली. ते आता प्लुटोच्या चवथ्या चंद्रावर उतरत होते.
ते आता केरबेरोसवर होते. इथेही सारखीच कथा, गोठलेल्या पाण्याच्या बर्फापासून बनलेला पृष्ठभाग. ज्या वेगाने उतरले त्याच वेगाने परत उडाले. शेवटच्या चंद्रावर हायड्रावर जाताना त्यांना जाणवले की हा चंद्र खूप तेजस्वी आहे पण जवळ गेल्यावर त्यांना कळलं की यावर सुद्धा गोठलेल्या पाण्याचा बर्फ आणि वातावरण नाहीच. पदरी पुन्हा निराशाच. प्लुटो आणि त्याच्या पाचही चंद्रावर त्यांना जीवसृष्टी नाही आढळली.
मग त्यांनी त्यांच्या आवडत्या ग्रहावर युरेनसवर ठिय्या मांडला. युरेनसच्या २७ चंद्रावर जीवसृष्टी नाही हे त्यांना आधीच ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी नेपच्यूनच्या १५ चंद्रांना पालथे घातले. हाती निराशा. पण ते इतक्यात हार मानणार नव्हते. ते आणखी पुढे निघाले. ते प्रथमच इतक्या लांबवर आले होते. शनी ग्रहावर त्यांनी आता मुक्काम करायचा ठरवला, पण शनी ग्रह पूर्ण वायू आणि बर्फापासून बनलेला असल्याने त्यांना त्यावर उतरता येत नव्हते. ५५ तबकड्या सोडून बाकीच्या तबकड्या शनीच्या ८२ चंद्रावर निघाल्या. ज्या ५५ तबकड्या उरल्या होत्या त्या पुढे गुरु ग्रहाच्या दिशेने निघाल्या. हेलियम आणि हायड्रोजन गॅस ने बनलेल्या गुरु ग्रहावर सुद्धा त्यांना उतरणे अशक्य होते. त्याच्या भोवतालच्या ९५ चंद्रावर जाण्यापेक्षा सर्वात मोठ्या चार ग्रहांकडे मोर्चा वळवला. ते सगळ्यात आधी गुरूच्या गॅनिमीड या सगळ्यात मोठ्या चंद्राकडे झेपावले. सगळ्यात पुढे उडणाऱ्या तबकड्यांच्या यंत्रणा अचानक सदोष रीडिंग दाखवू लागल्या. त्यांचे कंपास उलटसुलट फिरू लागले. त्यांनी पटकन आपली दिशा बदलून गॅनिमीड पासून लांब गेले. त्यावेळी मात्र त्यांची यंत्रणा पूर्ववत झाली. याचा अर्थ असा होता की गॅनिमीड या गुरूच्या सगळ्यात मोठ्या चंद्राला स्वतःचे असे चुंबकीय क्षेत्र आहे. ५५ मधल्या ५ तबकड्या त्या चंद्राला घिरट्या मारू लागल्या. गॅनिमीड चंद्र हा सिलिकेट खडक आणि बर्फापासून बनलेला असून त्या जाड बर्फाच्या खाली खाऱ्या पाण्याचा समुद्र असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. गॅनिमीडचे पातळ वातावरण हे ऑक्सिजनने बनलेले आहे.
बाकीच्या ५० तबकड्या आता निघाल्या गुरूच्या दुसऱ्या मोठ्या चंद्राकडे, कॅलिस्टोकडे. हा गुरूचा चंद्र गुरुपासून सगळ्यात लांब अंतरावर आहे. हा चंद्रसुद्धा खडक आणि बर्फापासून बनलेला असून बर्फाखाली जवळपास १०० किमी अंतरावर अत्यंत थंड असा खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे असे त्यांच्या निदर्शनास आले. ५० मधल्या ५ तबकड्या आता कॅलिस्टो भोवती फिरू लागल्या. कॅलिस्टोचे वातावरण कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन पासून बनलेले आहे. त्यांनी आणखी एक निष्कर्ष नोंदवला.
उरलेल्या तबकड्या निघाल्या आता गुरूच्या तिसऱ्या मोठ्या चंद्राकडे, आयओकडे.